व्यथा
का कोणास ठाऊक पण प्रत्येकाला आपापल्या व्यथा मांडायच्या असतात. मी खूप खूप सोसलं. मी खूप सहन केलं. मी नसतो तर हे शक्यच नव्हतं. माझ्या इतका अपमान कोणीही सहन करणार नाही. मी होतो म्हणून आज हे सारं वैभव तुम्ही पाहत आहात. वगैरे, वगैरे. किती किती म्हणून गोष्टी आहेत, त्या सांगायच्या असतात. त्यातील व्यथा मांडायच्या असतात. मन मोकळ करायचं असतं. पण ते होत नाही. त्याचीही एक व्यथा होते. व्यथेत भर पडते पण व्यथा संपत नाही. संपत नाहीत करूण कहाण्या व त्यातील कारुण्यपूर्ण दर्दनाक काटेरी टोचण्या. या व्यथातून अनेक कथांचा जन्म होतो. व्यथा संपतात व इतिहास रचला जातो. त्याचं अध्ययन होतं, चर्चा होते व त्यातून व्याथांच्या कथा सुरसपणे सांगितल्या जातात.
व्यथा वैयक्तिक, सामाजिक व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरही असू शकतात. काही शब्दच त्यातील भाव स्पष्ट करतात. जसे प्रेम म्हटलं की अनेक गोष्टींचा बोध होतो. त्याचप्रमाणे व्यथा शब्द ऐकला तरी त्यातील व्यथा कानांना नकोशा वाटतात. अनेकांचे जीवन व्यथांशिवाय जातं.! तर अनेक जण व्यथातील मुख्य पात्राच्या भूमिकेत असतात. त्यांच्या वाट्याला आलेलं जीवन म्हणजे फक्त आणि फक्त व्यथा होय. व्यथांचा अंत व्हायला बहुदा बराच वेळ लागतो. अशा व्यथांचा अंत झाला तरी त्या आपल्या पाऊलखुणा त्या व्यक्तीच्या जीवनात खोलवर सोडून जातात. आपण लहानाचे मोठे होतो. समाजाच्या मुख्य प्रवाहात येईपर्यंत अनुभवाची शिदोरी बरोबर घेतो. एक व्यक्ती म्हणून स्वतःची ओळख निर्माण करतो. जीवन जगतो व जगता जगता या व्यथांचा भाग होतो. काहींच्या वाट्याला कमी तर काहींच्या वाट्याला करूण व्यथा येतात. व्यथांचा स्पर्श नसलेला माणूस शोधणे म्हणजे परिसाचा शोध घेण्यासमान आहे. व्यथांशिवाय जीवाचं जीवन पूर्णत्वाकडे जाण जवळजवळ अशक्य आहे.
व्यथा व अडचण किंवा व्यथा आणि संकट यामध्ये खूप अंतर आहे. हिंदवी स्वराज्य निर्माण करताना शिवाजी महाराजांना अनेक संकटाना तोंड द्यावं लागलं. परकीय शत्रू व स्वकीयांनी महाराजांसमोर अनेक अडचणी निर्माण केल्या. त्या सर्वांचा महाराजांनी यशस्वीपणे सामना केला. अशा अडचणी किंवा संकट म्हणजे व्यथा नव्हे. त्या व्यथा नसून जनतेच्या व्यथा संपविण्यासाठी केलेले अतुलनीय शौर्य व पराक्रम आहे. रयत त्यातून सुखी झाली. व्यथांचा व्याप्ती कधीकधी कल्पनाशक्ती पलीकडील असते. व्यथा व्यक्तीला कधीकधी लाचार बनवते. स्वाभिमान विकायला भाग पाडते व व्यक्तिस्वातंत्र्यावर काही प्रमाणात मर्यादा येतात. व्यथांतून व्यक्त होणाऱ्या भावना असह्य असतात. त्यातील दुःख मन पिळून काढतं. त्याचे परिणाम व्यक्तीवर अनेक दिवस किंबहूना हयातभर राहतात.
