समाधान
मनाच्या व्यक्त आणि अव्यक्त भावनातील सर्वात सुखकारक समाधान ही भावना आहे. मनाच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. कधी आपण खिन्न असतो, कधी प्रफुल्लित, तर कधी गंभीर असतो. सभोवतालच्या घटनांचा मोठाच प्रभाव आपल्या मनावर सदैव होतो. त्यातूनच आपल्या मनाची जडणघडण होते आणि त्याला चांगल्या किंवा वाईट सवयी लागतात. कधी मनातील भावनांचा उद्रेक होतो तर बऱ्याच वेळीच भावना दडपून राहतात. मन कोंदटल्यासारखे होते. उदास उदास असल्याची हीच वेळ असते. काही वेळा मनात भावना सुंदर उमटतात. पण विचारांचा किंवा शब्दांच्या तुटवड्यामुळे ओठापर्यंत येत नाहीत. किंवा त्या शब्दबद्ध करता येत नाहीत. दुःखी भावनांना अश्रू वाट मोकळी करून देतात. अतिआनंदातही हेच अश्रू कामी येतात. सुख व दुःख या परस्परविरोधी भावना आहेत. या दोन्ही भावनांमध्ये मनाची परिपूर्णता अनुभवता येत नाही. पण समाधान अशी भावना अवस्था आहे की, ज्यामध्ये परिपूर्णता अनुभवता येते. समाधानात जे समाधान आहे ते अनेक वेळा शब्दांच्या पलीकडील असते. सुख वेगळ आहे व समाधान वेगळ आहे. सुखात समाधान असेलच असं खात्रीपूर्वक सांगता येत नाही. तसेच समाधानात सुख किंवा दुःख काहीही असू शकतात.
सुख शोधण्यासाठी आपण अहोरात्र झटत आहोत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अधिकाधिक सुखी बनण्याचा आपला आटोकाट प्रयत्न आहे. केलेला प्रत्येक कष्टाचं ध्येय सुखी व संपन्न होणे हेच आहे. सुख व संपन्नता म्हणजे समाधान खचितच असू शकेल. सुखाचं नातं समाधानाशी जोडण चुकीचे आहे. सुख अनुभवण्यात आहे तर समाधान मानण्यात आहे. दोहोतील हा मुख्य फरक आहे. हा फरकच त्यातील दरी स्पष्ट करू शकेल. सुख अनुभवण्यासाठी आधी सुख तयार करावं लागतं. ते करत असताना अनेक हालअपेष्टा सहन करून ते तयार होत. समाधानाच मात्र तसं नाही. त्यासाठी वेगळे कष्ट करावे लागत नाहीत. अथवा त्यासाठी कुठे स्पर्धेत उतरावे लागत नाही. ते सर्वस्वी आपल्या मनाच्या वळणावर व आपल्या विचारसरणीवर अवलंबून असते.
समाधानाची एक परिभाषा आहे. ही परिभाषा प्रत्येकासाठी वेगळी व भिन्न आहे. एक बालक, तरुण व वृद्ध यांच्या समाधानाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक प्राणी, पक्षी, तरु ह्यांच्याही समाधानाच्या परिभाषा वेगळ्या आहेत. त्या वेगळ्या आहेत, तेही एका अर्थाने चांगलेच आहे. कारण समाधानाची एकच व्याख्या असती तर ते मिळवण्यासाठी एकच रस्सीखेच सर्वत्र पहावयास मिळाली असती. सध्या आहे त्यापेक्षा विचित्र व जीवघेणी स्पर्धा तयार झाली असती. समाधान मिळणे दुरापास्तच पण प्रचंड तणावाखाली आपण सगळे असतो. पर्यायाने समाधान प्रत्येकासाठी स्वतंत्र आहे ही चांगलीच बाब आहे. ती वेगळी असण्यातच आपलं कल्याण आहे. लहान बाळाचं समाधान छोट्या-मोठ्या बाबींनी