राजकारण
मानवाच्या उत्क्रांतीच्या एका नव्या टप्प्यामध्ये टोळ्यांच्या रोजच्या भांडणांमध्ये त्यांचे म्होरके तयार झाले असावेत. कालांतराने या मोरक्यातून पुढे राजेरजवाडे यांची निर्मिती झाली असावी. त्यानंतर त्या त्या प्रदेशासाठी तो राजा अशी पद्धत रूढ होत गेली असावी. त्यात नंतर प्रगल्भता येत येत आली असेल. राजे राज्य करता करता राजकारण, समाजकारण, अर्थकारण, धर्मकारण, इत्यादी गोष्टीं उदयास आल्या असाव्यात. ह्या प्राचीन बाबी आहेत. त्या अशाच घडल्या असतील असे नाही. त्या अशा घडव्यात असेही नाही. पण उत्क्रांतीचा बहुतांश इतिहास याच मार्गाने जातो. माणूस अगदीच सुरुवातीच्या कालखंडापासून समूहाने वावरत होता. समूहाला ताब्यात ठेवण्याचं काम ज्याला चांगलं येत होतं तो मोरक्या....! त्यातून पुढे राजाची निर्मिती व मग पुढे समाजकारण, राजकारण, इत्यादी बाबींचा उदय होतो. प्रजेचे पालन-पोषण करत असताना, या सर्व बाजूंवर तितक्याच प्रकर्षाने व परिणामकारकरित्या लक्ष ठेवणे गरजेचे आहे. समाजहितासाठी वरील सर्व गोष्टी योग्य व फक्त आणि फक्त समाजहित डोळ्यासमोर ठेऊन करणं म्हणजे समाजकारण होय. धर्मासाठी राजानं झटणें, धर्माचे रक्षण शत्रूपासून करणं, धर्मस्वातंत्र्य प्रजेला बहाल करणे, इत्यादी गोष्टी करणे म्हणजे धर्मकारण होय. अशा अनेक बाबींवर राजा यशस्वीपणे तोंड देतो. आपल्या प्रजेला शक्य त्या पद्धतीने सुखी ठेवण्यासाठी राबतो. जेवढी प्रजा खूश, सुखी तेवढा राजा यशस्वी. प्रजेची हरएक प्रकारे सेवा करणे, म्हणजे राजधर्माचे पालन करणे. जो राजा योग्य प्रकारे राजधर्माचे पालन करतो, तो लोककल्याणकारी राजा होय. प्रजा व राजा यांचा ताळमेळ योग्यप्रकारे झाला पाहिजे. त्यामुळे राज्याचे कल्याण होते. राज्याची प्रगती होते.
आपण सगळेजण एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावरून आत येऊ पाहतोय. नव्हे आलोय सुद्धा...! सध्यातरी आपण प्रगत समाजामध्ये आहोत. वरील संकल्पना जशाच्या तशा आपल्याला लागू होत नसल्या तरी वेगवेगळ्या माध्यमातून त्या सगळ्यातून आपण जात आहोत. अर्थकारण, समाजकारण, धर्मकारण व राजकारण या सर्व बाबींना आपण स्पर्श करतो. जोपर्यंत समाज व्यवस्था अस्तित्वात आहे, तोपर्यंत या बाबी जिवंत राहतील. किंबहुना त्या जिवंत ठेवल्या जातील. कारण उत्तम समाज व्यवस्थेसाठी पोषक अर्थव्यवस्था, निकोप समाज व सर्वव्यापक राजकारणाची आवश्यकता असते.
समाज अनेक रूढी, परंपरा, श्रद्धा व अंधश्रद्धा या व अशा अनेक गुण व अवगुणांनी व्याप्त आहे. त्याच्यामध्ये चांगले व वाईट गुण आहेत. पूर्वी टोळीयुद्ध होत. वर्चस्व सिद्ध करण्यासाठीच ही टोळीयुद्ध होत होती. त्यानंतर राजा राजांमध्ये लढाया झाल्या. त्याही वर्चस्वाच्या लढाया होत्या. अशा लढाया करून त्या राजाचे राज्य किंवा प्रांत काबीज केला जात होता. त्यानंतरच्या काळामध्ये देशादेशात युद्ध झाली. आपापल्याला देशाचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ती युद्ध होती. अशा अनेक युध्दांमुळे समाजावर खोल परिणाम झालेले दिसून येतील. त्यातील काही युद्धे तर अतिविनाशकारी होती, हे आपण जाणतो. युद्धातील चांगल्या व वाईट परिणामांचा प्रभाव थेट समाजावर होतो. युद्धातील दाहकता समाजावर शेकली जाते. युद्धनीती समाजाला डोळ्यासमोर ठेवून आखली जाते. युद्धातील अनेक कावे व डाव समाजाचे रक्षण किंवा विनाश करण्यासाठी आखलेले असतात. देशांतर्गत झालेल्यां युद्धामध्ये अशी युद्धे अनेक देशांनी जिंकलीतही. पण युद्धाचे परिणाम अनेक वर्षांपर्यंत तिथल्या समाजव्यवस्थेवर झालेले आपणास पहावयास मिळतील. दुसऱ्या महायुद्धानंतर अशा प्रकारची दाहकता जगासमोर आली. दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक राष्ट्रे अक्षरशः भिकेला लागली. रशिया व अमेरिका सोडली तर बाकी जवळजवळ जग पुढील अनेक दशकं गरिबी व सामाजिक विषमतेचा सामना करीत होती. युद्ध सर्व गोष्टींवर सर्वार्थाने उत्तर असू शकत नाही. युद्धाला योग्य प्रकारे कलाटणी देता येऊ शकते. युद्ध करण्याने युद्धासाठीचे प्रश्न सुटतीलही. पण युद्ध न करता हे प्रश्न सोडवण्यासाठी हुशार, मुत्सद्दी राजकारण्यांची आवश्यकता असते. ठाम तत्वे घेऊन, तितक्याच ठामपणे समाजापुढे मांडणारा तत्त्ववेत्ताच युद्धातला दुसरा पर्याय आहे.
भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामामध्ये अनेकांनी प्राण गमावले. सर्वस्व अर्पण केलं. सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रजांवर आक्रमण करून, युद्ध करून, देशाला स्वातंत्र्य मिळवूयात असा विचार केला. त्यांचा तो विचार काही अंशी पूर्णत्वास जाऊ शकला नाही. कदाचित इथल्या मातीला रणसंग्रामचा विचार रुचला नसावा. कोणतही कारण असूदेत. सुभाषचंद्र यांचा बेत तडीस गेला नाही. अनेकांनी देश स्वतंत्र करण्यासाठी कंबर कसली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सुभाषचंद्र बोस यांच्यानंतर लोकमान्य टिळक उठून दिसतात. टिळकांनी जहाल विचारसंघर्ष स्वातंत्र्यप्राप्तीसाठी केला. अनेक जळजळीत अग्रलेख लिहून जणू इंग्रजांच्या बापालाही आपण घाबरत नसल्याचे त्यांनी अनेक वेळा दाखवून दिलं. टिळकांचा हा प्रयत्नही देश स्वतंत्र करण्यासाठी पुरेसा ठरला नाही. पूर्ण स्वातंत्र्याची व्याख्या टिळकही पूर्ण करू शकले नाहीत. दरम्यानच्या काळात अनेक योद्धे आपापल्या परीनं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कंबर कसत होते. कमीअधिक प्रमाणात ते त्यात यशस्वीदेखील होत होते. त्यानंतरच्या कालखंडामध्ये मोहनदास करमचंद गांधी यांचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला व स्वातंत्र्यप्राप्तीची संपूर्ण समीकरणच या माणसाने बदलून टाकली.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या प्रवासात गांधीजींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या कालखंडामध्ये महात्मा गांधीजी नसते तर कदाचित अनेक रक्तरंजित संघर्ष आपल्याला पहावयास मिळाले असते. देश फक्त भांडवलशाही किंवा अर्थकारणावर कधीच चालू शकत नाही. कोणताही देश त्या देशाला दिलेल्या विचारांवर चालतो. तो विचारांचा वारसा जोपासतो, विचारांचे सौंदर्य अभ्यासतो व शक्य असल्यास त्या सुंदर विचारांच्या पायघड्या स्वतःच्या आयुष्यात अंथरतो. भारतामध्ये असे विचार पेरण्याचे काम महात्मा गांधीजींनी केलं. देशवासियांनी त्यांचे विचार मान्य केले व कालांतराने स्वीकारले. त्या काळात देशवासीयांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतले. त्यांना साथ दिली. तीही मौलिकपणें.....! देशाने गांधीजींना बळ दिले. पाहता पाहता सत्याग्रह, अहिंसा, मुकमोर्चे, इत्यादीमध्ये देश अखंड बुडला. स्वातंत्र्यप्राप्तीची नवीन पद्धती गांधीजींनी शोधली. सुरुवातीसुरुवातीला गांधीजींची ताकत इंग्रजांना ओळखता आली नाही. गांधीजी स्वतःच्या तत्त्वज्ञानावर प्रचंड ठाम होते. त्यांना विचलित करण्याची हिंमत कोणातच नव्हती. गांधीजींनी अत्युच्च मुल्ये घेऊन स्वतःच्या आयुष्याची आखणी केली होती. सुंदर मूल्यांमध्ये बदल त्यांना कदापि मान्य नव्हता. एक अनोखी,आग्रही व ठाम भूमिका गांधीजींनी संपूर्ण देशासमोर ठेवली. लढ्याला व्यापक स्वरूप दिले. संपूर्ण समाज अक्षरश ढवळून निघाला. चैतन्याचा संचार जेव्हा समाजामध्ये होतो तेव्हा परिवर्तन अटळ असते. असे परिवर्तन स्वातंत्र्यरूपानं संपूर्ण भारताने पहिले. भारतीय समाजव्यवस्थेची बांधणी मुळात प्रेम, परोपकार, सहिष्णुता, त्याग, अहिंसा, भूतदया या व अशासारख्या उच्च विचारांवर आधारित आहे. गांधीजींनी ह्या तत्वांना आपली हत्यारे बनवली. कोणत्याही रणसंग्रामामध्ये तरुणवर्ग जास्त सहभागी व अग्रेसर असल्याचं आपल्या लक्षात येईल. किंबहुना तरुणांशिवाय आपण लढाया जिंकू शकत नाही. भारतीय रणसंग्राम याला अपवाद आहे. भारतीय स्वातंत्र्यलढयात तरुण तर होतेच; पण तरुणांबरोबर वृद्ध, बालके व महिलाही मोठ्याप्रमाणात सहभागी असल्याची नोंद आहे. त्यामुळेच हा लढा व्यापक झाला. जनमानसात रुजला. अशा प्रकारे सर्व समाज सहभागी होणे म्हणजे क्रांती व परिवर्तन होणारच....! ते झालंही. हा गांधीजींच्या विचारांचा विजय होता. भरताआधी व भरतानंतर अनेक देश स्वतंत्र झाले. यात समाजाच्या सर्व थरातील लोक सहभागी नव्हते. ही जादू फक्त भारतातच झाली आणि ती फक्त गांधीजींमुळेच झाली. कोणताही देश विचारांवर चालतो. समाजाला ठाम विचार देणारा कोणी तत्ववेत्ता असेल तर लोक त्याचे विचार स्वीकारतात व आचरणात आणतात. संबंधित व्यक्तीला डोक्यावर घेतात. गांधीच्या बाबतीत नेमकं तेंच झालं. गांधी विचारांची