सुख तोंडभरून सांगता येतं, तर दुःख डोळेभरुन दिसते. सुख व दुःख ही अशी कळतात. नदीचा प्रवाह व महापूर यामध्ये जो फरक असतो तो सर्वसामान्य दुःख व या अशा वेदनांमध्ये दिसतो. शब्द संपतील पण तरीही व्यथातील काही कहाण्या शिल्लक राहतील, अशी परिस्थिती निर्माण होते. ज्यांच्या वाट्याला अशा प्रकारचे जगण येतं, त्यांचा अनेक चांगल्या मानवीमूल्यांवरचा विश्वास कधीच उडालेला असतो. ज्याकडून कोणतीच अपेक्षा नाही, कोणतच ध्येय नाही, असं उजाड माळरान होऊन जातं जीवन. आपल्याला जगण्यासाठी प्रेम, स्वार्थ, ईर्षा, ध्येय, प्रेरणा,अहंकार, या अशा अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. दर्दनाक परिस्थितीतूनही अनेक जण बाहेर पडतात. मानाचं जीवन जगतात आणि इतरांना जगण्यातील आनंद शिकवितात. काहीजण जगण्यापुढे शरण जातात व स्वतःचं जगणं संपवितात. व्यथांच्या चक्रव्यूहात गुरफटलेल्या अनेकांना मार्गच सापडत नाही. जगण्यापेक्षा मारणं सोपं वाटतं. जगण्यापेक्षा मरण जवळच वाटतं तेव्हा ती विचारांची हारच मानवी लागेल. अर्थात हा मार्ग चुकीचा असला तरी त्याचं समर्थनसुद्धा करता येणार नाही. परिस्थितीला सामोरं जाणं काहींना अशक्यप्राय होते व इहलोक यात्रा संपवली जाते. राहिलेले काही वाममार्गाला जवळ करतात. काही नशेत स्वतःला खोलवर गाडून घेतात. अशा सर्वच ठिकाणी असह्य वेदनांचा डोंगर दिसून येईल. आयुष्यभर पुरेल इतक्या वेदना चहूबाजूंना दिसतील. अनेकजण व्यथांतून यशस्वीपणे बाहेर पडले तरी सर्वांना ते शक्य नसते. व्यथा प्रथम विचारावर घाला घालतात. त्यातून व्यथा अनेकांना लाचार बनवतात. भावनाशून्य जीवनचक्रात ती व्यक्ती गुंतते. किंबहुना तिला परिस्थिती अशा भावनाशून्य जीवन जगण्यास भाग पाडते. अनेकांना वेदना असतात. पण पर्वतांएवढ्या वेदनांचं ओझं डोक्यावर घेऊन पाऊल पुढं टाकण जवळजवळ अशक्यप्राय होतं. विवेकशून्य, भावनाशुन्य, प्रेमशुन्य आयुष्य निरर्थक आयुष्य ठरतं. जगण्याचा अधिकार सर्वांना आहे. मग अशा व्यक्तीच्या बाबतीत समाजाची कर्तव्य विस्मृतीत जाणं मानवतेला परवडणारे नाही. दुःख दिसूनसुद्धा बऱ्याच वेळा आपण दुःखी होत नाही. सर्वत्र आनंदीआनंद असल्याचा भास आपण तयार करतो. सत्याला नाकारतो. विवेकशून्य, भावनाशून्य होतो. समाजाच्या भावना जाणून हळवे होणारे सानेगुरुजी महाराष्ट्रातील होते, हे विसरून चालणार नाही. अशा दुःखांकडे निर्विकारपणे बघण्याने सामाजिक विषमतेची बीजे पेरल्याशिवाय राहणार नाहीत. सामाजिक विषमता कालांतराने समाजासाठी घातक ठरते. अनेक देशांमध्ये ही विषमता उद्रेकाच्या रूपाने बाहेर पडल्याचे चित्र दिसतं. अशा वेदनांची जाणीव समाजाला लवकर होण एकूणच समाजासाठी फायदेशीर आहे.
व्यथा कपड्यावर पडलेल्या व न निघणाऱ्या डागांसारख्या असतात. कपडा फाटतो पण डाग निघत नाही. तसं काहीसं व्यथाचं होतं. जगताना त्याचा प्रवास कदाचित उत्तरार्धात सुखावह असेल पण मनावर कोरलेल्या त्या व्यथा डागांसारख्या आयुष्यभर साथसंगत करतात. मन शुद्ध होण्यापासून व्यक्तीला परावृत्त करतात. सततच्या टोचण्या आठवणरूपाने देतात. अशा टोचण्या आयुष्य पोखरुन टाकतात. मन उद्ध्वस्त करतात. आयुष्य त्यातून पुरतं झिजून निघत. दुःखाचा डोंगररांगातील प्रवास न संपण्यासाठी असतो. व्यथांतील कथा व कथेतून नव्या व्यथा जन्म घेतात. पण व्यथांचा प्रवास मात्र संपत नाही.
व्यथा ह्या कथन करण्यासाठी असतात. अनेक वेळा व्यथांच्या कथा सांगितल्या व ऐकल्या जातात. काही व्यथा मात्र मुक्यानेच भोगल्या जातात व मुक्यानेच संपतात. अशा व्यथांना व्यक्त होण्यासाठी साधी संधीही मिळू नये, ही दुर्दैवी बाब आहे. अशा अनेक करूण कथा इथे जन्मतात व त्या अबोलपणे संपतात. आपला मागमूसही मागे न सोडणाऱ्या व्यथा दुर्दैवी होत.