होतं. वय वाढतं. वयाबरोबर आकलनशक्ती आणि गरजा वाढतात. गरजा वाढल्या की समाधानाच्या कक्षा रुंदावतात. पूर्वीचे बालवयातील रोज खेळले जाणारे खेळ फोल ठरतात. नवीन वयानुसार, नवीन खेळ, नवीन सवंगडी व नवीन दिशा आवडतात. कालचा खेळ पोरखेळ होतो. तारुण्यातील सळसळत्या उत्साहात आपण लोटले जातो. जग कवेत घेण्याची जिद्द ह्रदयात पाझरू लागते. नवीन क्षितिज रोज खुणावतात. ती काबीज करण्याच्या योजना आखल्या जातात व तशी तयारीही केली जाते. यश मिळालं तर समाधान पावतो. अपयशाचे कडवट घोट वाट्याला आले तर, संकल्पांच्या ठिकऱ्या मन कोमेजून टाकतात. यशात सुखाच्या गुदगुल्या तर अपयशात काटेरी टोचणी लपलेली असते. सिकंदर जग जिंकण्यासाठी निघाला. त्याने बराच भूभाग जिंकलाही. पण तो स्वतःचे मन जिंकू शकला नाही. जग जिंकून जे समाधान मिळणार नाही, ते मन जिंकून मिळेल. पण ही साधी बाब नाही. एक वेळ जग जिंकता येईल, पण मन जिंकणं अवघड आहे. म्हणून समाधान प्रत्येकाच्या मनाच्या वाटण्यावर अवलंबून असते. 'ठेविले अनंते, तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे, समाधान' तुकाराम महाराजांनी समाधान शोधण्याचा राजमार्ग सर्वांसाठी खुला करुन ठेवला आहे. खरं तर आपल चित्त जाग्यावर नसल्याने, आपण समाधान पाहू शकत नाही. चित्तातील अस्थिरता समाधानापासून आपल्याला दूर नेते. आपण बरच मिळवतो. पण समाधानी नसतो. समाधान मिळवण्यासाठी अनेकांचे अथक परिश्रम अनेक वेळा वाया गेलेले आहेत. समाधान मिळत नाही. चित्ताची स्थिरता मुळी समाधानी अवस्था आहे. पण चित्त स्थिर होत नाही. ते स्थिर करण्याचा आपण फारसा प्रयत्न करत नाही. आपण सुखी आहोत, पण समाधानी मात्र नाही. सुखापासून समाधान वेगळे करू शकत नाही. त्यामुळे सुख येऊनही अनेक उणिवा काट्यासारख्या सतत टोचतात.
वृद्धापकाळातील समाधानाची परिभाषा वेगळी असते. एका वृद्धाच समाधान एव्हरेस्ट जिंकण्यात कधीच असू शकत नाही. किंवा बाळासारख छोट-मोठ खेळही वृद्धाच समाधान करू शकत नाहीत. तरीही काही वृद्ध समाधानी दिसतात. कारण त्यांच्यासाठी समाधान वेगळ आहे. खरं तर या वयात काहीच मिळवायच राहिलेलं नसत. कल्पनांना परिपूर्णता आलेली असते. फक्त वृद्ध लोकच वर्तमानात असतात. आयुष्याचा बराच प्रवास पूर्ण करून या अवस्थेत पोचणं म्हणजेच अनुभवांची मोठी शिदोरी होय. माणूस वयाने म्हातारा व्हावा. मन म्हातारं झालं की तारुण्यातही वार्धक्य जडत. तारुण्यातील संवेदनशीलता उतारवयात टिकत नाही. मनाचा हळुवारपणा वयावर अवलंबून नसावा. वयावरून म्हातारपण आणि त्या म्हातारपणावर मनाचा वायस्कपणा ठरवण चुकीचे आहे. मनाला वयाच्या चाकोरीत बसवता कामा नये. किंवा त्याला वयस्कपणाचा शिक्का मारणही योग्य नाही. मन सदैव चिरतरुण ठेवण म्हणजेच कल्पनांचा विस्तार होय. समाधान इथेच कुठेतरी शोधलं तर मिळू शकेल.