त्सुनामी आली जणू....! लोक भारावून गेले. लोकं त्यांच्या विचारांनी प्रेरित झाली; पण मग शेवटी प्रश्न असा पडतो की संपूर्ण समाज सहभाग गांधीजींनी कसा शक्य करून दाखविला? समाज आदर्श तत्वांची नेहमीच वाट पाहतो. अशी आदर्श तत्वे घेऊन येणाऱ्यासाठी समाज डोळे लावून वाट पाहतो. त्याचे निरीक्षण करतो. त्याचा अभ्यास करतो. त्याला ते पटले तर अशा विचारांना पाठिंबा देतो. साथ देतो. गांधीजी जगत असलेले तत्त्वें तर महान होतीच पण त्यांच्या आयुष्याची आखणी त्यांनी जाणीवपूर्वक या चांगल्या तत्वांना पोषक स्वरूपात करून घेतली होती. अंतर्बाह्य सत्य तत्व गांधीजींच्या आयुष्यात असल्याचे लोकांनी बारकाईनं पाहिलं. आदर्श तत्वाज्ञान अंगीकारण्यासाठीच असतं. ते अनेकांनी अंगीकारलं. त्यामध्ये वयाची अट नव्हती. संपूर्ण समाज सहभाग त्यामुळे आपोआपच सहज शक्य झाला. त्यामध्ये तरुण आले, वृद्ध आले, महिला आल्या व या सर्वांमुळे लहानगेसुद्धा आले. गांधीजीच्या स्वातंत्र्यलढ्यात 'चले जाव'चा नारा देणारे अनेक चिमुकले जीव होते हे विसरून चालणार नाही. अशाप्रकारे सर्व समाजस्तर रणसंग्रामात सहभागी झाला. हिंसा प्रत्येक प्रश्नावर उत्तर कधीच असू शकत नाही. उलट भारतीय समाज पारंपरिकरीत्या शांतताप्रिय आहे. भारताने कधीच कोणत्या देशावर आक्रमण केलं नाही. जगाच्या पाठीवर स्वातंत्र्यप्राप्तीसाठीचा कोणत्याच देशाचा लढा शांततापूर्ण नाही. किंबहुना लढा म्हटले की हिंसा आलीच; पण जगात भारत हा एकमेव देश आहे, जिथे लढा झाला पण हिंसा झाली नाही. अहिंसेने, सत्याने व उच्च तत्त्वांनी भरून तो लढा झाला. क्रांती झाली पण रक्तपात झाला नाही. क्रांती झाली पण ती रक्तरंजित लढाई नव्हे तर प्रभावी विचारांची झाली. गांधीजींचे तत्वज्ञान सगळ्या देशासाठी अत्यंत उपयुक्त ठरलं. गांधीजी त्यात पूर्णपणे यशस्वी झाले. भारतीय समाजव्यवस्थेवर गांधींचा प्रभाव खोलवर रुजला गेला. जनतेला युद्ध कोणत्या स्थितीत मान्य नसते. संघर्षातून नवीन संघर्ष जन्माला येतो. युद्धातून नवीन युद्ध जन्म घेतं. युद्धाशिवाय संघर्षाची व्याख्या पूर्ण होत नाही. युद्ध व संघर्ष एकच आहेत. गांधीजींनी मात्र युद्ध व संघर्ष वेगळे केले. संघर्ष केला पण युद्ध नाही.गांधीजी जिंकले पण लढाई झाली नाही. स्वतंत्रप्राप्ती झाली पण अतिशय कमी रक्त सांडून झाली. त्यानंतरच्या भारताच्या जडणघडणीत गंधाजींचे विचार दिपस्तंभाप्रमाणे आधारभूत मानले जातात. यापुढेही आपण गांधीजींच्या विचारांना ज्या ज्या वेळी फाटा देऊ तेव्हा तेव्हा आपल्याला त्याची जबर किंमत मोजावी लागेलं. भारत व गांधीजी हे अतूट नाते आहे. गांधी विचाराने हा देश जगभर ओळखला जातो.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा भारत देशाचा प्रवास फक्त राजकारण या एकाच गोष्टीभोवती सुरू आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गांधीजींनी देशाचं नेतृत्व करावं असं मत अनेकांनी व्यक्त केलं. ठामपणे नकार देत गांधीजी त्यापासून जाणीवपूर्वक दूर राहिले. कदाचित तो आपला राजकिय तोटा झाला असंही म्हणावं लागेल. गांधीजींशिवाय स्वातंत्रोत्तर सुरू झालेला देशाचा राजकीय प्रवास आज मितिस अत्यंत भयंकर स्थितीत पोहोचल्याच आपल्या लक्षात येईल. सत्तेसाठी कोणत्याही थराला पोहोचणारे राजकारणी समाजासाठी घातक आहेत. माझ्या मते गांधीजी जर राजकारणात सक्रिय झाले असते तर तिथेसुद्धा त्यांनी आपल्या विचारांचा ठसा उमटवला असता. त्यामुळे अनेक आदर्श तत्त्वें राजकारणात समाविष्ट झाली असती. राजकारणाला; विशेषतः भारतीय राजकारणाला नैतिकतेची किनार गांधीजींमुळे लागली असती, यात दुमत असण्याचे कारण नाही. भारतीय राजकारणाचा दर्जा उच्च स्तरापर्यंत पोहोचला असता. निकोप समाजव्यवस्था त्यामुळे निर्माण झाली असती. राजकारणातील सत्तापिपासूवृत्ती बळावण्यास काही प्रमाणात आळा बसला असता. आजचा राजकारणी सत्तेसाठी वर्तणुकीचा कोणताही स्तर लिलया पार करतोय. गांधीजींच्या राजकीय सहभागामुळे दर्जात निश्चित सुधारणा झाली असती. त्यांच्या राजकारणाचा आदर्श नवीन येऊ पाहणाऱ्या राजकारण्यापुढे राहिला असता. सध्या झालीय इतकी राजकारणाची वाताहात कदाचित झाली नसती. गांधीजी राजकारणात असते तर कदाचित कल्पनेपलीकडे राजकारणाचा प्रवास आपल्याला पहावयास मिळाला असता.
