Monday, 20 July 2020

चिंतन......सद्भावनांचे.....3





                                                                                   स्वभाव 



 एखाद्याविषयीची जवळीक स्वभावातून होत असते. जर आपल्या विचारांशी स्वभाव मिळता-जुळता असेल तर मैत्रीची लांबी पुढे वाढते व ती तशी टिकतेही. पण विचारांची जर फारकत दिसली तर मैत्रीचा हात आखडता घेतला जातो. प्रसंगी ती संपतेदेखील. म्हणूनच समविचारी व्यक्तीमत्त्व समस्वभावामुळे एकत्र येतात. स्वभाव मैत्री टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो. या स्वभावामुळे अनेक फायदे व तोटे संभवतात. स्वभाव एकमेकांना जोडतो. तर तोच स्वभाव एकमेकांना तोडतो. स्वभावाचे अनेक पैलू व प्रकार आहेत. व्यक्ती-व्यक्तीनुसार त्यात बदल होत असतो. प्रत्येकाजण एका स्वभावानुसार असतो. एखाद्याच वागण, बोलण, त्याचे विचार, उच्चार व आचार या गोष्टी त्याचा स्वभाव ठरवतात. ज्या पद्धतीने तो विचार करतो, विचारांच्या सुसंगत बोलतो आणि बोलल्याप्रमाणे किंवा बोलण्याविरुद्ध वागतो, तसा त्याचा स्वभाव आहे असे आपण सर्वसाधारणपणे म्हणतो. प्राथमिकदृष्ट्या स्वभाव ओळखण्यासाठी या गोष्टी उपयोगी पडतात. पण या सर्व वरकरणी बाबी मानाव्या लागतील. व्यक्तीच्या पूर्ण परिचयासाठी किंवा स्वभाव सर्वस्वी तपासण्यासाठी याव्यतिरिक्त बरेच बारकावे तपासावे लागतात. वरील मात्रा सर्वांनाच उपयोगी पडत नाही व ती कोणी उपयोगात आणण्याचा प्रयत्न केला तर कालांतराने पश्चाताप करण्याची पाळी येऊन ठेपते व त्या वेळी स्वतःच्या नशिबाला दोष देण्याखेरीज दुसरं काहीच उरत नाही. अनेक व्यक्तिमत्व आचार, विचार व उच्चार स्वतःसाठी एक व इतरांसाठी वेगळे अवलंबतात. बहुदा अशी व्यक्तिमत्व फसवी असतात. चांगल्या स्वभावाची माणसे चांगली असतीलच असे नाही. जगात अनेक चांगल्या स्वभावाच्या लोकांनी अक्षम्य गुन्हे केलेले आहेत.  तेव्हा फक्त आचार, उच्चार व विचार यांचा वरकरणी अभ्यास झाला तर आपण फसू शकतो. म्हणून व्यक्तीचा पूर्ण स्वभाव ओळखण्यासाठी आपणास वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्याचा विचार करावा लागेल. तसा विचार आपण केला तर अनेक मजेशीर गोष्टींचा उलगडा आपल्याला होईल. कदाचित त्यावेळी आपला आपल्यावरीलसुद्धा विश्वास उडेल. एखाद्याच्या स्वभावातील बारकावे तपासायचे म्हटले तर तेथे फक्त ढोबळमानाने निरीक्षण करणे उचित ठरणार नाही. त्याच्या बारीक-सारीक गोष्टी आधी तपासाव्या लागतील व तपासलेल्या प्रत्येक बाबीचे विश्लेषणात्मक वर्णन मनात करावे लागेल. अशा अनेक छोट्या-मोठ्या निरीक्षणातून व अनुभवातून एखाद्याचा स्वभाव सांगणे किंवा ओळखणे योग्य होईल. यासाठी अनेक दिवसांचा, महिन्यांचा किंवा वर्षाच्या कालावधीत जाण्याची शक्यता आहे. म्हणूनच वरकरणी निरीक्षणांना व अनुभवांना स्वभाव तपासताना काही मर्यादा येतात. अर्थात सर्वच व्यक्तींचे स्वभाव अशा पद्धतीने तपासणे योग्य होणार नाही. पण त्याचबरोबर सर्वांसाठीच वरकरणी निरीक्षणही योग्य नव्हे. त्यामुळे आपल्या गरजेनुसार वरील बाबी वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने तपासल्या पाहिजेत.


 स्वभाव ही साचेबद्ध बाब आहे. 'सुंभ जळेल पण.....' ही म्हण स्वभावामुळेच तयार झाली असावी. ग्रीष्मातील तप्त ऊन सृष्टी जाळून टाकतं आणि मग रिमझिम धारा अमृत ओततात. एक नवा प्राण सगळीकडे उमलू लागतो. हिरव्या शालून सृष्टीचं लाजणार रूप पावलोपावली दृष्टीस पडते. झरे वाहतात. ओढा, नदी, नाले कधी नव्हे इतक्या लगबगीने खळखळून हसत पुढे जातात. पाखरं नवीन गाणी गुणगुणतात. झाडं गगणाच चुंबन घेण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करतात. एका पावसान कितीतरी जीवात चैतन्य ओतलेले असते. सृष्टीत होणारा हा दरवर्षीचा बदल किती मोहकात आणतो. ही मोहकता येते खरी पण ती टिकून राहण्यासाठी नव्हे. झाडाझुडपांना हे माहीत असते की ग्रीष्मात मी शुष्क होणार आहे. पाखरांना हे ठाऊक असतं की ग्रीष्मात आजची शीळ तोंडात नसेलही. पण म्हणून ती आज गुणगुणायची थांबत नाहीत. काहींना पाऊस पडला की अडचण होते. पावसाचा थेंब जरी अंगावर पडला तरी नाक गळत. हा दोष केवळ स्वभावाचा आहे. साचेबद्ध स्वभाव ग्रीष्मातही तसाच, शरद, हेमंत की, आणखीन कोणता ऋतू येवो, यांचा आपला स्वभाव तो स्वभावच. पावसाच्या स्पर्शाचा किंवा अंगाशी संग करणाऱ्या वाऱ्याशी जणू आपलं काही देणेघेणे नाही. ऊन पडो, पाऊस पडो, विजा कडाडो, हे मात्र स्तब्धच…! 

 बरीच माणसं हसताना अवघडल्यासारखी दिसतात. जणू हसण्याचे पिक आमच्याकडे पिकत नाही. त्यांच्या मते, जीवन म्हणजे नुसते दात काढणे नव्हे. जीवन म्हणजे हास्य नाही हे जरी बरोबर असले तरी जीवन म्हणजे गंभीरता नव्हे किंवा हासायच नाही असेही नव्हे. हास्य ही मानव जातीला दिलेली अनमोल देणगी आहे. इतर कोणताच जीव हसू शकत नाही. निदान हसताना दिसत नाहीत. सर्वजण गंभीर आहेत. जरी ते गंभीर नसले तरी हसू मात्र शकत नाहीत. खळखळून हसणे कित्येकाना जमतच नाही. हसताना सुद्धा हात राखून असे लोक हसतात. हसताना काय मागे ठेवून हसावे ? हसणे म्हणजे किती क्षणाची बाब. पण भविष्यातील स्वार्थ, काळज्या, अन् बरंच काही  मनाच्या कोपऱ्यात घर करून बसलेले असतात आणि तेच त्याला खळखळून हसू देत नाही. 

अलीकडे हास्याचे क्लब निघालेत, जिथे जाऊन हसून यायचं..…! पण तसे हसणे म्हणजे जणू हसण्याची केलेली निव्वळ प्रतारणा होय. हास्य म्हणजे दोन किलो साखर नाही. दुकानात जातो व घेऊन येतो.....! कधी हसाव हे ज्यांना ठाऊक नसतं असेच लोक अशा क्लबचे सदस्य असावेत किंवा हास्य त्यांच्या अवतीभोवती चुकूनही फिरत नसेल, अशीच मंडळी नियमित हास्यटॉनिक घेऊन येत असतील. किती आणि का हसावं हे जर शिकायचं असेल तर लहान बाळाकडून शिकावे लागेल. प्रत्येक बालकाच्या ओठावर निर्लेप हास्य परमेश्वराने ठेवले आहे. बालकं निरर्थक, निर्हेतुक हसतात. कधीही, कशालाही हसतात. का हसता म्हणून विचारलं तरी हसतात. हसू नका म्हटलं तरी हसतात. शांत रहा म्हटलं तरी हास्याची ठिणगी हळूच टाकतात. जीवन गंभीर जरूर आहे पण इतकही गंभीर नाही की हसायचं नाही. अनेक लोक हसताना खूप छान दिसतात. ती असतातही तशीच. म्हणून हसताना ती लोभस वाटतात. काही हसतात तर काही हसवतात. हसण्यापेक्षा हसवणे श्रेष्ठ आहे. कारण हसण्यासाठी जास्त विचार बाजूला करावा लागत नाही. पण हसवण्यासाठी सुख-दुःख, चांगल्या, वाईट भाव-भावना बाजूला ठेवून हास्यकारंजे उडवावी लागतात. हास्याचे अंकुर अनेकांच्या जीवनवेली बहरवतात. जीवन म्हणजे केवळ हास्यमिश्रित सुखदुःखांची मिलन आहे. जर जीवन कटू प्रसंगाने व्यापून राहील असेल तर हास्य या जीवन वाळवंटातील ओयासिस आहे, जिथं मनाला थोडा विसावा व सुख अनुभवता येत. हास्य हा अनुभव छोटा असला तरी त्यातून मिळणारी अनुभूती चिरकाल टिकणारी आहे. हसणं  आरोग्याला हितकारक आहे. हसरी माणसं उत्तम आरोग्य टिकवून ठेवतात. 

समाजात अनेक प्रकारची हास्य आपण पाहतो. बालकाच्या निर्हेतुक हास्यापासून वृद्धांचे अनुभवी हास्य आणि तरुणांच्या खळाळून हास्यापासून स्त्रियांच्या लोभस हास्यापर्यंत अनेकविध हास्यप्रकार आहेत. टोमणा मारणे, कोपरखळी, हास्याची उकळी, हस्यकल्लोळ, खसखस पिकाणें, खट्याळहास्य, स्मितहास्य, मिश्किल हास्य, रावणी हास्य,कापटी हास्य, इत्यादी, इत्यादी अनेक हास्य प्रकार स्वभावागणिक पहावयास मिळतात. हास्यप्रकारात आपणाला याहीपेक्षा खोलवर जाऊन डोकावता येईल. पुष्कळ लोकांचे स्वभाव अतिगंभीर गोष्टी हलक्याफुलक्या करणारा असतो.  त्यांना त्यावर उत्तम तोडगाही मिळतो. समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वस्वी वेगळा ठेवतात. याउलट अनेकांचा स्वभाव साध्या गोष्टीकडे अतिगंभीरतेने पाहण्याचा असतो. त्यामुळे मूळ समस्या अधिकच जटिल होऊन जाते व प्रसंगातील गंभीरता वाढत राहते. 