समाधान ही स्थिती नसून अवस्था आहे. या अवस्थेत बदल होऊ शकतो. बदललेल्या अवस्थेत समाधान असेलच असं नाही. समाधान या मनाच्या अवस्थेच स्थितीत रूपांतर केले की त्यात पुन्हा परिवर्तन शक्य नसतं. परंतु मनाचं समाधान स्थितीत पोहोचणे अवघड आहे. मन एकदा समाधानानं पावल की, सदैव त्याच अवस्थेत राहीलच असे नाही. याला जबाबदार आपणच असतो. मन समाधानी करण, चंचल करण, विचारी करणे, स्थिर करणे किंवा अस्थिर, दुखी करणे या बाबी आपणच करतो. आपल्या सभोवतालची परिस्थिती त्याला काही अंशी जबाबदार असते. आपल समाधान आपल्या मनासारखं झालं तरच होतं. आपल्या मनाच्या जरा जरी विरुद्ध झालं तर आपली समाधानीवृत्ती लोप पावते. आपण खिन्न होतो. असं का व्हावं? अनेक गोष्टी आहेत. काही आपल्या तर काही सभोवतालच्या आहेत. या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास व निरीक्षण न करताच आपण पुढे जातो. त्यामुळे त्यातील बारकावे, जटीलता तशीच राहते व आपलं जगणं सुरू राहत. काळाच्या चक्रात प्रवाहित झालेलो आपण प्रवासी आहोत. एक दिवस हा प्रवास संपतोही. पण मग प्रश्न असा उरतो की या सर्व गोष्टी आपण अनुभवणार कधी? शिकणार कधी? आपलं मन आहे. त्याला शिकविण्याच्या भानगडीत आपण कधीच पडत नाही. किमानपक्षी मनाचं निरीक्षण तरी आपण केव्हा करणार आहोत? त्याच्या जटील स्वभावाच निरीक्षण होण गरजेचे आहे. सर्व सुख, समाधान, शांतीचा आरंभ तर मनातच आहे. आपण ह्या बाबी बाहेर शोधतोय. त्या अंतकरणात आहेत. म्हणजे आपला प्रवास चुकतोय, असेच होय. समाधान शोधाव कुठे? वस्तुत? पैशात? अलंकारात? भोगात? की मनात? जरा चोहीकडे डोळसपणे पाहिले तर सगळ्यांची शोधाशोधीतील धडपडत चुकीची असल्याची जाणीव होऊन जाईल. या धडपडीत सुख मिळेल पण समाधान यत्किंचितही असणार नाही. कारण समाधान मुळात तिथं नाहीच. जे नाही ते सापडणार कसं?
व्यक्तीव्यक्तीतील फरकानुसार मी खूप समाधान आहे, असं भासवणारी किंवा स्वतःच्या मुखातून अशा प्रकारे विचार व्यक्त करणारी माणसं आपणास अनेक वेळा पहावयास मिळतात. खरंतर अशा व्यक्तींना पाहिले तरी ती समाधानी नसून सुख शोधणारी व ते मिळाव म्हणून आयुष्यभर केविलवाणी धडपड करणारी माणसातील अतृप्त आत्मेच होत. सुख व समाधान अशा व्यक्तींना वेगळं करता येत नाही. या सृष्टीची रचना परमेश्वराने अशा प्रकारे केली आहे की प्रत्येक जीवा जन्मल्यापासून मरेपर्यंत सततची धडपड करत असतो. ही धडपड अनेक कारणांसाठी असते. स्वामी विवेकानंद, रामदास, तुकाराम, ज्ञानेश्वर यांनीही आयुष्यात अनेक धडपडी केल्या. स्वामी विवेकानंद तर जगभर फिरले. त्याकाळी त्यांचेइतका प्रवासाचा झपाटा खचितच कोणत्या भारतीयाने केला असेल! हिंदू संस्कृती व सभ्यता संपूर्ण जगासमोर उलगडून, अनेक पाश्चिमात्यांचे डोळे दिपवून त्यांना भारतीय विचारांप्रति आकर्षून घेतले. खरंतर भारतीयांबरोबर जग समाधानी व्हावे या उदात्त विचारांनी झपाटून स्वामीजी आयुष्यभर धडपडत राहिले. संत तुकारामांना, रामदासांना परमेश्वर कसा होता हे माहीत होतं.त्यात ते आयुष्यभर गुंग राहू शकले असते. पण तरीही त्यांच्यासारखी व्यक्तिमत्व समाज समाधानी व्हावा म्हणून आयुष्यभर धडपडत राहिली. आपली धडपड प्रत्येकाने तपासून पाहिली तर आयुष्यातील प्रत्येक क्षण आपण आपल्यासाठी व आपल्या आप्तस्वकीयांसाठी जगल्याच आपल्याला पहावयास मिळेल. शक्य तितका स्वार्थ आपण केल्याचं मोठ्या खुबीने आपण दाखवत असतो. जगण्यासाठी थोडा स्वार्थही गरजेचा आहे. पण जर समाधानानं जगायचं असेल तर त्याग महत्त्वाचा ठरतो. समाधानात त्यागी वृत्ती असणे गरजेच आहे. किंबहुना त्यागाशिवाय समाधान मिळणे दुरापास्त आहे.