व्यथांतील काही कथा कदाचित शब्दात व्यक्त होतात तर काही शब्दांच्या पलिकडील असू शकतात. कुष्ठरोग झाला म्हणून जगण्याचा अधिकार क्रूरपणे हिरावून घेणारे अनेक दैत्य आपल्यात लपून बसलेले आहेत. ज्यांच्यावर असा प्रसंग ओढवतो, त्यांच्या व्यथांचा अंत बहुदा त्यांच्या शेवटच्या श्वासाला होतो. रोगी शरीर, रोगी घर व रोगी समाज यांचा सामना करता करता अशी माणसं पुरती दमून जातात. दिवसाच्या प्रत्येक क्षणात संघर्ष व त्या संघर्षातून जगणं सुरू असतं. क्षणाक्षणात नवीन व्यथा व प्रत्येक व्यथेतून नवीन कथा उदयास येतात. कोणती कथा सांगायची व कोणती व्यथा लपवायची या द्विधा अवस्थेत अनेक व्यथा अबोल होतात. ह्या व्यथा फक्त आणि फक्त भोगण्यासाठी आणि त्याही एकट्यानेच भोगण्यासाठी असतात. क्षणाक्षणाला होणाऱ्या यातना सांगूनही संपणाऱ्या नसतात. सांगूनही संपत नाही त्या व्यथा असतात.
व्यथांचा जन्म का होतो हेही अभ्यासणे गरजेचे आहे. व्यथा अन्याय, अविचार, अज्ञान व परिस्थितीतून निर्माण होतात. हुकूमशाहीवृत्ती इतरांच्या व्यथांसाठी कारणीभूत ठरते. असे अघोषित हिटलर पावलोपावली आपल्याला दिसतील. ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्या अन्यायाची वाच्यताही अशांच्या तोंडून होत नाही. स्वतःच्या कृत्याचं समर्थन शेवटपर्यंत असे लोक करतात. स्वार्थ अविचाराला कारणीभूत ठरतो. त्यातूनही व्यथांचा जन्म होतो. इतरांच्या भावभावना जाणून जगणं हितावह होय. इतरांच्या भावना पायदळी तुडवण हा अन्याय होय. त्यातून व्यथा जन्माला येतात. त्यानंतर अज्ञान येते. अनेक गुप्त धनासाठी अनेक बालकांचा बळी जाणं हे कृत्य निव्वळ अज्ञान या सदराखाली मोडतं. अन्यायग्रस्त बाळ व त्याचे पालक यांना या व्यथा सोसाव्या लागतात. अत्यंत क्रूर व स्वार्थी लोक अशा प्रकारचे कृत्य करू शकतात. भावनांचा लवलेशही नसणारी क्रुरकर्मी व्यक्तिमत्व समाजाला लागलेली वाळवी आहेत. शेवटी परिस्थिती व परिस्थितीजन्य व्यथा येतात. अशा व्यथा परिस्थितीनुसार जन्म घेतात. त्या वेळची परिस्थिती त्यांची तीव्रता ठरवतात. भोपाळची वायुगळती, खिल्लारी किंवा गुजरातचा भूकंप, त्सुनामीने माजवलेला हाहाकार, अचानक पडलेला कोरडा किंवा ओला दुष्काळ, अपघात इत्यादीमुळे निर्माण झालेल्या व्यथा परिस्थितीजन्य मानाव्या लागतील. अशा व्यथा सामाजिक भीती व असुरक्षितता निर्माण करतात. अशा व्यथा वैयक्तीक व सामाजिक पातळीवर अनेक पाऊलखुणा सोडून जातात.
व्यथा कशाही जन्म घेऊ देत, त्यांचा जन्म झाला की संबंधित व्यक्ती पुरती हैराण होते. अनेकांचा जगण्यावरील विश्वास उडून जातो. ज्योतिषशास्त्र व व्यथा यांचा जवळचा संबंध असावा. आपल्याकडे शनीची साडेसाती सुरू झाली की व्यथा सुरू होतात, असं पंचांग मानतं. साडेसाती बरेच दिवस चालते असं मानतात. खरंतर हा विषय तसा माझ्याशी निगडित नाही. पण व्यथांचा मात्र साडेसातीशी संबंध आहे. अशा साडेसातीरूपी व्यथांना भलेभले घाबरतात. पंचांग, ग्रह, राशी, तारे आणि नशिब यांचा जवळचा संबंध लावणारे अनेकजण भेटतील. आपल्याकडे पंचांग व नशिब याशिवाय केवळ कष्ट व जिद्द यावर भर देणारेही अनेक धाडसी लोक पहावयास मिळतात. ग्रह व तारे यापेक्षा स्वतःच्या हिमतीवर विश्वास असावा. महात्मा फुले यांचे विचार याबाबतीत क्रांतिकारी ठरले. रूढी, चालीरीती यांची भीती दाखवून स्वतःच पोट भररणारे यांनी वेळीच सावध व्हावे. शिक्षण व लोकजागृती करणारे फुले हे आधुनिक समज परिवर्तक आहेत. आजही त्यांचे विचार युगपरिवर्तनाचे काम करताहेत. त्यांना गुरू मानून आंबेडकरांनीही तोच वारसा जपला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत असत, असं कृत्य करू नका ज्यांच्यामुळे भीती वाटेल. आपण भीती वाटण्यासारखं काम केले नाही तर भिण्याचे कारण नाही. काहींच्या हातून कळत नकळत गुन्हे घडतात. घडलेल्या प्रत्येक गुन्ह्याची नोंद होत नाही. अशा नोंद न झालेल्या गुन्ह्यांची नोंद कदाचित शनीच्या डायरीत होत असल्याने अनेक जण घाबरतात. फुले-आंबेडकरांचं तत्त्वज्ञान जगणाऱ्याला साडेसातीची भीती यत्किंचितही नसावी. देव-देवतांचा धाक समाजावर असणें हे चांगलंच. पण विनाकारण मनात भीती बाळगणही चुकीच आहे.
