Monday, 10 August 2020

चिंतन....... सद्भावनांचे........६

                                                       भूमिका 


 या जगामध्ये विविधता, विविधतेबरोबर विशालता व विशालतेबरोबर व्यापकता पदोपदी पाहायला मिळते. सर्व व्यक्ती, वस्तू, व प्राणी विविधता, विशालता व व्यापकतेच्या अधिन आहेत. व्यक्ती म्हणून प्रत्येक पुरुष इतरांपेक्षा वेगळा आहे. प्रत्येक स्त्री इतर स्त्रियांपेक्षा वेगळी आहे. प्राणी, पक्षी किंवा वस्तू जात म्हणून एक आहेत पण प्रत्येकाचा स्वातंत्र्यरित्या विचार केल्यास भिन्नता आढळून येते. भिन्न गुणधर्म प्रत्येकाच्या मुळाशी आहेत. व्यक्तीत, प्राण्यात, वस्तूत भिन्न गुणधर्म असणे ही विविधता आहे. त्यांच्यात विशालताही आहे व या सर्वांनी तर जग व्यापले आहे. म्हणजे व्यापकता ही प्रत्येकाठायी आहे. अशा रितीने सृष्टीची रचना समतोल ठेवली गेली आहे. कोणत्याही एका गोष्टीचा अतिरेक इथं नाही किंवा विशिष्ट अशा गोष्टीचा तुटवडाही नाही. सर्व काही तोलून-मापून आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी पूर्णत्व आहे. प्रत्येकजण परिपूर्ण आहे. अपूर्ण इथं काहीच नाही. जे आहे ते पूर्ण व निःसंकोचपणे परिपूर्ण आहे. प्रत्येकाला महत्व आहे. व्यक्ती, वस्तू किंवा प्राणी यांचा कालचक्रात मोलाचा वाटा आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने झटकण्याचे काम करतोय. कोणाच्या कुवतीनुसार झटण्यात कमी-जास्तपणा आहे. पण झटतोय हे मात्र निश्चित आहे. गाय दिवसभर चरते. संध्याकाळी दूध देते. तिचं काम संपलं. दूध मिळाल्यानंतर अनेकांचे काम मार्गी लागत. गाईने दूध देण्याची भूमिका घेतली म्हणून अनेकांच्या सकाळच्या चहाची रंगत वाढली. कित्येक लहान बाळांचे रडण गाईने बंद केलेलं असतं. दुधाला दूध हेच उत्तर आहे. इतर कोणताही पांढरट पदार्थ  दुधाची भूमिका वठऊ शकणार नाही. किंवा आजपर्यंत कोणत्याही पदार्थाने दुधाची तहान पूर्ण केली नाही. ती पूर्णही करणार नाही. 


 भूमिका हा शब्द रंगमंच किंवा चित्रपटसृष्टीशी अधिक निगडित आहे. भारतीय मनावर चित्रपटांनी खोलवर परिणाम केलेला आहे. किंबहुना चित्रपटाशिवाय सध्याच्या भारतीय समाजाची कल्पना कदाचित अपूर्ण ठरेल. चित्रपट हा विषय जसा आपल्यासाठी अविभाज्य आहे, तसच त्यातून रंगवल्या गेलेल्या भूमिकाही आपल्यासाठी अविभाज्य आहेत. विशिष्ट एका चित्रपटातील नटनटीनं केलेली भूमिका मनाच्या कोपऱ्यात घर करून असते. कितीही विसरेन म्हटलं तरी विसरणं अशक्यप्राय होत. ती भूमिका अनेक मनांवर अनेक काळ अधिराज्य गाजवत असते. वास्तविक नट-नटीन केलेली भूमिका अजरामर कलाकृती असते. अनेकांशी निगडित विचारांशी समरस ती भूमिका असते. त्यातून साकार होणार भावविश्व मनात खोलवर आधी कधीतरी रुजलेलं असतं किंवा त्या आदर्शांची, भावभावनांची काल्पनिक उजळणी मनात पूर्वी होऊन गेलेली असते. त्या भूमिकेच्या रूपाने आपलं मन पडद्यावर उलगडत असतं आणि आपण कलाकाराने साकारलेल्या भूमिकेत गेलेलो असतो. कल्पना व सत्य यात फक्त पडदा असतो. आपण खुर्चीत, तर मन पाडद्यावर साकारलेल्या भूमिकेत असत. 


