Monday, 3 August 2020

चिंतन....... सद्भावनांचे........५



                                                                         दुःख



 भाषेमध्ये काही शब्दांच्या वाट्याला लावण्य, काहींच्या वाट्याला प्रेम, काहींच्या मान, काहींच्या वाट्याला अपमान आहे. काही शब्दांना वजन आहे.  काही हलकेफुलके तर काही जड आहेत. काही शब्द सुंदर, काही लोचट, काही खुळे, तर काही बावळट असतात. भाषा आशा अनेक शब्दसमूहांचा संच आहे. त्यातील दुःख हा शब्द आहे. दुःख हा शब्द क्लेशदायक आहे. या शब्दाला खूप यातना जोडलेल्या आहेत. त्याला स्वतःचं असं सौंदर्य नाही. दुःख या शब्दाने काळीज पिळवटून निघावं इतक्यात यातना या शब्दात आहेत. या शब्दाचा उच्चार करणे म्हणजे दुःख आहे. घडलेल्या दुःखी घटनेचे वर्णन म्हणजे दुःखाचा पाढा होय. ते कथन करणे, ऐकणे अथवा तो प्रसंग मनात आणन या सर्वात दुःखच दुःख विखुरलेल असत. दुःख अशी जिन्नस आहे, ती कोणालाच हवीहवीशी वाटत नाही. तिच्यापासून आपण कसं लांब राहू याच नियोजन प्रत्येकजण करतो.

प्रेमाच तसं नाही. प्रेम सर्वांना हवेहवेसे वाटते. आपल्यावर सर्वांनी प्रेम करावे, अशी रास्त अपेक्षा प्रत्येकजण करतो. प्रत्येकाची अपेक्षा पूर्ण होते न होते हा भाग वेगळा. पण प्रेमाची अपेक्षा लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण करतात. दुःख नकोनकोसे असते. दुःखाची सावलीसुद्धा आपल्या जवळ येऊ नये अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. वास्तविक प्रेमाकडून व दुःखाकडून आपली अपेक्षा रास्त आहे. पण या अपेक्षा मोठ्या सफलतेने पूर्ण होताना दिसत नाहीत. याला अनेक कारणं असू शकतात. मुख्य कारण अपेक्षा अर्थात आशा. प्रेमाकडून प्रेमाची आशा आणि दुःखाकडून सुटकेची अर्थात दुःख दूर करण्याची आशा. या दोन्ही बाबतीत सदैव दुःख आहे. प्रेमाची अपेक्षा करावी  आणि ते मिळत नाही, म्हणजे दुःख. दुःखाकडून दुःख दूर राहण्याची आशा आणि दुःख आपल्या पुढ्यात येऊन हजर, म्हणजे दुःख होय. या दोन घटनांचा सारासार विचार केला तर अपेक्षा किंवा आशा दुःखाला कारणीभूत होते. कोणाकडून किती आशा धरावी याचं ताळतंत्र आपण सोडून दिलेले असत. त्यामुळे पुढील दुःखमय प्रवास आपल्या वाट्याला येतो. तसा तो येऊ नये ही प्रत्येकाची अपेक्षा असते पण 'आशेच' गाठोडं वाढत जाते व मग पुढील अनर्थ घडतात.

 दुःख शब्द एक आहे पण त्याची व्याप्ती प्रत्येक ठिकाणी वेगळी आहे. प्रत्येक ठिकाणची त्याची तीव्रता वेगळी असते व प्रत्येक ठिकाणी उमटणाऱ्या त्याच्या पाऊलखुणा वेगवेगळ्या असतात. इथल्या प्रत्येक जीवाला आणि निर्जीवाला दुःख भोगाव लागत. दुःखातून व्यक्ती अथवा वस्तूच संक्रमण वारंवार होत असत. फुल मोठी उमेद घेऊन उमलतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी प्रवासाला निघतात. काहींच्या वाट्याला अंतयात्रा येते. काही फुले एखाद्या बड्या नामांकित आसामीच्या सत्काराला हजर होतात. काही लग्नसमारंभासाठी वापरली जातात. काही सजावटीसाठी वापरली जातात. तर काही दिवंगताच्या प्रतिमेसमोर माळ करून बसतात. काही ईश्वराच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतात. काहींच्या वाट्याला पायदळी पडण होतं तर काही फुलं उगीचच न वापर होता कोमेजून जातात. फुलांचा प्रवास सुखकारक कमी व दुःखदायक जास्त आहे. इथं दुःख आहे. ते आपल्या वाट्याला येणार आहे. दुःख सहन करण्याची क्षमता  फक्त फुले देऊ शकतात.  फुल सहन करतात आणि दुःख भोगूनही ती सदैव आनंदी दिसतात. दुःखाची तीव्रता फुलांच्या ताजेपणापेक्षा कमी असते. म्हणूनच अनेक सुखी व दुःखी ठिकाणी फुलांचा सर्रास वापर केला जातो. दुसऱ्याला प्रसन्न करण्याचा गुण फुलं कोणत्याही ठिकाणी सोडत नाहीत. म्हणूनच ती सर्वांना हवीहवीशी वाटतात.

