दौशाड हे डॉ. नंदकुमार राऊत यांच्याकडून मिळालेले पुस्तक मला जसे वाटले तसे.....
पुस्तकाचे नाव एका चिवट जातीच्या वनस्पतीच्या नावावरून घेतलेले आहे. प्रतिकूल परिस्थितीत फुलणारी ही वनस्पती जेव्हा सगळीकडे राख झालेली असते तेव्हा टवटवीत असते. सर्वांसमोर आदर्श निर्माण करते. मी फक्त जिवंत नाही तर टवटवीत आहे, हे ओरडून जगाला सांगते. डॉ. नंदकुमार राऊत व राऊत कुटुंबीय याच कुळातील आहेत. त्यामुळे समर्पक असं नाव वाटतं.
दौशाड हे डॉ. नंदकुमार राऊत लिखित आत्मचरित्र आहे. अगदी आजोबांच्या लहानपणापासून त्यांच्या आजपर्यंतच्या जीवनातील अनेक घटना संवादासह माणदेशी शैलीत पहावयास मिळतात. पुस्तकाचे हे विशेष वैशिष्ट मी मानेन की, पुस्तकात बोलीभाषेतील अनेक म्हणी पुस्तकाला माणदेशी बनवतात. लेखकाने कोणाचाही मुलाहिजा न ठेवता बिनदिक्कपणे पुस्तकात सर्रास वापरल्या आहेत. खरंतर बोलीभाषेमुळे त्या त्या भागाशी आपण एकरूप झालेलो असतो. माणदेश हा कणखर आहे. इथली लोकं तिखट बोलतात. अनेकांना ते झोंबतं. पण जेवढी वरून कठीण दिसतात, तेवढीच मनानं मधुर व प्रेमळ अंतरंग घेऊन वावरतात. ती अवास्तव खर्च करत नाहीत, की कोणतीही बडेजावी मिरवत नाहीत. ती वास्तवाशी घट्ट वीण राखून असतात. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यासारख्या इथं आत्महत्या होत नाहीत. इथं शिक्षण फक्त परिस्थितीचंच मिळतं व त्यातूनच घराघरात दौशाड वनस्पतीची पैदास होते.
दौशाडची कथा सुरू होते लेखकाच्या गोसावीवाडी गावापासून. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील इतर गावाप्रमाणेच एक गाव. छोट व टुमदार. कथेला इथेच सुरुवात होते व कथेचा शेवटही लेखकाच्या आईच्या निधनाने इथेच होतो. पुस्तक जणू एक वर्तुळ पूर्ण करते. या वर्तुळाच्या परिघावर अनेक पात्र आपापली भूमिका चोख पार पडतात व अखेरीस वर्तुळ पूर्ण करतात.
लेखकाचे वडील गंगारामदादा हे एक परिस्थितीने गांजलेलं, संस्कारहीन व रागीट पात्र. तरीही लेखक त्यांचा सतत मान राखतात. कारण ते त्यांचे वडील आहेत. तापट, काहीसे आडमुठे स्वभावाचे दादा इथल्या अनेक वडिलांचे प्रतिनिधी वाटतात. इथला बाप म्हणजे साक्षात यमच. बापाची भीती काळजात चर्रर्र केल्याशिवाय राहत नाही. अर्थात गंगारामदादांच्या लहानपणी आई वारली. त्यांचे वडील भोळसर. त्यामुळे संस्कार व शिक्षण मिळालेच नाही. प्रेम आपुलकी व माया मिळण्यापेक्षा भाकरी मिळवण्याची स्पर्धा खूप मोठी होती. जगण्याच्या संघर्षात आयुष्य प्रत्येक टप्प्यात दादांना नवीन वाटत गेलं. अशात तरुणपण व दादांचे लग्न झालं. त्यामुळे दादा सतत नवीन परिस्थिती पाहताना, इतरांवर फणाच काढताना दिसतात. अर्थात शिक्षण व संस्कार नसल्यानंतर रागीट होणं स्वाभाविक आहे. शेवटी परिस्थितीतून मार्ग काढण्याचे शिक्षण हे खूप मोठे हत्यार आहे, जे दादांकडे कधीच आले नाही. असं असलं तरी दादा जिथे आहेत तिथे शोभतात. कथेतील सर्वच पात्र दादांना वचकून असतात, भितात. पूर्वार्धा रागीट, तापट दादा, उत्तरार्धात शांत झालेले पहावयास मिळतात. समाधानी वाटतात.