   चित्रपटाचा असा फार दिवसापूर्वीचा काळ होता, जेव्हा भूमिका रसास्वादासह प्रेक्षक गृहण करीत होता. त्या चित्रपटांविषयी, त्यातील भूमिकांविषयी गोडीने बोलत होता. काळ बदलला. काळाबरोबर चित्रपट, रंगमंच व याबरोबर भूमिकाही बदलल्या. श्रोता-प्रेक्षकही बदलला. त्याच्या मागण्या बदलल्या. समाज व समाजरचना आणि त्यांच्या गरजेनुसार चित्रपट रंगमंचावरील भूमिकाही बदलत राहिल्या. त्या अशाच काळाबरोबर बदलत राहणार. पण एकूणच तिथे वठवल्या जाणाऱ्या भूमिकांविषयी रसिक पूर्वीइतका तृप्त पाहावयास मिळत नाही. जुन्या जमान्यात विशिष्ट कलाकाराच्या भूमिकेने रसिकाची चित्रपटांविषयी, रंगमंचावरील एखाद्या नाटकातील भूमिकेविषयाची समाधानी वृत्ती होती, ती आता त्याहीपेक्षा सरस भूमिकेने होत नाही. त्याला अनेक कारणे आहेत. पूर्वीच्या समाजरचनेत व आत्ताच्या समाजरचनेत अनेक सामाजिक स्थित्यंतर झाली आहेत. यात वाद नाही. अनेक बदल होत, समाज हळूहळू बदलला. त्याच्या मागण्याबरोबर त्याच्या भावनिक गरजा वाढल्या. त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न चित्रपट किंवा रंगमंच करत गेला. आणि हा प्रयत्न त्यात वठवल्या जाणाऱ्या भूमिकेमुळे विशेषता रसिकापर्यंत मोठ्या कुशलतेने पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला गेला. 

 चित्रपट किंवा रंगमंचावरील काही भूमिका आव्हानात्मक असतात. बऱ्याच वेळेला आपण एखादी भूमिका साकारलेले पाहत असताना, आपल्याला उगीचच वाटत जातं की ही भूमिका अशी नाही, अशी पाहिजे होती. या ठिकाणी या नायक-नायिकेनें किंवा अन्य पात्रांने असं बोलायला हवं होतं. थोडक्यात त्या कलेमध्ये कुठेतरी मनात थोडी उणीव जाणवते. तेंव्हा ती भूमिका पूर्णपणे कोसळलेली असते. भूमिका किंवा चित्रपट, नाटक आपल्या मनात पूर्णपणे केव्हा घर करतं? जेव्हा तो चित्रपट, नाटक मनातल्या घरात येतो तेव्हा....! आपलं मन फार विचित्र आहे. मनात कोणालाही उगीच थारा नसतो. मनातील घरात फक्त आवडत्या गोष्टीच असतात. नावडत्या बाबी पटकन तिथून निघून जातात. तसच फक्त मनापासून आवडलेल्या भूमिका आपल्या मनात असतात. भला तो चित्रपट किंवा नाटक पाहिलेल्या घटनेला दहा वर्षे होऊ देत. पण मनात ती भूमिका आजही ताजी व टवटवीत असते.