 जगताना कोणाच्या वाट्याला किती व कोणत्या प्रकारच दुःख येईल हे निश्चित सांगता येत नाही. पण प्रत्येकाला दुःख  सहन कराव लागत हे मात्र खरे आहे. त्याची तीव्रता वेगवेगळी असते. एखादी सुंदर भावना शब्दबद्ध करताना लेखकाचा न बसेलला ताळेबंद किंवा एखादी नवीन रचना रचत असताना कवींची होणारी घालमेल व त्यातून निर्माण होणार दुःख, खरच कोणाला सांगायचं नसतं. असं दुःख भोगण्याचं भाग्य फारच कमी लोकांना मिळत. हजारो निरीक्षण नोंदवल्यानंतर पुढील निरीक्षणात शोध असतो. मग मागील हजार निरीक्षणात मिळालेलं अपयश नवीन मिळालेल्या यशाचा पाया असतो. ती निरीक्षण शोधकर्त्याशिवाय कोणालाच माहीत नसतात. चित्रपट तयार करताना चित्रपटाच्या मागे एक चित्रपट असतो. प्रत्येक कवितेमागे एक कविता असते. प्रत्येक पुस्तकामागे एक पुस्तक होईल एवढं पुस्तक असत. खरं तर ते दुःखच असत. ते बहुदा कोणाला न संगण्यासाठी असत. प्रत्येकाला पडद्यामागची कथा जाणून घेण्याची उत्सुकता असते. चित्रपट हिट होण्यासाठी घेतलेले टेक आणि रिटेक ही दुःख नसून प्रयत्न आहेत. अनेक न जुळलेली कडवी फाडून पुन्हा रचलेली शब्दांची माळ, कविता वा गाणं अप्रतिम बनविण्यासाठीचा प्रयत्न असतो. त्याच्या यशातून सुख तर अपयशातून सतत टोचण्या बसतात. 

दुःख सर्वव्यापी आहे. काही ठिकाणच्या दुःखाची तीव्रता हलकी असते तर काही ठिकाणच दुःख काळजाचा काप घेऊन जात. परमेश्वराने दुःख का निर्माण केला असाव? भयानक, ह्रदयद्रावक, प्राणांतिक, अतीव दुःख, अशा दुःखाच्या अनेकविध फांद्या आहेत. ईश्वराने दुःख निर्माण केले असे स्पष्टपणे म्हणता येणार नाही. पण दुःख सहन करण्याची क्षमता माणसाच्या अंगी निर्माण केली ही एक वरदायी बाब म्हणावी लागेल. नाहीतर सर्वत्र दुःख, दैन्य दिसलं असत. अनेक दुःखावर मात करीत माणूस जगतो. सुखाच्या एकेरी शोधात अविरतपणे धडपडतो. पण सुख काही त्याच्या हाती येत नाही. 'सुख पाहता जवापडे, दुःख पर्वताएवढे.....' ह्या अध्यात्मिक ओळीत दुःखाचा डोंगर व सुखाची क्षणभंगुरता छोट्या शब्दात तीव्रतेने सामावलेले आहे. आपण अहोरात्र सुख शोधतोय. एक सुख मिळालं की दुसर सुख दृष्टीच्या टप्प्यात दिसतं. ते मिळवण्यासाठी आपण पुन्हा कंबर कसतो. सुखापर्यंत जाणाऱ्या मार्गात अनेक काटे पायात रुततात. दुःखाच्या हेलकाव्याने आपण पुरते घायाळ होऊन जातो. अंती ते सुख आपल्याला मिळत देखील. तोपर्यंत सहन कराव लागलेल दुःख, त्या सुखाच्या मानाने कितीतरी पटीने अधिक असत. सुखाची सावली दुःख विसरायला लावते. सुख  बहुदा मृगजळाप्रमाणे असावे. या मृगजळाच्या शोधात आपण इतके पळतो की घशात अखंड कोरड तशीच राहून जाते. मृगजळाप्रमाणेच सुखसुद्धा भेटणं दुरापस्त आहे. बऱ्याच वेळी आपल्याला सुख येऊनही आपण सुखी नसतो. अनेक उणिवा काट्याप्रमाणे टोचतात व आपण खिन्न होतो. सुख येऊनही सुखी नसणें असते ते हेच. खऱ्या अर्थाने सुखाची किंवा दुःखाची व्याख्या करता येत नाही. सुख आणि दुःख मोजता येत नाही हेही आपलं एक दुःख आहे. त्यामुळे सुख आलं तरी त्या सुखाला आपल्या मर्यादित विचारसरणीमुळे पूर्णत्व येत नाही व दुःख कोसळलं तरी त्याचा अंत पाहता येत नाही. ह्या आपल्या मर्यादा आहेत. नेमक्या त्याच मर्यादा आपल्या दुःखाच्या व सुखातील सुखासीन दुःखाच्या मुळाशी आहेत. त्यामुळे आपण दुःखी आहोत व  दुःखाचे पुन्हा पुन्हाचे साथीदार आहोत.