दौशाडचा गाभा म्हणजे इथलं दुसरं पात्र_लेखकाची आई. लक्ष्मीबाई. त्या तशा साध्याच पण बहिणाबाईसारखं विशाल तत्त्वज्ञान आईच्या ठिकाणी पाहावयास मिळत. कथेतील सर्वच प्रमुख पात्रांच्या जडणघडणीत या माऊलीचा सिंहाचा वाटा आहे. भविष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची दृष्टी तिच्याकडे आहे. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी वाट्टेल तेवढे कष्ट उपासण्याची तिची तयारी आहे. ती जिद्दी व चिवट आहे. तिचं सर्वांकडे बारकाव्याने लक्ष आहे. सोनबाच्या परीक्षा फी साठी दारोदार तिनं पदर पसरला. हार मानली नाही. अनेकांनी तिला रिकाम्या हाताने माघारी पाठवलं. पण ती हारली नाही. तिने ते पैसे मिळवले. पुढील अनेक दिवस शेतात राबून सर्व पैसे फेडले. हे व असे अनेक प्रसंग तिनं अगदी लीलया पार केलेले पुस्तकात सर्वत्र दिसतात. लेखकाच्या आईला मध्यवर्ती पात्र म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण सर्व कथाच तिच्या अवतीभोवती फिरते आहे. मुळात या कथेचा जन्मच तिच्या मृत्यून झालाय असं मला वाटतंय. कारण आई गेली आणि लेखकाचं मन सुन्न झालं. त्यातूनच पुढे ही कथा पुस्तकरूपान उतरली गेली. त्यामुळे पुस्तकात व लेखकाच्या जीवनात आईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपूर्ण पुस्तकांमध्ये आईच्या आत्महत्येचा प्रसंग सोडला तर सर्व ठिकाणी ती एक महागुरु वाटते. अधिकारवाणीने व प्रेमाने ती सर्वांची मनं जिंकते. वर उल्लेख केलेला आईचा आत्महत्येचा प्रयत्न हा केवळ आणि केवळ दादांच्या मुळेच घडलेला होता. पण आई त्यातूनही सही सलामत बाहेर येते. तिचं साध तत्वज्ञान थेट हृदयापर्यंत पोहोचतं. तिच्या संस्कारातून सर्व मुले घडताना दिसतात.
लेखकाच्या दोन बहिणी अक्का_वंचाबाई व ताई_रुक्मिणीबाई. या दोघीही आपल्या आईच्या स्वभावासारख्याच प्रेमळ व कष्टाळू. अक्का आठ दहा वर्षाची झाल्यानंतर अचानक एके दिवशी ताप येऊन निधन पावते. ताईचं लग्न होऊन तिला म्हसवड येथे दिलेली असते. तिचा नवरा दारुडा. अनेक प्रसंग पुस्तकात आहेत, जिथे शिक्षणाचा अभाव दिसतो. अंधश्रद्धा दिसते. त्यामुळे गरिबी सततची आहे. ताई या परिस्थितीतही तग धरते व आपला संसार करते. पुढे हीच ताई तानाजीबापूंना आधार देते व तिच्यामुळेच ते म्हसवड येथे दवाखाना टाकू शकतात. तिच्या परीने जी शक्य ती मदत त्यांना करताना दिसते.
