समारोप
निरोप
वेगळा व समारोप वेगळा. समारोप म्हणजे सांगता, शेवट. निरोप म्हणजे तळमळ, व्याकुळता,
हुरहूर, आठवण, वेदना, एक झुरणं, एक संवेदना जी फक्त संबंधीत व्यक्तीलाच जाणवते.
काही निरोपात आनंदही असतो; पण असा निरोप साजरा करता येत नाही. निरोपाच गांभीर्य
त्यात दिसत नाही. निरोप.…..मनाला मनापासून पिळवटून काढणारा प्रसंग......! तसं तर आपणाला
अनेक ठिकाणी निरोप द्यावा व घ्यावा लागतो. आपण तो आनंदानं देतो व घेतोही. पण काही
ठिकाणचे निरोप देणेघेणे मन कासावीस करून सोडते. निरोपाच्या वेदना हरघडीला उगळल्या
जातात. निरोपाच्या आठवणी बेचैन करून सोडतात. काहींना चांगला निरोप देता येत नाही.
काही निरोप देण्यात पटाईत असतात. त्याला शुद्ध मराठीत 'कटवणे' असं म्हणतात. अशा कटवण्यात पटाईत असणाऱ्यांसाठी आजचा लेख नाही. अर्थात काही
ठिकाणी अशा कटवण्यात वेळ वाचवणं हा मुख्य भाग असतो. काहींना मात्र कटवावच लागतं.
तथापि कटवणे म्हणजे निरोप असं स्पष्टपणे म्हणता येणार नाही. निरोप दिमाखात दिला
जातो. कटवणे हा चुटकीचा खेळ आहे. अनेकजण असा खेळ गंमतीने खेळतात.
निरोप काही अंशी त्याग म्हणावा लागेल. म्हणजे
नववधू सासरी जाते तेव्हा तिला निरोप दिला घेतला जातो. नवविवाहित सासरी जाताना
व्याकुळ होते. इकडील मंडळी आता फक्त आठवणीत राहतील, प्रत्यक्षात असणार नाहीत.
याची तिला स्पष्ट कल्पना असते. मला वाटत यापेक्षा मोठा निरोप नसेल.....! यापेक्षा
दुसरी वेदना नसेल. आपल्या प्रिय आईवडील, बहिणभाऊ, सगेसोयरे यांना सोडून ती
सासरी जाते तेव्हा ती माहेरचा त्यागच करते. तेव्हा निरोप व त्याग यांचा जवळचा
संबंध आहे. त्यागात प्रेम असतं. त्यागात आठवण आहे. तळमळ आहे. व्याकुळता आहे.
हुरहूर आहे. निरोपात उमटणाऱ्या भावना कदाचित शब्दात सांगूनही कमी पडाव्यात इतक्या
उत्कट असतात. असो
गेले जवळजवळ तीन महिने दर सोमवारी आपण माझ्या
सोबत आहात. आता समारोपाची वेळ अगदीच जवळ आली आहे. आजचा हा समारोपाचा शेवटचा भाग.
हा भाग मात्र ताजा आहे. मागील सर्व भाग मी पूर्वी लिहले होते. जवळपास चौदा
वर्षानंतरही ते मला ताजे वाटले. म्हणून ते डिजिटल केले व आपल्या सेवेत हजर केले.
खरं तर अशाप्रकारच लिखाण लोकांना आवडेल की नाही हा प्रश्न माझ्या मनात होता. मग
विचार केला, चला पाहुयात. मी अक्षरशः
भारावून गेलो. माझे फेसबुक खाते, फेसबुक पेज व ब्लॉगवर हे लेख मी उपलब्ध केले. वास्तविक
माझ्या जवळच्या लोकांचा त्यावर पहिला अधिकार. आता फेसबुकवर सर्वजण दिसतात. म्हणून 'फेसबुक माण-खटाव', डॉ. प्रा. संगीता भालसिंग
संचालित 'चित्रशलाका', ‘आम्ही साहित्यिक’ व
उत्तरार्धात ‘अक्षर शाळा’ या माझे मित्र बरडकर यांच्या फेसबुक समुहावर मी शेअर केले. यासर्व ग्रुपवर चांगला
प्रतिसाद मिळाला. या सर्व ग्रुपचे सदस्य व अडमीन यांचे मी मनापासून आभार मानतो.