राजकारणामध्ये काही विचार घेऊन समाजापुढे जावे लागते. राजकीय गुरूंची आवश्यकता व उपयुक्तता फार मोठी आहे. राजकारणातील भीष्माचार्य म्हणजे राजकारण पूर्णपणे त्यांच्या अंगी असल्याचे मानले जाते. यशवंतराव चव्हाणांनंतर महाराष्ट्रामध्ये आदर्श घ्यावा असे फारच कमी राजकारणी उदयास आले. कोणत्याही राजकीय व्यक्तीचा राजकीय प्रवास अनुकरणाने सुरू होतो. राजकारण हे काही आखाडे बांधून केले जाते. असे धूर्त आराखडे मनामध्ये तयार करण्यासाठी धूर्त व हुशार गुरूंची आवश्यकता असते. राजकारण स्वतःपासून सुरू होऊन समाजाजवळ व समाजहितासाठी संपलं पाहिजे. राजकीय व्यक्तीचा प्रवास स्वतःपासून सुरु होऊन तो समाजाच्या कल्याणामध्ये संपला नाही तर मोठाच अनर्थ संभवतो. उत्तम गुरूंचा उत्तम शिष्य स्वतःच स्थान मजबूत करून समाजाच हित साधल्याशिवाय गप्प बसत नाही. राजकारण स्वतःपासून सुरू होऊन स्वतःभोवती संपलं तर त्यातून राजकीय स्वार्थ साधला जातो. त्यामुळे अशा व्यक्तीजवळ प्रचंड माया साचते व समाज प्रगतीपासून वंचित राहतो. पैशातून पैसा निर्माण होतो व समाजामध्ये अराजकता फोफावते. अज्ञान व आश्वासनांच्या भुलथापांत समाजाला गुरफटून ठेवले जाते. स्वतःचा विकास एवढी एकच गोष्ट केंद्रबिंदू मानून राजकीय व्यक्ती राजकारण करते. एकूणच समाजहितासाठी ही बाब अत्यंत धोकादायक आहे. सध्यातरी आपल्याकडे या अशा गोष्टींना पर्याय नाही. हे आपण सहन करतोय. अशा बाबी सहन करताकरता त्यांची सवय होते. सर्वार्थाने समाज मुका होण्याची वेळ हीच असते. समाजाची ताकद वेदनारहित होते. अशा बधिर समाजाला राजकीय व्यक्तीचं राजकारण कारणीभूत असतं. मूक व बधिर समाज कोणतच भाषण देऊ शकत नाहीत. अज्ञानी लोक राजकारण्यांना जाब विचारू शकत नाहीत. एखाद्याने त्यातूनही जाब विचारण्याचा प्रयत्न केला; तर येनकेनप्रकारे त्यांचा आवाज थंड केला जातो. विकसनशील भारतावर मारलेला हा मोठा आघात आहे. अशाने विकसित भारताचे स्वप्न आपण कधीच पूर्ण करू शकणार नाही किंवा विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी खूप वेळ तरी जावा लागणार आहे.
लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्याला लोकांनी निवडून दिलं तो लोकप्रतिनिधी....! भारताचा राजगाडा भारतीय घटनेनुसार चाललेला आहे. घटनेला सर्वोच्च स्थान त्यामुळेच आहे. देशहित डोळ्यासमोर ठेवून घटनेचे प्रत्येक कलम लिहिलं गेलं आहे. त्यामध्ये सामान्य माणसाचं हित अगदी बारकाईने जोपासले गेलं आहे. लोकप्रतिनिधींची निवड लोकशाही पद्धतीने होते. लोकप्रतिनिधींची निवडप्रक्रिया व त्याला निवडून दिलेल्या कालावधी यामधील घटनांना राजकारण म्हणतात. भारतीय राज्यघटना जात व धर्मरहीत आहे. पण अनेक निवडणुकीत जातीचे उकारें उकरले जातात, धर्माच्या भिंती समाजासमाजात उभ्या केल्या जातात. निव्वळ विषाची पेरणी केली जाते. जातीजातीमध्ये व धर्माधर्मांमध्ये हाडामासाचं वैर राजकारणी पेरतात व त्याचचं राजकारण होत. खऱ्या अर्थाने निपक्ष लोकप्रतिनिधींची निवड प्रक्रिया पार पडणे गरजेचे आहे. राजकीय उमेदवारांचा प्रचाराचा स्तर उच्च दर्जाचा असावा. जिंकणं हा निकष डोळ्यासमोर ठेवून साम, दाम, दंड व भेद या नीतीने समाजामध्ये मतांची मागणी होते. बरं जातीरहित व धर्मरहित प्रचार करायचा म्हटलं तरी प्रतिस्पर्धी उमेदवार आपले मनसुबे धुळीस मिळवेल ही भीती उमेदवारांच्या मनात असते. जिंकण्याची जिद्द व प्रतिस्पर्ध्याच्या प्रत्येक कुटील डावावर प्रतिडाव रचण्यानं राजकारणातील रंग वाढतात. ही स्पर्धा निकोपापासून विकोपापर्यंत जाते. उमेदवारांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाही काही प्रमाणात कमी पडते. एकूणच लोकशाहीलाच हरताळ फासला जातो व एकाची लोकप्रतिनिधी म्हणून निवड होते. दरम्यानच्या काळात बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलेलं असतं. निवड चुकल्याचे बऱ्याचदा आपल्या लक्षात