व्यथा कोणत्याही वयात किंवा कोणत्याही स्थितीत असू देत. व्यथा कधीच रम्य असू शकत नाहीत. व्यथातून आनंद कधीच मिळत नाही. बालवयापेक्षा, तारुण्यापेक्षा वृद्धापकाळातील व्यथा सर्वांना भोगाव्या लागतात. शरीर जीर्ण तर मन कोमेजून गेलेली अवस्था म्हणजे वार्धक्य. वार्धक्यात संगसोबत चांगली मिळाली तर त्या व्यक्तीच्या व्यथा कमी होण्यास मदत होते. अनेकांच्या वाट्याला वर्धक्यात अपमानास्पद वागणूक मिळते. जगण्याचा अधिकार काढून घेणारे सुपुत्र अनेक आईबापांच्याच्या वाट्याला येतात. काळाबरोबर लेकाचे घाव झेलणारे आईबाप परिस्थितीपुढे शरण जाऊन बंदिवासात आयुष्य व्यतीत करताना मी पाहिले आहेत. त्यांच्या व्यथा चार भिंतीच्या आत बंदिवासात असतात. क्वचितप्रसंगी अशा व्यथा बाहेर आल्या तर त्या समाजाला कळतात. पण अनेकवेळा अशा व्यथा कमनशिबी आई-बाबांबरोबर गाढल्या जातात. आयुष्यभर मुलांच्या कल्याणासाठी कष्ट करणारा बाप स्वतःच्या मुलांचा गुन्हेगार बनतो. ही आपल्या समाजाची वस्तुस्थिती आहे व ती स्वीकारावी लागेल.
भोग ही गोष्ट व्यथेला जन्म देण्यास कारणीभूत ठरते. समाजाच्या मानसिकतेचं बारकाईने निरीक्षण केले तर असे लक्षात येईल की समाजामध्ये भोगी वृत्ती फोफावते आहे. समाजामध्ये अनेक ययातींचा सुळसुळाट झाल्याचे पहावयास मिळेल. भोगापायी अनेकजण व्यथांचे वाटेकरी होत आहेत. भोगांचा अंत नाही तसा त्यातून जन्म होणाऱ्या व्यथांचाही अंत नाही. रोज नवे भोग व रोज नव्या व्यथा. भोगातील व्यथा लाजिरवाण्या असतात. त्यातील कथा कानांपलीकडील असतात. खरोखरीच आपण माणूस आहोत की पशु याची जाणीव आपल्याला होत नाही. चंगळवादी, भोगी व विलासीवृत्ती समाजासाठी कोणत्याही अवस्थेत घातकच असते. स्वामी विवेकानंद यांच्या विचाराने व तेजपुंज देहाने प्रभावित झालेल्या अमेरिकन स्त्रीने स्वामीजींशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. स्वामीजींनी तत्परतेने त्या स्त्रीला माझ्याशी लग्न का करावेसे वाटते विचारल्यानंतर तिने तुमच्यासारखा तेजस्वी पुत्र माझ्या पोटी जन्माला येईल असे उत्तर दिलं. स्वामीजींनी मग मलाच तुमचा पुत्र का मानत नाही असा सवाल करून त्या स्त्रीला निरुत्तर केलं. भोगात व्यथा आहेत तर त्यागात वीरश्री आहे. आपल्या समाजाला खऱ्या अर्थाने स्वामी विवेकानंदांच्या विचारांची प्रकर्षाने गरज आहे. समाजात मर्यादित भोग असणं समाजासाठी हितावह आहे. ययातीरुपी भोगातून समाजाचा ऱ्हास आपोआप होईल यात कोणतीच शंका नाही. आंबेडकरांनी शिक्षणाबरोबर शीलाला महत्त्व दिले आहे. भोग व त्याग ह्या परस्पर विरोधी बाबी आहेत. आपण त्यागापेक्षा भोगी असल्याचं आपल्याला दिसेल. एकुणच समाजासाठी ही बाब अत्यंत घातक आहे. भोग भोगण्यासाठी माणूस अत्यंत खालच्या स्तरावर पोहोचतो. अनेकांवर आपण अन्याय, अत्याचार करत आहोत इतकाही विवेक तो विसरतो. भोग भोगतो व मागे व्यथा सोडतो. अशा अनेक घटनांमध्ये पश्चातापाशिवाय नंतर काहीच उरत नाही. अनेक मानवी मुल्यांचं आचरण विवेकातून होतं. पण विवेक संपतो व अघोरी कृत्य हातून घडतात.