 भुकेल्या पोटान बाहेरून याव. जरा आवरून जेवायला बसावं. बघतो तर काय.....? भाजीत मीठ नाही. आहारातील मिठाची भूमिका किती महत्त्वाची आहे, याची जाणीव जीभ आपल्याला लगेच करून देते. आपल्या वापरातील प्रत्येक गोष्टीची आपण नीट चाचपणी केली, तर आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल की त्या सर्व वस्तूंची आपणास प्रकर्षाने गरज आहे. ती गरज पूर्ण करण्याची भूमिका त्या वस्तू पार पाडत असतात. काही वस्तू आपण वापरून फेकून देतो. काही वापरून परत वापरण्यासाठी ठेवून देतो. आपल्या दैनंदिन जीवनाला, या सर्व बाबींमुळे पूर्णत्व येत. आपल दिवसभराचं काम सोपस्कर होत. एखाद्या वस्तूने आपलं काम अडवलं, तर आपण कमालीची चिडचिड व्यक्त करतो. भाजीत मीठ नाही ही बाब ऐकायला किंवा वाचायला साधी वाटत असली तरी अनेक घरात केवळ या साध्या घटनेने बायकांची डोकी फोडलीत किंवा मोठा कलह तरी माजतो. सकाळी उठून पाहतो तर काय....? काल आणून लावलेलं वाहन आज चालू होण्यास नकार देतय. वास्तविक आपल्याला वाहून नेण्याची महान भूमिका वाहनं नेहमी करत असतात. त्यांनी एखाद्या दिवशी नकार दिला, म्हणून कोणत आभाळ कोसळणार नाही. पण नाही. घरात त्रागा, वाहनावर त्रागा, वाहन दुरुस्त करणाऱ्या बिचाऱ्या मेकॅनिकला तर शिव्यांची लाखोली वाहिली जाते. हे का होते तर साधं वाहन चालू होत नाही. मला वाहून नेण्याची भूमिका ते पार पडत नाही म्हणून. पण आपण या घटनेचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करू शकत नाही. परिणामस्वरूप आपण विनाकारण स्वतःला व इतरांना त्रास देतो. शेवटी सगळं ठीक होतं. तोपर्यंत आपली भूमिका मूळ भूमीकेतून खलनायकाच्या भूमिकेत कधी गेलेली असते, हे आपल्यालाही माहीत होत नाही. मजेशीर बाब ही की हे सगळे आपल्या उशिरा लक्षात येते. प्रत्येक वेळी हे असंच होत. पुन्हा उशीरा आपल्या लक्षात येतं. इतका राग इथं नको होता. आपण पुन्हा पुन्हा तीच ती हळहळ व्यक्त करून वारंवार त्याच चुका करत असतो. आपल्या पाहण्यात, बघण्यात अशी बरीच माणसं असतात, ज्यांनी अत्यंत क्षुल्लक कारणासाठी एखाद्याचा जीव देखील घेतलेला असतो. रस्त्यावरून मी चाललो आहे. समोरून येणारी व्यक्ती मला नीटशी बाजू देत नाही. म्हणून त्याच्या श्रीमुखात मारणं ही शुद्ध हिंसा आहे. आपण रस्त्याने चाललो म्हणजे राजाच्या स्वारीप्रमाणे सर्वांनी बाजूला व्हावं असं कुठे लिहिले नाही. पण मन ऐकत नाही. राग अनावर होतो व त्याचा परिणाम हिंसेत होतो. समाजात अशा प्रवृत्या संख्येने जास्त होऊ पाहत आहेत. अनेकांना राग आवरता आवरत नाही. कित्येकांना राग आवरता येतो हे माहित देखील नाही. घटना छोटी व राग मोठा असे चित्र सर्वत्र आज आहे. 


 एखाद्या अनोळखी गावी गेल्यानंतर खरं तर धीर सुटलेला असतो.  अशा ठिकाणी कोणी मायेने विचारपूस केली तर आपल्याला जे समाधान मिळते, ते दुसऱ्या कशानेही मिळू शकणार नाही. त्या गावाविषयी, तिथल्या लोकांविषयी अचानक मनात प्रेम निर्माण होतं. जरा समाधान होतं. वास्तविक त्या व्यक्तीने पार पाडलेली भूमिका प्रेम, सदाचार, माया यावरील आपला विश्वास दृढ करते. 


  जीवन जगताना असे अनेक प्रसंग अनेक वेळा येतात की सतत दुःख,अत्याचार, निंदा  वाट्याला येते.  आपल्याच बाबतीत असं नेहमी का होतं, असं वाटतं. त्यावेळी खर तर आपला चांगल्यावरील विश्वास उडालेला असतो. नेहमीच दुःख, अन्याय, अत्याचार सोसणाऱ्यांची सहनशीलता बहुदा संपलेली असते. या जगात वात्सल्य, माया, प्रेम जणु काही नाही, यावर त्यांची ठाम धारणा झालेली असते. त्यातूनच नैराश्यपूर्ण जीवन कंठण्याची वेळ येऊन ठेपते. असे जीवन जगण्याऐवजी जीवन अक्षरशः ढकलण्याची परिस्थिती तयार होते. मन मोठ विषारी आहे. सभोवतालच्या परिस्थितीवरून मन मनाची भूमिका ठरवत.  त्याच्यातील उणिवा आपण शोधू शकत नाही.  आपण मूळ किचकट परिस्थितीत गुंतलेलो असतो. इकडे मन त्याच्या भूमिकेत अधिक बळकट होत.  अशा परिस्थितीत मन नकारात्मक भूमिकेत जास्त ओढ घेतं. त्या  वेळी कदाचित आपण चूकण्याचा धोका असतो. कधी कधी तर चुकतो देखील.