सोनबाभाऊ व तानाजीबापू ही दोन वेगवेगळी पात्र कथेत दिसतात. ती परस्पर भिन्न आहेत. ती हुशार आहेत पण त्यांच्या वाटा वेगळ्या आहेत. रोखठोक व्यक्तिमत्व म्हणजे सोनबाभाऊ. वस्तुस्थितीशी नाळ जपणारे, जैसा देश वैसा वेश, गरज पडल तिथे चोरी, गरज वाटली तर मारामारी सुद्धा. भाऊंना जसं वाटेल तसे भाऊ जगताहेत. पण त्या पाठीमागे कुटुंब प्रेम दिसते. दहावी झाल्यानंतर मुंबईला जाण्याचं स्वप्न अखेर लाख प्रयत्न करून पूर्ण केलंच. घराला खरी दिशा भाऊंनीच दिली. भाऊ मुंबईला गेले व लेखकाचे घर माणसात आलं. पुढील सर्व कथेचा सूत्रधार सोनबाभाऊ हे पात्र वाटतं. वडिलांच्या अधिकाऱ्याने कुटुंबातील सोपस्कार पूर्ण करताना भाऊ दिसतात. डॉक्टरांच्या दवाखाना उभारणीपर्यंत भाऊ खंबीरपणे सर्वांची साथ देतात. भाऊ हवा तर सोनबाभाऊ सारखाच असावा. कारण सर्वांचा हात हातात घेऊन चालताना प्रगती कमी होते पण सगळे बरोबर असल्याचे समाधान मिळते. भाऊ सर्वांना बरोबर घेऊन जाताना दिसतात.
लेखकाच्या कुटुंबातील सर्वोच्च शिक्षण झालेलं दुसरं पात्र म्हणजे तानाजीबापू. एम.बी.बी.एस. करून एम. एस. (जनरल सर्जन) हे पदव्युत्तर शिक्षण घेणारे एकमेव पात्र. अतिशय हुशार व बुद्धिमान पात्र. संयमी व शांत पात्र. तानाजीबापू पुस्तकाशी स्नेह करणारे वाटतात. त्यातूनच पुढे त्यांनी शिक्षण घेऊन डॉक्टर झालेत.
लेखकाचा लहान भाऊ हनुमंत यांच्याविषयी त्रोटक वर्णन पुस्तकात दिसते आहे.
लेखकाची पत्नी मोनिका ह्या कष्टाने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून पोलीस उपनिरीक्षक व नंतरच्या परीक्षेत पोलीस अधीक्षक बनल्या. लेखक स्वतः स्पर्धा परीक्षेतून मंत्रालयात कक्ष अधिकारी व नंतर अवर सचिव या पदापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे तेच बाळकडू आपल्या पत्नीला देताना दिसतात. अर्थात स्पर्धा परीक्षा खूप कष्ट केल्याशिवाय पार पाडता येत नाही. ते सर्व कष्ट उभयतांनी केलेले अनेक प्रसंग पुस्तकात संवादासह पहाण्यास मिळतात. स्वतः लेखक व त्यांच्या पत्नी मोनिकाताई दोघेही अजून सेवेत आहेत.
संपूर्ण पुस्तकातील उल्लेख करण्यासारखं एक सहपात्र ज्ञानदेव बापू. अर्थास देनाबापू. देव माणूस म्हटलं तरी चालेल. खर तर समाजात शंभर वाईट माणसानंतर एक ज्ञानदेव बापू भेटतात, ज्यामुळे आयुष्य बदलून जाते. समाजाचे कल्याण करण्यात धन्यता मानणारे ज्ञानदेव बापू लेखकाच्या अनेक प्रसंगात बरोबर राहिले, साथ दिली. त्यामुळे त्यांच्या उल्लेखाशिवाय पुस्तक परीक्षण पूर्ण होऊच शकत नाही.
कथा उलगडत असताना पुस्तक मोठा झाल्याचं जाणवत. आत्मचरित्र वस्तुनिष्ठपणे मांडत असताना अनेक प्रसंगातून सत्य सांगावं लागतं. त्यातून काहींची मनं नाराज होऊ शकतात. लेखकाने सडेतोड लेखन करून कोणाचीही मुलाहिजा न ठेवता, सत्य घटनेवर विश्वास ठेवून लेखन केल्याचे नकळत जाणवते. साहित्यातील अवघड प्रकार म्हणजे आत्मचरित्र. लेखक ते सहज मांडतात. त्यांचं हे पहिलंच पुस्तक. पण वाचताना असं कुठे ते जाणवत नाही. लेखक सराईतपणे लिहिताना दिसतात. दौशाडच्या यशासाठी त्यांना आभाळभर शुभेच्छा....!
हरीश गोरे
दहिवडी.
ReplyForward |