येते; पण तोपर्यंत नवीन ताजे जिंकून आलेल्या प्रतिनिधीचे राजकारण सुरू झालेले असतं. त्या राजकारणाला समाज बळी पडतो. विकासकामेही होतात; पण तुलनेनं राजकारण जास्त होतं. काही इलाज चालत नाही. अशा लोकप्रतिनिधींचं बोट धरून चालावं लागतं. समाजहितासाठी तेच गरजेचे आहे. समाजाच्या तळमळीसाठी व त्यांच्या विकासासाठी झटणारे हजारो लोकप्रतिनिधी भारताला हवे आहेत. सत्तेचं राजकारण स्वहितासाठी वापरणं समाजाच्या पथ्यावर पडतं; पण तळमळीने समाजाला विकसित करणारा लोकप्रतिनिधी डोक्यावर घेतल्याशिवाय समाज स्वस्थ बसत नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर इथं अनेक गोष्टी करायच्या राहून गेल्यात. आपल्या राजकारणाचा प्रामुख्याने त्यासाठी वापर करणारा राज्यकर्ता जनतेच्या नजरेतून हिरो ठरतो. असे अनेक लोकप्रतिनिधी ज्यांना राजकीय वारसा किंवा वरदहस्त नसताना निवडून आलेत व तें लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेत. शिक्षण, आरोग्य व दळणवळण या मूलभूत गरजांबरोबरच औद्योगिक वसाहत निर्माण करून रिकामटेकड्या हाताला काम देणाऱ्या लोकप्रतिनिधींची समाज सदैव वाट पाहतो. चोखंदळ नजरेतून पाहिल्यास, ग्रामीण भारतात बेकारांची संख्या प्रचंड आहे. अशांना काम व तें कामही सन्मानानं मिळणं गरजेच आहे. बऱ्याच वेळा काम मिळतही पण ज्या सन्मानाची तो त्या कामातून अपेक्षा करतो; तो सन्मान त्याला मिळत नाही. पर्यायाने कामाआधी त्याला लाचार केलं जातं. त्यामुळे कामात अनेक चुका करतो. बऱ्याचदा आर्थिक कुचंबणा होते. तुटपुंज्या पगारातील लचका असे राजकारणी तोडून नेतात. बरं कुठं वाच्छताही करता येतं नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मार खावा लागतो. असे प्रश्नही काही प्रमाणात सोडविले गेले पाहिजेत. ग्रामीण भारतामध्ये बेरोजगारीबरोबरच अज्ञान व अंधश्रद्धा यांचा सुळसुळाट झाला आहे. काही ठिकाणी शहरी भागही याला अपवाद नाही. शिक्षणाने समाजामध्ये परिवर्तन घडू शकते, यावर राज्यकर्त्यांचा विश्वास असला पाहिजे. समाजातील अंधश्रद्धा शिक्षणाने आपोआप संपण्यास मदत होते. अज्ञान व अंधश्रद्धा यातूनच अनेकांच्या हातून गुन्हे घडतात. अशांवर चाप बसवण्याची जबाबदारीही राजकारण्यांची आहे. त्यानंतर आरोग्याचा प्रश्न आ वासून उभा आहे. भारतीय समाज गेली पन्नास-साठ वर्षे आजारी स्थितीत आहे; हे सांगायला कोणाची गरज नाही. आरोग्यव्यवस्था ठीक करण्यासाठी पुढील काही दशकं काम केलं तरी ते अपूर्ण राहील....! खाजगीपेक्षा शासकीय आरोग्यव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी लोकप्रतिनिधींना खूप वाव आहे. प्रत्येक गरीब व श्रीमंत व्यक्ती सरकारी दवाखान्यापर्यंत येईल अशी व्यवस्था तयार करणारा शासकवर्ग निर्माण झाला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठेही स्वार्थी राजकारण आणणं म्हणजे समाजाला आजारी ठेवणं होय. त्यानंतर दळणवळण आहे. रस्त्यांची दुरावस्था आपल्याकडे अनेकांची कंबरडी मोडून काढतात. रस्त्यांची गल्लीतगात्र अवस्थाच देशाच्या विकासासाठी धोक्याची घंटा आहे. देशातील रस्ते शरीरातील नाड्याप्रमाणे आहेत. त्यांची लांबी व मजबूती देशाची प्रगती सांगतात. आपल्याकडे कोण व कसे रस्ते बनवतात हा संशोधनाचा विषय आहे. सर्वप्रथम असे रस्तेच का बनवले जातात हा प्रश्न तयार होतो. रस्ता म्हणजे संबंधित गाव व शहराचा प्राण आहेत, हे लक्षात न येण्याइत आपल्याकडील राजकारण अज्ञानी नाही. स्वतःच घर भरून झाल्यानंतर तरी थोडं डांबर रस्त्यावर टाकावं. या भूमीचं आपण काही देणे लागतो; हेच अशी माणसे विसरून जातात. राजकारणाचा प्रवास असा दिशाहीन व विकास होऊनही विकासहिन होतो. एकूणच अनेक ठिकाणी राजकारण होतं व समाज विकासापासून दूर राहतो. अशाप्रकारच्या राजकारणाचा समाजावर खोल परिणाम होतो. लोकशाहीत हुकूमशाहीची वृद्धी होते व समाजामध्ये विषमतेची बीजं रोवली जातात.