   सहनशीलता केवळ नाव नाही. सहनशीलतेला एक व्यापक अर्थ आहे. तिच्यात प्रचंड ऊर्जा असलेली शक्ती आहे.  तिचा अनुभव प्रत्येकाने घेतला पाहिजे. आपण किती सहनशील असावं? आपण नेहमी ऐकतो, मी खूप खूप सहन केल. आता सहन करणार नाही. ही बंडखोर प्रवृत्ती आहे. ती सहनशीलता नाही. सहनशीलता इतकी संकुचित नाही. स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेल्यानंतर, तिथे त्यांना अनेक गोष्टी  सहन कराव्या लागल्या. कित्येक लोकांनी तर त्यांची सार्वजनिक ठिकाणी टर उडवली, कुचेष्टा केली. त्यांचा पोशाख व राहणीमान पाश्चमात्यांचा चेष्टेचा मुख्य विषय होता. पण म्हणून स्वामीजींनी चिडून जाऊन कोणाला धमकावल्याची नोंद कुठेही नाही. गांधीजी दक्षिण आफ्रिकेत गेले. वर्णभेद तिथंही होता. डब्यातून सामानासह बाहेर फेकून दिले. वास्तवीक त्यावेळी त्यांनी बॅरिस्टर पदवी मिळवली होती. त्यांच्यावर अन्याय होण्याचा प्रश्नच येत नव्हता. पण झाला. कविवर्य नारायण सुर्वे......! जन्म झाला आणि रस्त्याच्या कडेला जन्मदात्यांनी फेकून दिलं. कवी नारायण सुर्वे यांच्या आयुष्यातील एक एक प्रसंग डोळ्यात पाणी आणतो. पण कुठंही सहनशीलता संपली नाही. अशी अनेक उदाहरणं देता येतील, जिथे फक्त सहन केलय. 


  अन्याय, अत्याचार सहन केला की मन शक्तिशाली बनतं. विचारी बनतं.  अन्याय-अत्याचार संपवण्यासाठी फक्त विचार गरजेचे असतात. विचार वाढविण्यासाठी सहनशीलता आवश्यक असते. सहनशीलता अंगी असण्यासाठी विचारी असणं गरजेचं असतं. अनेक वेळा, आपण खूप विचारी असल्याचे वाटत असतं. तो निव्वळ भास व इतरांना दाखविण्यासाठी केलेला उत्कृष्ट अभिनय असतो. विचार घडवणं आणि वाढवणं इतकी सोपी गोष्ट नाही.  क्षणाक्षणाला मनात अविचार डोकावणारी माणसं विचारी कधीच बनू शकत नाहीत. त्यांनी केलेल्या प्रत्येक प्रयत्न त्यांना शेवटी एका नव्या अविचारापाशी नेतो.  विचारी बनण्याच्या नादात नकळत अविचार हातून घडतो. मनाची जडणघडण ज्या बांध्याची असेल तसं आपण नकळत वागतो. जीवन जगणं व जगलेल्या जीवनात विचार असणं मोलाच आहे. आपण किती जगलो, ह्यापेक्षा कसं जगलो याला जास्त महत्त्व आहे. 