 काही अतिव दुःख वगळता, इतर दुःख मनाच्या वाटण्यावर अवलंबून असतात. मग कोण किती खोलवर त्याची उजळणी करेल तितकी ती अधिक काटेरी बनून आपल्याला टोचतात. दुःखाच्या उकिरड्यातून सुख शोधताना दुःख मिळणार हे निश्चित आहे. तरीही आपण अविरतपणे असल्या न मिळणाऱ्या सुखाचा शोध घेतो. मुळात दुःख हा विषय चिंतन किंवा मनन करण्याचा नाही. दुःख हा असा वृक्ष आहे, त्याची मूळ, खोड, पान, फुलं, फळं आणि फांद्या दुःखी आहेत. त्यातून सुखद कल्पनांची संकल्पना चुकीची व अंती दुःखद ठरू शकते. म्हणून त्याची उजळणी करत न बसता येणाऱ्या प्रसंगाला धीराने सामोरे जाण महत्त्वाचे ठरत. धीर धरणं हे दुःखातील जालीम औषध आहे. ज्यांना दुखी प्रसंगात धीर धरता येत नाही, त्यांना खूप दुःख विनाकारण सहन कराव लागत. असलं दुःख शरीर आणि मनावर खोल परिणाम सोडून जातं. धीराने तोंड देत दुःखावर सहज मात करता येऊ शकते. आत्मसंकुचित वृत्तीतून बाहेर पडल्यानंतर दुःखाची बंधन सैल होतात. एक साधा विचार आहे, प्रभू श्रीरामचंद्र जगाचे मालक होते. अवतार धारण केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात खूप दुःख सहन कराव लागल. सामान्य माणसाच्या जीवनाइतका किंबहुना त्याहीपेक्षा जास्त संघर्ष व दुःखी प्रसंग त्यांच्यावर कोसळले. वास्तविक त्यांच्यावर असे प्रसंग येण्याचं नियतीचे कोणतंच प्रायोजन नव्हत. तरीही श्रीरामचंद्रांना अनेक दुःख का झेलावी लागली?  या जीवनात अशी अनेक माणसं आपल्या पाहण्यात, वाचण्यात येतात की जी खूप यातना सहन करुन, खूप हाल अपेष्टा सोसून जीवनात प्रचंड यशस्वी झालेली आहेत. त्यांनी दुःखाचा पाढाच वाचला असता तर ती आज तिथपर्यंत पोहोचू शकली असती का? पुण्यात माधुकरी मागून अनेकांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. चांगल्या पदव्या घेऊन आपला जीवनस्तर उंचावला, ना की ते रडगाणे गात बसले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विध्यार्थीदशेत असताना चारदोन तास सोडले तर इतर वेळ ज्ञान मिळवण्यात घालवला. अनेक ठिकाणी अपमान सहन केला. पण दुःखाचा पाढा वाचला नाही. इन्फोसेसचे नारायण मूर्ती  ध्येय व चिकाटीने वेडावून गेलेले साधे  गृहस्थ होते. रोजच्या जीवनातील व्यावहारिक अडचणी कदाचित आपल्यापेक्षा त्यांना जास्त होत्या. पण काही करून दाखवण्याची जिद्द त्यांना एका अढळ पदापर्यंत नेऊन पोहोचवते. ते तिथपर्यंत पोचतात खरे. पण वाटेत अनेक दुःखी घटना घडल्या. त्यांना वेडगळ थारा न देता त्यांचा प्रवास सुरू राहिला. एक दिव्य स्वप्न ते साकार करू शकले.