 हिंसक स्वभाव मानवजातीसाठी उणे बाजू आहे. अनेक व्यक्तींचा स्वभाव आक्रमक असतो. प्रत्येकाने तसे आक्रमक असावे सुद्धा.....! पण आक्रमक असणे फक्त अन्यायाविरुद्ध अधिक खुलून दिसते. अन्यत्र नाही. बऱ्याच लोकांचा स्वभाव भांडखोर असतो. जणू वाद करणे हा जन्मसिद्ध हक्क आहे. अशी व्यक्तिमत्व अनेक गंभीर प्रसंग कोणतेही कारण नसताना स्वतःवर ओढवून घेतात व संकटात फसतात. पण तरीही स्वभाव मात्र यत्किंचितही बदलत नाहीत. अशा व्यक्तींची केवळ उपस्थिती वादाचे कारण ठरते. याला कारणीभूत स्वभावच आहे. स्वभावाचे रेखाचित्र मनःपटलावर इतके खोलवर कोरलेले असते की, अशी माणसं वेगळ्या दृष्टिकोनातून त्याचा विचार करू शकत नाहीत. मत्सर, हेवादेवा हे वादाचे प्रमुख कारण आहे. भारतात न्यायप्रणाली आहे म्हणून बरे. नाहीतर मानव जातीने वाद हा विषय कोणत्या थराला नेला असता देव जाणो. तरीही वाद सोडवता सोडवता न्यायव्यवस्था पुरती थकून जाते. जीवनात वाद आवश्यक आहेत का? वादाव्यतिरिक्तही चिंतनशील बाबी जीवनात आहेत. पण स्वभाव इतका साचेबद्ध असतो की, वाद आपोआप तयार होतो व एका नव्या अपरिचित वळणावर जीवन येऊन ठेपते. अर्थात तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि बऱ्याच गोष्टी हाताबाहेर गेलेल्या असतात. 

 व्यक्तीव्यक्तीच्या स्वभावात अंतर आहे. व्यक्ती बदलली की स्वभाव बदलतो. स्वभाव वर्तणुकीवरून ठरतो. तर वर्तन विचारांवरून आणि विचार अवतीभोवतीच्या समाजावरुन आणि संस्कारावरून ठरतात. अनेकांचा स्वभाव 'मी'पणाने काठोकाठ भरलेला असतो. बोलणाऱ्या प्रत्येक शब्दातून व वाक्यातून हा 'मी'पणा ओसंडून वाहतो. इतरांवर छाप मारण्याचा तो एक प्रकार असतो. वास्तविक अशी 'मी'पणाच्या प्रौढीची चोरी बोलताना लगेच सापडते. पण तरीही अशी माणसं बदलण्यास तयार नसतात. पुष्कळ लोक  महान कार्य करतात. जगाला त्याचा साधा थांगपत्तादेखील नसतो. अशी माणसं फक्त चांगल्यासाठी जगतात. चांगलंच करतात. चांगलं स्वतःसाठी करतात व चांगलं पीडित समाजासाठी करतात. पण मी हे केले, माझ्यामुळेच हे शक्य झाले, याचा साधा उच्चारदेखील त्यांच्या मुखातून येत नाही. अशी व्यक्तींचा स्वभाव जणू चांगल करण्यासाठी व चांगलं करून पडद्यामागे राहण्यासाठी भूकेलेला असतो. हातून होऊन गेलेली प्रत्येक चांगली कृती रसभरीत कथन करण्यासाठी नसते. ती विसरून जाण्यासाठी असते. इतरांचं भलं करण्यात जर कोणी झटत असेल, तर त्याने त्याचं झटणे अलगद विसरून जाणारी माणसं, माणसातील देव होत.

 स्वभाव व्यक्तीच्या ओळखीसाठी खूप उपयोगी पडतो. किंबहुना अनेक व्यक्ती त्यांच्या स्वभावावरून सगळ्यांना परिचित असतात.  अनेकांचे स्वभाव कष्टाळू असतात. जीवनात यश किंवा अपयश नेहमीच येत असतं. जी व्यक्तिमत्व कष्टाळू असतात, ती नेहमीच यश व अपयश एकाच भावनेतून पाहतात. मात्र कष्ट थांबवत नाहीत. त्यांचे कष्ट अविरतपणे चालूच असते. अशा स्वभावाच्या लोकांना इतर बाबतीत मुळीच रस नसतो. आपलं काम भलं आणि आपण भलं. एक काम संपलं की दुसरं काम त्यांची आतुरतेने वाट पाहत. अशी माणसं कामाला त्यांच्या आयुष्यात सर्वात आधी प्राधान्य देतात. अशा या कष्टाळू स्वभावाशिवाय आळशी स्वभावाची व्यक्तिमत्वही पहावयास मिळतात. आळस माणसाचा शत्रू असला तरी बऱ्याच लोकांना आळस मित्र असल्याचे चित्र पहावयास मिळते. अशांना आळसामुळे आयुष्यभर जबर नुकसान सोसावे लागते. प्रसंगी वाईट दिवस येण्याची शक्यताही असते. परंतु त्यांची चूक त्यांना उमजली तर नवल......! आळसाने बुद्धीला गंज चढतो. आळस करणे म्हणजे प्रगतीला साखळदंड अडकवणे होय. आळस वाईट कृत्य करायला भाग पाडतो. आळसामुळे व्यक्ती सुखासीन, परावलंबी व लाचार बनू शकते. एक आळस अनेक अनर्थ बरोबर आणतो. क्षणाचा आळस आनंतासाठी दुःखाचा मूळ बनतो. पण आळशी स्वभाव मात्र बदलत नाही.

 काहींचा स्वभाव अतिलाजरा असतो. लाजणे तारुण्यात उठून दिसते. सर्वच ठिकाणी लाजणारा स्वभाव नसावा. काहींचा स्वभाव बडबडा असतो. काहींचा मिश्कील विनोद करण्याचा असतो. अशी विनोदी स्वभावाची व्यक्तिमत्व समाजात बरीच लोकप्रिय असतात. जर विनोदत स्वार्थ नसेल तर अशा व्यक्तिमत्वाने केलेल्या शाब्दिक कोटी निखळ हास्य निर्माण करतात. अशा लोकांचा स्वभावच नर्मविनोदी असतो. पु. ल. देशपांडे हे व्यक्तिमत्व अशाच प्रकारच निखळ, निःस्वार्थी विनोदी व्यक्तिमत्व होते. ज्यांना  त्यांचा सहवास लाभला ते खरोखरीच भाग्यवंत लोक होते. विनोद ऐकणे आणि साक्षात विनोद पाहणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. जणू साखरेची गोडी ऐकणे आणि साखर प्रत्यक्ष खाण्यासारखा तो प्रकार आहे. निस्वार्थी व अहिंसक विनोद हा उच्च कोटीतील आहे. हिंसक व पांचट विनोदावर निर्लज्यपणे विनोदवीर होऊ पाहणारे आंबटशौकीन  स्वभावाची माणसंही आहेत. अशा स्वभावाच्या लोकांना आपण परग्रहावरून येऊन विनोद करतो आहोत असं वाटत. आपणाला घरदार, आईवडील, बहिणभाऊ आहेत याचा विसर त्यांना पडतो व गावभराची घाण विनोदातून सदैव ओकतात. खरंतर तो विनोद नसून आंबट शौक पूर्ण करणारी पांचट चव असते. अशा विनोदाने अनेक जखमा होतात. विनोदाने केल्या जाणाऱ्या जखमांवर कोणताच मलम नाही. तेव्हा आंबटशौकीन्यांनी जिभेवर नियंत्रण ठेऊन निखळ विनोदावर भर देणे सामाजिक स्वास्थ्यासाठी हितावह आहे. छोट्या मोठ्या गमती-जमाती करणारी व्यक्तिमत्त्व समाजात जास्त लोकप्रिय असतात. अशा स्वभावाच्या माणसांना एकांतवास जणू खायला उठतो. माणसांशी त्यांचा लळा जास्त असतो.

 शास्त्रज्ञ, विचारवंत यांचे स्वभाव समाजातील इतरांपेक्षा वेगळे असतात. खरंतर ही देशाची बौद्धिक संपदा आहे. खूप जबाबदाऱ्या अशा व्यक्तींना पार पाडाव्या लागतात. ती काहीशी गंभीर आणि विचारी असतात. समाज आज जे सुख अनुभवतो आहे ते ह्या लोकांमुळेच. त्यामुळे अशा व्यक्तींना थोरपण जात व ते गेलेही पाहिजे. अथक परिश्रमातून शास्त्रज्ञ एखादा शोध लावतात व अखिल मानवासाठी त्यांचा शोध एक वरदान ठरून जातो. ज्ञात-अज्ञात जीव त्यांचे ऋणातित असतात. न्यूटनसारखी व्यक्तिमत्व खूप काही शोध लावून स्वतःला सर्वसामान्यातील सामान्य मानत होती. एक शास्त्रज्ञ असण्याव्यतिरक्त हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होय. या भावनेतून फक्त मानवता दृष्टीस पडते. सृष्टीत जन्म झालेला प्रत्येक जीव परमेश्वराने टाकलेली जबाबदारी चोखपणे पार पडतोय.  वास्तविक कोण काळा आहे, कोण गोरा आहे, कोण सुंदर तर कोण कुरूप. कोणी हुशार आहे तर कोणी मंद.  पण यात सर्वस्वी त्या व्यक्तीचा दोष अथवा चांगुलपणात कोणताच हात नाही. तसच जर कोणी हुशार, बुद्धिमान आहे, शास्त्रज्ञ आहे, तर त्यात नवल असं काही नाही. पण केवळ समाजासाठी झटणें, समाजासाठी झटल्यानंतरही समाजाचा ऋणी राहणे, यात मात्र निश्चित नवल आहे. असें नवल करणारी व्यक्तिमत्व थोडीच असतात. अशा स्वभावाची माणसं  प्रगल्भ असतात.

 स्त्रीमनाच्या स्वभावाचा कानोसा घेतल्यास अनेक मजेशीर बाबी आपल्यासमोर येतात. स्त्रिया समाजाचे भूषण आहेत. स्त्री आहे म्हणून वात्सल्य, प्रिती, जिव्हाळा, प्रेम, रसिकता आणि आपलेपणा आहे. स्त्रिया खरोखरीच खूप आघाड्यावर यशस्वीपणे लढत असतात. अनेक ठिकाणी लक्ष पुरवीत रोजची कामे त्या यशस्वीपणे करतात. घरातील प्रत्येकाला तोंड देत संध्याकाळपर्यंत मेटाकुटीला येतात. त्यात सासू नावाची वस्तू नीट स्वभावाची असेल तर ठीक. नाहीतर इतर व्यापाबरोबर हा ज्यादा ताणयुक्त व्यापही त्यांना यशस्वीपणे सांभाळावा लागतो. स्त्री जर नोकरी सांभाळणारी असेल तर संध्याकाळपर्यंत ती पुरती दमून जाते. पण तरीही स्त्रिया हार मानत नाहीत. भारतीय स्त्रीने तर खुप सोसले आहे. तरीही तिनं तिचं वेगळेपण जपलं आहे. समाजाने प्रत्येक वेळी तिच्यावर अन्याय केला आहे. तिनं तो सहनही केला आहे. पण आपली जगण्याची उमेद तिनं सोडली नाही.  स्त्रीमनाचा स्वभाव व्यापक दृष्टिकोनातून विचार केला जाण्याची आवश्यकता आहे. स्त्रियांमुळे समाजाला वैभव आहे. तर समाज स्त्रियामुळेच स्थिर व शांत आहे. या व्यतिरिक्त वैयक्तिक स्त्रीचा स्वभाव पाहिला तर तो प्रत्येक स्रीगणिक  वेगळा असतो. जरी तो वेगळा असला तरी प्रत्येक घरातील स्त्री घरातल्या सर्वांसाठी निस्वार्थी भावनेतून झटत असते. हे मात्र स्त्रीजातीतील साम्य आहे.