स्वार्थ व्यथांच्या माळेतील मेरुमणी आहे. व्यथांच्या मालिकेतील सुरुवात व शेवट स्वार्थाजवळ होते. अनेकांच्या व्यथांना स्वार्थच कारणीभूत होतो. स्वार्थामुळे सद्सद्विवेकबुद्धी झाकली जाते व माणूस अविचारी व विवेकहीन वागतो. अनेक चांगल्या विचारांच्या व्यक्तीबाबतीतही साधारणपणे असेच होतं. आपण असं वागलो, यावर त्यांचा विश्वास बसत नाही. पण वस्तुस्थितीपासून दुरही जाता येत नाही. व्यक्तीव्यक्तीनुसार त्याची तीव्रता कमी-जास्त असेल, स्वार्थाचा प्रकार वेगळा असेल किंवा स्वार्थाच्या तऱ्हा वेगळ्या असतील, पण स्वार्थ असतोच असतो. स्वार्थ कधीच उच्च दर्जाचा असू शकत नाही. उच्च मानवी मूल्यांचा यादीत स्वार्थाला बिलकुल जागा नाही. अनेक उदाहरणे देऊन स्वार्थामुळे व्यथांचा जन्म कसा झाला हे सांगता येईल. अनादिअनंत काळापासूनचे दाखले देऊन आपण हे सिद्ध करू शकतो. प्रभू रामचंद्र वनवासाला जाण्याची घटना निव्वळ स्वार्थापोटी घडली. अनेकजण ही घटना वाल्मीकीलिखित रामयणानुसार झाल्याचा युक्तिवाद करतील. पण श्रीरामांच्या वनवासाला मूळरूपाने स्वार्थच कारणीभूत आहे, हेही नाकारू शकतं नाहीत. कंसमामाचा मृत्यू श्रीकृष्णांच्या हातून होणार म्हटल्यावर मात्यपित्यांना बंदिवासात टाकलं. व्यथांचा जन्म झाला. सात बालकं कंसाने मारली. आठवा कृष्ण....! कंसमामा संपले. स्वतःच्या स्वार्थासाठी कांसमामाने अनेकांना त्रास दिला, यातना दिल्या. स्वार्थामुळे जी गोष्ट होणार होती, ती घडलीच. उलट ती सुनियोजितरीत्या योग्य वेळी घडली. त्यामुळे नियतीचे वेळापत्रक बदलण्याचं सामर्थ्य स्वार्थात कधीच असू शकत नाही. ती गोष्ट वेळ आल्यावर घडतेच. नियतीपेक्षा कुणीही मोठं होण्याचा प्रयत्न करू नये.
वैयक्तिक, सामाजिक व देशपातळीवर स्वार्थाचा विचार केला तर देशपातळीवर स्वार्थ अत्यंत घातक स्वरूपाचा आहे. देशपातळीवरील स्वार्थ सर्व देशवासीयांच्या यातनांना कारणीभूत होतो. अविचारी राज्यकर्ते देशवासीयांच्या दुःखाला कारणीभूत ठरतात. राजा कसा असावा याचा अभ्यास करायचा म्हटलं तर त्यात शिवाजी महाराज सर्वोच्च स्थानी असतील. ज्या राज्यातील तळागाळातील लोक राजाची स्तुती घरात बसून करतील तो राजा यशस्वी प्रशासकीय होय. शिवरायांचे नियोजन सामान्य माणसाला सुखी करणारं होतं. शिवराय सर्वसामान्यांच्या हिताला प्रथम प्राधान्य देत होते. हिंदवी स्वराज्यामध्ये राजे सुप्रसिद्ध होण्याचे प्रमुख कारण हेच आहे. परकीयांबरोबर युद्ध करून त्यांना धूळ चारणे व स्वकीयांना उत्तम प्रकारे सांभाळणे हे राजाच्या यशस्वितेचे गमक आहे. महाराजांनी ते यशस्वीपणे केले. एक योगी पुरुषांसारखं आयुष्य जगले. कुठंही स्वार्थ नाही. प्रजेलाही उत्तम सेवा दिली. आजचे राज्यकर्ते इतिहासापासून काय घेतात हे त्यांनाच माहीत....! राज्यकर्त्यांच्या हातून स्वार्थ झाला तर संपूर्ण समाजाला, देशाला व्यथा सोसाव्या लागतात. तुम्ही, आम्ही आज त्याच प्रकारच्या व्यथातून जातोय. भारत देशाला निस्वार्थी नेतृत्वाची अत्यंत गरज आहे. स्वामी विवेकानंदांची तळमळ व इच्छा पूर्ण करणारे अनेक नेते या देशाच्या सेवेत लागले तर इथल्या व्यथा काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. शिवरायांसारखी रणनिती व राजनीती केली तर देश बदलण्यास वेळ लागणार नाही. भारतदेशाजवळ विचारांचे माहेरघर आहे. पण हे विचार प्रत्यक्ष व यशस्वीपणे राबवणारे प्रभावी राज्यकर्ते नाहीत. जगाला विचार व दिशा देणारे ज्ञान आपल्या जवळ असताना इथलं दारिद्र व दुःख संपता संपत नाही. गरिबांच्या नावाने राजकारण होत. पण त्या राजकारणाचा गरिबाला प्रत्यक्ष फायदा होताना दिसत नाही. याला स्वार्थी राज्यकर्तेच कारणीभूत आहेत.