  थोर व उदात्त तत्व घेऊन जगणारी माणसं अनेकांना वाट दाखवू शकतात. अनेकांना आधार ठरतात. तत्त्व व विचार घेऊन जगणं आणि अज्ञान व अविचार घेऊन जगण, या दोन जगण्यात कितीतरी पटीने नैतिक अंतर आहे. एक सन्माननीय तर दुसरे क्षुद्र जगणं आहे. भले तो क्षुद्र श्रीमंत असो अथवा कंगाल. विचार व जगण्याची संस्कृती नसेल तर तो कितीही श्रीमंत झाला तरी त्याच क्षुद्रपण फार काळ लपून राहत नाही. वादळवाऱ्यात दिवा तेवत ठेवणं जेवढं कठीण आहे, तेवढच कठीण जीवनात विचार टिकवण आहे. एक विचार टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी शंभर अविचारांचा गळा घोटावा लागतो. आपल्याकडे परिस्थिती याच्या उलट आहे. एका अविचारासाठी आपण अनेक चांगल्या विचारांना, चांगल्या मूल्यांना कोणताही विचार न करता क्षणात तिलांजली देतो. विचार घडवताना हा अविचार आपल्याकडून नकळत होतो. शेवटी लक्षात येतं तेव्हा 'आपलेच दात व आपलेच ओठ'  यासारखी परिस्थिती येते. आपण मूग गिळून गप्प बसतो. विचार घडवताना असा अविचार होणे सर्वस्वी चुकीचे आहे. चांगले विचार, आदर्श तत्वे, काही मुल्ये,  सर्वांसाठी सारखीच आहेत. व्यक्तिपरत्वे ती बदलत नाहीत. ती काळ सापेक्षही आहेत. काळही ती बदलू शकत नाही.  त्या मूल्यांचा, विचारांचा किंवा तत्वांचा  संबंध आपल्यापाशी आला, आपण चुकलो; जाऊ द्यात. असं म्हणणं सर्वस्व चुकीचे व निंदनीय आहे. तत्वांचा आदर्श सर्वांसाठी सारखा आहे. जे आहे ते आहे. व्यक्तीव्यक्तीनुसार मूल्ये भिन्नभिन्न करता येणार नाहीत किंवा व्यक्तीच्या पदानुसार किंवा परिस्थितीनुसार त्यात बदल करण्याचा अधिकार कोणालाच नाही. तसा बदल करणेसुद्धा योग्य होणार नाही.


 भारत देशामध्ये अनेक जातीचे, विविध धर्माचे, पंथाचे लोक एकत्र आहेत. भारतात विविधतेत एकता आहे. भारताच्या इतिहासातील जडणघडणीत वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांची भूमिका स्पृहणीय आहे. अनेकविध जाती, अनेक धर्म असून सुद्धा एका घट्ट धाग्याने सर्वजण बांधले आहेत. जगामध्ये अनेक देश आहेत. पण इतकी विविधता कुठेच नाही. सर्व जग आपल्याकडे मोठ्या कौतुकाने  पाहत आहे. भारत एक अव्यक्त चेतना आहे. भारत एक अनामिक आकर्षण आहे. हे आकर्षण काही आज तयार झालं नाही. ते अनेक वर्षापासून जगाला आहे. भारत एक चमत्कार आहे. अनेक संकटे या देशाने मोठ्या हिमतीने छातीवर झेलली आहेत. अनेक झंजावातात त्यानं त्याचं व्यक्तिमत्व  सोडलं नाही. पूर्वी जी ओळख होती, ती आजही आहे व ती पुढेही अबाधित राहणार आहे.


 महापुरुष सामान्यापेक्षा सर्वस्वी वेगळे व वेगळेपणात स्वतःबरोबर देशाची ओळख टिकविणारे असतात. भारत ही जशी कर्मपुण्य कर्मवीरांची भूमी आहे, तशी ती या मातीसाठी जीव ओवाळणाऱ्या रत्नांची मायभूमी आहे. भारत म्हणजे केवळ जमीन, पर्वत, डोंगर, नद्या, समुद्र यांचा मिलाफ नाही. तर भारत एक विशाल तत्व आहे. तिच्या मातीला येणारा गंध इतरत्र अनुभवता येणार नाही. तिच्या कुशीत मिळणारी ऊब दुसऱ्या कुठेच अनुभवता येणार नाही. भारतभूमी जशी कर्मवीरांची, देशभक्तांची भूमी आहे, तशी ती  संतांची आवडती आहे. भारतात संतांची मोठी परंपरा आहे. संतांच्या पावनस्पर्शाने पुनित झालेली पवित्र माती म्हणजे भारत होय. पावित्र्यात संस्कृती, संस्कृतीत तत्व व तत्वात देश फक्त भारतच आहे. भारत महान व जगावेगळा असण्याची कितीतरी कारण आहेत.  इथल्या मातीत जे आहे ते क्वचितच इतरत्र पहावयास व अनुभवयास मिळते. इथल्या काही बाबी फक्त इथेच आहेत. भारताने घेतलेली भूमिका जगासाठी एक आदर्श असते. जगाला भारताची भूमिका नाकारण्याच धाडस आज तरी नाही. भारताने घेतलेली भूमिका सर्वमान्य असते. त्या भूमिकेमागे वैयक्तिक स्वार्थ नसतो. असते ते जगाचे, मानवजातीचे कल्याण.....!  कुणी घेतलेली भूमिका, किती निस्वार्थी आहे, त्यावर त्या भूमिकेचं वजन व किंमत ठरते. निस्वार्थी भूमिका घेणाऱ्या देशाच्या पाठीमागे काय संस्कृती आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. संस्कृती नसेल तर कित्येक वेळी विचार तोकडे पडण्याची शक्यता असते. जगापुढे आपली भूमिका नेहमी आदर्श राहिलेली आहे. 