त्याशिवाय फेसबुक पेज, फेसबुक खाते व ब्लॉगवर देखील अनेकांनी त्याचा लाभ घेतला. सर्वांचे आभार.
वाचलेल्यापैकी अनेकांनी लाईक किंवा कंमेंट करणं टाळलं. मी लाईक व कमेंटचा भुकेला
नाही. हे माझे विचार आहेत. चांगले विचार कोणी लिहिले अथवा कोणी वाचले वा कोणाच्या
प्रतिक्रियांवरून अथवा प्रतिसादांवरून त्यांची किंमत कमीअधिक होत नाही. शेवटी चांगलं
ते चांगलच. तरीही अनेकांनी लाईक व कंमेंट केले. माझे लेख एवढ्या मोठया प्रमाणावर
वाचण्याची ही पहिलीच वेळ. तेव्हा सर्वांना मनापासून धन्यवाद...!
अनेकांनी सर असंच लिहा, वाचायला छान वाटतंय, असं आवर्जुन सांगितलं.
अनेकांनी अभिनंदन केलं. अभिनंदनाने हुरळून जाण्याइतपत मी नवखा लेखक नाही. वास्तविक
माझ्या स्तुतीपेक्षा ते अनेकांच्या वाचनात आले, हे फार महत्त्वाच आहे. लिखाणातून
मला आनंद मिळतो. तो सर्वांना वाटण्यात गैर काय?
एकूणच लोकांच्या प्रतिक्रियांवरून मी लिहावं,लिहीत राहावं असा सूर आला.
सारख सारख एकाच सुरात लिहण्यांन वाचकांची वाचनाविषयीची रुची कमी होण्याची शक्यता
असते. बरं ते योग्यही नाही. शेवटी शब्दांचे डोस किती जणांना रूचतात? त्यात जड लिखाण डोक्यात
घेण्याऐवजी डोक्यावरून जातं याच भान मला आहे. मी लिहावं हे जरी ठीक असलं; तरी
योग्य ठिकाणी थांबणही गरजेचे आहे. तशीही ही लेखमाला तीनेक महिने चालली. एवढया
प्रदीर्घ लेखनाची ही पहिलीच वेळ. यात बरेच दिवस व्यस्त गेले. आणि म्हणून या लेखमालेचा
समारोप करण इष्ट होय. पुन्हा कधी व काय लिहीन हे मला माहित नाही. तसे अनेक विषय
सतत डोक्यात घोळत असतात. पण शब्दबद्ध करण्यासाठी निवांतपणा मिळणं दुरापस्त होतंय.
बघूयात काय होतंय ते. जास्त वेळ पेनापासून स्वतःला दूर ठेऊ शकत नाही हे मात्र खरं
आहे.
कोरोनान जवळजवळ जग कवेत घेतलं. आपणा सर्वांना
खरंच थांबावं लागलं. या जगात दृष्ट प्रवृत्या बळावत आहेत हे निश्चित आहे. मग त्या
आपल्या आसपास असो किंवा देशाच्या आसपास. कोरोना हा असाच दृष्ट पृवृत्तीच्या लोकांच्या
विचारसरणीतून जगभर हाहाकार माजविण्यासाठी पासरवलेला रोग आहे. रोग कुठून व कसा आला
यावर चर्चा करण्याच हे व्यासपीठ नाही. पण सर्वाना कामाला लावलं हे मात्र खरंय.
चीनचा आधुनिक छुपा साम्राज्यवाद व विस्तारवाद आपल्या मुळावर उठला आहे. वास्तविक
सध्य परस्थितीत विस्तारवादी धोरण शक्य नाही. प्रत्येक देशानं असलं धोरण अवलंबल तर
जगाचा विनाश अगदीच जवळ येईल. वैश्विक विचारांची गरज जगाला आहे. येणाऱ्या काळात हे
वैश्विक नेतृत्व भारताला करावं लागणार आहे. इथली माती अशा सुपीक विचारांनी पावन
झाली आहे. त्यामुळे भविष्यातील जगाचे नेतृत्व भारताकडे येणार आहे. जग विनाशपासून
वाचवण्याची अलौकिक ताकद भारतीय संस्कृतीत आहे.