 वेळ अनेकांच्या दुःखाला कारणीभूत ठरते. सर्वसामान्यांपासून ते अतिमहत्त्वाच्या सर्व व्यक्तीपर्यंत वेळेचे भान ठेवावे लागते. वेळेचे महत्त्व ज्यांनी ओळखले ते सुखी राहू शकतात. वेळेचे भान सुटले, त्याला दुःख अर्थात मनस्तापाला सामोरे जावे लागते. वेळेत सुटणारी गाडी पकडण्यासाठी थोडा उशीर झाला. गाडी निघून गेल्यानंतरचा प्रत्येक क्षण वेळेचे महत्त्व मनात उजळणी करायला लावतो. त्यातून निर्माण होणारे दुःख  फक्त स्वतःलाच भोगण्यासाठी उद्भवलेल असत.  बसस्थानकातून बस निघून गेल्याचं सोयरसुतक इतर कोणालाही नसत. त्यावेळेचा प्रत्येक क्षण बोचरा असतो. दुःखाला धार मन  लावत.  मन दुःख तयार करत व मनच ते दुःख स्वतः न भोगता यातना आपल्यासाठी देऊन इतरत्र भटकत. शेतकऱ्याने वेळेत पेरणी न केल्यास,  वर्षभर दारित्र्याला तोंड द्यावे लागत. विद्यार्थी परीक्षेचे महत्त्व न ओळखता नेमक्या परीक्षांच्या वेळेत गाफील राहिला तर त्याचा त्याच्या गुणांवर परिणाम होतो. रोगी माणसाला वेळेवर उपचार मिळाले नाही तर रोग आणखीन बळावतो. क्वचित प्रसंगी अनिष्टसुद्धा  घडू शकतं. वेळ तारक आहे. परंतु तिचं महत्त्व ज्यांना नाही त्यांच्यासाठी ती मारक ठरू शकते. वेळेत मारलेल्या चेंडूवर षटकार बसतो व अवेळी टोळविलेला चेंडू त्रिफळा उडवतो. पैलवानाने योग्यवेळी साधलेला डाव गड्याला धुळ चारतो तर नेमक्या त्याच वेळी गाफील राहिल्यामुळे धूळ खावी लागणाऱ्या गड्याला अपयशाचे शल्य पुढील डावापर्यंत टोचत राहत. वेळ म्हणजे पैसा, अशा आशयाची 'टाईम इज मनी'  ही म्हण इंग्रजीत आहे. त्यात वेळेची अचूकता व मार्मिकता असल्याचे दिसत. वेळेचे महत्त्व जे नाकारतात त्यांना पैसे मिळणं अवघड असतं. वेळ ही अशी बाब आहे की, ती कोणासाठी थांबत नाही. योग्य वेळी योग्य काम न केल्यास, योग्य तो परिणाम होणार नाही व अंती दुःखाला सामोरे जावे लागते. काही माणसांच्या आयुष्याच समीकरण बिघडलेलं असतं. बालपण खेळण्यासाठी, तारुण्य कष्ट व अर्थाजनासाठी तर वार्धक्य  ईश्वरीय चिंतनासाठी असत. यामध्ये जर बदल झाला तर दुःख पुढ्यात वाढून ठेवलेल आहेच म्हणून समजा. तारुण्यातील मस्ती भविष्यासाठी दुःखाचा प्याला घेऊन उभी असते. तारुण्य कर्तृत्व सिद्ध करण्याचे रणांगण आहे. जो ज्या पद्धतीने इथं हे रणांगण कौशल्याने लढेल, तो त्या त्या प्रमाणात कर्तुत्ववान म्हटला जातो. तारुण्यातील आळस, म्हातारपणी कष्ट व दुःख आणतो. अर्थातच आयुष्यात ज्या त्या वेळी जे ते काम केले, तर दुःखाचा प्रश्नच निर्माण होत नाही.