  शिकागो धर्मपरिषदेत भारतीय धर्मग्रंथ तळाला होता. तो तळाला असला म्हणून त्याची मौलिकता मुळीच संपणार नाहीत किंवा ती तसूभर कमीही होणार नाही. जगाला शाश्वत वाट दाखवण्याची धमक फक्त भारतीय धर्मग्रंथातच आहे. भारतीय धर्मग्रंथ ही निव्वळ पुस्तके या सदराखाली मोडणाऱ्या वस्तूं नाहीत. त्यांची किंमत थोडयाफार मूल्याने वसुल होईलही. पण त्या किमतीच्या हजार पटीने त्याच मोल आहे. जगात अनेक पुस्तकं आजवर छापली. ती मोठ्या चवीनं कदाचित वाचलीतसुद्धा. पण पुस्तक कशी वाचावीत हे आपले धर्मग्रंथ सांगतात. त्यांच्या प्रत्येक पानावर, पानातील ओळीत व ओळींतील शब्दात आदर्श तत्वज्ञान  ठासून भरल आहे. दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करण्याची कुवत त्यांच्यात आहेत. 


  जगात इतरत्र संपन्नता, श्रीमंती आपल्याला पाहावयाला मिळेल. तिथली प्रगती आपले डोळे दिपविल. हे सर्व आहे. तरीही भारताविषयीचे प्रेम भल्याभल्यांना नाकारता आल नाही.  इथल्या मातीत आकर्षणाची लोकविलक्षण जादू आहे. तिला कोणतं नाव नाही. पण त्या आकर्षणाचा इन्कारही  करता येत नाही. खूप दिवस घरापासून दूर आहोत. आज घरी जाण्यासाठी निघालोत. मनात घराविषयीची ओढ, घरातील माणसांचे प्रेम, या सर्व गोष्टींच आकर्षण शब्दात किंवा व्याख्येत सांगता येणार नाही. नेमकं तेच आकर्षण भारत व भारतभूमीविषयी जगाच्या मनात आहे. आपण जागलो, वाढलो पण भारतात गेलो नाही, याची खंत अनेक विदेशी लोकांना आहे. नैतिकदृष्ट्या आपला व आपल्या संस्कृतीचा हा फार मोठा विजय आहे. अशा नीतिमान देशात आपण आहोत. आपल्या कणभर अस्तित्वाची भूमिका मिळून देश व देशाची संस्कृती ठरवताहेत. याचा सार्थ अभिमान सर्वाजवळ असला पाहिजे.


 जीवन जगताना अनेक चमत्कारिक घटना बऱ्याच वेळी घडतात. काही चांगल्या तर काही वाईट असतात. काही हलक्याफुलक्या तर काही हृदयद्रावक असतात. अशा घटना घडणें कोणालाच अपेक्षित नसतात. पण त्या घडतात खऱ्या. कधी अचानक कुठूनतरी भूकंपाची वार्ता धडकते आणि अनेकांच्या आशा-अपेक्षासह घरदार जमीनदोस्त होतात. कधी दुष्काळ पडतो आणि संकटांची माळ गळ्यात घालून लोक त्याचा सामना करताना दिसतात. कधी अतिवृष्टीने गावागावात पाणी थैमान घालत येतं. या सगळ्या घटनात जगण विस्कटून टाकल जात. जगणं आणि विस्कटलेल जगण या परस्परविरोधी बाबी आहेत. या व अशा प्रकारच्या महासंकटाने अनेकांच्या आयुष्याला पूर्ण कलाटणी मिळालेले आहे. जगणं विस्कटत तेंव्हा आभाळाला टाके टाकून आभाळ शिवण्यासारखं असतं. असं जगणं जिवंतापणीचा मृत्यू होय. काय काय म्हणून हातात धरून ठेवणार?  कोणाला कोणाला वाचवणार? सगळं तर ठीक चाललं होतं. क्षणात सर्व परिस्थिती भयानक असल्याचे चित्र समोर असताना होत्याचं नव्हतं पाहण्याची धमक मनात शिल्लक राहत नाही. एखादा महापूर बोळातून यावा, तसे अश्रू बाहेर येण्यासाठी डोळे अपुरे पडतात. भावनांचा बांध चौफेर विखुरला जातो. काय अडवाव आणि काय आठवावं? 


