प्रा. हरी नरके #HariNarake सरांचे पुसेगाव येथील व्याख्यानास उपस्थित राहण्याचा योग जुळून आला. सोबत व्यासंगी बी. ए. कदम सर होते. समोरून ज्ञानाचा पाऊस व शेजारी ज्ञानाची खान....! अनेक दिवसांनी असा दुग्धशर्करा योग जुळून आला. पाठीमागे असाच एम. ए. शेख सरांशी काही मिनिटांचा संवाद झाला. अर्थात तोही दिवस माझ्यासाठी असाच दुर्मिळ होता. सुदैवाने दोन्ही वेळेस कदम सर सोबत होतेच.... ज्ञानाची उंची खूप मोठी आहे. ज्ञान ही तपस्या आहे. ही तपस्या केलेली व्यक्तिमत्त्व सोबत असणं म्हणजे परिस्पर्श......!
प्रा. नरके सरांचा विषय होता " महात्मा फुले यांचे काही नवीन पैलू." महात्मा फुल्यांविषयी माझा त्रोटक अभ्यास आहे. त्यामुळे त्यावर मी भाष्य करणं संयुक्तिक नाही. अर्थात नरके सरांनी महात्मा फुल्यांवर जो प्रकाश टाकला तो पुसेगावकरांसाठी व एकूणच महाराष्टातील ग्रामीण भागासाठी नवीन आहे. सरांचा व्यासंग पाहता हजारो व्याख्यानातून महाराष्ट्रासह देशविदेशात निडरपणे प्रबोधन करत आहेत. व्यक्तिशः मी अनेक दिवसांचा त्यांचा फॉलोअर आहे. मात्र फेस टू फेस पुसेगावमध्ये झालो.
व्याख्यानातील महात्मा फुल्यांचे काही नवीन पैलू सरांच्या शब्दात........ महात्मा फुले पहिले शिवचरित्रकार होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनीही ही गोष्ट मान्य केली हे विशेष. पहिला शिवजागर पुण्यात शिवजयंती सुरू करून महात्मा फुले यांनी केला. महात्मा फुले यांचा हा अत्यंत नवीन पैलू.
महाराष्ट्राला किंबहुना जगभराला फुले दाम्पत्य शिक्षणासाठी केलेल्या कार्यामुळे ओळखते. शिक्षणाशिवाय अनेक व्यवसाय त्यांनी केले. फुलांच्या व्यापारापसून सुरू झालेला त्यांचा प्रवास थक्क करतो. शिक्षण, बांधकाम व्यावसायिक,( नरके सरांनी त्यांना बिल्डर न म्हणता नेशन बिल्डर म्हटले.....व्वा क्या बात है) दागिण्यासाठी लागणाऱ्या मुशी तयार करणे, पुस्तके छापणे व त्यांची विक्री करणे, अनाथालय चालवणे, रुग्णसेवा, भाजी व फळे ट्रेनने मुंबईला पाठवून तेथे विक्री, राजकारण, विधवा संगोपन, आणि अनेक गोष्टी. एक माणूस एका आयुष्यात किती कामे करू शकतो? महात्मा फुल्यांनी ती केलीत. बांधकाम व्यावायिक म्हणून केलेली कामे आजही दिमाखात उभी आहेत. सोन्याच्या मुशी बनवण्याची संपूर्ण भारताची एजेंसी त्यांच्याकडे होती.
महात्मा फुले यांचे जीवन अनेक पैलूने नटलेले आहे. सरांचे विचार ऐकल्यानंतर त्यांच्याबद्दल आदर निर्माण होतो. शिक्षणासारखा विचार सोडला तर बाकी यातील अनेक गोष्टी समाजाला माहितही नाहीत. त्यामुळे नरके सरांनी महात्मा फुलेंच्या या बाबींवर टाकलेला प्रकाश वेगळा वाटतो. लंडनस्थित लायब्ररीत फुलेंच्याविषयी कितीतरी हजारो तास वाचन होईल इतके दस्तऐवज उपलब्ध आहेत, हे नव्याने कळाले. सर आपण त्यातील काही दिवसांचे व तासांचे वाचन केलेत. हा व्यासंग महाराष्ट्रासाठी नवीन आहे, विशेषतः आजच्या काळात.....!
व्याख्यानापूर्वी आपण महात्मा फुलेंच्या मूळ गावी कटगुणला भेट देऊन आलात हेही सुंदर वाटले. पुसेगाव नगरी श्री. सेवागिरी महाराजांच्या व फुलेंच्या पूर्वजांमुळे पावन झाली आहे. स्त्री शिक्षणाची अवस्था फुले नसते तर काय झाली असती, हे वेगळे सांगायला नको. आपण महात्मा फुलेंचा वारसा आपल्या अंगी असणाऱ्या ज्ञानाच्या भुकेपोटी समर्थपणे चालवता आहात.
पुढील वर्षी आपण तर असणारच आहात पण आपल्यासोबत राजू परुळेकर #RajuParulekar
सरांना एकदा ऐकण्याची इच्छा आहे. व्याख्यानात आपण महात्मा फुलेंचे अनेक पैलू उलघडले. मी ते सर्वच इथे मांडत नाही. कारण आपलं ठरलय सगळंच आज सांगायचं नाही. काही पुढल्या वर्षीसाठी राखून ठेवायच.......आपणास अनेक शुभेच्छासह पुढील वर्षापर्यंत थांबतो....!
हरीश गोरे
दहिवडी.