Monday 27 July 2020

चिंतन..... सद्भावनांचे…...४

                                    चैतन्य



 एक भला मोठा दगड निस्तेजपणे पहुडलेला आहे. अगदीच निश्चल, निरामय, अचल आणि निस्तेज. कोण कारागिर येतो. त्यात त्याला शिल्प दिसतं. स्थिर पाषाणात शिल्प दिसण हे कलेला पडलेलं स्वप्न आहे. तो पाहतो आणि वेगाने कामाला सुरुवात करतो. दगडाला एक नवी उभारी येऊ लागते.  कलाकार तन्मयतेने झटतो. नको असलेला भाग उडवून लावतो व हळूहळू एका सुंदर कोरीव शिल्पाची निर्मिती होऊ पाहते. आधीचा तो दगड आता भावना सांगू लागतो. हळूहळू कलाकाराचं काम पूर्ण होतो व एक अप्रतिम कलाकृती अनंत कालावधीसाठी चैतन्यमयी होऊन जाते. ती बोलते. तिच्या अंगी असणाऱ्या भाव-भावना व्यक्त करते. निस्तेजापासून तेजाकडे झेपावणारा हा चैतन्याचा प्रवास होय. काय होतं त्या पाषाणात....?  नाही. खरच काही नव्हतं. एका अचल, बेढब दगडात कलाकाराला शिल्प दिसल. आपलं कौशल्य त्यात ओतलं आणि चैतन्य त्यात निर्माण केल. एक दगड  चैतन्यमयी होऊ शकतो. तर प्रश्न असा उरतो की सृष्टीतल्या कोणत्या व्यक्ती अथवा वस्तूजवळ चैतन्य नाही? दगड हा दगड आहे. तो स्थिर आहे. बेढब आहे. पण मग तो कलाकाराच्या हाताखालून गेल्यानंतर पूर्वीचा तो दगड नसतो. त्याला एक नव सळसळत रूप प्राप्त होतं. म्हणजे कलाकाराने त्यात कल्पकता  ओतल्यानंतर त्याला चैतन्य प्राप्त होतं. याचा अर्थ चैतन्य ओतणारा असेल तर कोणत्याही व्यक्ती अथवा वस्तूला चैतन्य प्राप्त होऊ शकत. दगडाजवळ मूर्ती तर होतीच नव्हती फक्त कल्पक नजर......! ती नजर कलाकाराने दिली आणि तो खुलून दिसू लागला. चैतन्याने तो बहरला.

 चैतन्य......... चैतन्य अंगी असणे हे जगणं आहे. चैतन्य आहे तर जीवन आहे. चैतन्य म्हणजे जीवातील शिव आहे व चैतन्य म्हणजेच जीव आहे. जीव फक्त सजीवात असतो असं नाही आणि चैतन्य फक्त चालणाऱ्या किंवा हलणाऱ्या व्यक्ती किंवा वस्तूत असत असं नाही. चैतन्य सृष्टीतील प्रत्येक कणात आहे. प्रत्येक कण प्रचंड ऊर्जा स्वतःच्या ठायी साठवून असतो. इथली कोणतीच गोष्ट निस्तेज नाही. तेजोमय आहे. मुळात सृष्टीच चैतन्यमयी आहे. सृष्टी म्हणजे चैतन्य आहे. सृष्टी तेजाने नटलेला गोल आहे. चैतन्य तिच्या प्रत्येक कणाकणात समाविष्ट आहे. सर्वत्र चैतन्य व्यापून आहे. मनाची मरगळ म्हणजे निस्तेजपणा. मन प्रसन्न म्हणजे चैतन्य होय. प्रसन्न मन अनेक गोष्टींची उलथापालथ करू शकते. अंगात उत्साह असणे हे प्रसन्न मनाचे लक्षण आहे. प्रत्येक वेळीचा उत्साह चांगल्यासाठीच असेल असे नाही. आज हातून घडणारे काम उद्याची प्रसन्नता ठरवते. आज चोरी करताना उत्साह दाखवून उद्याची प्रसन्नता हरवू शकते. त्यामुळे उत्साह योग्य ठिकाणी असणे कधीही चांगलेच असते.

