आदरणीय अरूणजी घोडके सर,
नुकतंच 'रयतधरा' हे आपले वडील कै. बाबुराव घोडके (दादा) यांचे आपण लिहलेले चरित्र वाचले. दादांच्या जीवनातील अनेक आठवणी आपण त्यारुपाने अनंत काळासाठी शब्दबध्द केल्यात. दादा व कर्मवीर अण्णा यांचे अतूट प्रेम होते. अण्णांच्या मनात दादाविषयी अपार माया होती. खरंतर दादांचा बहुतेक कालखंड दहिवडी परिसरात गेला. आपल्या लेखणीच्या रूपाने दहिवडी परिसराचा समकालीन इतिहास समजून आला. दादांचे कार्य समजून घेता आले. कर्तुत्ववान माणसं भूमी कोणतीही असो, आपलं कर्तृत्व मागे ठेऊन जातात. आपले दादा त्यापैकी एक होत.
वडिलांविषयी काही लिहावं असं वाटणे म्हणजे त्यांच्याविषयी अपार प्रेम व आदर मनात ठेवणे होय. खरंतर प्रत्येक बाप मुलाच्या आयुष्यातील नायक अर्थात हिरो असतो. पण होत असं की प्रत्येक मुलाला हा नायक रेखाटता येतं नाही. खूप इच्छा असूनही शब्द शत्रू होतात व अशा रीतीनें हा नायक पडद्यावर येण्याआधीच लुप्त होतो. आपण भाग्यवान आहात की आपण आपल्या जीवनातील नायक अर्थात दादांना न्याय देऊ शकलात. तेही उत्तम शब्दामध्ये. त्यानिमित्ताने दादा निरंतर आठवणीत राहतील. दादांच्या कार्याला यानिमित्ताने न्याय मिळाल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही.
कर्मवीर भाऊराव पाटील उभ्या महाराष्ट्राच्या शैक्षणिक चळवळीतील वादळ होते. पायाला भिंगरी लाऊन अण्णा महाराष्ट्रभर फिरले व रयत उभी केली. अण्णांनी एक एक माणूस अक्षरशः वेचून आणून त्याला ताकद दिली. अण्णांच्या मुशीत तयार झालेली अनेक माणसं पुढे महाराष्ट्राला मिळाली. केवळ अण्णा ही एकच प्रेरणा घेऊन अशा माणसांनी आयुष्य अण्णांनी घालून दिलेल्या वाटेवरून चालत राहिली. आपले दादा हे त्यापैकी एक होत.
कर्मवीर अण्णांचा सहवास व त्यांच्या पश्चात त्यांचा आदर्श ह्या दोन गोष्टी दादांच्याबाबतीत अधोरेखित कराव्याशा वाटतात. अण्णांच्या अतीव प्रेमापोटी अण्णांच्या अस्थी दादांनी मेशपालान केंद्रात दहिवडी येथे आणून तेथे समाधी बांधून आयुष्यभर सेवा केली. अण्णांविषयी असणारे प्रेम आणि प्रेमच यातून दिसते. अण्णा म्हणजे परीस होते. त्यांचा स्पर्श झालेला प्रत्येक माणूस सोन झाला. दादा हे त्यापैकी एक होत. तसही अण्णांचे दहिवडीविषयी असणार अस्थेच नात,आपुलकी वेगळीच होती. का कोणास ठाऊक पण अण्णा माण तालुक्यावर अतोनात प्रेम करत होते. कदाचित त्यांची बालपणाची काही वर्ष इथं गेल्यामुळे किंवा आपले दादा इथं असल्यामुळे अण्णा वारंवार दहिवडीत असायचे. आणि तेही मेशपालन केंद्रात दादांकडेच थांबायचे. ही दादांसाठी मोठीच पर्वणी असायची.
खरतर दादांमुळे अनेक अंशी अण्णा समजून आले. तसा तर अण्णांचा खूप इतिहास माहीत आहे. आपण राहिलेला बराच भाग यानिमित्ताने प्रकाशात आणण्यास मदत केलीत.
आपला बालपणीचा काळ व दादांचा उमेदीचा काळ एकच होता. दादांच्या शिस्तीमुळेच आपले शिक्षण उत्तम प्रतीच झाले यात दुमत नसावे. शेवटी बाप दूरदृष्टीचा असतो. आणि तो धाकात प्रेम लपवतो. आपल्याला त्याचा धाक दिसतो, प्रेम दिसत नाही. सुदैवाने आपण दोन्ही गोष्टी पाहिल्यात व त्यामुळेच आपणास आपले वडील पर्वताएवढे भासले. प्रत्येक मुलाला ते तसे दिसावेत. तर आणि तरच बाप नावाच्या एका कष्टकरी माणसाला न्याय मिळेल. त्याच्या कार्याचा सन्मान होईल. आपण आपल्या वडिलांचा सन्मान अबाधित ठेवण्यात यशस्वी झालात.
तीन चार वर्षापुर्वी आपण नाशिकला जाताना माझ्या वडीलांवरील A Tribute to My Father's Struggle For Life या पुस्तकाविषयी चर्चा केली. आपण मायेने माझ्या पाठीवरून शाबासकीची थाप दिली होती. आपुलकीने चर्चा केली होती. बाप फारच कमी मुलांना कळतो. आपण दोघेही त्या बाप कळणाऱ्या ओळीत आहोत. येणारा इतिहास या घटनेची नोंद घेतल्याशिवाय राहणार नाही यात कोणतीही शंका नाही.
दादांच्या चरित्राच्या निमित्ताने साहित्यिक अरुण घोडके ठळकपणे लक्षात राहतात. आपली लेखणी उत्तरोत्तर धारदार होओ. दादांना माझे विनम्र अभिवादन. आपणास अनेक शुभेच्छासंह पुन्हा नवीन कलाकृती आपल्या हातून निर्माण होओ ही मनोकामना व्यक्त करून थांबतो.
हरीश गोरे
दहिवडी.
No comments:
Post a Comment