सध्य परिस्थितीत आपल्याला अनेक गोष्टी
नव्याने शिकून घ्याव्या लागल्या. हात धुणे, अंतर ठेवणे, तोंडाला मास्क लावणे, इत्यादी गोष्टी आपल्या समाजाच्या जवळपास अंगवळणी पडल्या
आहेत. आपल्यासाठी ते योग्यच आहे. याव्यतिरिक्त कोरोनाकाळात अनेकांनी जोरदार पैसे
कमावले. जणू ही त्यांच्यासाठी सुवर्णसंधी होती. अनेकांना अतोनात हाल सोसावे लागले.
अनेकांच्या कुटुंबातील सदस्य आजाराला बळी पडले. सामाजिक भीतीतर पुढील अनेक वर्षे
राहील. माणस माणसापासून अंतर ठेवून जास्त दिवस जगू शकत नाहीत. माणसामाणसात संशयाचा
पीक अधिक बाळावतय. त्यामुळे अनेक सामाजिक संदर्भ बद्दलताहेत. हे न भरून येणार नुकसान
आहे. प्रश्न असा पडतो की याला जबाबदार कोण? चीन की आपण? त्याशिवाय यावर उपाय काय? भविष्यात असे विषाणू हल्ले
होणार नाहीत याची खात्री काय? त्यामुळे यावर खोल विचार होणं आवश्यक आहे. चिंतन होणं
गरजेचं आहे. भविष्यातील आपली गरज व दिशा याच नियोजन करावे लागेल.
देशादेशातील वाद करोनापर्यंत गेला. जग एका
अनोळखी आजाराशी झुंज देतंय. आपली मनं साफ होणं यानिमित्ताने गरजेचे होऊन बसले आहे. जरी
विस्तारवादी धोरणामुळे आपण चीनला दूषणं दिली तरी आपल्या जवळच बरकाव्याने पाहिलं तर
हे विस्तारवादी धोरणं छोट्या-मोठ्या प्रमाणात सर्वत्र दिसेल. धनाचा किती संचय केल्यानं आपलं आयुष्य
चांगल्या प्रकारे जगता येईल याचं उत्तर कोणाला देता येत नाही. त्यामुळे संपत्ती
संचयात आयुष्य पुढे जातंय व चांगले विचार मागे राहताहेत. चांगले विचार घेऊन हे जग आत्ता
आहे त्यापेक्षा सुंदर करण्याचा प्रयत्न प्रत्येकानं करावा. लेखमाला सुरू करून हे
जग सुंदर करण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न होय. शेवटी चांगले विचारच तारणार आहेत.
मला याची स्पष्ट कल्पना आहे की माझे प्रयत्न छोटे आहेत. पण असेच छोटे छोटे प्रयत्न
शेवटी जग सुंदर, मनाने निरोगी, व आशावादी बनवणार आहेत.
इतरांविषयी चांगली भावना जग सुंदर करण्याचा प्रयत्नच आहे.
सध्या सोशल मीडियाचा वापर लोकप्रियता
मिळवण्यासाठी जास्त होतोय. जवळचा लांबचा पाहून क्रिया व प्रतिक्रिया दिल्या
घेतल्या जातात. खरं काम बाजूला पडतं. लोकप्रियतेच्या नावाखाली आपण दुसऱ्याचा वेळ व
अक्कल कामातून घालवतोय याची कल्पनाही यांना नसते. प्रत्येकाने खरंच आपल्या
कुवतीप्रमाणे पोस्ट कराव्यात. स्पष्टपणे सांगायचे तर हे लिखाण मी सवंग
लोकप्रियतेसाठी केले नाहीत. माझ्या लोकांना मला काहीतरी द्यावं असं वाटतं होत.
देताना ते सर्वोत्कृष्ट असावं एवढीच अट होती. हे लिखाण चांगलं आहे किंवा नाही हे
मात्र मला माहित नाही. ते आपण सुज्ञ वाचकांनी ठरवावं. मराठीतील माझा हा पहिलाच
प्रयोग....! व्याकरणाच्या अनेक चुकाही असू शकतात. माझ्या चुका मला मान्य आहेत. आपण
त्याबद्दल मला माफ करावे. व्याकरणाच्या चुका होतात म्हणून लिहायचं नाही ही चूक असू
शकते. ती भीतीही आहे. ती उराशी बाळगून मी लिहिणार नाही. लेखन हे धाडस आहे. मी ते
धाडस केलं आहे. भविष्यात यात सुधारणा होईल हे निश्चित.