 अनेक व्यक्तींच्या ठायी चैतन्याचा महापूर असतो. अशा व्यक्ती जिथे जातील तिथे चैतन्य बरोबर नेतात. कामाचा मोठा ढिग क्षणार्धात हातावेगळा होऊन जातो आणि आपण हे केले यावर आपलाच विश्वास बसत नाही. याला कारण अंगी निर्माण झालेले चैतन्य होय. भारताला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली. कुणी इंग्रजांबरोबर जाहीर बंड केले, तर कोणी भूमिगत होऊन इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. लोकमान्य टिळकांनी जहाल भूमिका घेऊन इंग्रजांना विचार करायला भाग पाडले. जंग जंग पछाडले, पण स्वातंत्र्य मिळण्याची चिन्हे काही दिसत नव्हती. आणि अशातच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गांधीरुपी महायुद्धाचे रणसंग्रामात आगमन झाले. अखिल भारतवर्षात चैतन्याची लाट पसरली की जे चैतन्य या देशाने प्रभुश्रीराम किंवा श्रीकृष्णांच्या काळात अनुभवले असेल. स्वातंत्र्याचे चैतन्य निर्माण करण्याचे काम या महायुद्धाने केले. चैतन्य स्वतः प्याले व संपूर्ण भारताला चैतन्य पाजले. आबालवृद्धांनी स्वातंत्र्याची मागणी केली आणि इंग्रजांना ती नाकारता आली नाही. खेड्यापासून शहरापर्यंत सत्याग्रह, अहिंसा यांना उधाण आलं. परिणामस्वरूप इंग्रजांना देश सोडून जावा लागला. पारतंत्र्याच्या बेड्या देशाच्या पायातून तोडण्याचं काम महात्मा गांधींच्या चैतन्याने केल. भारतीय समाजमनात जे खोलवर रुजले होते ते तत्व गांधीजी पुन्हा आठवण करून दिल आणि समाज चैतन्याने पेटून उठला. न भूतो न भविष्यती उत्साहाची वीरश्री प्रत्येकाच्या ठायी संचारली. हा देश स्वतंत्र झाला. त्यात गांधीरुपी चैतन्याचा सिंहाचा वाटा आहे.

 चांगल्या विचारांनी भारावून जाणे म्हणजे चैतन्य गृहण करणे होय. चैतन्य म्हणजे आहे तरी काय? चैतन्य पाहून करण्यासारखे आहे. थोडीशी मरगळ बाजूला केली म्हणजे चैतन्याचा संचार झालाच म्हणून समजा. मनाची स्थिरता चैतन्यासाठी आवश्यक आहे. विचारांची लयबद्धता, कृतीची विचारांशी घातलेली सांगड, कृती व विचार यांचा वाचेशी केलेला ताळमेळ म्हणजे चैतन्य....! चैतन्य एक स्थायीभाव आहे. विचारांनी झपाटणे किंवा ध्येयाने भारावून जाऊन  कामाला लागणे म्हणजे चैतन्य होय. ओसाड माळरानावर नंदनवन फुलवणारा कष्टकरी, ध्येयाने झपाटलेला रानवेडा असतो. मनाच्या स्मृतीपटलावर नंदनवनाची आकृती त्याने कधीच कोरून घेतलेली असते. नंदनवन पूर्णत्वास जाणे बाकी असते. ती आकृती पूर्ण करण्यासाठी जणू तो वेडापिसा झालेला असतो. कामाचा ढिग तो रात्रंदिवस उपसतो. घामाचे मोती रानात विस्कटतो.  खऱ्या अर्थाने चैतन्याची पेरणी त्या माळरानात होते आणि एक दिवस चैतन्याच्या वास्तविक रूपात नंदनवन साकार होते. हा केवळ चैतन्याच्या विजय आहे. 'असाध्य ते साध्य करिता सायास' ही उक्ती फक्त चैतन्यासाठीच वाहिलेली आहे. प्रयत्न चैतन्याला पूर्णत्वाकडे नेणाऱ्या पायऱ्या आहेत. अशा पायऱ्या ज्या जोमाने आपण चढु  त्याच जोमाने यश आपल्या जवळ येणार आहे. आपण थांबलो की यश थांबते. म्हणून चैतन्य अखंडपणे वाहणा-या झऱ्याप्रमाणे असावे. चैतन्याचे नसणं म्हणजे जीवनाचा प्रवास थांबवण्यासारख आहे. म्हणून चैतन्य घेऊन जगणं हेच खरं वाहत्या झऱ्याप्रमाणे होय. असं जगणं अनेकांना आधार ठरतं. त्यांचं जगण्याचं कारण बनतं. कोणाच्या जगण्याचे कारण आपण स्वतः बनणे म्हणजे चैतन्याचा परमोच्च बिंदू होय.