 'वेळ आली होती पण.......'  ही म्हण वेळेसंबंधी आहे. पण ती काळाशी अर्थात मृत्यूशी निगडित आहे. मृत्यू या भूतलावरील सर्वात भयानक गोष्ट आहे. मृत्यूची भीती  प्रत्येक सजीवाला आहे. त्यात  ती मनुष्यजातीला जास्त तर मनुष्यातील पिडाकरक मनुष्याला इतरांपेक्षा जास्त असते. अनेक माणसं दुसऱ्याला मारून स्वतः चिरंजीव राहण्याच्या प्रयत्नात असतात. अर्थात ते शक्य नसते. जर जन्म आहे तर मृत्यू  निश्चितच आहे. यात वाद नाही. दिवस उगवतो म्हणजे तो मावळण्यासाठी.  सुख आहे तर दुःख न सांगता येणार. तसं मृत्यूच्या बाबतीतही म्हणता येईल. मृत्यू अटळ आहे. मृत्यू आहे पण मृत्यूबरोबर दुःख आहे. मृत्यू त्याच्याबरोबर आभाळभर दुःख आणून आपल्या अंगणात ओततो.  ते पाहता पाहता आपण पुरते थकून जातो.  दुःख जिथं आहे, त्यात मृत्यू सर्वात दुःखद मानावा लागेल. मृत्यूच दुःख  मरणाऱ्यापेक्षा नातेवाईकांसाठी जास्त असतं. मृत्यू जीवनातील शेवटच्या अंकातील शेवटची घटना होय.  मृत्यू  सर्वांसाठी जसा अनिवार्य आहे, तसा तो सुखद किंवा दुःखद असणं ज्याच्या त्याच्या नशिबावर अवलंबून आहे. मृत्यू काहींसाठी भयानक असतो तर काहींसाठी हसरा असतो. काहींसाठी तो यातनादायक व दुःख भोगायला लावणारा असतो. मृत्यू जरी काहींसाठी सुखद असला, तरी मृत्यू ही बाब मुळीच सुखद असू शकत नाही. मरणाऱ्याला जरी तो सुखद असला, तरी तो इतरांसाठी दुःखद असतो. जगताना जीवनाचे ज्ञान व मृत्यूच भान असल म्हणजे मरणाची यत्किंचितही भीती असू नये. 

 मानवी जीवन विज्ञानामुळे सुसह्य  झाले आहे. परंतु विज्ञानाच्या काही मर्यादा आहेत. तसं पाहिलं तर विज्ञानाच्या मर्यादा फार कमी आहेत. इथल्या अनेक रहस्यांचा उलगडा विज्ञानाने सहजतेने केला आहे. पण काही बाबतीत आजही विज्ञान अपूर्ण आहे. विज्ञानाच्या ज्या काही उणिवा आहेत, त्यात मृत्यूनंतरचे जीवन अग्रस्थानी आहे.  मृत्यूपश्चातचे जीवन उलगडणे विज्ञानाला अजूनह तरी शक्य झालं नाही. किमान अजून कितीतरी वर्ष ते विज्ञानाच्या आवाक्याबाहेर दिसतेय. याबाबतीत काही ग्रंथ प्रसिद्ध झालेत. पण त्यात कोणताही ठोस पुरावा किंवा विश्वास ठेवण्यासारखं काही दिसत नाही. ती निव्वळ करमणूक म्हणावी लागेल. परमेश्वराने काही बाबतीत आपल्याला अज्ञानी ठेवलेय. तसे ते योग्यच आहे. त्यात वरील बाब येईल. जन्मापूर्वीच व मृत्यूनंतरचे जीवन ही बाब आपल्यासाठी अनभिज्ञ आहे. ही गोष्ट तशी योग्य म्हणावी लागेल. जर आपल्याला ह्या बाबी माहीत असत्या तर कदाचित मरण्यासाठी चढाओढ व रस्सीखेच झाली असती व जगण्यापेक्षा मृत्यूत आनंद व घाई वाटली असती. काही बाबतीत अज्ञान फायद्याचं ठरतं. मृत्यूची वेळ आधी कळली असती तर तीसुद्धा आपल्यासाठी यातनादायक ठरली असती. 