 जशी संकटरुपी भयानकता अचानकपणे समोर येते, तशाच अचानक काही चांगल्या घटना देखील घडतात. पावसाळ्यात चातकाच ओरडणं मनाला हुरहूर लावून जात. त्याच्या ओरडण्याने पावसाची अनामिक वाट पाहिली जाते आणि अशीच एक दिवस चातकासह सृष्टी तृप्त करणारी बरसात येऊन जाते. एका अनामिक हुरहुरीला असं समाधानाच पूर्णत्व येत. आवडती व्यक्ती दूरवर आहे. अचानक एके दिवशी ती आपल्या समोर यावी. जे अकल्पित समाधान आपल्याला मिळतं, ते ओठांत कधीच मावत नाही.  त्याच्या येण्यान मन भरल्याची पावती आपल्या चेहऱ्यावर मिळते. ती व्यक्तीच नाही तर अनेक आठवणी त्याच्याबरोबर आपली  संगसोबत करण्यासाठी आलेल्या असतात. त्याच्या येण्यानं मनाची मरगळ दूर होतें व नवसंजीवनी अंगात संचारते. असं का होतं?  तसं पाहिलं तर जगात कोणीतरी कोणाची वाट पाहतोय हे सर्वत्र चाललेलं असतं. बायको नवऱ्याची,  बाळ आई-बाबांची, आजोबा नातवांची, मित्र मित्राची, झाड पाण्याची, दुकानदार गिऱ्हाईकांची, वाट पाहत असतात. यश प्रयत्नांची वाट पाहत. गुरु उत्तम शिष्याची तर परमेश्वर निस्सीम भक्ताची वाट पाहतो. एका उदात्त हेतूनं वाट पाहणं वेगळं आणि स्वार्थाच्या किंवा स्वहितार्थ वाट पाहणं वेगळं. त्यात बरेच नैतिक अंतर आहे.


 एखाद्याच्या असण्याने कुणाच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होत असतील तर त्या विशिष्ट व्यक्तीच्या अस्तित्वाची, उपस्थितीची भूमिका खरोखरीच अतुलनीय मानावी लागेल. अनेकांची जगण्यातील उमेद खचलेली असते. त्याला बळ देणं  कधीच गैर असू शकत नाही. उलट या भूमिकेत आपण असणं कोणासाठी वरदान ठरत असेल, तर ती भूमिका वठवण, त्या भूमिकेत राहण नेहमी चांगलं होय. दीपस्तंभाप्रमाणे स्वतः अचल राहून इतरांना मार्ग दाखवण तसं कठीण काम आहे. पण  आपल्यामुळे अनेकांना मार्ग दिसत असेल तर दीपस्तंभ का होऊ नये? इतरांना वाट दाखवताना आधी स्वतःला वाट सापडण महत्त्वाच आहे. आपण वाटेवर असणंसुद्धा त्याइतकच महत्त्वाच आहे. अशा प्रकारच्या जगण्यातील आस्वाद  वेगळाच असतो. आपली ती भूमिका  श्रेष्ठ मानावी लागेल. 