साठवून ठेवणे किंवा संचयन करणे ही बाब समाधानाची वैरीण मानावी लागेल. अधिकच्या हव्यासापोटी माणस माणुसकी सोडून अपराध्याच जीवन जगत आहेत. ज्यांनी खूप संचय केला, मग ते संचयन वस्तूच अथवा धनाच असेल, ती त्यांच्या आयुष्यात समाधानी आहेत का? याचा अभ्यास आपण कधीच करत नाही. समस्त सृष्टी नियंत्रण तो करतो आहे. ज्यांनी संचय केला त्यांचे नियमन तो करतो व जे भिकारी आहेत त्यांचही पोट भरतोय. अनेक व्यक्तींचा अभ्यास केला तर या भूमंडळी समाधानी व्यक्ती भेटण दुरापास्त किंबहूना अशक्य असल्याचं दिसून येईल. तरीही आपण समाधान अव्याहतपणे शोधत आहोत. खरंतर ही शोधाशोध समाधानाची नसून सुखाची असते. सुख मृगजळासारखे असून आपली पळापळी ही त्या मृगासारखी आहे, जी कधी संपत नाही. धडपड ही न संपणारी बाब आहे तर समाधान न मिळणारी चीज आहे. पुन्हा प्रश्न पडतो. मग आपलं काय चाललंय? हे कष्ट कशासाठी आणि का? अनेकांना याचे उत्तर मिळत नाही. काही थोड्यांना उत्तर मिळतं पण मार्ग सापडत नाही. काही थोडेच या कोड्याचे उत्तीर्ण परीक्षार्थी असतात. समाधानाचे गमक शोधणाऱ्यापैकी अनेक जण त्याचा स्वतःसाठी वापर करून घेतात व काही मोजकेच समाज समाधानी करण्याचा न पेलवणारा शिवधनुष्य उचलतात. स्वामी विवेकानंदांना भारतीयांविषयी आत्मिक तळमळ होती. भारतातील गरिबी, अज्ञान व अडाणीपणाविषयी अनेकवेळा ते बोलले आहेत. हृदयापासून व्यक्त केलेले विचार आजही तसेच आहेत. परिस्थितीत फार मोठी सुधारणा झाल्याचे चित्र आपल्याला पाहावयास मिळत नाही. आपण शिक्षण घेत आहोत, शहाणे होण्यासाठी धडपड करत आहोत. पण खरे पाहिले तर आजही आपण चमत्कार होण्याची अतुरतेने वाट पाहत आहोत. माझं जीवन व्यर्थ चाललय. प्रगती थांबली आहे. मला पूर्णपणे सुखी करणाऱ्या महापुरुषाची मी वाट पाहतोय. तो येईल व माझ्या जीवनात बदल घडवेल. या आशेवर आपल्यातील अनेकजण जगताहेत. चमत्काराचा अनामिक पगडा आपल्या विचारसरणीवर खोलवर रुतलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आपण आसल्या मानसिकतेतून बाहेर पडत नाही. निरर्थक गोष्टींची अनामिक वाट पाहतो व शेवटी अशा चमत्कारी फसव्या महापुरुषांची आपण शिकार होतो. कल्पना व वास्तव यांच्या मध्यावर जीवन आहे. भगवी वस्त्रं परिधान केलेली प्रत्येक व्यक्ती संत असल्याचे चित्र आपल्याला दिसते. पुजलेला प्रत्येक दगड आपण देव मानतो व प्रत्येक कळसाखाली दिसणाऱ्या मूर्तीत आपण देवाप्रती भाव जागा करतो. देऊळ संस्कृती आपल्याकडे झपाट्याने वाढत आहे. देवाविषयी प्रेम आदर असावा याविरुद्ध मी नाही. पण आजच्या ग्रामीण भारतात डोकावून पाहिले तर प्रत्येक गावांमध्ये, गावाच्या आवाक्याबाहेरील शिखरं दिसून येतात. शिक्षण व आरोग्य तसेच दळणवळणाच्या सुविधा या ग्रामीण भारताच्या विशेष गरजा आहेत. त्या पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा शिखरांची उंची मोजण्यात ही मंडळी गर्क आहेत. तरुणांसमोर भावनिक आवाहन केले जाते व त्याची ऊर्जा शुन्याकडे प्रवास करू लागते. तरुणांचा वैचारिक प्रवास शून्यातून शून्याकडे सुरू आहे. वैज्ञानिक जाणिवांची उणीव ग्रामीण भारतात प्रकर्षाने जाणवते आहे. हात कष्ट करण्यासाठी असून, बुद्धी स्वतंत्र विचारसरणीसाठी आहे, ही गोष्ट हे तरुण विसरून जातात व हुकमांची अंमलबजावणी करणारे गुलाम होतात. गुलामीत स्वतंत्र विचारसरणी कधीच जन्म घेऊ शकत नाही. यातूनच अज्ञानाकडे प्रवास सुरू होतो व शेवटी अज्ञानातच तो संपतो. थोडेफार सुख व थोडेफार समाधान मिळत असेलही. पण सुंदर जन्मातील अनेक गोष्टींना त्यांचं आयुष्य मुकलेल असत. पुढे सरकलेले आयुष्य मागे सरकू शकत नाही. हे आयुष्याच वास्तव आहे. वास्तवात जगणं व वास्तवात राहणार हीसुद्धा समाधान मिळवून देणारी बाब आहे.