 प्रयत्न व यश हे एकामागून एक चालणारे मार्गस्थ आहेत. त्यांच्या चालण्यात कधीमध्ये अपयश डोकावून जात. अपयशाने डोकावले की मनोधैर्य खचून आपण पार कोलमडून जातो. वास्तविक अपयशाचे डोकावणे नैसर्गिक आहे. आपण जास्तिच महत्त्व त्याला देतो आणि प्रयत्न व यशाची पांगापांग करण्यास कारणीभूत ठरतो. अनेक वेळा यश मिळते पण ते स्थिर स्वरूपाचं नसत. कारण ज्याप्रमाणे प्रयत्न व यश हे दोन प्रवासी आहेत, त्याचप्रमाणे त्यानंतरचे प्रवासी म्हणजे कीर्ती व संपत्ती होत. यश  ज्या ठिकाणी उपस्थित असते, त्या ठिकाणी या दोहोंचा प्रवास ठरलेला असतो. थोडा उशिरा का होईना, त्यांच्याजवळ हे दोन प्रवासी जातात व ते ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी हळूहळू चैतन्याचा खून होतो. चैतन्याचा मृत्यू म्हणजे निस्तेजपणा होय. कीर्ती व संपत्ती येऊनही काही ठिकाणी यश अबाधित राहतं. याला कारण या दोन गोष्टींना वाजवीपेक्षा जास्त महत्त्व न देणं. चैतन्य म्हणजे प्रयत्न होय. प्रयत्न अखंडपणे ठेवले की पुढील कोणताच अनर्थ घडत नाही. म्हणजेच चैतन्य सदैव अंगी ठेवणे कधीही हितकारक असते.यशाने हुरूप येतो तर अपयशाने माणूस खचून जातो. हुरूप आला तर चैतन्य संचारते तर खचून गेले म्हणजे मरगळ येते. उदासीनता व पठारावस्था मनाला प्राप्त होते, जी घातक ठरू शकते. व्यक्तीचे चैतन्य यश किंवा अपयश यावर अवलंबून असणें म्हणजे संकुचित मनाचे द्योतक आहे. मनाची विशालता चैतन्यप्राप्तीसाठी एक आवश्यक बाब आहे. ती मिळाल्यानंतर आणखी कशाचीच आवश्यकता भासत नाही व जरी भासली तरी गौण ठरते.