आता वळूयात मुख्य लिखाणाकडे. सर्व लेख दीर्घ
होते यात शंका नाही. सोशल मीडियातून असं दीर्घ लिखाण नाकारलं जात याची स्पष्ट
कल्पना मला आधीपासूनच होती. आपल्यापैकी अनेकांनी लेख संपूर्ण वाचणे टाळले, याचीही
जाणीव मला आहे. त्यात आपणा कोणाची चूक नाही. वास्तविक आपल्याकडे आता प्रदीर्घ
लिखाण वाचण्यासाठी वेळ नाही. व्यावहारिकदृष्ट्या असले लेख लिहिणं योग्य नाही. यात
आपण लोकांचा वेळ घेतोय असंही अधूनमधून वाटून गेलं. मध्यंतरी प्रत्येक लेखाचे दोन
भाग करून प्रसारीत करावेत असंही मनाला वाटलं. त्यामुळे जी कमिटमेंट मी आधी केली
होती, त्याला बाधा येत होती.
त्यामुळे तोही विचार मी मनातून काढून टाकला. आहे ते योग्य समजून दर सोमवारी
वाचकांसमोर ठरल्याप्रमाणे आलो. सुदैवाने संपूर्ण लेखमाला पूर्णही झाली. ही सर्व 'त्याचीच' लीला मी मानतो.
देश व जग कोरोनाशी झुंजताना आपणही मागे राहू
नये असं सतत वाटलं. आमच्या अनेक शिक्षक बांधवांच्या सेवा कोरोनासाठी अधिग्रहित
केल्या गेल्या. मी पाहिलं, सर्व शिक्षकांनी या सेवा समर्पकभावनेने केल्या. ही तर खरी देशसेवा आहे. तसा
आमचा शिक्षक सांगेल ते काम निमूटपणे करतो. विशेषतः समाजाला जास्त गरज असेल तिथं तो
हजर असतो. कोरिनाकाळात कोरोना सर्वेक्षण, वॉर्डबॉय, चेकपोस्ट, क्वारंटाईन ड्युटी, इत्यादी ठिकाणी बिनबोभाट सेवा दिल्या. भीतीच सावट होतच.
तरीही लोक मागे हटले नाहीत. छान सेवा केली. आपणही मागे असू नये असं वाटत होतं.
उन्हाळभर क्वारंटाईन ड्युटी केली; पण प्रत्यक्ष कोरोना ड्युटी नाही. शेवटी ती वेळ
आली व माझी अधिकृतपणे विसापूर ता. खटाव येथे चेकपोस्टवर पंधरा दिवसांसाठी नेमणूक
झाली. नेमके माझ्या आधीच गावात सात रुग्ण एकाच दिवशी सापडले होते. सुरुवातीची भीती
कर्तव्यात कधी परावर्तित झाली, हे समजलेच नाही. अतिशय आनंदाने व समाधानाने सर्व
काळजी घेऊन सेवा बजावली. मी कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील सैनिक असल्याचा अभिमान आहे.
आता पुन्हा प्रश्न लेखमालेवर येतो. पंधरा दिवस
चेकपोस्टवर काम करताना लेखमाला सुरू ठेवणं मोठं जिकिरीचं काम होऊन गेलं. मुळात लेख
प्रदीर्घ. त्यात मराठी टायपिंग, एडिटिंग मोठं अवघड काम. इतके मोठे लेख पूर्ण होतात की नाही
हा प्रश्नच होता. त्यावरही उत्तर मिळालं. मला मिळणारा अधिकचा वेळ मी लिखाणासाठी
दिला. प्रसंगी रात्री जागलो. खरं तर मी रात्री नव्हे, तुम्हाला दिलेल्या शब्दाला
जागलो. विनाअडथळा कार्य सिद्धीस गेलं. अनेक प्रश्न असेच सुटतात, यावर माझा ठाम विश्वास आहे.
त्रास तर होणारच. पण त्यात आनंद मानला की त्रास कमी होतो. तसंच झालं.
दुसरं असं की दरम्यानच्या काळात तीन दिवस मी
आजारी पडलो. त्यामुळे तीन दिवस काहीही करता आलं नाही. अशा वेळी केलेले संकल्प
तुटतात की काय ही भीती सतत मनात डोकावते. एरवी आपण सगळेच अधूनमधून आजारी पडतो. एका
टाईमबाऊंडमध्ये काम करताना तुम्हाला वेळ कमी असतो. विशेषतः अशा वेळी कारणं
चालत नाहीत. सामाजिक कमिटमेंटला काही किंमत असते. वादे आणि इरादे फक्त घोषणा
करण्यासाठी नसतात. ते पूर्ण करावे लागतात. आता माझी पुन्हा चिंता वाढली. ती वाढणे
स्वाभाविक होते. सुदैवाने तीन चार दिवसात बरा झालो व राहिलेल्या दिवसात पुढील अंक
पूर्ण केला. एकूणच या लिखाणामुळे मी मात्र तीन महिने पूर्ण व्यस्त राहिलो.