स्वभावामुळे व्यक्ती, व्यक्ती मुळे गाव, शहर आणि पर्यायाने देशाची बांधणी होत असते. व्यक्तीव्यक्तींचा स्वभाव चांगला, परोपकारी आणि दुसऱ्यांसाठी झटणारा असेल तर देशाची जडणघडण चांगल्या प्रकारे होऊ शकते. सृजनशील समाजाची निर्मिती हे अनेकांचे स्वप्न स्वप्नच राहिले आहे. अनेकांनी समाजाला चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न केला. पण समाजाचा आपला स्वभाव आहे तोच आहे. त्यात फारसा फरक जाणवत नाही. याला कारण समाज ढवळून न निघणें. समाजाचा स्वभाव बदलणे तसें फार कठीण काम आहे. समाजाचा स्वभाव कुत्र्याच्या शेपटीसारखा वाकडा आहे. तो कितीही नळीत घालून सरळ करण्याचा प्रयत्न केला, तरी मूळ पातळीवर येण्यास फारसा वेळ लागत नाही. कल्पनेतील सुस्वभावी समाज खरोखरीच मानव जातीसाठी एक आदर्श समाज होय. प्रत्यक्षात तो इतका सुस्वभावी होत नाही. कारण समाजातील विघातकी स्वभावाच्या विकृत्या होय. अशा स्वभावाच्या लोकांमुळे समाज जडणघडणीत मोठाच अडथळा निर्माण होतो व सामाजिक प्रगतीला खीळ बसते. समाज पुन्हा दिशाहीन होतो. प्रत्येकाने आपला स्वभाव सुस्वभावी केला तर आदर्श समाज निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.

 प्रत्येक व्यक्तीला ज्याप्रमाणे स्वभाव आहे, तसा स्वभाव सृष्टीतील वस्तू, पक्षी, प्राणी व प्रत्येक कणाला असतो. म्हणजे कडुनिंब, कारले कडू असतं, साखर गोड असते, चिंच आंबट, आवळा तुरट, इत्यादी इत्यादी. व्यक्तीच्या स्वभावातील बारकावे ज्याप्रमाणे टिपता येतात, त्याचप्रमाणे त्यांच्यातही स्वभाववैशिष्ट्ये टिपता येतात. त्यातील काहींचे स्वभावही परोपकारी आहेत. आपण कोणावर उपकार करतोय, याची मात्र त्यांना जाणीव नसते. वारा मुक्तपणे सर्वत्र संचार करतो. त्याच्यावर कोणीही मर्यादा आणू शकत नाही किंवा त्याच्यावर कोण नियंत्रण ठेवू शकत नाही. वारा वाहतो. पण वाहताना अनेकांना जगवतो याची कल्पना त्याला नाही. वारा प्रत्येक श्वासात आपल्यात एक नवा प्राण ओतून जातो. पण त्याची वाऱ्याबरोबर आपल्यालाही कल्पना नसते. ढग अचानक डोक्यावर येतात व बरसतात. त्यांच्या बरसण्याच्या स्वभावात आजतागायत बदल नाही. पाऊस पडणे ही नैसर्गिक गोष्ट आहे. पण ती सकल मानवजातीसाठी वरदान ठरते. कदाचित याची जाणीव पावसाला नसेलही. पण तो आपला मूळ स्वभाव सोडत नाही. सूर्य अविरतपणे प्रकाश व उष्णता देतो. जगण्याची उब सूर्यच देतो. प्रकाशाने नटलेलं जीवन ही सूर्यापासून घेतलेली कविकल्पना आहे. त्याच्या उगवण्यात, मावळण्यात व मध्यावर आल्यानंतर उकडण्यातही जगणे आहे. तो जगवतो  व प्रत्येकाला जगण्याचं बळ देतो. आपल्याला वाढवतो आणि घडवतो. सूर्याच्या प्रत्येक क्षणाचे तेज वेगळे असते. त्याचे उगवणे म्हणजे चैतन्याची सळसळ सृष्टीत निर्माण करणे होय. त्याचं मावळन म्हणजे उद्याच्या उगवण्याच्या व फुलण्याच्या रम्य कल्पना होत. सूर्य उगवतो, तापतो व मावळतो. पण तो आपणाला दर दिवशी नवीन घडवतो. फक्त मानवालाच नाही, तर सर्व प्राणिमात्रासाठी तो वरदान ठरतो. त्याच्याइतकी परोपकारी भावना दुसरीकडे क्वचितच पहावयास मिळते. एरवी लाईटबिले भरून भरून शेवटी आपण अंधारातच  आहोत. जरा कल्पना केली, सूर्याने त्याचे लाईट बिल व हीट बिल मागितले तर? हातात अखंड दोरी घेऊन फास घेण्यापेक्षा आपण दुसरं काहीच करू शकणार नाही. ही कल्पना काहींना सोसणार नाही. पण सूर्य प्रकाश, उष्णता देतो. त्याचं साधं ऋणी राहणंसुद्धा आपण पसंत करत नाही. सूर्य म्हणजे चैतन्य, सूर्य म्हणजे जीवन आणि सूर्य म्हणजे जगणे आहे. नाहीतर अंधार म्हणजे तरी काय आहे? अंधार म्हणजे अज्ञान आणि अंधार म्हणजे मृत्यू होय. हा अंधार तर सगळीकडे आहे. त्यानेच तर जग व्यापून टाकले आहे. मनाचा एक कप्पा उघडला तर मनात अंधार ठायी ठायी वसलेला आहे. अंधाराच शब्दशः रूप नसेल, इतर रूप असेल. ते कोणतेही रूप असो. पण अंधार मात्र आहे. हा अंधार म्हणजे मृत्यूच आहे. कारण कोणाला जगायचं असेल तर प्रत्येक क्षणी मरावं लागतं आणि मरण कोणालाच आवडत नाही. आपण मरत नाही म्हणजे आपण जगून सुद्धा मुडदेच आहोत. सूर्याच्या प्रकाशाचा इतका व्यापक अर्थ आहे. त्याचा स्वभाव असा आहे की तो प्रत्येक क्षणी वाढवतो. वाढवतो प्रेमाने, मायेने व वात्सल्याने. सूर्य हे ब्रह्मांडातील मोठे तत्व आहे व आपण त्यांच ऋणी असणे गरजेचे आहे.

 परोपकारी तत्व हे फक्त मानवाकडेच आहे असं नाही. मानवाचे परोपकार समाज किंवा इतिहास ठळक अक्षरात नोंद करून ठेवतील. पण परोपकार मानवाव्यतिरिक्तही दुसऱ्या कोणी केला तर त्याची दखल इतक्या वाजतगाजत घेणे शक्य नाही. झाडे, झुडपे, लता, वेली यांचे स्वभाव खरोखरीच परोपकारी आहेत. झाडं काय देत नाहीत? सर्वच तर आपण त्यांच्यापासून घेत आहोत. आपण जरा ताण दिला व पाहिलं तर रोजचं अन्न वनस्पतीच पुरवत आहेत. अंगावरील वस्त्रे झाडच पुरवून आपली लाज राखताहेत. दैनंदिन वापरातील अनेक वस्तू  वनस्पतीपासूनच आपण घेतो. हा निव्वळ परोपकार नव्हे काय? काहीजण म्हणतील आम्ही त्या वस्तू विकत आणतो. पण तुम्ही पैसे कोणाला देता? झाडांना तर कुठे खिसे नाहीत....! माणसं सोडून इतर कोणीही सृष्टीत व्यापार करत नाहीत. खरेदी-विक्री हा मानवाने तयार केलेला सौदा आहे. या व्यापारानेच तर माणसामाणसात मोठी दरी निर्माण केली आहे. व्यापार नफ्याच्या आकड्यांवर चालतो आणि नफा पैशात पाहिला जातो. पैसा पाहण्यासाठी व तो मिळवण्यासाठी तर आपण सगळे धावतो आहोत. व्यापार करतो आहोत. पैसा मिळवता मिळवता आपण पक्के व्यापारी बनलो आहोत. व्यापारी बनता बनता आपण किती अनर्थ करतो आहोत? आपण सगळेजण तर एकत्र आहोत पण तरीही एक मोठी अनामिक दरी आपापसात आहे की जिच्यामुळे जवळ असूनसुद्धा एकमेकांपासून लांब आहोत. वनस्पती व्यापारी नसून आपल्यासाठी झटणाऱ्या मुक्या देवता आहेत. उन्हात मिळणाऱ्या सावलीचा थंडावा, पक्वान्नसुद्धा मिळवून देणार नाहीत. हिरव्या पानांनी भरलेली झाड पाहणे म्हणजे डोळ्यांनी वैभव पाहणे होय. झाड वाढतात, फुलतात आणि आपल्यासाठी फळ घेऊन येतात. त्यापुढे आपला व्यापार सुरू होतो.....! झाडाइतकं दानशूर कोणीही नाही. रंगीबेरंगी फुले म्हणजे सप्तरंगी जीवनाचा रंग आहे. फुलांचे रंग हा सृष्टीतील मोठा चमत्कार आहे व तो चमत्कार दरवर्षी होतो. आपण मात्र तो चमत्कार पाहण्यासाठी पुरते जागे नसतो. हा त्याहीपेक्षा मोठा चमत्कार आहे. जगण्याच्या धडपडीत आपण बरेच मागे राहतोय. इतकं मागे आहोत की आपल्यासाठी फक्त जगण शिल्लक राहतय.  फक्त जगणं बाकी असतं त्यावेळी जगुन सुद्धा त्या जगण्याला अर्थ नाही. ते निव्वळ बेरंगी जगणं होय. कळी उमलते व वाढते. ती आपली उगीचच उमलते. उमलते आपले सौंदर्य जपण्यासाठी, नाजूकपणा जपण्यासाठी आणि उमलते जगण्याचं आणि जगण्यातील रंग देण्यासाठी......! ही फक्त सेवाच होय. ईश्वराच्या पायदळी आपण फुले वाहतो. देवालाही फुलं खूप आवडतात. आवडतात कारण ती निरागस असतात. आवडतात कारण ती विविधरंगी असतात. आवडतात कारण ती इतरांना सुगंध देतात. फूलांचा स्वभाव असा सर्वाना आवडीचा आहे. त्यात ती कोणत्याच परिस्थितीत बदल करत नाहीत. झाड ऊन, वारा, पाऊस, दिवस, रात्र अनेक वादळ सोसत एका जागेवर स्थिर असतात. आपल्यासाठी स्थिरतेचा मोठा संदेश झाड देत नाहीत का? 