 जीवनात जस दुःख आहे तस क्षणाक्षणाला सुख आहे. मनापासून जीवन जगणाऱ्याच्या जीवनात सुखच सुख विखुरलेले असत.  त्यामुळे या जन्मावर आणि जगण्यावर शतदा प्रेम करावे असं म्हणतात, हे सार्थच आहे. मृत्यूची वेळ अथवा मृत्यूनंतरच जीवन जर आपल्याला ठाऊक असत तर कदाचित आपण जीवनातील आनंद गमावून बसलो असतो. जीवनातील आनंद निघून गेला असता, तर फक्त उदासीनता राहिली असती. सर्वत्र नकारात्मकता दिसली असती. क्षणाक्षणाला वाढण्याचं व वाढताना जगण्याचं गम्य  आपल्याला मिळालं नसतं व जीवन आता आहे त्यापेक्षा दुःखी बनल असत. मृत्यू माहित असणाऱ्यांन हसायचं सोडून दिलं असतं. जीवनाकडे कदाचित तो पाठ फिरवून बसला असता. परमेश्वर  सृष्टीचा निर्माता व चालक आहे. त्याने त्याच्या निर्मितीत काही अप्रतिम बाबी निर्माण करून ठेवल्या आहेत. त्यात त्याने आपलं हितच साधल आहे. त्यामुळे जीवन सुखकारक झाले आहे. 

 मृत्यू केवळ दुःख या परीभाषेतून वर्णन करणं, म्हणजे त्याचं अपूर्ण वर्णन होऊ शकतं. एखाद्याच्या मरणाने दुःख जरूर निर्माण होत असेल. पण सृष्टीच कालचक्र मृत्यूमुळे पूर्ण होतय. जर जन्म ही घटना कालचक्रातील सुरुवात आहे तर मृत्यू त्याचा शेवट होय. आपण मरून विधात्यावर मोठे उपकारच करतोय असं म्हणावं लागेल. झाडाला पालवी फुटलेल पान झाडासाठी खूप काही करत. शेवटी पिकतं व गळून खाली पडत. त्याच्या परिपक्व होण्यात व गळण्यात एक अप्रतिम समाधान आहे. जगताना मृत्यूचे भान ठेवून जगलं तर अनेक अजरामर काम आपल्या हातून होऊन जातील व शेवटी आपण कृतकृत्य होऊन देह ठेवू शकू. अशा मरणात दुःखाची किंचितही छाया असणार नाही. 

 मानवेतर समाज केवळ जगण्यासाठी जगतोय. झाडे, पशु, पक्षी, प्राणी ही मंडळी कोणतेही स्वप्न उराशी बाळगून जगत नाहीत. त्यांच्या जगण्यात स्वच्छंदीपणा आहे. एक नैसर्गिक ऊर्मी अंतरात साठवून ती एक एक दिवसांनी जीवन सर करताहेत. त्यांच्याजवळ आशा, आकांक्षा, पुढील अनेक पिढीना पुरेल इतक साठवून ठेवणे वगैरे गोष्टींना अजिबात थारा नसतो. अर्थात त्यांना या गोष्टी  ठाऊकदेखील नाहीत. म्हणून एक साध, सरळसोट पण नैसर्गिक जीवन त्यांच्या वाट्याला येत. मानवाचं जीवन इतरांपेक्षा खूप वेगळ, वेड्यावाकड्या वळणाच व पुष्कळस अनैसर्गिक मानाव लागेल. खरंतर आपण सर्वच सजीव प्राणी एकाच परमेश्वराची लेकर आहोत. पण तरीही मानवजात म्हणून नैसर्गिकपणापासून आपण खूप दूर चाललोय.  दुःख तयार होण्याचे हे महत्त्वाचं कारण मानाव लागेल. 