त्यामुळे लॉकडाऊन निवांत व व्यस्त घालवता आला.
जीवनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मार्ग
मिळतात. मिळालेलं जीवन फार थोडं आहे. त्यात मनात विष घेऊन जगण्यात काहीच अर्थ
नाही. बरं असलं विष कुठं खपत नाही. विषारी पेरणीचं पीक कधी आपल्या दारात उगवेल हे
सांगता येत नाही. त्यामुळे या लेखमालेत व्यक्त केलेल्या विचारांना एक वेगळी उंची
आहे. त्याचा लाभ कोणी घ्यायचा की नाही हा प्रश्न ज्याचा त्याने सोडवावा. पण
कोरोनानंतरच्या जीवनात ही लेखमाला जगण्यासाठी नवी उभारी देईल यात तिळमात्र शंका
नाही. याच काळात अगदी माझ्या जवळच्या अनेकांनी आत्महत्या केल्या. वास्तविक
निराशावादी धोरण माणसाला मृत्यूपर्यंत घेऊन जात, नव्हे जिवंत मारते. अविचार
मृत्यूच्या दाढेपर्यंत नेतात. आणि म्हणून चांगल्या विचारांची समाजाला सतत गरज आहे.
ते कुठूनही मिळोत,
पण सतत मिळाले पाहिजेत. जीवन कधीही नव्याने सुरू करता येते. जगताना सुंदर जगणं
हा विचारांचा खेळ आहे. तो कधीही खेळता येतो. सुंदर जगण्यासाठी ही लेखमाला निश्चित
उपयुक्त ठरेल.
काही नविन देताना त्यात भर टाकावी म्हणून या
लेखमालेतील हा अंतिम लेख. विषयाची निवड करण माझ्यासाठी खूपच सोपं होतं. अनायासे
आपलं लिखाण संपत आलंय. तेंव्हा हा समारोप का होऊ नये? असा विचार मनात आला आणि तो
झाला. मला माझ्या आयुष्यात अनेक निरोप वेदनादायक जाणवले आहेत. आजही वाटतात. मला
आवडणारी माणसं निरोपाच्या यादीत आवडत नाहीत. त्यांना मी तरी माझ्या बाजूने निरोप
देऊ शकत नाही. का कोणास ठाऊक पण माझ्या सहवासातील अशी अनेक गुणी लोकं आज
माझ्याबरोबर नाहीत खरी; पण मनातून जाता जात नाहीत. ती माझ्याशी सतत हितगुज करतात. ती सदैव बरोबर
लागतात. ती असतातही. त्यामुळे त्यांना माझ्याकडून निरोप मिळणार नाही, हे खात्रीशीर आहे. पण
त्यांच्या आठवणींचा समारोप मला करता येतो. शेवटी आपण एका संवेदनावर जगणारी माणस
आहोत. त्यातून आठवणी जपण व त्या मनात जागवण म्हणजेच माणूसपण जागवण आहे. सध्याच्या
जमाण्यात आठवण आली की फोन करता येतो. त्यामुळे जरी निरोप दिला तरी व्हर्चुअली ती
व्यक्ती सोबत असल्याचा फील येतो. आपण सर्वजण असंच करतो.
सर, एका दमात वाचून होत नाही, असा सूर अनेकांनी लावला. यापुढे
जर मी आपणासोबत काही शेअर केलं, तर असं प्रदीर्घ न लिहता छोट्या भागात विभागणी करून वेळेची
बचत केली जाईल. अनेकांनी कौतुक केलं. टीकाही कोणी केली असेल. कौतुक व टीका
दोन्हीही मान्य....! आपण व्यक्त झालो हे मात्र खरे....! विचार चांगले असले तरी फार
दिवस मनात ठेवले की ते अडगळ होतात. आता नवीन चांगली अडगळ साचली की पुन्हा
भेटेन....! सर्वांनी स्वतःची व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी हि विनंती. लोभ
असावा. 180920 ©Harish gore