स्वभाव माणसाला जगवतो. स्वभाव तारतो तर स्वभावच मारतो. वर्तन आणि विचार स्वभाव मापण्याची किंवा तोलण्याची मापे आहेत. वर्तन आणि विचारांच्या सुसंगत व्यक्तीचा स्वभाव असतो. व्यक्ती स्वभावात सहसा बदल करत नाही. स्वभाव चांगला व आदर्श असेल तर त्यात बदल करणे गरजेचे नाही. पण स्वभावात जर काही उणिवा असतील तर स्वभाव बदलणे किंवा बदल करून घेणे, स्वतःसाठी तसेच इतरांसाठी फायद्याचे ठरते. आपण विचार करू शकतो. चांगल्या आणि वाईट गोष्टींचा न्यायनिवाडा करू शकतो. स्वभावातील किंवा वर्तनातील त्रुटी अंतर्मन स्पष्टपणे आपल्याला सांगत असते. त्याच आपण वेळीच ऐकलं पाहिजे. त्याचं तसं ऐकणं म्हणजे सुस्वभावी होणे होय. मनाची विचार करण्याची दिशा स्वभावाच्या जडण-घडणीतील महत्त्वाची बाब आहे. मनातील विचार वर्तन नियंत्रित करतात आणि त्यातूनच स्वभाव घडतो. विचार व वर्तनांची पाऊलं जर चांगल्या निरोगी दिशेने पडत असतील तर, एक आदर्श स्वभाव निर्माण झालाच म्हणून समजा. चांगला स्वभाव असणे म्हणजे तरी काय?  फुल सुंदर असतात. एक एक सुंदर फूल जोडून फुलांचा सुंदर हार तयार होतो. फुलांपेक्षा फुलांचा हार सुंदर दिसतो. तसेच एक एक वर्तन चांगुलपणाने जोडले तर चांगुलपणाचा हार स्वभावाच्या गळ्यात पडेल, की जी व्यक्ती तो परिधान करेल  ती निश्चितच चांगल्या स्वभावाची असेल. स्वभावातील स्वार्थ हा मनाचा गंज आहे. स्वभावातील अहंकार हा अज्ञानाचा नाजूक पडदा आहे. स्वभावातील अन्यायी पणा दुर्बलतेचा पुतळा आहे. अन्याय करणारी माणसं अन्याय सोसणाऱ्यापेक्षा अनेक पटींनी दुबळी असतात. तेव्हा स्वभावाशी निगडीत या काही विसंगत बाबी आहेत. त्याचा जर विसर्ग केला, तर आपण सर्वजण सृष्टीतील इतर तत्वाप्रमाणेच सुस्वभावी होऊ. त्या वेळी खऱ्या अर्थाने आपलं जगणं सुरू होईल व त्याच वेळी आपण खरं तर मरूनही जिवंत राहू शकू. 300306 ©Harish Gore

Monday, 13 July 2020

चिंतन......सद्भावनांचे.......२

                              आवाज




  आवाज...... आवाज कसा असावा? किती असावा? कोणाचा असावा? असे आवाजासंबंधी अनेक प्रश्न आपणाला रोजच्या जीवनात पडलेले असतात. असे असले तरी आवाज अनेक वेळा मुका असतो. खूप कष्टाने मिळविलेल्या यशाची महती सांगण्यासाठी आवाजाची गरज नसते. पण तो आवाज सर्वत्र घुमतो खरा. खोट्यालामात्र खुप ओरडून आपला प्रचार करावा लागतो. त्याशिवाय खोटं खपत व रुजत नाही. अनेकजण असं खोटं खपवताना दिसतात. हल्ली सोशल मीडियाचा आधार त्यासाठी मोठ्या प्रमाणावर घेतला जातोय. त्यामुळे सत्य पाहण्यापेक्षा माझ्या जवळचा कोण, पक्षातील कोण, पाहुणा कोण, मित्र कोण, हे पाहून त्याला सपोर्ट होतो. दूरदर्शन संचावर दिसणाऱ्या बहुतांश जाहिराती खोट्या असल्याचं निदर्शनास येते. ग्लोबेल्स नितीप्रमाणे वारंवार सांगितलेलं खोटं कालांतराने खरं भासतं. आपल्या तुंबड्या भरण्यासाठी सर्रास ग्लोबेल्सनीतिशास्त्र समाजात अतिप्रमाणात वापरल्याने सत्य घरीच बसून राहतेय…...विवेकाचा आवाज वाढवणं हाच यावर उपाय असू शकेल.

 शब्दांचा नेमका अर्थबोध करणार आवाज हे माध्यम आहे. निवडणुका आल्या की 'आवाज कुणाचा?' हे प्रश्नार्थक वाक्य नको म्हणायची वेळ आणते. एकंदरच विश्वाचा प्रवास आवाजापासून आवाजापर्यंत चाललेला आहे. जर आवाज नसेल तर शांतता असेल. अशी निरव शांतता असेल तर  मन शांत असेलच असं नाही. मन.........या जगामध्ये सर्वात जास्त आवाज करणार कोण असेल तर ते आपले मन. मनातील आवाजाला स्वरयंत्राची मदत लागत नाही. मनाची खूप बडबड आपल्याला ऐकून घ्यावी लागते. अनेक सल्ले आले तरी, 'ऐकावे जनाचे करावे मनाचे', अर्थात मनाचं ऐकावं असं म्हणतात. इंग्रजीतून सिक्सथ सेन्सचं काम मन करत. मन आणि अंतर्मन हया तशा एकच संकल्पना आहेत. विवेकाचा लगाम मनात असतो. खरं तर आपण सर्वजण त्याचेच गुलाम आहोत. 'मन वढाय वढाय, उभ्या पिकातल ढोर' असं बहिणाबाईंनी मनाच्या अस्थिरतेविषयी वर्णन केले आहे. त्याशिवाय मनावर अनेकांनी भाष्य केले आहे. त्यातून एक दिसते की मन चंचल आहे. मन आपल्याशी बोलत. त्याचा आवाज आपल्याला स्पष्टपणे ऐकू येतो. त्याच ऐकणें जणू आपले कामच आहे. त्याचा आवाज प्रत्येकजण स्पष्टपणे ऐकू शकतो. 

 आवाज बोलके यंत्र आहे. आवाजामुळे बोलण्याला स्पष्टता येते. प्रत्येकाचा आवाज इतरांहून वेगळा आहे. आवाज प्रत्येकाच्या अस्तित्वाचं माध्यम आहे. आवाज दाबण्याचा अर्थ अस्तित्व संपवणे असाच होतो. अशी आवाज दबलेली माणसं मुकी होतात खरी पण कायमची नाही. काहींचा मात्र कायमचा आवाज दाबला जातो. आपल्याकडे असे आवाज दाबणारे अनेक गुप्त हुकमी एक्के असतात. असे आवाज काही वेळा योग्य वेळी तर अनेकदा अयोग्य वेळी योग्य माणसांचे दाबले जातात. योग्य माणसासाठी आशा वेळी समाजातून हळहळ ऐकू येते. पण त्या हळहळळीचा आवाज मंद असतो. 

घरात बसून आपण घराबाहेरील, परिचित व्यक्ती आवाजाच्या माध्यमातुन ओळखू शकतो. आवाजातील चढ-उतार हा आणखीन एक मजेशीर विषय आहे.चढ्या आवाजात बहुदा मुद्यांवर बोललं जातं. एरवी वादातीत मुद्देही चढ्या आवाजात असतात. आवाज चढवला म्हणजे आपण बोललेलं योग्य आहे अशी समजूत अनेकजण करून घेतात, नव्हे तशी त्यांची ठाम धारणा असते. त्यामुळे मुद्याची लढाई गुद्यावर येते. पुढे अनेक अनर्थ घडतात. बोलताना आवाज महत्त्वाचा मानला जातो. तो कोणत्या पटीत ठेवायला हवा हे ज्याचे त्याने ठरवावं.

 सुंदर आवाजातील कथन हे पुन्हा पुन्हा कानात साठवून ठेवावेसे वाटते. कथानातील ओघवतेपणा अर्थात आवाज मूळ कथेला रंगत चढवतो. शब्द लिखित व आवाजाचे मूर्त रूप आहेत. 

 बाजारातील आवाज जाहीर खरेदी-विक्री दर्शवितात. जिन्नस घेऊन बसलेले व्यापारी आवाजाचा कुशलतेने वापर करून मालाचा फडशा पाडतात. तर कसलेले गिऱ्हाईक किरकोळ किमतीसाठी घासाघीस करतं. तसं पाहिलं तर पुष्कळांना घासाघिशीशिवाय केलेली खरेदी अपूर्ण वाटते. सांगितलेला दर  शांतपणे मान्य करणारी गिऱ्हाईक व्यापाऱ्याच्या दृष्टीने श्रेष्ठ ठरतं. बाजारातील कोलाहल अनेकांनी तारस्वरात काढलेल्या आवाजामुळे असतो. शांत बाजाराची संकल्पना भारतात रुजण्यास बराच कालावधी जाण्याची शक्यता आहे. काही जण बाजारात खरेदी-विक्री व्यतिरिक्त वेगळा उद्देश घेऊनही येतात. तर काही जण एक नित्याची सवय म्हणून देखील येतात. बाजार ही बाब आवाजाच्या नजरेतून टिपून ठेवण्याची बाब  आहे. बरेच बाजार हे आवाजाचे असतात. 'बोलणाऱ्याचे खडे विकतील........' ही  म्हण स्पष्टपणे बाजारातून मराठी भाषेत सामील झाली असावी. एकूणच बाजार गिऱ्हाईक व व्यापारी या दोघांनाही समाधान देऊन जातो. पण मालाच्या बाजाराआधी बराच आवाज खर्ची घालवावा लागतो. जो व्यापारी आवाजाचा कुशलतेने वापर करतो, त्याला अधिक लाभ संभवतो. तर जो कुशलतेने खरेदी करतो, त्याला योग्यपणे बाजार करता येतो. 