 मुळात नैसर्गिक दिनक्रम, आचार, विचार असतील तर दुःखाचा प्रश्नच तयार होत नाही. पण निसर्गाला फाटा देऊन दिनचर्या ठेवली की, थोडं का होईना दुःख सोसावं लागेल. रात्र विश्रांतीसाठी किंबहुना झोपण्यासाठी आहे. रात्री आपण जागून काम करत बसलो तर पित्त वाढेल, डोकं दुखण्याचा त्रास कदाचित होईल. आरोग्य बिघडले की दुःख आहे हे साधे उदाहरण मानता येईल. तसं दिवसभराची आपली दिनचर्या पाहिली तर ती पूर्णपणे निसर्गाच्या विरुद्ध आहे. शारीरिक रोगांमुळे निर्माण होणार दुःख स्वतःला भोगण्यासाठी असत. रोग होण्याची अनेक कारणे आहेत. पण मुख्य कारण दिनचर्येतील आधुनिक कृत्रिमता होय. हल्ली सर्वचजण ताणतणावाखाली दिसतात. बालकांपासून वृद्धांपर्यंत तणावाला सामोरं जावं लागतं.  हृदयविकार व मधुमेहासारख्या गोड व महागड्या आजारांनी सर्व इस्पितळे भरून व्यापलेली आहेत. हे रोग आधुनिक जीवनशैलीतून बाळसेदार झालेले आहेत. त्यांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतेय. एक दिवस येईल, त्यादिवशी अशा आजारांविषयी आपल्या सर्वांना चिंतन करण्याची पाळी निश्चित येईल. अर्थात ती आजही आहे पण इतकी नाही. त्या वेळी उत्तर फक्त एकच असेल, ते म्हणजे 'निसर्गाकडे चला...... नैसर्गिक जगा.....'  रोज जगताना, दहा पिढ्यांना पुरेल इतकं साठवण्याच्या हेतूनं आपण झोपेतून जागे होतो. आपल्या अव्यवहारी अपेक्षा आपल्या दुःखाच्या मुळाशी आहेत.  सार्थ आशा सुख देते तर स्वार्थी आशा दुःख देऊन जाते. 
 दुःख ही एक कडवट भावना आहे. अपेक्षेला तडा देणारी भावना म्हणजे दुःख होय.  दुःख या भावनेचा कण नि कण कडवट आहे. आपण आपल्या भावना सुख व  दुःखात व्यक्त करतो. पण इतर जीवांच्या दुःखी भावना कशा व्यक्त होत असतील? पाखरं रडत असतील का?  ती आपल्या व्यथा कोणाला सांगत असतील?  मन हलकं करण्यासाठी ती काय करत असतील?  स्वैरपणे हवेत भरारी मारण्याचा दिनक्रम ती सुखात आणि दुःखात ठेवत असतील, की दुःख आणि सुख ह्या भावनाच त्यांना नसतील?  पाण्यातल्या माशाचे अश्रू कोणी बरे पाहिले असतील?  मासा खूप दुर्दैवी जीव होय. त्याचे अश्रू देखील दिसण्यासारखे नाहीत. दुःख होऊनही दुःख दाखवू शकत नाहीत, असे जीव दुर्दैवी होत. त्यांच्या दुःखाला पारावार नाही. झाडाची एक फांदी तोडल्यानंतर शेजारची फांदी वाऱ्यावर मुक्तपणे का डोलत असावी?  झाडं सुख व दुःख  एकाच कुशीत घेऊन बसतात का?  त्यांच्यातील निरागसता दुःखाच्या घावाने का ढळत नसावी?   दुःख सर्वत्र आहे. ते इथं आहे.  इकडे, तिकडे, सर्वत्र आहे. असा माणूस शोधूनही सापडणार नाहीत जो दुःखी नाही. माणसांचा प्रवास सुख शोधण्यासाठी आहे.  पण तो दुःखाची गाठोडी घेऊन परतताना दिसत आहेत. सुख शोधता शोधता खूप दुखी होत आहेत. आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस दुःखी आहे. आजच्यापेक्षा उद्याच्या दिवसाकडून सुखाची अपेक्षा जास्त होती. ती पूर्ण झाली नाही म्हणून तो दुःखी आहे. दुःख माणसाची पाठ सोडणे महाकठीण आहे. त्यातुन त्याची सुटका नाही. माणूस संपेल पण तरीही दुःख मागे शिल्लक राहील. चालता-चालता जसा माणूस संपेल पण वाट संपत नाही. तसच दुःख सर्वांसाठी आहे. दुःखाच्या काटेरी वाटेवरुन प्रत्येकाला प्रवास करावा लागतो. मग कोणासाठी ही वाट जास्त काटेरी तर कोणासाठी कमी काटेरी असेल. पण ती काटेरी आहे हे मात्र खरे.