 चित्रपट किंवा नाटकातील भूमिकेशी ते पात्र एकरूप झालेले असत. त्या पात्रातील सुख-दुःख अभिनयातून व्यक्त होतं. कलाकार आपली भूमिका मोठ्या तन्मयतेने साकारतात. कलाकाराच्या वास्तविक जीवनात त्या भूमिकेला काडीचाही थारा नसतो. भूमिका वठवताना हसणं, रडणं, गंभीर होण म्हणजे फक्त अभिनय होय. रडण्याचा अभिनय करणे म्हणजे रडणं नव्हे. प्रेमाचा अभिनय म्हणजे खरंखुरं प्रेम नव्हे. मारामारीचा अभिनय म्हणजे लुटूपुटूचा खेळ होय. सगळं म्हणजे खोटं खोटं. पण आपल्यासाठी तो कलाकार सर्व प्रसंग जिवंत करण्याचा अभिनय करतो. आपलं रोजचं जगणं म्हणजे एक उत्कृष्ट अभिनय का असू नये? आपलीसुद्धा जगण्यातील भूमिका लुटूपुटू, खोटी खोटी का असू नये? जीवन म्हणजे एक विशाल रंगमंच आहे. इथली आपली भूमिका संपली म्हणजे इथंच आपला मेकअप उतरवून आपल्या मूळ घरी जायचय. कोणतीही वस्तू जाताना बरोबर न्यायाची नाही, की रंगमंचावरील पात्रच जीणं बरोबर घ्यायचं नाही. इथली भूमिका विसरून, आपल्या मूळ भूमिकेत आपणा सर्वांना परतायचं आहे. आपल्याला मात्र या गोष्टीचा पुरता विसर पडतो. आपण जगतोय. पण प्रत्येक वस्तू किंवा व्यक्तीत डिंक  लावल्याप्रमाणे चिकटून बसतोय. खरोखरच हे जगणं आहे काय?  मी एक टुमदार घर बांधलं. इतरांपेक्षा जरा वेगळ आहे. त्याचं वर्णन ऐकवून ऐकवून सर्वांना बेजार करून सोडतो. एक छानदार गाडी घेतली. हजारवेळा तिला मिरवून आपली आर्थिक ताकद आपण सर्वांसमोर सिद्ध करत असतो. एखाद पद मिळाल तर त्या पदाला पुरत चिकटून बसतो. सोडता सोडत नाही. त्यातुन जे जे गाळून काढता येईल ते ते शेवटपर्यंत काढतो.  हे का ?  आपण एक घर बांधतो. त्याचं इतकं रसभरीत वर्णन करतो.परमेश्वराने सकल सृष्टीच बांधकाम सुरेखपणे केलय. ती निर्मिती करताना त्यांन त्याचं वर्णन किंवा बडेजावी कधीच मारली नाही. 


  आपला अनेकांशी संबंध येतो. कोणाशी प्रेमाने, कोणाशी खट्याळपणे, तर कोणाशी तटस्थपणे. आपण कोणावर प्रेम केलं, मग ती व्यक्ती असो वा वस्तू, आपण त्यात पुरते अडकतो. प्रसंगी फसतोदेखील. कोणाशी वाद झाला तर आपण तो विकोपाला नेतो. एखाद्या ठिकाणी तटस्थपणाची भूमिका घेतली तर कमालीचे तटस्थ होतो. त्या घटनेच किंवा प्रसंगच आपल्याला सोयरसुतक नसतं. घरातील माणसावर बरावाईट प्रसंग आला तर आपल्याला धक्का बसतो. असं का होतं?  त्या नात्यात आपण पुरते अडकलेले असतो. त्या नातेसंबंधाशी आपण खरोखरीच संबंध जोडलेला असतो. जगताना स्वतःची भूमिका विषद करणं गरजेचं आहे. 


  स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला 'कर्मयोग' जीवन जगायला शिकवितो. त्या कर्मयोगानुसार जीवन जगणे म्हणजे चिखलात कमळ उमलणं होय.  एक निस्वार्थी, निगर्वी, अहंकाररहीत जगणं कर्मयोग शिकवितो. सर्वजण तर रंगमंचावर आहेत.  बोलताहेत, भांडताहेत, जगताहेत. पण ते खरे की खोट? जगताना आपण फक्त जगतोय. अभिनयक्षमता आपल्यात नाही. याच जगण्यात जेव्हा आपण अभिनय शिकू तेव्हा तिथून जगणं सुरू होईल. आपली भूमिका सुरेखपणे आपण वठवू तेव्हा तिला दाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. याच जीवनातील, दोन जगण्यातील अंतर या तत्वामुळे आपण अनुभवू शकू. जगुनसुद्धा आपलं जगणं अलिप्तपणे अनुभवू शकू. प्रेम करूनही त्यात अडकणार नाही. पण प्रेम तसूभर कमीही होणार नाही. आपण रागावू पण तरी आपण रागीट असणार नाही. आपण  बोलू, तरीही मौनवृत्त धारण केलेल असू. आपण अनेक नातेसंबंध प्रस्थापित करू. पण नात्यातील बंधनात कधीच अडकणार नाही. आणि आपली ही भूमिका आपल्यासाठी खूप काही मौलिकता देऊन जाईल.   110706   ©Harish Gore

Prof. Agarwal sir Vaduj

 Dear Agarwal sir, It was pleasent experience for me to read your 'A Pryayer to My God, the Man'. A deep touch to heart by reading a...