 मंदिर व धार्मिक स्थळांजवळील आवाज पवित्र असतात. अनेकांना फक्त परमेश्वराची भीती राहिलेले आहे. त्यामुळे असे लोक आपली देवापृथ्यार्थ नम्रता दर्शविण्यासाठी मंदिराकडे धाव घेऊ लागले आहेत. त्यामुळे हल्ली या ठिकाणची पवित्रता अशा  वृत्यांमुळे कलंकित होऊ लागली आहे. अनेकांना परमेश्वर हा एकच विसावा वाटतो. कित्येकांना चराचरात साठुन राहिलेला विधाता माझाच आहे असं वाटतं. तर वृद्धांना देवा तुझ्या शिवाय मला कोणीही नाही, ही भावना घेऊन मंदिराकडे जाणे होते. पण एकूणच या ठिकाणचे आवाज दबक्या, नम्र व भक्तिमय सुरात असतात. परमेश्वराचे गुणगान गाताना अनेक जण तल्लीन होतात. भक्तीतील अर्जव आवाजाच्या माध्यमातून व्यक्त होते. तर परमेश्वर प्राप्ती भक्तीमुळे होते. भक्तीत राखट व कणखरपणा खपत नाही. भक्ती प्रेमळ व नम्र असावी. प्रेम व नम्रता आवाजावरूनच समजतात. मनातील विचारांची खोली व तीव्रता आवाज ठरवतो. देवासाठी मारलेली आर्त हाक भक्तीची तीव्रता दर्शविते. ठराविक आवाजातील देवाची हाक ही केवळ माझे काम आहे व मी ते संपवितो आहे हेच दर्शविते. प्रेमाचा लवलेशही इथे पाहावयास मिळत नाही. देव आवाजाचा नसून भक्तीचा भुकेला आहे. आवाज भक्तीचे माध्यम आहे. आवाज म्हणजे भक्ती नव्हे. आवाजाशिवायही भक्ती करता येते. मंदिर परिसरातील आवाज भिन्न असले तरी ते सर्व परमेश्वरासाठी व्यक्त केले जाणारे किंवा त्याच्यासाठी दाखविलेल्या चांगल्या भावना होत. वैयक्तिक गाऱ्हाणी व घरगुती कलह मंदिरात जाऊन परमेश्वराला कथित करणं म्हणजे  भक्ती नव्हे. तो पूर्णपणे स्वार्थ होय. असे आवाज म्हणजे भक्तीत केलेली शुद्ध भेसळ होय. 

माऊली, संत तुकाराम, समर्थांचा आवाज कसा असेल याविषयी मनात सदैव उत्कंठा दाटून असते. मध्यंतरी  स्वामी विवेकानंद यांनी शिकागो इथं केलेल्या ऐतिहासिक भाषणाची ध्वनिफीत ऐकण्यात आली. खरं सांगतो, इतकी वर्षे त्यांच्या साहित्याचं वाचन करून साध्य झालं नाही ते त्यांच्या क्षणाच्या आवाजाने केलं. अंगावर सर्रकन काटा फुटला.जुन्या काळातील आवाज आपल्या वाट्याला न आल्याबद्दल मनाला अनेकदा खंत वाटली आहे. निश्चितच संतांच्या आवाजात माधुर्य, प्रेम आणि रसाळपणा असणार यात शंका नाही. उगीचच का चारपाचशे वर्षे लोटून गेलीत आणि तरीही ज्ञानोबा-तुकोबांच्या नावाचा गजर तेवढ्याच तीव्रतेने ऐकू येतो. आपण अनेक प्रेमळ माणसांचे आवाज ऐकतो. पण संतांचे प्रेमळ व मधुर आवाज चांगुलपणाचे आदर्श आहेत व ते ऐकवण्याची तहान संतांशिवाय दुसरं कोणीही भागवू शकत नाही. असा प्रयत्न कळत नकळत कोणी केला तर ते शुद्ध नाटक होऊ शकते. हल्ली फायद्याशिवाय गोड आवाज ऐकायला मिळतच नाहीत! जोपर्यंत स्वतःचा स्वार्थ साध्य होत नाही तोपर्यंत आवाजातील गोडी टिकते. तद्नंतर खरा आवाज बाहेर येतो. संतांचे आवाज प्रेमळ, तितकेच हुकमी असू शकतात. भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळाचे वेध घेणारे संत हे परोपकारी महात्मे होत. त्यामुळेच ते असे अधिकारपणे बोलू शकत असतील. संत जसे बोलतात, तसे वागतात. 'बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले' असे समर्थांनी ठामपणे सांगितले आहे. संतांचे आवाज फसवे कधीच होऊ शकत नाहीत. तर फसवणारे आवाज संतांचे असूच शकत नाहीत.

 काही आवाज फक्त सोसण्यासाठीच असतात व ते सोसणारे कान सोशिक कान म्हणावे लागतील. वाहनचालकास किंवा मोठ्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना अशा प्रकारचे आवाज सोसावे लागतात. अशा आवाजात शून्यता, रुक्षता व उत्पादकता असते. पण एकूणच असे आवाज सहनशील कामगारच सहन करू शकतो व ते सोसण्यातच त्याचं व त्याच्या कुटुंबाचे भले म्हणावे लागेल. स्वतःचा चरितार्थ चालवत असे उत्पादक आवाज देशासाठी फार मोठा हातभार लावतात.

 सुंदर स्वरातील गाणं आवाजाच्या दुनियेतील परमोच्च बिंदू मानावा लागेल. मानवी मूल्यातील गाणं हे एक स्वतंत्र प्रकरण आहे. किंबहुना दिवसभरातील बेसूर आवाजाचा अंत रात्रीच्या वेळी एखादं मधुर आवाजातील गाणं करत. काहींना गाणं ऐकल्याशिवाय काम होत नाही. तर अनेक विद्यार्थ्यांना गाण्याशिवाय अभ्यास शक्य होत नाही. गाणं लहानांपासून वृद्धांपर्यंत आवडीचा विषय आहे. गाण्याचा प्रकार वेगळा असेल पण गाणं आवडतच. सुर गाण्याचा आत्मा आहे. सुराशिवाय गाणं  'बेसुर' आहे. उत्तम गाता येणे यशस्वी गायकाचे लक्षण आहे. तसे आपण सर्वजण गायकच आहोत. पण आपल्या कानाशिवाय त्या गाण्याला दुसरा चांगला श्रोता मिळणे कठीण आहे.

 जीवनाला काही जण गाण्याची उपमा देतात. ज्यांना जीवन गाणं चांगलं गाता येतं, त्यांना सुरेख सुर सापडले असे म्हणता येईल. अनेक जण जीवनगाणे कुरकुरत गातात. किंबहुना कुरकुरल्याशिवाय अशा व्यक्तींचा दिवस पुढे सरकत नाही. जीवन सुरेख गाण्यात रूपांतरित करण्याची क्षमता अशा व्यक्तीजवळ कमी असते. गाण्याचा अविष्कार मानवाला कधी झाला हे सांगता येणार नाही. पण गाणे हा प्रकार जेव्हा सुरू झाला असेल, तो क्षण निवांत वेळेतील मानवाचा कलागुणांसाठी वाहिलेला क्षण असेल. त्या क्षणी त्याने नित्याची भाकरीसाठीची धडपड बाजूला ठेवली असेल व गाण्याकडे लक्ष पुरवले असेल. कदाचित त्या काळच्या मानवाच्या गरजा या फक्त शारीरिक असू असतात. पण जेव्हा केव्हां त्याने गाण गायला सुरुवात केली असेल, तेव्हा त्याच्या मानसिक गरजा असू शकतात या पातळीवरून त्याने विचार केला असावा. यातूनच गाणे हा प्रकार सुरू झाला असावा. गाण्याची गोडी आवाजावरून ठरते. तर आवाजाची गोडी गाण्यातील शब्दाने वाढते. जात्यावर गायल्या जाणाऱ्या ओव्यासाठी कित्येकांचे कान आजही असुसलेले आहेत. तर जात्यावर कोणते गीत गायले जात होते, हे ठाऊक नसणारा वर्गही आपल्या समाजात समाविष्ट आहे. काहींना पूर्वीची जुनी गाणी सुरेख वाटतात तर सध्याच्या गाण्याकडे नकारात्मक दृष्ट्या पाहणारेही आपल्याकडे आहेत. जुनी गाणी हृदयाचा ठाव घेत होती तर सध्याची गाणी ह्रदयाचा छेद घेत आहेत. अशा प्रकारच्या तिखट प्रतिक्रिया द्यायला ही मंडळी विसरत नाहीत. नव्या गाण्याकडे तुच्छतेने पाहणारे जुने डोळे नव्या गाण्याला नाकतोंड मुरडतात. अशांवर सध्यातरी आभाळच कोसळत असेल. तसं पाहिलं तर सध्याची अनेक गाणीही सुरेल आहेत. ऐ. आर. रेहमान किंवा आपल्यातीलच मराठमोळे अजय-अतुल जोडगोळी संगीतात अनेक नवे प्रयोग करताना दिसताहेत. फक्त जुन्याला कवटाळून बसलात तर असे प्रयोग आपण कधी अनुभवणार? काळाबरोबर रसिकताही बदलली पाहिजे व ती बदलताना दिसतेय. ते काहीही असो पण गाणे हा प्रकार काही बंद नाही व तो बंद पडण्याची सुतराम शक्यता नाही. 

आपल्या आवाजाच्या सामर्थ्यावर कित्येकांनी गाण्यासाठी आयुष्य खर्ची घातले. पण गाणे जिवंत ठेवले. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर या प्रकारात येतात. आयुष्यभर गाणे आणि गाता गाता गाण्यासाठी आयुष्य वेचणे या दोन्ही गोष्टी लता मंगेशकर यांनी केल्या. सुरुवातीच्या काळातील गरजेसाठीचे गाणे हेच त्यांच्या आयुष्याचे जगण्याचे कारण ठरले. आवाजात काय ताकद असते हे लता मंगेशकर यांच्याकडे पहिल्यानंतर कळते. किंबहुना त्यांच्यामुळेच आवाजाची ताकद समाजाला कळली. गाण्यासंबंधित सर्व शब्द त्यांच्याजवळ स्तब्ध होतात. अशा या चिरतरुण आवाजाला जगाने कधीच श्रेष्ठत्व बहाल केले आहे.

 कित्येकांचे आवाज रुक्ष व राकट वाटतात. असे आवाज ऐकण्यासाठी नकोसे वाटतात. अशी व्यक्तिमत्व बोलत असताना, थांबणार कधी हा प्रश्न मनात येतो. शब्द तलवारीप्रमाणे असतात. पण माझ्या मते जर शब्द तलवार असतील तर ते  व्यक्त करणारा राकट आवाज तलवारीची तीक्ष्ण धार आहे. अशा व्यक्तींचे साधे बोलणेही नकोसे वाटते. आवाजाचे सामर्थ्य अशांना कळणे दुरापास्त आहे. कित्येकांचे आवाज प्रेमळ असतात. असे प्रेमळ आवाज सर्वांनाच हवेहवेसे वाटतात. आवाज ही परमेश्वराने दिलेली देणगी आहे. मानवजात दिलेल्या आवाजात बदल करू शकत नाही. प्रेमळ आवाजात बोलणे हे स्वतःसाठी, तसेच इतरांसाठी अर्थातच हितकारक ठरते.