राजकारण या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. गावपातळीपासून ते राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत इतरत्र सर्वत्र राजकारण आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशहिताला प्राधान्य दिले जाते. राष्ट्रीय स्तरावर राज्याचा विकास राजकारणातून साधला जातो. विभाग किंवा त्या त्या गटासंदर्भातील प्रश्न राज्यस्तरावरील राजकारणातून सुटतात. त्यानंतर अनुक्रमे जिल्हास्तर, तालुकास्तर व गावपातळीवरील राजकारण येतं. या सर्व स्तरात गावपातळीवरील राजकारण रंजक व चढाओढीचं ठरतं. अनेक मजेशीर किस्से ग्रामपंचायतीच्या निवडणूकीतीत घडतात. ज्यांना मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री बनण्याची स्वप्न पडतात, त्यांनी गावचा सरपंच होऊन पाहावं. ज्याने सरपंच म्हणून राजकारणाची सुरुवात केली व सरपंचकी शेवटपर्यंत टिकवली, तो राजकारणात कुठेही सहज निवडून येऊ शकतो. गाव, गावाच्या तऱ्हा, गावातील कार्यकर्ते व ठग संभाळणारा सरपंच हरहुन्नरी राजकारणी असतो. अनेक आश्वासन त्यांनी गावाला दिलेले असतात. काही पूर्णही करतो. काही शक्य नसतात. काही करायची नसतात; पण सरपंच नेहमीच मेळ घालणारं राजकारण करतो. गावाला घट्ट ठेवतो.
औपचारिक राजकारण गावपातळीपर्यंत येऊन तिथच तें संपतं. त्यानंतर अनौपचारिक राजकारण सुरू होतं. हे अनौपचारिक राजकारण वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या वेळी घडतं. आपण उठल्यानंतर झोपेपर्यंत अशाच राजकारणाचा भाग होतो. कदाचित आपल्याला त्याची जाणीव नसते; पण ह्याच राजकारणाला आपल्यापैकी अनेकजण बळी पडतात. घराघरात असलं राजकारण होतं. आप्तस्वकीयांत झालेलं राजकारण परस्परांत कटूता आणतं. अशी कटूता कमीअधिक काळ टिकते; पण इथं राजकारण होतं हे मात्र नाकारता येत नाही. कुटुंबाचे सदस्य परस्परविरोधी अघोषित भेदभाव करतात. विचारांची फारकत होते. त्यातून एकमेकांबद्दल इर्षा, द्वेष व मत्सर निर्माण होतो. कुटुंबाच्या एकजुटीला तडा जातो. सुखी घर कलहात कधी रुपांतरीत होतं, हे घरातील सदस्यांना समजत नाही. छोट्या-मोठ्या राजकारणाला आणखी एक उंबरठा बळी ठरतो. घराच्या भिंतींना तडा देणारं राजकारण घरासाठी घातक ठरतं. कुटुंबातील सदस्यांनी याचा बारकाव्याने अभ्यास करून कुटुंबहिताव्यतिरिक्त राजकारणाला थारा देऊ नये. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या हिताचे रक्षण होण्यास मदत होईल.
कामाच्या ठिकाणी, कार्यालयात होणार राजकारण हे त्यानंतर अत्यंत मजेशीर असतं. अनेक डावपेच इथं रचले जातात. काही प्रत्यक्षात उतरतात; तर काहीच तसेच धुळीत मिळून जातात. कंपन्यांमध्ये कामगार व अधिकारी, अधिकारी व वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ अधिकारी व मालक यांच्यामध्ये पावलोपावली राजकारण दिसतं. अनेकांवर त्यातून अन्याय होतो. नको असलेल्यांच्या गळ्यात माळा घातल्या जातात. या सर्व ठिकाणी राजकारणच होतं. अशा प्रकारच्या राजकारणापासून शासकीय कार्यालये तर कधी सुटत नाहीत. त्यामध्ये लोकहितार्थ राजकारण आणि स्वहितार्थ राजकारण होतं. राजकारणामध्ये कोणाला पायात घातलं जातं; तर कोणाला मांडीवर बसवलं जातं. कोणाला खांद्यावर; तर कोणाला डोक्यावर घेतलं जातं. त्यातून अनेक समीकरणांची गोळाबेरीज केली जाते व डावपेच आखले जातात. काही राजकारण्यांचे डाव यशस्वी होतात; तर काहींचे फसतात. यशस्वी झालेले हसतात; तर फसलेले मनाची समजूत घालतात. हसलेले व फसलेले असे दोघेही नव्या दमात पुन्हा राजकारणासाठी स्वतःला सज्ज करतात. राजकारणाचं वेड मात्र डोक्यातून निघत नाही. राजकारण व्यसनासमान आहे. त्याची सवय माणसाला स्थिर बसू देत नाही. किंबहुना जो स्थिर बसेल तो राजकारणातून अस्थिर झालाच म्हणून समजा....! राजकारण म्हणजे नशा आहे. पराभव झाला तरी त्याची झिंग डोक्यातून उतरत नाही. शेवटी राजकारण हे राजकारण असतं. ते तुमच्या आमच्या सर्वांसाठी, सर्वठिकाणी, सर्ववेळी होत असतं. असा माणूस शोधूनही मिळणार नाही, ज्याच्या बाबतीत राजकारण झालं नाही....! हे जीवन जगणे म्हणजेच एक राजकारणाचा डाव मांडणे आहे.त्यामुळे जरा जपून.....पुढे राजकारण सुरू आहे......सावध रहा....... हुशारीने जगा....... हुशारीनं जगणारा तो डाव जिंकतो. आयुष्याच्या प्रत्येक पावलावर राजकारण सोसावं लागतं. घरात राजकारण, समाजात राजकारण व कार्यालयात किंवा कामाच्या ठिकाणी राजकारण. अशा ठिकाणच्या राजकारणामध्ये लोकप्रतिनिधींच्या निवडीच्या प्रक्रिया नसतात. असतात त्या अस्तित्व टिकवण्याच्या,वर्चस्वाच्या व जगण्याच्या अघोषित स्पर्धा.....! ह्या स्पर्धेतून अनेक खेळ्या होतात, डाव प्रतिडाव होतात. काही योग्य; तर काही अयोग्य.…..! काही वरच्या तर काही खालच्या पातळीवरील राजकारण होतं. ह्या साऱ्या प्रक्रियेतून प्रत्येकाला जावं लागतं. अनेकजण यशस्वी होतात. अनेकांच्या वाट्याला निराशा येते; पण आपण प्रत्येकजण राजकारणी आहोत, हे मात्र तितकेच सत्य आहे.