 चैतन्य म्हणजे साक्षात ईश्वर आहे. ईश्वर खऱ्या अर्थाने चैतन्यमय आहे. परमेश्वर कधीच अंधारमय किंवा निस्तेज असू शकत नाही. सृष्टीत चैतन्य ओतणारा चैतन्याचा महासागर असणार यात कोणताच वाद नाही. ईश्वरी चैतन्याचा स्पर्श ज्या महात्म्यांना झाला, त्याचं जीवन चैतन्यमयी झाले. शेवटच्या श्वासापर्यंत  चैतन्य त्याच्याकडे राहील. याला कारण ते ईश्वरी श्रद्धेने प्रेरित झालेले चैतन्य. सर्वसामान्यांचे चैतन्य चिरकाल टिकून राहणार नसत. स्वार्थ, अहंकार, मत्सर, इत्यादी दुर्गुगुणांनी युक्त चैतन्य क्षणिक असत.  तर ईश्वरवादी व मानवतावादी चैतन्य चिरकालासाठी असते. श्रीरामकृष्ण परमहंस हे असंच एक व्यक्तिमत्त्व होतं. ईश्वरी चैतन्याच सळसळत रूप म्हणजे श्रीरामकृष्ण परमहंस होत. परमहंस ईश्वर प्राप्तीसाठी ध्येयवेडे झाले होते. कालीमातेच्या चिंतनात अखंड बुडून गेले होते. ह्रुदयाचा प्रत्येक ठोका व प्रत्येक श्वास त्यांना कालीमातेच्या जवळ नेत होता. अढळ श्रद्धा आणि निश्चयी मन दिवसेंदिवस प्रगल्भ होत गेलं. श्रीरामकृष्ण परमहंस हे एक असं संत होऊन गेले की ज्यांना अनेक विद्या प्राप्त होत्या. एक एक विद्या प्राप्त करण्यासाठी उभे आयुष्य खर्ची घालाव लागत. अशा कित्येक विद्यात ते पारंगत होते. हा केवळ प्रयत्नांचा अर्थातच चैतन्याचा चमत्कार होय. ईश्वरी चैतन्याने भारावून गेलेली माणसं ही अशी जगावेगळी व ध्येयवेडी असतात. शेवटी समदृष्टी येणे हे परमेश्वराला चराचरात पाहणे नव्हे काय? ईश्वर चराचरात व्यापून आहे हे बोलणं वेगळं व त्याला चराचरात पाहण, या दोन भिन्न गोष्टी आहेत. माझ्या एकीवातील तुकाराम महाराजांची गोष्ट आहे. तुकाराम महाराज एकदा चोरांबरोबर, चोरांच्या आग्रहावरून, कोण्या एका घरी गेले. चोरांनी चोरी केली. दरम्यान पहाट झाली. महाराजांची काकड आरतीची वेळ झाली. काकड आरती सुरू झाली. चोर पळून गेले. घरातील लोक जागे होऊन पाहतात तर काय, साक्षात तुकाराम महाराज आपल्या घरी....! मूळ विषयाकडे वळताना हे सांगायचं आहे की, त्यांच्या चैतन्याच्या मूळ स्वभावात कोणताच फरक पडला नाही. याला कारण समदृष्टी होय. समदृष्टी असणाऱ्या व्यक्ती ह्या काळ, वेळ अथवा संगतीने बाधित होत नाहींत. एरवी कोणाला आपल्या विचारांची, सोबतीची आवशकता असताना आपण हजार सल्ले एकतो. त्याची संगत करू नको. तू बिघडशील. समदृष्टीत तस नाही. समदृष्टी वाईट व चांगल्यासाठी समच असते. स्वतःवर कोणत्याही बाह्य विचारांच्या प्रभावापासून अलिप्तवादी दृष्टिकोन देते. ही समदृष्टी चैतन्याच्या आगळ्यावेगळ्या संचारामुळेच तयार होते. चैतन्य माणसाला समदृष्टी व विवेक प्रदान करते. विवेक आणि मनाची स्थिरता चैतन्याला सदैव बळकटी देतात. सर्व भुताठायी  दया, प्रेम, वात्सल्य व प्रीती करण्यास चैतनन्यामुळे सहज शक्य होते. चैतन्य सळसळत्या वाऱ्याप्रमाणे आहे. तर चंचल मन हे घोंगावणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याप्रमाणे आहे. वाऱ्याची हलकी लकेर आल्हादायकता निर्माण करते. तर वादळी वारा दुःख निर्माण करतो. अनेकांच्या यातनांना कारणीभूत ठरतो. वाऱ्या वाऱ्यात हा फरक आहे.