 रेडिओ हे आवाजाच्या दुनियेतील बोलके यंत्र आहे. रेडिओचे सामर्थ्य आवाजात आहे. सुरुवातीच्या कालखंडात अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या रेडिओने आजही त्याची ख्याती टिकवून ठेवली आहे. विविध केंद्रावरून ऐकू येणारे आवाज, श्रोतेवर्गात कमालीचे लोकप्रिय आहेत. कित्येक मैलाच्या अंतरावरून जवळीक साधण्याची कला अनेक निवेदकांकडे आहे. प्रेमळ पण शिस्तबद्ध आवाजाचे दुसरे नाव म्हणजे रेडिओ होय. अमिन सायानींसारख्या व्यक्तिमत्त्वाने अनेक पराक्रम केवळ निवेदकाच्या माध्यमातून स्वतःच्या नावावर नोंदवले आहेत. खऱ्या अर्थाने तोच कालखंड रेडिओसाठी पोषक ठरला. अनेकजण केवळ अमिन सायानींचा गोड आवाज ऐकण्यासाठी कानात जीव एकवठून रेडिओजवळ बसत असत. ही केवळ आवाजाची प्रेमळ जादू होती. त्या आवाजाचा आनंद अनेक वर्षे श्रोत्यांनी घेतला. आजही त्यांच्यासारखे अनेक निवेदक श्रोतेवर्गात लोकप्रिय आहेत. खुबीने निवेदन करून श्रोत्यांना खिळवून ठेवणे ही एक कला आहे. केवळ गोड आवाज नव्हे तर गरजेनुसार विविध माहित्या, मनोरंजन करून ज्ञानात भर टाकणे हे रेडिओचे मुख्य सूत्र आहे. या सर्व गोष्टी श्रोत्यांपर्यंत जितक्या यशस्वीपणे जो निवेदक पोहोचवेल तो निश्चितच लोकप्रिय होतो. एकूणच रेडिओ आणि आवाज यांचे एक अतूट नातं आहे. ते नाते कधीही संपणे शक्य नाही. आवाज रेडिओच भांडवल आहे. त्यावर त्याच्या यशस्वितेची वाटचाल अनेक वर्षांपासून अखंडीतपणे सुरू आहे व पुढेही सुरू राहील. यात शंका नाही.

 आवाज वेगवेगळ्या वस्तूंचे तसेच व्यक्तींचे असतात. समाजातील विविध थरातील व्यक्तिंचे आवाज आपण ऐकत असतो. बऱ्याच वेळेला असे आवाज ऐकणे आपल्याला भाग पडते. या सर्व आवाजांमध्ये लहान बाळाचा आवाज अत्यंत आल्हाददायक वाटतो. बाळाच्या आवाजात कोमलता व निरागसता असते. त्याच्या आवाजाच्या मागे कोणताही छळवाद किंवा कपट, स्वार्थ मुळीच नसतो. बाळ हवेहवेसे तर त्याचा आवाज लोभस भासतो. घरात बाळ असणे म्हणजे जवळ पैसे असण्यापेक्षा कितीतरी पटीने समाधानी वृत्तीने असण्यासारखे आहे. आई बाळासाठी नेहमीच वेडी असते. प्रत्येक आईला आपल्या बाळाचं कौतुक असतं. त्याचे बोबडे बोल ऐकण्यासाठी तिचे कान असुसलेले असतात. दिवसभराच्या कामाचा थकवा अनेकांच्या घरात लहान बाळ घालवतात. परमेश्वराचे दुसरे रूप म्हणजे लहान बाळ होय. त्याला घडवण व वाढवण्यासाठी आई-वडील आपलं आयुष्य खर्ची घालतात. बहुतेक आई-वडील याच पद्धतीने आपल्या आयुष्याची आखणी करतात. पण तरीही समाजात हिंसाचार व क्रूरता  का  वाढत असावी? हा प्रश्न  विचार करण्यासाठी उरतो. बाळाच्या आयुष्याला वळण देताना आई-वडिल कुठेतरी निश्चित चुकत असावीत किंवा संस्कार पुर्णपणे अंगिकारले जात नसावेत. कारण ज्याच्या वाट्याला प्रेम येते, तो निश्चित प्रेम देतो. मग कुठे आहे ते प्रेम, जे आई-वडीलांनी त्याला दिले?  लहान बाळं सर्वार्थाने वेगळी असतात. त्यांच्या हालचाली, त्यांचे वागणे, त्यांचा हट्ट, लडिवाळ आवाज जणू आपल्या कल्पनेचा विस्तार असावा असा असतो. बाळामध्ये स्वतःचं बालपण शोधण्याची रम्य कल्पनाही काहीजण करतात. तर आपण लहान नाही याचा अनेकांना पश्चाताप होतो. तसं पाहिलं तर आपण कोणत्याही क्षणी लहान होऊ शकतो. पण क्रोध, अभिमान, अहंकार, द्वेष व मान आपल्याला इतके चिकटुन बसलेले असतात की आपण त्या पातळीवर विचार करणे शक्य होत नाही. हा आपल्या विचारांचा तोकडेपणा व बुद्धीच दारिद्र्य आहे. मुक्तपणे विचार करायला लहान बाळाकडूनच आपल्याला शिकाव लागेल. बाळाची समाधी लहान-सहान खेळात लागते. भान हरपून ती खेळत असतात. त्यांच्या मनाइतकी श्रीमंती व समृद्धी दुसरी कुठच पहावयास मिळत नाही. म्हणूनच ती निरागस असतात व ती आपणा सर्वांनाच हवीहवीशी वाटतात.

 आवाजाआवाजामध्ये भिन्नता असते. येणारा प्रत्येक आवाज भिन्न असतो. दिवसा होणारे बहुतेक आवाज कामासाठी किंवा मानवाने पोटासाठी केलेल्या धडपडीतून निर्माण होतात. रात्रीचे आवाज काळजाचा ठाव घेतात. उजेडात पुण्य तर अंधारात पाप होते असे म्हणतात. रात्री वाटणारी भीती पिढ्यानपिढ्या आपल्यापर्यंत चालत आलेली असते. रात्री होणारे बहुतांश आवाज भीतीदायक भासतात. रातकिड्यांचे ओरडणे असो किंवा कुत्र्याचे भुंकणे, कानाला असह्य वाटते. अनेक रात्रीच्या गर्भात कुटील डाव रचले जातात. बहुतांश क्रूरकर्म रात्रीच घडतात. पण तरीही रात्र होणे सर्वांसाठी हितावह असते. रात्री आवाजाची वारंवारिता कमी असते. रात्री आवाज नसणे हे सुद्धा कधीकधी डरावणे वाटते. सभोवतालच्या आवाजाची आपल्याला सवय झालेली असते. त्यामुळे रात्रीची नीरव शांतता कधीकधी जीवघेणी भासते. वृद्ध दिवस वर येण्याची आतुरतेने वाट बघत असतात. तर प्रेमीयुगल रात्र संपूच नये असे म्हणतात. रात्र त्यांच्यासाठी काही क्षणांसमान जाणवते. कष्टकरी वर्ग रात्री गाढ झोपतो. खरंतर प्रत्येक रात्र तिच्यासोबत येताना एक नवा साज घेऊन येते. शृंगाराने नटलेली रात्र कोण कशी साजरी  करतो यावर रात्रीच्या सफलतेची गोष्ट अवलंबून असते. रात्र प्रत्येकासाठी जरी वेगळी असली, तरी रात्र ही  रात्रच आहे व तिची भ्रमंती रोजचीच आहे. ती आपल्या वाटण्यावर किंवा असण्यावर बऱ्याच वेळा अवलंबून नसते. अनेकांच्या अनेक रात्री मित्र परिवारासोबत किंवा प्रियजनांसोबत गप्पांच्या मैफिलीत खोल डुंबून  जातात. त्यावेळी खरतर सकाळ होऊच नये असं वाटतं. इतक्या वेळ गप्पा मारल्यानंतरही त्या बोलण्याला पूर्णत्व येत नाही. बरंच काही बोलायचं किंवा ऐकायचं राहून गेल्याची हुरहूर मनात राहते. प्रेमळ शब्द असतात ते हेच जे देऊनही शिल्लक राहतात व ऐकूनही ऐकण्याचे बाकी राहीलेले असतात. उद्याच्या भविष्याचा वेध आजच्या रात्रीत असतो. रात्र तिच्यासोबत शांतता घेऊन येते. तर शांतता नसलेल्या रात्रीत दिवसापेक्षा फारसा फरक नसतो. पण तरीही दिवस वेगळा व रात्र वेगळी असते. दिवसभराच्या वणवणीतून माणूस रात्री निवांत होतो. दिवसा तोंड बोलते तर रात्री मन बोलते. चिंतन ही मुकी बडबड आहे. जे तोंडाने बोलणे होत नाही ते मन सहज बोलते. मनाचं बोलणं आपल्याला स्पष्टपणे ऐकू येते. चिंतनाची सवय मनासाठी हितावह ठरते.

 अनेक आवाज आपणाला परिचयाचे असतात. मानव उत्क्रांतीच्या प्रवासात माणूस शक्य तितका वेळ चार भिंतीच्या आत स्वतःला डांबून ठेवत आहे. त्यामुळे सहाजिकच निसर्गाची सोबत त्याच्यासाठी दुर्मीळ होतेय. आपण निसर्गापासून फार दूर होतो आहोत असा भास त्याला होतो. निसर्गाच्या अनेक नियमांचे उल्लंघन दिवसागणिक आपण करतो. निसर्गचक्राचे दुष्परिणाम त्यामुळे आपणाला सहन करावे लागतात. निसर्ग जितक्या सहजतेने देतो, तितक्याच क्रूरपणे अनेक गोष्टी आपल्यापासून हिरावून नेऊ शकतो. त्याने असे रुद्र रूप अनेकवेळा धारण केल्याचे आपण पाहतो. त्यामुळे निसर्ग मानवाचे काही अंशी आक्रमण सहन करेलही परंतु तो जेव्हा माघारी उलटेल तेव्हा ते आपल्याला सहन होणार नाही. आपण स्वतःही निसर्ग आहोत. तेव्हा आपलं वागणं, बोलणं आणि एकूणच आचार, विचार व उच्चार नैसर्गिक हवेत. ते निसर्गावर अतिक्रमण करणारे, कृत्रिम नसावेत,अर्थात नैसर्गिक असावेत. 

 निसर्गात कधी काळी भ्रमंती झाली तर तिथले भावविश्व चाकोरीबद्ध जीवनापेक्षा सर्वस्वी वेगळे वाटते. निसर्गाचे निरीक्षण व तिथल्या आवाजाचा कानोसा आपल्यासाठी अविस्मरणीय पर्वणी ठरते. पक्षांची किलबिल आणि पानांची सळसळ वनात गेल्याशिवाय गवसणें शक्य नाही. खरं तर असे आवाज आपल्याला काहीच देत नाहीत. ते उगीचच ऐकायचे असतात व कानात साठवायचे असतात. पहाटेच्या अंधुक प्रकाशात पक्षी जागे होऊन गप्पांच्या मैफली भरवतात. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कोणत्या विषयावर ही बडबडी लेकरं बोलताहेत असं वाटतं. निरागसता अंगावर घेऊन ती रोजच हा कार्यक्रम मांडतात. कोणी पहा किंवा पाहू नका, कोणी लाईक करा, करू नका, कोणी कमेंट करा, करू नका, ती रोजच बडबडतात. पानें वाऱ्याच्या प्रत्येक हिंदोळ्यावर मागे सळसळाट सांडतात. तर खट्याळ वारा त्यांना रात्रंदिवस झोके देतो. त्यातून निर्माण होणारा नाद कानात साठवून ठेवण्यासाठीच असतो.