थोर व्यक्ती खरोखरीच थोर असतात. कारण त्यांचे पाय सदैव जमिनीवर असतात. आपलं मात्र यापेक्षा वेगळं असतं. आपले पाय जमिनीवर थरतच नाहीत. येथेच आपण अधोगतीच्या प्रवासास निघतो. मोठ होण्यासाठी निघालेले अनेक माणसं वैफल्यग्रस्त होतात व अशाच अवस्थेत आयुष्य कंठत असतात. विवेकबुद्धीचा ऱ्हास होऊन गर्वाचा, दंभाचा मोठा फुगा आपण सदैव फुगवतो. कल्पनांच्या वल्गना करण्यात आपण धन्यता मानतो. आपल्यापेक्षा शेजारी कसे वाईट आहेत. हे सर्वांना घसा तुटेपर्यंत सांगतो. निंदेतून समाधान शोधणे म्हणजे पाण्यातून लोणी काढण्यासमान आहे. समाधानाची परिभाषा यापेक्षा भिन्न आहे. समाधान ही बाब वृत्तीत जागी होणे गरजेचे आहे. आपलं मन कशानच भरत नाही. असे आपण सारे असमाधानी सतत समाधान शोधत असतो.
माणूस जात सोडून इतर ठिकाणी आपणास काही अंशी समाधानीवृत्ती पहावयास मिळते. पशू व पक्षी यांच समाधान अन्न, पाणी, निवारा व हवामान या घटकांवर अवलंबून असत. संचयन करण्याची त्यांची वृत्ती माणूस जातीपेक्षा सहसा कमी दिसून येते. संचयनाने स्वार्थ व स्वार्थामुळे अनर्थ जन्माला येतो. विवेकबुद्धी कुंठते व क्रूरपणा, मीपणा व दांभिकता वाढीस लागते. विवेकशून्य विचारातून उदात्त विचारसरणी कधीच जन्माला येऊ शकत नाही. वृक्ष काही अंशी संचयन करतात. पण साठवण्याच्या प्रयत्नात त्यांचं जगणं ते कधीच विसरत नाहीत. साठवणे व साठवलेल्यात पुन्हा उद्या आणखीन आणून ओतणे. यातून आपण एका विचित्र जीवघेण्या स्पर्धेला जन्म देतो. समाज अशा अनेक स्पर्धांनी भरून वाहताना आपण पाहतोय. स्पर्धेची अनावश्यक चढाओढीत समाजरचना नव्याने तयार होत आहे. बालकांचे बालपण स्पर्धेत अर्पण करून, अपेक्षांच्या ओझ्याने थकलेल्या हमालांचे आईबाप होण्यात आपण धन्यता मानतो. संपूर्ण समाजासाठी ही धोक्याची घंटा आपण न ऐकता चढाओढीनं स्पर्धा जिंकण्याची व्यर्थ खटाटोप अव्याहतपणे करतोय. पक्षाने तयार केलेली गोदामे आपण कधी पाहिली नाहीत. किंवा पाणी आवश्यक आहे म्हणून झाडांनी नद्या थोपवून ठेवल्याचं आपल्या कधी ऐकण्यात नाही. सर्वांना सर्वच मिळत असतं, पण विनाकारण ते मिळवण्यासाठी आपण रस्सीखेच निर्माण करतो. या सगळ्यांमध्ये आपलं जगणं आपण शोधतो. खरं तर जगण याहूनही अनेक पटीने वेगळे आहे व नेमकी तेवढीच गोष्ट आपण हरवून बसलो आहोत. समाधानी नसण्याचं मुख्य कारणही कदाचित तेच आहे. आपण जीवन जगतो. मात्र जीवनात आपण कुठेच नसतो. जे नाही ते शोधणे व जे आहे ते विसरून बसण, अशी आपल्या जगण्याची व्यथा असते. अनेक वृद्धांच्या तोंडून जीवनाविषयी खरा दृष्टीकोन ऐकावयास मिळतो. वृध्दच जीवनाच समर्थपणे वर्णन करू शकतात. ज्ञानाइतकंच महत्त्व अनुभवाला आहे. ज्ञानी मनुष्य व अनुभवी मनुष्य थोड्याफार अंतराने मला सारखेच वाटतात. वृद्ध हे ज्ञान नसले तरी ते अनुभवी मात्र निश्चितच असतात. त्या अर्थाने ते ज्ञानी होतात. जीवनाविषयी त्यांची सर्व गणिते मांडून झालेले असतात. काही चुकलेली तर काही अचूक असतात. वयाच्या अशा अवस्थेत असतात की काही मिळवण्यासाठी त्यांची धडपड कमी किंवा लुप्त झालेली आपणास पहावयास मिळते. सुदृढ समाजनिर्मितीसाठी त्यांचा आपण सहजतेने वापर करू शकतो.