 दिवस उगवतो. त्याची किरणं दर दिवशी नवचैतन्याचा सडा घालत सर्वत्र हुंदडतात. दिवसाचा प्रवास सुरू होतो आणि कणाकणात जुनाच जीव नव्याने उमलायला लागतो. सूर्याची प्रखरता वाढते. जणू तो जगावर आग ओकतोय असा भास होतो. त्याच्या प्रखरतेतील तेज सामावून घेण्याइतकी ताकद कोणातही नसते. सूर्याचा हा तप्त प्रवास एकट्याचा असतो. तो मावळतीला सरकतो व पुन्हा सोनेरी किरणांचा सडा जग व्यापतो. कवीचं चैतन्य यावेळी बहरत. नव्या कल्पनांचे कोंब कवींना फुटतात आणि मग संध्याकाळ होते. सूर्य क्षितिजापलिकडून सर्वांचा निरोप मोठ्या दिमाखात घेतो. त्याचं येणं व त्याचं जाणं या दोन्ही गोष्टीत चैतन्याच्या शिडकारा आहे. जगण्याची उमेद आहे. रात्रीचा रम्य प्रवास चंद्र आणि चांदण्यांच्या संग सोबतीत सुरू होतो. रात्र काळी साज घेऊन येते. पण किलकिल्या चांदण्या रात्रीतसुद्धा उमेद भरण्याचं काम करतात. रात्र सोबत भयानकता आणते. तर चांदण्या कोमलता घेऊन क्षितीजाच्या उंबरठ्यावर स्वागतासाठी उभ्या असतात. त्यांच्याकडे भाऊक नजरेन पाहणं म्हणजे उमेदीची आणि चैतन्याची शिदोरी बांधणें नव्हे काय? मध्यान्हीच्या उन्हात जे होरपळून निघतात, त्यांना चांदण्या चैतन्याचा अल्हाददायक स्पर्श करून उमेदीन न्हाऊन काढतात. त्यांचं जगणं पुन्हा नव्याने जगवतात. दिवसाची दाहकता व रात्रीची शीतलता  ही चैतन्याची दोन भिन्न रूपे आहेत. दोहोंची तुलना करता येत नाही. दोघातही जगण्याचा स्पर्श आहे. दोघांतही चैतन्य आहे. एक तप्त तर दुसरं कोमल. अनेकांना कोमलता भावते. चांदण्या येताना स्वप्न घेऊन येतात. अनेकांची स्वप्न पूर्णत्वाकडे जातात. अनेकांची धुळीला मिळतात, इतस्ततः विखुरतात. तर काहींची स्वप्न फक्त स्वप्नच राहतात. स्वप्न पाहणें म्हणजे चैतन्याची उसळी घेणें नव्हे काय? आपण जगतो, या जगण्याला खऱ्या अर्थाने स्वप्नच कारणीभूत ठरतात. स्वप्न वेड्यासारखी येतात. येतात आणि मनात खोलवर घर बांधून राहतात. आपला रोजचा प्रवास तर स्वप्नातील यांच घरापर्यंत जाण्याचा असतो. रोजच्या जगण्यात पुन्हा नवीन स्वप्नांची त्यात भर पडते. आजची रात्र उद्याच्या प्रवासातील स्वप्न आहे. स्वप्न मनात उमेद आणतात. उमेदीत एक जगणं असतं आणि जगण्यात एक स्वप्न असतं. त्या स्वप्नांना आकार देण्याचे काम आपण करतो. आपल्यातील काही जण त्याला सुंदर आकार देतात. त्या स्वप्नांच याच जीवनात सोनं करतात. काहींना तो आकार नीटसा देता येत नाही. त्यांची स्वप्न भंग पावतात. उमेद खचते. चैतन्य काही काळ का होईना मरगळल जात. आपण जगतो व हरवलेले स्वप्न पुन्हा शोधतो. वेडी स्वप्नं जगण्याचे कारण बनतात. स्वप्नं जीवनात चैतन्य भरतात. चैतन्य घेऊन आपण जगतो आहोत. जगता जगता एक दिवस जगणं संपेल. जगणं संपल तरी चालेल पण स्वप्न संपता कामा नये. नाहीतर तो जिवंतपणी मृत्यू होय. असा मृत्यू खऱ्या मृत्यूपेक्षा भयावह असतो. जगण्यात स्वप्न व स्वप्नात जगण्यात आशावाद आहे. फक्त जगण्यात रुक्षता आणि फक्त स्वप्नात कल्पनाविलास आहे. जगण आणि स्वप्न यांचा सुरेख मिलाफ म्हणजे जीवन. ज्यांच्या वाट्याला असं सुंदर जगण येतं, ते खरोखर भाग्यवान होत. 