 अनेकविध  छोटे-मोठे जीव रानावनात आपले आयुष्य निसर्गाच्या वाटेवर व्यतित करतात. त्यांचे आवाज आपल्यासाठी वेगळे असतात. निसर्ग बोलतो हे कावळ्याच्या कावकाव व चिमणीच्या चिवचिवेपलीकडे गेल्यानंतरच कळते. झाडं बडबडतात, वेली खळखळून हसतात, वारा कर्णमधुर शीळ घालतो, झऱ्याचा मंजुळ आवाज अंतर्मनात नादब्रह्म निर्माण करतो, डोंगर गंभीर होऊन आपल्याकडे पाहतो आणि पर्वताचा प्रत्येक सुळका माझ्याएवढा हो अशी आर्जव आपल्याला करत नाहीत का? निश्चल दगडांना शब्दांचे घस असतात. हे दगडाशी व निसर्गाशी केलेल्या प्रितीतूनच समजते. असा विचार वेडेपणाचा वाटला तरी आपल्या फायद्याचा आहे. अखिल भूतलासाठीच हे पसायदानाच आहे.

आपण निसर्गाच्या कुशीत जाऊन त्याच्या ऊबीचा अनुभव घेतला पाहिजे. त्याच थोडं का होईना, आपण ऐकून घेतले पाहिजे. खरं तर कोणाचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत आपण नसतो. आपलच ऐकवण्याचा हट्ट आपण धरतो. जीवन जगण्याचा हा चुकीचा मार्ग आहे. काही ठिकाणी फक्त ऐकून घेण्यासाठी जायचं असतं. त्यात निसर्ग वरच्या स्थानावर आहे. तो आपल्याला खुणावतो पण आपण जागचे हललो तर शप्पथ.....! तो बोलावतो पण आपण गेलो तर नवल...! आणि त्यातून चुकून गेलो तर आपल्या विकृत्या आपण निसर्गाच्या गालावर कायमस्वरूपी कोरून येतो. निसर्गात शिकण्यासाठी जायचं असतं. तिथ गेल्यानंतर तो शिकवतोच पण त्याची भाषा मुकी असते जी आपल्या आकलनशक्तीबाहेरील असते. त्याच्याशी जवळीक साधली तर तिथली प्रत्येक बडबड आपल्या कानावर आल्याशिवाय राहणार नाही. 

 आवाजातील कडवटपणा, माधुर्य किंवा प्रेमळपणा अचूकपणे टिपतात ते कान. कान आवाज ऐकण्याचे माध्यम आहेत. काही शब्द ऐकून साठवण्यासाठी असतात तर काही ऐकून विसर्जन करण्यासाठी असतात. प्रियजनांचे बोल कान साठवतो तर नको असलेले किंवा दृष्टांचे आवाज कान  सहज विसरून जातो. कान आवाजाचा सदैव भुकेलेला असतो. काहीच आवाज त्याची  भूक भागवतात. अशा आवाजासाठी कान सदैव आतुर असतात. प्रत्येकाच्या कानाची भूक व  भूकेची चव वेगळी असली तरी प्रत्येक कानाला ही भूक असते खरी. तोंड फक्त बोलते. कान फक्त ऐकतो. डोळे मात्र बोलतात व ऐकतातही. डोळ्यांनी पाहण्याव्यतीरिक्त करायची ही दोन अतिरिक्त कामे आहेत. डोळे बोलतात तेव्हा बहुधा तो प्रणयक्षण असतो. डोळ्याकडून बोलण्याची व ऐकण्याची क्रिया याच क्षणी जास्त होते. डोळे  याव्यतिरिक्तही बऱ्याच वेळा बोलतात. अनेक डोळ्यातून दुःख, दारिद्र्य ओसंडून वाहते. अनेकांच्या डोळ्यातून लाचारी प्रत्येक उघडझापेतुन डोकावते. अन्यायग्रस्त डोळे दया व प्रेम मागतात. तर असाह्य रोग्यांची डोळे करूणा ओततात. डोळे असंच काही बोलतात...... ते बोलतात खरं.... पण अशा बोलक्या डोळ्यांचे, डोळ्यातील शब्दांचे आवाज टिपण्यासाठी कानसेन डोळेच हवेत. समदृष्टी असणारे डोळेच असे डोळ्यांचे आवाज अचूक टिपू शकतात. काहींचे डोळे आग ओकतात. डोळ्याचा व आगीचा काडीचाही संबंध नाही. पण अशी आग डोळ्यात दिसते खरी. असे आग ओकणारे डोळे पाहणे आपल्याला शक्य होत नाही. अशा डोळ्यातील भावना सर्वस्वी मानवतेची पायमल्ली करणाऱ्या, हेकाड व एककल्ली ठरतात.

 डोळ्याव्यतिरिक्त आपल्या शरीराच्या इतर अनेक अवयवातून आवाज दिला जातो. शरीराची भाषा मानवी भाषेबरोबर विकसित झाली असावी. तिला अजून तरी पूर्णत्व नाही. पण शारीरिक भाषेला अस्तित्व मात्र नक्कीच आहे. जर आपले अवयव बोलते होत असतील तर सृष्टीतल्या प्रत्येक कणाजवळ भरपूर शब्दसंपत्ती असलीच पाहिजे. अचल वस्तु स्थिरतेचा संदेश देतात. तर मुके प्राणी-पक्षी, वनस्पती प्रेम, दया व करूणा शिकवितात. त्यांच्याकडून शिकण्यासाठी सद्भावना पाहिजे. चांगल्या भावनाच अव्यक्त आवाज ऐकू शकतात. त्यासाठी मन शुद्ध व भावना तरल असाव्यात एवढीच अट आहे.


 असा हा आवाज हवाहवासा तसेच नको नकोनकोसा वाटतो. आवाज हवाहवासा व आवाज नकोनकोसा वाटणे या केवळ मनाच्या स्थितीवर अवलंबून असते. आत्यंतिक कोलाहालात आणि नीरव शांततेतही जो कार्यमग्न असतो त्याला मनाची स्थिरता लाभलेली असते. स्वामी विवेकानंदांच्या मते तोच एक स्थिर मनाचा होय. मनाच्या स्थिरतेचा भंग आवाज करतो. आवाजामुळे एकाग्रतेचा भंग होतो. पण जर मन स्थिर असेल तर कितीही कर्कश आवाज मनाची स्थिरता मोडू शकत नाही. शेवटी आवाज कितीही करता येत असेल किंवा काढता येत असेल तरी हळू व नम्र आवाजात बोलणे सभ्येतेचे अंग आहे. सर्वांनी याचं पालन केले तर एक प्रेमळ समाजाची निर्मिती होऊन जाईल. 200306 ©Harish Gore

Monday, 6 July 2020

चिंतन.... सद्भावनांचे......१

                                                 संवेदनशीलता


 

संवेदनशीलता दोन प्रकारची असू शकते. शारीरिक संवेदनशीलता आणि मानसिक संवेदनशीलता. शारीरिक संवेदनशीलता वरवरची व अल्प कालावधीत काळाच्या पडद्याआड जाणारी व भूतकाळाच्या गर्द अंधारात दिसेनाशी होणारी आहे. तर मानसिक संवेदनशीलता ही प्रत्येकावर खोल परिणाम ठेवून जाणारी असते. एकूणच संवेदनशीलता मानवजातीची अनमोल भावना म्हणावी लागेल. जिथं जिथं भावनांचा प्रश्न येईल, तिथं तिथं संवेदनशीलता आवर्जून उपस्थित असते. प्रेम, दया, वात्सल्य, प्रीती, ही संवेदनशीलतेची लेकरं होत. तर क्रोध, लोभ, हिंसा हे तिचे शत्रू होत.

 

 

 संवेदनशील असणं हे उच्च व उदात्त व्यक्तिमत्वाच अविभाज्य अंग आहे. ज्यांच्या भावना मेल्या आहेत त्यांना संवेदनशील होणं अवघड आहे. किंबहुना संवेदनशीलता अंगी नसणे म्हणजे अशा व्यक्ती स्वार्थी, लोभट, असंस्कृत आणि पूर्णपणे  व्यावसायिक मानाव्या लागतील. बालवयात स्वामी विवेकानंदानी कलकत्त्याच्या रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या टांग्याखाली सापडणाऱ्या लहान बाळाला, आपला जीव धोक्यात घालून वाचवलं. टांगेवला व नरेन या दोघांनाही मने होतीच. पण नरेन अधिक संवेदनशील जाणवतो. मानवतेची महान भूमिका नरेनने कोवळ्या वयात पार पडली. टांगा अंगावर घालणारा व जीव धोक्यात घालून मुलाचे प्राण  वाचवणारा या दोघांनाही मने होतीच. पण टांगेवला संवेदनहीन तर नरेन संवेदनशील होता. परस्पर विरोधी मनाचा तो क्षण होता. बालवयात  मन जास्त संवेदनशील असतं असं म्हणतात. हळूहळू ही संवेदनशीलता  कमी होते व माणूस या दुनियेच्या दुष्टचक्रात अडकून क्रूर बनतो.  पण जे जाणीवपूर्वक  संवेदनांची जोपासना करतात ते खरोखरीच एक महान मूर्ती समान  महात्मे मानावे लागतील.

 

 क्रूरकर्मा कोणाला म्हणावे ? जो  अत्याचार,अन्याय, खून, दरोडे घालतो त्याला. पण माझ्या मते तर तोही क्रूरकर्मा म्हणावा लागेल जो नाजुक फ़ुलांना आपल्या पायदळी तुडवतो.  अर्थात खून करताना व फुले रेंदताना त्याची संवेदनशीलता ही एकाच प्रकारची असू शकते.  फुलांइतकं नाजुक दुनियेत दुसरे कोणीही नाही. फुले अनेक रंग घेऊन येतात. सुगंधाची मुक्तहस्ते उधळण करणारा फुलांइतक उदार दुसर कुणीही नाही.  जी माणसे सदैव हसरी दिसतात, ती काहीशी फुलासारखी असतात.  निर्व्याज हसणं आणि रंगीबेरंगी  छटांची उधळण निसर्गात करणारी फुल फक्त प्रेम करतात.  प्रेम निसर्गावर, प्रेम वाऱ्यावर, प्रेम भिरभिरणाऱ्या भ्रमरावर आणि प्रेम निर्दयीपणे पादाक्रांत करणाऱ्या पायावर.....! प्रेम कशावर करावं हे जर शिकायचं असेल तर फ़ुलाजवळ जावं लागेल  आणि प्रेमाची व्याख्या पाकळ्यांवर वाचावी लागेल.  रंगांची उधळण मोजावी  लागेल तर सुगंधाची चव घ्यावी लागेल.  निर्व्याजपणे प्रेम आणि फक्त प्रेम, फुलेच  करू शकतात.  फुलांचे प्रेम  कळण्यासाठी बलिदान द्यावे लागत.  खरंतर फुले फार सोसतात. या छळातही टवटवीत हास्य कधीच सोडत नाहीत. हळव मन, हसरी माणसं व फुल ही भाऊक असतात.  म्हणूनच ती जास्त संवेदनशील असतात.