व्यथांच्या या कथांबरोबर, त्यांच्या तीव्रतेच्या यातनांबरोबर समाजामध्ये व्यथा कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न होतो, हेही विसरून चालणार नाही. शारीरिक व्यथा वैद्यकशास्त्राने कमी केल्या जातात. शरीराची पिडा कमीअधिक प्रमाणात वैद्यांच्या मदतीने सोडवली जाते. डॉक्टर यमाचे वैरी आहेत. ते असवेतही. त्यामुळे प्रगत वैद्यकज्ञान असणाऱ्या देशात मृत्युदर कमी असतो. शरीराची पिडा व्यक्तिगत पातळीवर असह्य असते. व्यक्ती पूर्णपणे निरोगी असेल तर तीचं दैनंदिन जीवन सोयीस्कर होतं. पण ती जर शारीरिक पिडेत अडकली असेल तर डॉक्टरच तिची सोडवणूक करू शकतात. भारत देशाच्या प्रगतीमध्ये ज्या प्रमाणात वैद्यकीय सेवा ग्रामीण भागात मिळणे गरजेचे आहे, तेवढी सेवा अजून मिळू शकत नाहीत. याला अनेक कारणे आहेत. ग्रामीण भागात संपर्काची व दळणवळणाची व्यवस्था आजारी स्थितीत आहे. एकविसाव्या शतकातील सोनेरी स्वप्न पाहणाऱ्या विशाल भारताला लाजवेल अशी परिस्थिती ग्रामीण भारतामध्ये आजही आहे. ग्रामीण भागातून लोंढेच्या लोंढे रोजगारासाठी शहराकडे धवताहेत. हे सहूहिक अपयश आहे. देशाच्या प्रगतीत शहर व ग्रामीण हा भेदभाव केल्याने ही विषमता निर्माण झाली आहे. फक्त वैद्यकीय सेवेबद्दल बोलायचं झालं तरी हे चित्र विदारक आहे. बरं कोणी होतकरु डॉक्टर ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देऊ लागला तरी त्याला तिथल्या परिस्थितीत अडकून ठेवणारे ठग ग्रामीण भागात आहेत. त्याच्या सेवेविषयीचं भूत उतरलं जातं. याला जबाबदार ग्रामीण भागातील अव्यावहारी राजकारण आहे. एकूण यांमध्ये समाजाची गैरसोय होते. वैद्यकीय सेवेपासून संबंधितांना मुकावे लागते. इतर पर्यायाचा विचार करावा लागतो. अर्थात हा पर्याय शहरी भागाकडे त्याला घेऊन जातो. दोष फक्त संबंधित डॉक्टरांचा नसतो. समाज नाना तऱ्हा, नाना स्वभाव व नाना गुणांचा व अवगुणांचा बनलेला आहे. सेवा देणाऱ्यांनी त्या गुण-अवगुणांचा बारकाईने अभ्यास प्रथम करावा व नंतर सेवा सुरू करावी. नाहीतर सेवेचं भूत डोक्यातून उतरायला वेळ लागत नाही. बाबा आमटेंनी अशा प्रकारची सेवा केली. निष्कलंक व निस्वार्थी सेवा....! सेवा व फक्त सेवा....! अनेकांच्या व्यथांना हलकेपणा बाबांनी आणला. आज त्यांची तिसरी पिढी सेवेमध्ये येऊ पाहतेय. सेवेचे व्रत घेतलेल्या तीन पिढ्या कुटुंबात व त्याही एकाच कुटुंबात जन्मास येणे, हे अचंबित करणार आहे. कदाचित त्यापेक्षा मी तर असं म्हणेन की त्यांच्या येणाऱ्या पिढ्या न पिढ्या अशा प्रकारच्या सेवेत येवोत. त्यांच्यासारख्या सहृदयींची समाजाला अत्यंत गरज आहे व ती पुढेही राहील. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन उदयोन्मुख डॉक्टरांनी सेवाभावी वृत्तीने आपापल्या सोयीने समाजाची व्यथा कमी करावी. आपल्याकडे अनेक प्रश्न माणसाला पडतात. मी सेवा का करावी? सेवेतून मला काय मिळेल? मी सेवा केली तर मग माझ्या कुटुंबीयांच काय? वगैरे, वगैरे... बाबा आमटे यांनी हाच विचार केला असता तर कुष्ठरोग्यांचा वाली कोण झाला असता? अनेकांची व्यथांची ओझी कोणी उतरवली असती? आपल्या दैनंदिन जगण्यातून समाजाच्या उपकारांतून उतराई होण्यासाठी व्यक्तीने सदैव तत्पर राहणे, समाज हितासाठी योग्य आहे. संपूर्ण नाही पण त्यातून काही व्यथा कमी होण्यास हातभार लागेल.