समाजामध्ये जगणाऱ्या अनेक वायस्कांच्या व्यथा आपण ऐकल्या तर मन विषण्ण होते. हात-पाय गळठुन जातात. पोटच्या पोरांवर जीवापाड प्रेम करणारे आईबाप वृद्धपणी प्रेमाला पोरकी होतात. मोठ्या आशेने सर्वांकडे प्रेमाची याचना करतात. पण प्रेम त्यांच्या वाट्याला सहसा लाभत नाही. आपण जगलेला हाच का तो समाज आहे यावर त्यांचा विश्वास बसत नाही. कालांतराने जगण्याची उमेद हरवली जाते आणि उरलेले आयुष्य शून्य होऊन बसत. प्रेमशून्य जगणं म्हणजेच दगड होऊन जगणं होय. ज्यांनी समाज घडवला, कुटुंब जपलं, वाढवलं त्यांच्या वाट्याला असल असह्य जगणं येत. मनात खोलवर हा विचार जातो व वाचा अबोल होते. अनेक वयस्कर माणसं कमी बोलतात. त्याचे कारण त्यांच्या वाट्याला आलेले अपमानास्पद व कुचंबनायुक्त जीवन असत. याच जीवनात आपल्या वाट्याला आलेली अवहेलना काहींना सहन होत नाही. तर काहीजण काहीच मार्ग सापडत नाही म्हणूनच जगतात. समाज सशक्ताला बळ देणारा व दुबळ्यावर प्रहार करणारा आहे का? भिन्नरुपी समाजाचे आपणही एक घटक असल्याचं दुःख प्रत्येकाच्या मनात आहे. कडुनिंबाच्या पोटी गोड आंबे येण्याची आपण निरर्थक वाट पाहतोय......! दुसऱ्याचं समाधान संपवण्यासाठी स्वतः दुःखी, अधीर होऊन इतरांच्या सुखात आपण पाय खूपसतोय. खरतर अशाने समाधान मिळणार नाहीच पण जगण बेसुरी होऊ पाहतेय. जगण्यातला आनंद आपण गमावतोय. प्रत्येक क्षण जगण्यासाठी असतो हे आपण विसरतोय. असंख्य दुःखी धागे आपल्या आयुष्यात घेऊन सुख सांधण्याचा प्रयत्न करतो आहोत. समाधान मिळण्यापेक्षा आपण अधिक स्वार्थी, कपटी, बावळट व एकूण समाजासाठी घातक ठरतोय. आई-वडिलांच्या मुळावर उठणारे अनेक पुत्र मी पाहिले व अनुभवले आहेत. ज्या माऊलीने मायेने वाढवल, तिचा केसाने गळा आवळणारे आपल्या समाजाचे घटक आहेत. सुखी व संपन्न होण्याच्या खटाटोपीत संस्कृतीचा खून होतोय हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. मुलांना स्वातंत्र्य, तरुणांना काम व वृद्धांना सन्मान मिळाला तर समाज समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. आज आपण याच्या बरोबर विरुद्ध वागतोय. लहानांना पारतंत्र्यात अडकवतोय, तरुणांना आइतखाऊ करतोय आणि वृद्धांचा पावलोपावली व शक्य असेल नसेल तिथं अपमानित करतोय. अशाने समाज अशांत होतोय व आपणही अशा अशांत समाजाचे घटक होतोय.