जनकल्याणासाठीच राजकारण समाजमान्य आहे. लोकशाहीला असं राजकारण मान्य आहे. राजकीय व्यक्तीच्या राजकारणाचा मुख्य भाग याच लोककल्याणासाठी वापर करणे म्हणजे यशस्वी राजकारण होय. समाजामध्ये अनेक असह्य लोक आहेत. गरजू, अपंग व दारिद्र्याच्या खोल दरीच्या चक्रव्यूहात फसलेले अनेक जीव यातनायुक्त अज्ञानी जीवनयात्रा जगतात. अशांसाठी राजकारण त्यांना जगण्यातील शक्ती व बळ प्राप्त करून देईल. अज्ञानांच्या घरी ज्ञानाचा दिवा जळेल. दलितांना योग्य न्याय मिळेल. स्त्रियांना सन्मान व समानता मिळेल. तरूणांच्या हाताला योग्य काम मिळेल. ही व अशी अनेक कल्याणकारी कामे मार्गी लागतील. समाजातील अडचणींचा सूक्ष्मपणे अभ्यास होणे गरजेचे आहे. समाज व राजकारणी यांचा योग्य मेळ म्हणजेच विकासाचे राजकारण होय. आपल्याकडे दुर्दैवाने आवश्यक तेवढे बारकाव्याने समाजाकडे राजकारणी पाहताना दिसत नाहीत. एखाद्या सत्तेच्या खुर्चीत बसला की त्या खुर्चीला डिंक लावल्याप्रमाणे चिकटून बसतात. सालोन् साल एकच राज्यकर्ता पहावा लागतो. त्यातून विकास थांबतो. काळानुसार परिवर्तन आवश्यक आहे. वर्षामाघून वर्षे सत्तेत राहिल्याने कदाचित जनहित डोळ्यासमोर न दिसता फक्त सत्ता दिसायला लागते. त्यातून हुकूमशाहीवृत्ती बळावते. अशी हुकूमशाही आपल्या लोकशाहीत न परवडणारी आहे. सत्तेमध्ये घराणेशाही येऊ पाहत आहे. ती आली तरी चालेल; पण त्याच्याबरोबर समाजहिताचं विस्मरण होता कामा नये. पिढ्यान पिढ्या एखाद्या मतदारसंघाची जहागिरी उपभोगणारे अनेक राज्यकर्ते क्षणात जनतेने घरी बसवले आहेत. हे आपण अनुभवले आहे. राजकारण ही अशा कुणा एकाची मक्तेदारी असता कामा नये. राजकारणामध्ये कर्तुत्वाला व समाजहिताला प्रथम प्राधान्य दिले गेलं पाहिजे. जो विकास करेल तो सत्ता भोगील. विकासापासून जनतेला वंचित ठेवणारा राजकारणी जनतेपासून दूर ठेवला पाहिजे. सत्ता स्वतःच्या हितासाठी नसून अविरतपणे जनतेच्या कल्याणासाठी आहे, याच भान जो राज्यकर्ता ठेवतो तो जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवतो. जनकल्याण, जनतेचा विकास व संबंधित क्षेत्राचा कायापालट या व्यतिरिक्त स्वहितासाठी स्वार्थी विचार करणारा राज्यकर्ता कदाचित जनतेची ताकद विसरतो. जनता अशा पुढाऱ्यांना परिवर्तनातून उत्तर देते. अगदी नको असं म्हणण्याची पाळी समाजावर येईपर्यंत, अनेक राजकारणी सत्तेचा उपभोग घेताना दिसतात. अशा अनेक ठिकाणी न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं परिवर्तन आपण पहिलं आहे. मनातील कामाची उर्मी संपल्यानंतर अशा राजकारण्यानी इतरांना काम करण्याची संधी दिली पाहिजे. दुर्दैवाने आपल्याकडे अशा गोष्टी घडत नाहीत. अटीतटीची लढत होते. लढ्यात एकजण जिंकणार आहे हे माहीत असते; पण तरीही हा लढा होतो. पैशाचा चुराडा होतो. अनेकांचे श्रम वाया जातात. नको असताना अनेक आश्वासने दिली जातात. समाजाची दिशाभूल होते. पराभवाच्या कारणांच विश्लेषण केलं जातं. शेवटी पुढील पंचवार्षिक निवडणुकीसाठी हरलेल्या मनाची समजूत काढली जाते. संबंधीचा पराभव होऊनही मनाची समजूत काढून मन तयारकेलं जातं. भारतीय राजकारणातून असली मानसिकता हद्दपार करणे गरजेचे आहे.