शारीरिक व्यथांबरोबर मानसिक व्यथा अतिभयंकर स्वरूपाच्या असतात. अशा व्यथा अमरवेलासारख्या असतात. त्यांचा शेवट नसतो. व्यक्ती संपेल तेव्हाच त्या संपतात. अशा व्यथा मनावर खोल ओरखडे काढतात. त्या जखमातून आयुष्यभर अश्रू ओघळतात. त्या संपता संपत नाहीत. डोळे आटतील पण व्यथा कमी होत नाहीत. अशा व्यथा कमी करणारे जादूगारही आपल्या समाजामध्ये आहेत, हे आपण विसरून चालणार नाही. परंतु आपल्याकडे त्यांची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात नाही. ज्यांच्यावर अन्याय, अत्याचार होतो, त्यांना मानसिक स्तरावरून आधार देण्याचे काम आपल्याकडे यशस्वीपणे केले जात नाही. एखाद्या महिलेवर अत्याचार झाल्यानंतर, तिला ज्या प्रमाणात समाजाकडून मदत मिळणें गरजेचे असते, त्या प्रमाणात ती मिळत नाही. अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतरचे उत्तरदायित्व समाजाच असतं. उलट घटनेनंतरची समाजाची अवहेलना संबंधित महिलेस परवडत नाही. अन्याय करण्याऱ्यांची पाठराखण अशा प्रकारे समाज करतो व व्यथा घेऊन संबंधित व्यक्ती जागते, त्यात भर पडते. पाश्चिमात्य देशात अशा प्रकारच्या सेवा देणाऱ्या सेवाभावी संस्था काम करतात. संबंधितांच्या हितांचे रक्षण मोठ्या मनाने करून मुख्य समाजप्रवाहात त्यांना पोहोचेपर्यंतचं दायित्व मोठया मनानं घेतात व ते मोठ्या निष्टेने पूर्ण करतात. आपल्याकडे असे काम प्रभावीपणे व मोठ्या प्रमाणात सुरू करणे व यशस्वी होणे अत्यंत गरजेचे आहे. समाजामध्ये विषमता आहे. जाती व्यवस्थेतही अशीच विषमता दिसते. जिथं विषमता आहे, तिथं व्यथा आहेत. स्त्री व पुरुष हा भेद आहेच. विकसित देशात हा भेद बऱ्याच अंशी कमी दिसतो. स्त्रियांना समानता व सन्मान मिळाल्याशिवाय समाज सुखी होणार नाही.
आत्यंतिक व्यथा कथनाने कमी होतात. आपल्या जवळच्यांना व्यथा सांगितल्याने त्या काही अंशी कमी होतात. मन हलकं होतं. व्यथा बाहेर येणे गरजेचे आहे. व्यथा ऐकण्यासाठी उत्तम श्रोता मिळणे गरजेचे आहे. व्यथा सांगणाऱ्यापेक्षा, व्यथा ऐकणारा श्रेष्ठ आहे. कारण त्या व्यथांवर एखादं रामबाण औषध ऐकणारा सुचवू शकतो. त्यांची पिडा तो कमी करू शकतो. समाज झपाट्याने बदलतो आहे. बदलत्या समाजाबरोबर चांगली मूल्ये आपण मागे टाकून प्रगती करतोय. अशी प्रगती कालांतराने आपल्यासाठी घातक आहे. शेजाऱ्याच्या व्यथा ऐकून मनात उकळ्या फुटणारे अनेक कुटुंबे आपल्याकडे आहेत. व्यथांना जर अशा प्रकारचा श्रोता मिळाला तर त्या कमी होण्यापेक्षा त्यात आणखीन भर पडेल व पर्यायाने संबंधितांच्यावर आणखीन अन्याय झाल्याच आपल्या लक्षात येईल. 'भीक नको पण कुत्र आवर' असे म्हणण्याची पाळी व्यथाग्रस्तावर येऊन जाईल. व्यथात भर पडणं संबंधिताला परवडणारं नसतं. दुसऱ्याच्या वेदना पाहून आनंदाच्या उकळ्या फुटणारे राक्षसीवृत्तीचे होत. माणूस म्हणून घेण्याचा किंवा माणुसकीचा लवलेशही अशांना स्पर्श करू शकत नाही. त्यांनी स्वतःच्या वर्तनाचा अभ्यास करून स्वतःमध्ये योग्य ते बदल करणे गरजेचे आहे. समाजासाठी व त्या व्यक्तीसाठी ते गरजेचं आहे. व्यथा सांगून काही का होईना, थोड्याफार प्रमाणात हलक्या होतात. व्यथांच्या कथा सांगाव्यात. त्यांची तीव्रता कमी व्हावी. त्या समाजाने ऐकून त्यावर उपाय करावा. हे संतूलीत समाजाचे लक्षण आहे. विचारी समाजाचे हेंच प्रतिक आहे.