 जग हे नवनिर्माणाने वेडावून गेले आहे. आज आहे ते उद्या नव्याने समोर येईल. आजच्या दिवसावर उद्याचं नव उभारत. कितीतरी अवाढव्य वास्तू येथे दिमाखात उभ्या आहेत. अजिंठ्याची लेणी असोत किंवा ताजमहाल, गगनचुंबी इमारत असो किंवा साधी झोपडी असोत, या सर्व गोष्टी उभ्या राहिल्या त्या चैतन्याच्या सळसळीतून. नवनिर्माणाची प्रेरणा  चैतन्याची पालवी आहे. ती कधीही सुखकारक असते. चैतन्याचा पूर जिथे असतो, तिथं नवनिर्माण जरूर होत. जिथं नवनिर्माण होतं तिथं चैतन्य असतंच असतं. एक मुंगी कशासाठी बरं इतक्या वेगानं धावत असेल? किती लागबगीत असते...! खरं तर ती काहीच करत नाही. मग ती धावते कशासाठी? मुंग्या सर्व किटकात कष्टकरी आहेत. त्या ध्येयाने वेड्या झालेल्या असतात. चैतन्य त्यांच्या प्रत्येक पिढीच्या नसानसात असत. त्यांचं जगणं चैतन्य आहे. त्यांचं धावणं चैतन्याची सळसळ आहे. त्या  धावतात व चैतन्य विखुरतात. मुंग्या जगायला शिकवतात. त्या उत्साहानं काठोकाठ भरलेल्या घड्याप्रमाणे असतात. त्या अथकपणे त्यांच्या वाट्याचं काम प्रामाणिकपणे करतात. हा चैतन्याचा आविष्कार नव्हे काय?  चैतन्य  फार मोठी उदाहरणे देऊन स्पष्ट करण्यापेक्षा मुंग्या अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करतात. त्यांच्या जवळ थोडं थांबवलं तर चैतन्य सहज आपल्या अंगात प्रवेश करेल. चैतन्य  सांगण्याची वा ऐकण्याची गोष्ट नाही, ती अनुभवण्याची बाब आहे. चैतन्याचे अमृत ज्यांच्या वाट्याला आलं, ती माणसं खरोखरीच इतिहासान अजरामर करून ठेवली. निसर्ग चैतन्यमयी आहे. अनेक जीव मोठ्या उत्साहाने जगताना दिसतात. माणसाचं सोडा, पण या जीवांची जगण्याची धडपड कशासाठी असेल? कोणताच जीव स्वस्थ बसत नाही. दर दिवशी जगण्याच्या एका नव्या उमेदीने जागा होतो. चैतन्याचे लेणं लेतो व दिवसभर जगतो. रात्र होते व स्वप्नांत चैतन्य विखुरले जात. सुगरण अतिशय मेहनतीने व कलाकुसरीने घरटे उभारते. तिची घरबांधणीतील धडपड अचाट करून सोडते. किती आटापिटा करते. चिमुकल्या जीवांच्या स्वागतासाठी ती अतुर झालेली असते. एका अकल्पित उत्साहाने ती काम करते. तिच्या कामावर देखरेख करणारा कोणी अधिकारी नसतो किंवा तिला फुकटात सल्ला देणारा कवडीमोल सल्लागारही नसतो. माणस स्वार्थी आहेत हेच खरे. आपण आपल्या रोजच्या जगण्यात मूळ जगणं केव्हाच विसरून जातो. आपला प्रवास स्वार्थापासून स्वार्थाकडे असतो. ज्याची