भक्ती आणि राजकारणासाठी समाजाची गरज असते. लोकांची आवश्यकता खूप आहे. देव मी जाणला आहे, त्याचे रूप सांगायचे आहे; पण लोक नसतील तर सांगणे शक्य नाही. संत नेहमी विरक्त जीवन जगताना आपण पाहतो, ऐकतो. विरक्तीमध्ये एकांत येतो. या एकांताला संतसुद्धा कधी कधी कंटाळतात. एकांतात मुखातून उच्चारलेले शब्द आसमंतात निःशब्द होतात. ज्ञान त्यातून कमी प्रतीचं होतं. त्याची अवहेलना ज्ञानी पुरुषांनी केली असं होतं. म्हणून संतांनी समाजप्रबोधन केलं. त्यामध्ये प्रवचन, कीर्तन, निरूपण, चर्चा, भजन, इत्यादी बाबी येतात. या सर्वांसाठी लोकांची आवश्यकता असते. लोक नसतील तर त्याची किंमत संपते. राजकारणामध्येही तसंच आहे. समाजाची उपयुक्तता खूप वर्णिली जाते. समाज किंवा जनता राजकारणापासून अलिप्त कधीच केली जाऊ शकत नाही; किंबहुना समाजापासून अलिप्त राहून केलेली कोणतीही गोष्ट राजकारण असूच शकत नाही. लोकशाहीमध्ये मतांच्या राजकारणापायी अनेक कटू बाबी समाजामध्ये विषासारख्या पेरल्या जातात. त्या विचारांची उपयुक्तता किंवा टाकाऊपणा, त्याचे परिणाम याचे घेणे-देणे समाज व राजकारणी या दोघांनाही नसते. गर्दी ही अल्प बुद्धीची असते असं म्हणतात. गर्दीला कोणता चेहरा नसतो. गर्दीत थोडेच दर्दी असतात. राहिलेले असेच असतात. राजकारणी नेमके याच गोष्टीचा फायदा उठवतात. विचार हे विकार आहेत. मोठ्याने बोलले तर आपल्याकडे असे विकारी विचार वेगाने समाजात पसरतात. त्वेषाने केलेले प्रत्येक भाषणाला आपला समाज मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतो. राजकारण करत असताना राजकारण्यांनी असले व्यर्थ खटाटोप व शब्दांचा भडिमार जनतेच्या पदरी देण्यापेक्षा विकास व परिवर्तनाच्या सत्यकथा समाजापुढे मांडणे, हे समाजासाठी कधीही चांगले. समाज व राजकारणी यांच्यात परिपक्वता असेल तरच या बाबी घडतील. त्यातून राजकारण व समाजकारणही होईल. यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. आपल्याला यातून नवीन वैचारिक पातळी व प्रगल्भता पहावयास मिळेल.
प्रपंचात राहून राजकारण करणं यात नवे किंवा वावगे असे काही नाही. प्रपंच करून राजकारण करावें व या दोन्ही बाबी अत्यंत सावधपणे कराव्यात असें समर्थ रामदास स्वामी ठामपणे सांगून गेलेत.
मुख्य हरिकथा निरूपण l दुसरे तें राजकारण
तिसरे ते सावधपण l सर्व विषई ll
धर्मकारण, राजकारण, सावधपण व क्षमा या गोष्टी प्रपंचाच्या पाया आहेत. प्रपंचाला यामुळे यथार्थता मिळून जाते. तो सुरळीतपणे पैलतीरी जाण्यास मदत होते. राजकारणाला, म्हणून प्रपंचामध्ये अद्वितीय स्थान मिळते. राजकारण व प्रपंच सावधपणे करून किरकोळ अन्याय करणाऱ्यांना क्षमेचा धर्म दाखवा, असं समर्थांना अभिप्रेत आहे. तसे केल्याने आपलं हित तर होतंच पण समाजापुढेही आदर्श निर्माण केला जातो. आपल्याकडे मात्र यापेक्षा विचित्र घटना पहावयास मिळतात. उसने पाचशे रुपये देत नाही, म्हणून खून करणारे महाभाग आपल्यात आहेत. क्षमा ही अशी जीवावर उठणारी क्रूर गोष्ट नाही. क्षमेचा व सावधपणाचा व्यापक अर्थ आहे. स्वार्थाच्या ठिकाणी दाखवलेला सावधपणा घातकी प्रवृत्तीच द्योतक आहे.असला सावधपणा अनेकांच्या मुळावर उठतो. आपण क्षमा करतो पण समोरचा आपल्या आवाक्याबाहेर किंवा परिस्थिती आपल्या विरोधात असेल तरच.....! ती क्षमा कधीच असू शकत नाही. जगण्याची ती एक चाल निश्चितच असेल. जगताना अशा चाली चालून फार अंतर कापू शकत नाही. त्यासाठी चांगले विचार असणे गरजेचे आहे. असल्या चाली क्षमेत कधीच रूपांतरित होऊ शकत नाहीत. म्हणून त्यांचा वेगळा व तटस्थ दृष्टिकोन ठेवून विचार केला गेला पाहिजे. सर्वार्थाने जगण्याला व जगण्यातील राजकीय रंगांना वेगळा अर्थ प्राप्त होईल. त्याने नवीन राजकीय व सामाजिक उंची प्राप्त होईल. 100514 ©Harish Gore