सरतेशेवटी जीवनामध्ये व्यथाही असाव्यात हे सांगताना मला भीती वाटत नाही. व्यथा जर नसतील तर आनंदाची किंमत कळणार नाही. व्यथा जर नसतील तर सुख भोगणं व तेही समाजहित जोपासून भोगण जमणार नाही. शबरीजवळ रामाला देण्यासाठी काहीच नव्हतं. शाबरींनं रामासाठी रोज बोरं वेचली, रोज त्या बोरांची चव पाहिली. गोड बोरं रामासाठी ठेवली व आंबट फेकून दिली. आयुष्यभर तिनं हेच केलं. आयुष्याच्या शेवटी राम आला. त्यांनी ती बोरं खाल्ली. शबरींच्या व्यथांना किनारा मिळाला. आज या घटनेला शेकडो वर्ष लोटलीत. रामानं शबरीची गोड बोरं खाल्ली की प्रेम? आपल्यासाठी हा संशोधनाचा विषय आहे. शबरीनं आयुष्यभर व्यथा भोगल्या नसत्या तर तिला राम भेटला असता का? व्यक्तीचा प्रवास व्यथांपासून परमार्थापर्यंत असला तर वाटेत देव भेटतोच भेटतो. शाबरीलाही वाटेत देव भेटला व तिच्या व्यथांचा अंत झाला. रामानं बोरं उष्टी आहेत म्हणून टाकून दिली नाहीत की आपण प्रत्यक्ष परमेश्वराला उष्टी बोरं देत आहोत असा प्रश्न शबरीला निर्माण झाला नाही. ती भेट आजच्या काळात झाली असती तर कदाचित आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी देशभर झडल्या असत्या. कदाचित न्यायालयात दाद मागण्यासाठी अनेक जनहितार्थ याचिका दाखल झाल्या असत्या. आपण पुढारलेल्या समाजात आहोत, हे याचे तोटे आहेत. व्यथा आवश्यक आहेत, हे मी जाणीवपूर्वक म्हणतो आहे. याचं कारणही शबरीप्रमाणे आहे. व्यथांचा शेवट जर गोड होणार असेल तर माणूस अशा अनेक व्यथा भोगेल. जाणीवपूर्वक अन्याय व व्यथांयुक्त प्रवास, यात खूप अंतर आहे. अशा अनेक व्यथांचा अंत प्रेमपूर्वक होतो. शेवटी व्यथांचा अंत गोड होणं संबंधित व्यक्तीचा व्यथातील शिणवटा क्षणात उतरवतं. व्यथांतील वेदनांचा विसर त्यामुळे होतो. वेदनांची तीव्रता काही अंशी कमी होते. एका नव्या आयुष्याची सुरुवात होते. शबरीप्रमाणे आयुष्याचं कल्याण झालं नाही तरी थोड्याफार प्रमाणात ती व्यक्ती सुखी बनवण्यास मदत होते. शेवटी व्यथा भोगणारा श्रेष्ठ असतोच पण त्या ऐकनही गरजेच आहे. समाजाचा सहभाग त्यासाठी मोलाचा ठरतो. समाजाने मनावर घेतलं की अशा यातनायुक्त जीवांच्या व्यथा लिलया संपतात. त्या संपवण्यासाठी समाजानं धावून जावं. अशा प्रकारच्या समाजनिर्मितीचे काम हाती घेणारे योद्धे निर्माण करण हेही समाजाचं काम आहे. निरोगी समाजाचं तेच लक्षण आहे. ज्याठिकाणी व्यथा, दुःख, दारिद्र्य असतं त्याठिकाणी परमेश्वराचे वास्तव्य असतं. साने गुरुजींचा 'खरा तो एकची धर्म' शिकण्याची व पुन्हा नव्याने शिकवण्यासाठी हजारो सानेगुरुजी जन्माला येण्याची गरज आहे. समाजातील व्यथा त्याशिवाय कमी होणार नाहीत. नियतीने दिलेल्या व्यथा नियतीन तयार केलेले असे योद्धेच कमी करू शकतात. असे महामानवच समाजाला व्यथांपासून दूर करू शकतात. भारत भूमी अशा योध्यांची आतुरतेने वाट पाहतेय. 060514 Harish Gore
ReplyForward |