सुरुवात स्वार्थी, शेवट स्वार्थी आणि मध्यंतरही स्वार्थी. स्वार्थ, स्वार्थ आणि स्वार्थ. स्वार्थ चोहीकडे. स्वार्थ वर, स्वार्थ खाली, जवळ, शेजारी आणि दूरवर स्वार्थच स्वार्थ. मध्यंतरी चंद्रावरील भूमीचा खरेदी-विक्री व्यवहार झाल्याचे वाचनात आल. स्वार्थ चंद्राच्या भूपृष्ठावर अलगद पोहोचलादेखील.....! उद्या मंगळ, बुध  आणि ग्रहांचे माळ विकणे आहे अशी जाहिरात आली, तर अचंबा नको! मुळात व्यापारात स्वार्थी तत्व जाहीरपणे लपलेल असत. व्यापार स्वार्थाच्या तेलावर चालणारा दिवा आहे. हा दिवा तेवत ठेवण्याचे काम नफ्यातील स्वार्थाने होतो. स्वार्थ अर्थात नफा नसेल तर हा दिवा विझून दिवाळ निघालेच म्हणून समजा. घरटी अनेक पक्षी करतात. पण सुगरणच का तिचा खोपा बनविण्यासाठी जीवापाड कष्ट सोसते?  तिच्या अंगातील नैसर्गिक ऊर्मी, उत्साह एका पाहुण्याच्या स्वागतासाठी स्वतःला सिद्ध करत असतो. एका अद्भुत उत्साहानं ती झपाटून गेलेली असते. ध्येय तिच्या अगदी नजरेत असते. एका अनामिक जीवाच्या चाहुलीने ती अगदी वेडीपिशी होते. शेवटी ध्येय गाठण्याची धडपड म्हणजे चैतन्य नाही काय? चैतन्य तिला काम करण्यासाठी प्रेरणा देत. तिच्या अखंड धडपडीत एक सहज सुंदर नैसर्गिकता असते. कृत्रिमता किंवा इतर कोणताही स्वार्थी हेतू नसतो. बाळाच्या आगमनासाठी आतुर झालेले ते रानपाखरू असत. ती धडपडते आणि एक नवनिर्मिती, एक अजोड कलाकृती, तिच्या खोप्याच्या रूपानं  तयार होते. ती पाहिल्यानंतर तिच्या धडपडीची स्पष्ट कल्पना येते.

 प्रेमाने प्रेम, रागाने राग, मत्सराने मत्सर वाढतो. तसेच चैतन्याने चैतन्य वाढते. चैतन्य एक अनमोल खजाना आहे.त्याची गरज सर्वांनाच आहे. निरुत्साही व्यक्तीकडे पाहिल्यानंतर आपणही निरुत्साही होण्याची शक्यता असते. चैतन्य मावळू शकत. जोपर्यंत एका व्यापक दृष्टिकोनातून जीवनाकडे आपण पाहत नाही तोपर्यंत उत्साह आणि निरुत्साह आपल्याला सहन करावा लागतो. जेव्हा सकारात्मक व सर्वव्यापी दृष्टीकोनातून आपण विचार करू, तेव्हा फक्त चैतन्य असेल. निरुत्साह किंवा मरगळ शोधूनही सापडणार नाही. आपले विचार सकारात्मक आणि सर्वव्यापी  होऊन जातील, तेव्हा निश्चितच आपण इतरांच दुःख कमी करू. इतरांच्या समस्या आपल्या समस्या होऊन जातील. त्या समस्या, अडचणी किंवा दुःख निवारण करण्यासाठी  आपण तत्परतेने प्रयत्न करू. त्यासाठीचा प्रत्येक क्षण आपला निर्लेप चैतन्यरुपी प्रवास  ठरेल. 