आपण लोकशाहीचा अंगीकार केला आहे. व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित असण्याचा घटनेने प्रत्येकाला दिलेला अधिकार आहे. अशा थोर अधिकाराचा घरात दार बंद केल्यानंतर आपणास विसर का पडावा? व्यक्तीच्या अर्थार्जनावरून त्याला मान द्यायचा की अपमान करायचा हे ठरवणारे न्यायाधीश प्रत्येक घरात जन्माला येऊ घातले आहेत. आई-वडिलांना तत्त्वज्ञांच्या गोष्टी सांगण्याइतपत संस्कृतीचा व सभ्यतेचा ऱ्हास अजून तरी झालेला नाही. पत्नी व मुलात समाज सुख पाहतोय. मुळावर घाव घालण्यानं पानं करपून जातात, हे विसरून चालणार नाही. समाज रचनेसाठी ते परवडणारही नाही.
अनेक माणसं पाहताच समाधानी वाटतात. ती समाधानी असतात किंवा नाही हा वेगळा विषय आहे. परंतु त्यांच्या कृतीतून तरी ती समाधानी वाटतात. व्यक्तीची हालचाल व देहबोलीवरून आपण प्रेम, स्वार्थ, आनंद, क्रोध किंवा समाधान शोधू शकतो. अशा समाधानी व्यक्तीच्या सहवासात आपणही समाधान पावतो. किमानपक्षी समाधानाविषयी थोडाफार परिचय होऊ लागतो. हळूहळू केलेला प्रवास ध्येयाप्रती नेऊन ठेवतो. अर्ध्यावर सोडलेला ध्यास निव्वळ ढोंगीपणा होय. काही गोष्टी अनुकरणाने सहजपणे शिकता येतात. त्या अंगी टिकून ठेवण्यासाठी स्वतःसुद्धा थोडेफार प्रयत्न करणे गरजेचे ठरत. वृत्ती समाधानी ठेवण्यासाठी समाधानी व्यक्तींचे अनुकरण करणे गैर वाटत नाही. चांगल्या बाबी प्रयत्नपूर्वक मिळवाव्या लागतात. तर वाईट गोष्टी आपोआप आपल्याकडून घडत असतात. दारू पिण्यासाठी अनेक दुकानं तुम्ही शोधू शकता. ती सहजपणे मिळतातही. परंतु दारू सोडवण्यासाठी दवाखाने समृद्ध असल्याचे चित्र आज तरी आपल्याला दिसत नाही.