 सुखाची पराधीनता व दुःखाची सोबत सर्वांसाठी अटळ आहे. सुख जसं सुखावह असतं. तसं दुःखसुद्धा बऱ्याच वेळी सुखावह असतं. अर्थात सुखावह दुःखाचा अंत आपल्याला पहायला यायला हवा. कदाचित आजच दुःख उद्यासाठी सुख घेऊन येईल. आजची जखम उद्या खपली धरल्यानंतर गुदगुल्या करणारी असू शकते. दुःखाकडे दुःखी नजरेने पाहिल्याने दुःखात वाढ होते. तर निरागसपणे त्याला सामोरे गेले तर दुःख आपल्यावर त्याचा परिणाम दाखवू शकत नाही. दुःखातील सुखी भावना टिपण्यासाठी निरागसता हवी. सुख आठवण्यासाठी व  दुःख विसरण्यासाठी आहे. ते विसरण्यातच सुख आहे. दुःखातील सुखासीन प्रवास  ज्याला करता येतो, तो खरा सुखी मानावा लागेल. सुख व दुःख त्याने एकाच नजरेतून पाहिलेली असतात. सुख आणि दुःख यापैकी कोणीतीच भावना त्याच्या मनावर परिणाम करू शकत नाहीत. सुखातही सुखी व दुःखातही सुखी ही मनाची परमोच्च अवस्था आहे. ती गाठल्यानंतर सर्वत्र आनंदीआनंद पाहता येईल, अनुभवता येईल. शेवटी दुःख ही एक भावना आहे व ती आपण किती भावनिक होऊन मनावर घेतो, यावर त्याची तीव्रता अवलंबून आहे. सुखाची अपेक्षा नैसर्गिक मनाची मागणी आहे. ती प्रत्येकाजवळ असते. पण पूर्ण होत नाही. अशा अपूर्ण आशेच्या मागे आपण धावाधाव धावतो. निराश होतो. पण धावण काही थांबवत नाही. नकळत वेग वाढतो. पुन्हा निराशा येते. दुःख येतं. आशाअपेक्षांची आपली उलथापालथ बहुधा चुकीचे आहे. खूप हवं, आणखीन हवं, सर्वच हवं, अशा हव्यासापोटी अनेक दुःखांचा जन्म होतो. समाधानी वृत्ती  दिवसेंदिवस लुप्त होते की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ पाहतेय. आपण सर्वजण त्याचे बळी पडतोय. एक विचित्र प्रकारची अस्वस्थता सगळीकडे दिसतेय. सर्वजण मागताहेत. ते मिळवतेयदेखील पण मागायचं काही संपत नाही. सर्वच तर आपल्याजवळ आहे. पण जणू अजून खूप मिळवायचं राहून गेल्याची अनामिक आस मनाची हुरहूरता वाढवतेय. चित्ताच्या ठिकाऱ्या ठिकाऱ्या करतेय. आपण खिन्न होतोय. पुन्हा नकळत मार्गी लागतोय. पण एका सर्जनशील विचार भावनेतून जीवनाचा विचार होताना दिसत नाही. संयमाचा बांध दिवसेंदिवस अधिक खचतोय.  मी आणि माझं, यापलीकडे आपली दृष्टी अंधूक होतेय. अधिक हव्यास व संचयातून दुःखाचा पाझर न थांबणारा आहे.


जगामध्ये थोर महात्मे होऊन गेले. त्यांनी त्यांच्या परीने जगातील दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला. स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत जाऊन सांगितलं की, जोपर्यंत माझ्या देशातील दुःख संपत नाही तोपर्यंत माझा देश सुखी होऊ शकत नाही. शिक्षणाने सुशिक्षित समाज निर्माण होईल. सुशिक्षित समाज सुखी असेलच असं नाही. अज्ञान व अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यामुळे भारतात दुःख असल्याचं स्वामीजींनी ओळखलं होत. त्यावर त्यांनी आयुष्यभर काम केलं. इथल दुःख, दैन्य  संपविण्याचा ध्यास घेतला. पण दुःख काही आज अखेर संपल नाही, संपणारही नाही. दुःखाची पालवी दर दिवशी नव्या जोमाने फुटते. त्याच स्वरूप वेगळं असेल पण दुःख मात्र असतेच. त्यामुळे आजवर सुखी करण्याचे जेवढे प्रयत्न झालेत, त्या तीव्रतेने दुःख फोफावतय व हे असच राहणार. मग दुःख कमी करण्याचा उपाय कोणता? समाधानी वृत्ती ठेवणे हा यावर रामबाण उपाय आहे.  'ठेविले अनंते, तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान....'  ही सर्वच लिला 'त्याची' आहे. सुखाला  'तो' तर दुःखाला 'मी' जबाबदार धरून प्रवास झाला पाहिजे. दुःख आलं तरी धीराने सामोरे जाण्याची मानसिकता ठेवावी लागेल. निव्वळ अतातायी भूमिका दुःख वाढवेल. तर संयम व धीर दुःख कमी करेल. संपूर्ण दुःख कमी व्हाव अस वाटत असेल, तर कोणत्याही गोष्टीचा स्वतःवर प्रभाव पडू दिला नाही तर तो एक दुःखावरील रामबाण उपाय होईल.  280506 ©Harish Gore

Prof. Agarwal sir Vaduj

 Dear Agarwal sir, It was pleasent experience for me to read your 'A Pryayer to My God, the Man'. A deep touch to heart by reading a...