 मृग नक्षत्राचा पाऊस धरतीवर पडण्यास सुरुवात होते आणि माती आसमंताला धुंद करून सोडणारा गंध सर्वत्र दरवळते. तिचा हा गंध अत्तराच्या लक्ष कुपिंपेक्षा मोहकता आणतो. त्या वासाने मन प्रफुल्लीत होते. हवाहवासा वाटणारा हा वास पुढे कुठे लपून बसतो कोणास ठावूक? पुन्हा पाऊस पडतो पण हा वास मात्र नंतर नसतो. तो जेव्हा असतो तेव्हा मात्र मनात चैतन्य रुजत. किती काळासाठी....? अगदीच काही क्षणासाठी मातीने मुक्तपणे केलेली उधळण असते. चैतन्य असते ते असं. मुक्तपणे उधळण करून इतरांत ते रुजवण्यासाठी..... त्याचा हिशोब करीत बसण्यासाठी मुळीच नसत. चैतन्यात मुक्तपणाचा मुक्तहस्ते वावर असला पाहिजे. चैतन्याने जर चैतन्य निर्माण केले तर ते सकारात्मक होय. नकारात्मक चैतन्य अन्यायी व इतरांना क्लेशदायक सिद्ध होतं. त्यामुळे सकारात्मक चैतन्याची खरी गरज आहे. सकारात्मक चैतन्य स्वतःबरोबर इतरांत प्रेरणेचा संचार करू शकते. स्वतःबरोबर इतरांच्या मनाची बांधणी व्यवस्थित करू शकते. ज्योतीने ज्योत पेटते. त्याचप्रमाणे चैतन्याने चैतन्य निर्माण होतं. जोपर्यंत व्यक्तीच्या ठायी चैतन्याचा संचार आहे, तोपर्यंत ती इतरांत चैतन्य निर्माण करू शकते. आळस  चैतन्याला बसलेली खिळ आहे. उदासीनता चैतन्यावर आलेले काळी काजळी आहे. चैतन्य अंगी  वसवण्यासाठी आवश्यकता आहे, ती मनाची मरगळ दूर करण्याची. चैतन्य नित्य तत्व आहे. त्याला बाधा कधीच येऊ शकत नाही. जीवनात अनेक विद्या, कला, कौशल्य, नाना तऱ्हेच्या चांगल्या गोष्टी शिकणं किंवा त्यांचं सतचिंतन करणे म्हणजेच सकारात्मक विचारधारा होय. स्वार्थ न बोलविता येणारा पाहुणा आहे. तो आला की अनेक अनर्थ घडवून ठेवतो. आपल्या मनात खोल घर बांधून राहतो. प्रत्येक क्षणाला मी आहे याची जाणीव आपल्याला करून देतो. आपण हे जणतो. पण तरीही स्वार्थाच्या भोवऱ्यात आपण पुन्हा पुन्हा जाणीवपूर्वक अडकतो. निस्वार्थ तसा नाही. त्याला प्रयत्नपूर्वक निमंत्रण द्यावे लागते. तो येता येत नाही. पण जर एकदा आला, तर जीवन प्रकाशमय करून टाकतो. निस्वार्थ मनात साठला की आपण सगळीकडे आनंदीआनंद पाहू शकतो. निस्वार्थ अनेक चांगल्या गोष्टी घडवून आणतो. जगण्यात ज्याची अपेक्षा केली नाही, अशा सर्व गोष्टी देऊन जातो. मुख्य म्हणजे मनाची शांती देतो. स्वार्थाच्या टोचण्या भीती व अस्थैर्य निर्माण करतात. निस्वार्थ येताना चैतन्य आणतो आणि चैतन्य दर दिवशी वाढवतो. स्वार्थ अनैसर्गिक तर निस्वार्थ नैसर्गिक आहे. आपण फसतो. आपलं एकदा फसण पुन्हा पुन्हा फसण्यासाठी असतं. असं वारंवार फसण म्हणजे स्वार्थाचा संग करणे होय. असा स्वार्थ अनेक दुःखाचा मूळ आहे. निस्वार्थी चैतन्य कसलच दुःख निर्माण करत नाही. उलट सर्वांसाठी प्रेम उत्पन्न करते. अनेकांना सन्मार्गावर नेऊन ठेवते. स्वार्थ तर ठायी ठायी आहे. एकदा निस्वार्थ अनुभवण्यास काय हरकत आहे?  असा निस्वार्थी चैतन्याचा  किरण अंधारमय जीवन उजळवून टाकेल. किमान जीवन उजळवून निघतं याची जाणीव तरी नक्कीच करून देईल. हिच चैतन्याची सुरुवात आहे. हिच चैतन्याची ज्योत अख्ख जीवन उजळून टाकण्यास व नवचैतन्याची सळसळ सळसळण्यास कारणीभूत ठरेल. 300406 ©Harish Gore

Prof. Agarwal sir Vaduj

 Dear Agarwal sir, It was pleasent experience for me to read your 'A Pryayer to My God, the Man'. A deep touch to heart by reading a...