अनेक विचारांती समाधान कशाने मिळेल हा प्रश्न अनुत्तरित राहतो. जगणं सुरू असतं. वय वाढतं. आपण फसतो व शेवटी सर्व केले पण समाधान मिळाले नाही. याची खंत राहून जाते. ज्याच्यासाठी आयुष्य घालवलं ती न मिळणे म्हणजे फसगत होय. अशी फसलेली अनेक माणसं आपल्या समोर येतात. त्यांच्या बोलण्यातून निराशेचा सूर दिसून येतो. हा पाश्चाताप आयुष्याच्या उत्तरार्धात व उत्तरार्धाच्या शेवटच्या चरणात करणं योग्य नाही. म्हातारपणी अनेक गोष्टींचा संकल्प केला तरी तो नेटाने पूर्ण होईलच याची खात्री नाही. त्यापेक्षा सोपा मार्ग म्हणजे तारुण्यात थोडावेळ थांबून विचार व चर्चा केली तर समाधान लवकर भेटू शकेल. वाईट गोष्टी करण्यासाठी फारसे कष्ट करावे लागत नाही. पण चांगल्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. त्याशिवाय चांगल्या बाबी पूर्णत्वाकडे जाऊ शकत नाहीत. समाजासाठी सोडा, स्वतःसाठीतरी उच्च तत्व घेऊन, आपण आपले जीवन जगले पाहिजे. सृष्टीतील शुद्ध तत्वे आपल्याकडे खेचून आणणें गैर नाही. त्याच्यासाठी आपला काही वेळ दिला तरी आयुष्याचं खूप मोठे नुकसान होणार नाही. उलट व्यक्तीचा फायदा होऊन उच्च दर्जाच्या सवयी मनाला जडल्याशिवाय राहणार नाहीत. स्वकल्याणात समाजाचे व पर्यायाने देशाचे कल्याण आहे. सर्व गोष्टी मिळवत असताना आपण थांबत नाही. थांबून विचार करत नाही. आपल्या प्रत्येक कृतीचा आढावा आपण घेतला पाहिजे. त्याचे मूल्यमापन तटस्थपणे केलं पाहिजे. सत्याच्या बोधात समाधानाचा उगम आहे. या उगमापर्यंत आपला प्रवास झाला पाहिजे. तो प्रवास जास्तीत जास्त सुखकर होण्यासाठी आपण योजना आखल्या पाहिजेत व त्या योजनावर प्रत्यक्ष काम करून सत्यात उतरवल्या पाहिजेत. समाधान ही वस्तू नाही. समाधान ही मनाची अवस्था आहे. म्हणून मन अभ्यासणे गरजेचे आहे. 'मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण' मनाची प्रसन्नता अनेक गोष्टी आपल्याला सहज मिळवून देईल. चित्तातील अशुद्धी गेल्यानंतर मन शुद्ध होत. जगताना आपण अनेक ओझी घेऊन जगत आहोत. एका अनामिक भीतीचे सावट घेऊन रोज घरातून आपण बाहेर पडतो. अनिश्चितता हा जगण्यातील मूलमंत्र होऊन गेलेला आहे. परिवर्तन सृष्टीचा नियम आहे. पण जगताना एक अनामिक काहूर प्रत्येकाच्या मनात आहे. अशी मनातली वादळे प्रयत्नांती शांत केली पाहिजेत. मनाचा अभ्यास झाला पाहिजे. प्रयत्न व सातत्य यामुळे हे सहज शक्य आहे. चाकोरीबद्ध आयुष्यातून बाहेर पडून उज्वल प्रकाशाकडे वाटचाल करणाऱ्यांना एके दिवशी प्रकाश दिसल्याशिवाय राहणार नाही. त्यात मनाच्या अनेक स्थिती मिळतील. महत्त्वाचं म्हणजे समाधान मिळेल, जे आपणास पूर्णत्वाकडे घेऊन जाईल. अशा प्रकारचा अनुभव स्वतः घेतल्यानंतर इतरांना तो अनुभव आपण देऊ शकू. विचारांमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. याचा अनुभव प्रत्येकाने एकदातरी घेतला पाहिजे. त्यात मिळणारी धन्यता शोधूनही सापडणार नाही. या धन्यतेत समाधान असते. एकदा असं समाधान मिळाले म्हणजे इतर कोणतीच गोष्ट मिळवण्याची इच्छा मनात उरत नाही. काही आठवण्याची व साठवण्याची गरज राहत नाही. स्वार्थ आपल्यापासून खूप दूरवर गेलेला असतो. चंगळवाद संपतो व सुख भोगण्याविषयीचे विचार हळूहळू लुप्त होतात. मन परिपूर्ण व तृप्त होतं. निरिच्छ भावभावना मनामध्ये उमलू पाहतात. निर्मळ व निथळ झऱ्याप्रमाणे आयुष्य दुसऱ्यांच्या सेवेसाठी तयार होते. निष्काम कर्मयोगाचा आपला प्रवास सुरू होतो. हा प्रवास म्हणजेच परमेश्वरी कार्य होय. प्रेमसागराच्या तळात आपण अखंड बुडून जाऊ. उरलेलं आयुष्य व पूर्वायुष्य यामधील पडदा गळून पडून नवसंजीवनी घेऊन आपण नवा प्रवास सुरू करू. प्रयत्नपूर्वक टाकलेल्या प्रत्येक पाऊल आपल्याला शेवटी यश देऊन जाईल. त्यात समाधान मिळेल. आपण ते समाधान शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. त्यातच आपल हित आहे. 090414 ©Harish Gore
ReplyForward |