 

 

 कवि हे लेखकापेक्षा जास्त संवेदनशील मनाचे असू शकतात.  वाल्मिकी, व्यासांची भक्तीमय संवेदनशीलता होती.  कुसुमाग्रजांसारखी  प्रेममय संवेदनशीलता, नारायण सुर्वेंसारखी करूणामयी  संवेदनशीलता  तर रामदास फुटाणेंसारखी वात्रट संवेदनशीलता म्हणावी  लागेल. या सर्वात भक्तिमय संवेदनशीलता मला  जास्त श्रेष्ठ वाटते.  भक्ती ही गुरुविषयी, परमेश्वराविषयी  किंवा आराध्यदैवताविषयी असू शकते.  बाल राम कसे होतेबाल रामांचे वाल्मिकीने केलेले वर्णन संवेदनशील मनाची खोली किती असू शकते हे दाखवते. चिंतनशील मन हे संवेदनशील असू शकते. भांडी रोज घासून जशी लख्ख निघतात तसं मन चिंतनाने स्वच्छ होतं.  मनाच्या अनेकविध  पैलूपैकी संवेदनशीलता हा एक पैलू आहे.  जर कोणाला परमेश्वर हवा असेल, तर प्रथम त्याने संवेदनशील बनले पाहिजे.  परमेश्वर प्राप्तीच्या वाटेवर त्याची नितांत आवश्यकता आहे.  अस्तित्व व भावना यांच्या मध्यावर संवेदनशीलता आहे.  तर संवेदनशीलतेच्या जाणिवेत परमात्मा आहे.  परमात्मा कसा? 'अणू रेणूही तोकडा  तुका आकाशाएवढा'.  किती सूक्ष्म व किती व्यापक स्वरूपात परमेश्वराचे अस्तित्व तुकाराम महाराजांनी व्यक्त केले आहे.  हे अस्तित्व जाणून घेण्याच्या भावना संवेदनशीलतेच्या लहरी मानाव्या लागतील. 

 

 

 स्त्रिया खूप हळव्या असतात. पण  हळव्या स्त्रिया संवेदनशील असतीलच असं नाही.  'आपला तो बाबु  आणि......' या म्हणीला स्त्रियांमुळे  बळकटी आली आहे.  पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त संवेदनशील असतात हे मात्र मान्य करावे लागेल.  विषन्न  मन घेऊन झोपडीत बंद करून घेणाऱ्या माऊलींना उपदेश करणारी मुक्ता संवेदनशीलतेचे मूर्तिमंत उदाहरण आहे. संपूर्ण आयुष्य  कन्हैयासाठी अर्पण करणारी मिरा ही एक संवेदनशील नारी होती हे विसरून चालणार नाही. बऱ्याच स्त्रिया नको तिथं संवेदनशीलता दाखवताना दिसतात. भावना आहे म्हणून संवेदनशीलता दाखवणे व संवेदनशीलता आहे म्हणून भावना व्यक्त करणे या दोन परस्परविरोधी गोष्टी आहेत. मातृत्व ही प्रत्येक स्त्रीसाठी मोठी आनंदी  पर्वणी. संवेदनशीलता 'पासून शिकायची  असेल तर आई व्हा. लहान बाळ, पहिला दिवस, पहिला क्षण, पहिला श्वास, पहिली संवेदनशीलता. या कोवळ्या जिवाच्या गरजा आईला संवेदनशीलतेतूनच समजतात.  माता निर्दयी कधीच असू शकत नाही. कारण संवेदनशीलतेचे खोलवर परिणाम तिच्यावर याच काळात होतात. म्हणून प्रत्येक आई  संवेदनशील असते. पर्यायाने स्त्रियातील संवेदनशीलता पुरुषांपेक्षा त्या मानाने जास्त होते. पण कालांतराने या संवेदनशीलतेवर धूळ बसून ती स्वार्थात कधी रूपांतरित होते हे स्त्री जातीच्या लक्षात देखील येत नाही.  एकूणच संवेदनशीलतेच्या व्याप्तीवर काही मर्यादा येऊ शकतात.

 

 

 माझ्या मते जे लोक हट्टी असतात त्यांच्याकडे संवेदनशीलता असते. पण आपल्या हट्टापायी ते  ती कधी वेशीला टांगतील याचा नियम नाही. अशी अनियमित संवेदनशीलता हट्टी  लोकांजवळ असते. याचं मुख्य कारण स्वार्थ आणि वैयक्तिक आकस. प्रभू राम वनवासाला जाण्यामागचं कारण या प्रकारात मोडू शकते. धरसोड करणारी संवेदनशीलता इतरांच्या दुःखाचे कारण होते. संवेदनशीलतेला स्वार्थाचा स्पर्श झाला कि दुःख निर्माण होते.  त्यापुढील सर्व घटना करुणामयी  असू शकतात. म्हणून स्वार्थ संवेदनशीलतेला लागलेला कलंक आहे. स्वार्थ वैयक्तिक व सामाजिक असू शकतो. जपानवर  अणूबॉम्ब टाकताना अमेरिकेचा सामाजिक स्वार्थ होता. जपानमधून बेचिराख झालेली संवेदनशीलता अमेरिका कधीच अनुभवू शकत नाही. तर अणूबॉम्ब टाकण्यामागील राग जपान कधीच विसरू शकत नाही. घडीचा राग अनंतकालावधीच्या  संवेदनशीलतेवर खोल परिणाम करतो. संवेदनशीलता जोपासायची असेल तर घडीच्या स्वार्थावर पाणी सोडणे योग्य. नाही तर अंतःकरणपूर्वक जोपासलेल्या संवेदनशीलतेला  वाळवी लागण्याची शक्यता असते. प्रयत्नपूर्वक जोपासलेली संवेदना ही स्वार्थाच्या किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर असते.

 

 

 घटना घडून गेल्यानंतर त्यावर विचार केला तर संवेदनशीलता आपल्याला तपासून पाहता येते. तिच्या व्याप्तीची चाचपणी आपणास करता येते. बऱ्याच वेळी सरकारी अधिकारी हे संवेदनाहीन असू शकतात. जे सदैव हुकुम सोडण्याच्या  प्रयत्नात  असतात, त्यांना संवेदनशीलता बहुदा जोपासता  येत नाही. स्वतःच्या कोशात हे लोक इतके गुंतून गेलेले  असतात की त्यातून सारासार विचार करणे मागे पडून जाते व त्यातून हुकूमशाही वृत्तीचा आपल्या लोकशाहीत  दर्शन होत. अशा लोकांना आपण चुकतोय हे स्पष्टपणे जाणवते परंतु आपण काहीही करू शकत नाही अशी समजूत ते करून घेतात. अर्थात अशी व्यक्तिमत्व संवेदनशीलता जोपासावी म्हटली तरी त्यांना ते शक्य होत नाही. अशा  लोकांमध्ये प्रासंगिक संवेदनशीलतेचे दर्शन कधी कधी दिसू शकते. पण प्रासंगिक संवेदनशीलता उथळ मनाचे द्योतक आहे व अशी संवेदनशीलता क्षणात क्रोधात रूपांतरित होते. व्यक्ती केलेली संवेदनशीलता ही निव्वळ कुचेष्टा ठरू शकते. संवेदनशीलता ही भावना आहे. तर अधिकाराची  नशा ही वृत्ती आहे. पदावर नसताना संवेदनशीलता जोपासता येईल पण पदावर असताना  संवेदनशीलता जोपासता येईलच असे सांगता येत नाही. बऱ्याचं  वेळा ती जोपासण्याचा  प्रयत्न केला तर ती वरवर वाटणारी व कृत्रिमही असू शकते.  कृत्रिमता  व वरवरपणाचा संवेदनशीलतेशी दुरान्वयेही संबंध नाही. व्यक्त केलेल्या कृत्रिम भावना या फक्त चित्रपटात शोभून दिसतात व जीवन म्हणजे तीन तासाचा खेळ नव्हे आणि संवेदनशीलता म्हणजे कृत्रिम भावना किंवा भावनांशी मांडलेला मेळ नव्हे. संवेदनशीलता जोपासताना, त्यामुळे, असा व्यवहार बाजूला ठेवून थेट हृदयाशी संवाद साधता आला तर अशी व्यक्तिमत्व, माझ्या मते, अधिक खुलून दिसतील.

 

 

 खरंतर  स्वतःवर दुःख  यावं, सदैव दुःखाची साथ आपल्याला असावी  असं कोणालाच वाटत नाही, ते वाटणारही नाही. कारण प्रत्येकाचा प्रवास सुखाच्या दिशेने वेगाने सुरू आहे. कुणाच्या वाट्याला किती सुख मिळालं  हे निश्चित  माहीत नसले तरी हे मात्र ठाम सांगता येईल की, सुख शोधता शोधता माणूस दुःखात होरपळून जातो. सुख शोधणे ही एक बाजू, तर दुःख ही जीवनरूपी नाण्याची दुसरी बाजू आहे. सुख हवे असेल तर दुःख न सांगता येणारच. सुखदुःखांची एकमेकात सुरेख गुंफण आहे. अनेकांना सुखात दुःखाचे दर्शन होते. पण बहुतेकांना दुःखात सुख शोधण्याची दृष्टी नसतेच. सुखापेक्षा दुःखात भावना जास्त चांगल्या प्रकट होतात. सुखात भावना उत्तेजित होतात. पण दुःखात त्या बहरतात. स्वतःवर कोसळलेल्या दुःखामुळे इतरांच्या भावना आपण समजू शकतो. ज्यांच्यावर सदैव दुःखाचे सावट असतं, ते माझ्या मते सर्वात जास्त संवेदनशील असतात. खऱ्या अर्थाने संवेदनशीलतेचे माहेरघर अशा व्यक्तींच्या हृदयात असते.  किंबहुना संवेदनशीलतेची जोपासना व सांभाळ अशी माणसं सदैव करत असतात. दुःखाचा कडवटपणा पचवून, संवेदनशीलता जोपासन हे उदात्त मनाच एक अंग आहे. खऱ्याअर्थाने येथेच संवेदनशीलता खुलून दिसते.

 

 

करुणेचा व संवेदनशीलतेचा जवळचा संबंध आहे. करुणा व संवेदनशीलता जवळजवळच असतात. जिथ कारुण्य आहे तिथे संवेदना, उशिरा का होईना येतेच.  कुष्ठरोगाने हातपाय नेले पण म्हणून कुष्ठरोग मन दुबळं करू शकत नाही. कारण बाबा आमटे ही एक संवेदनशीलता या करुणेला हात देते व मनाला बळ देते. बाबा आमटे.....अनेक करुणामयी ह्रदयांना आसरा देणारे महापुरुष. तरुणपणात काय नव्हतं या वेड्यापाशी? उच्चशिक्षण, आदर्श व्यवसायिक पात्रता, मनात आणलं असतं तर पैशाचा पाऊस पडता आला असता. पण नाही. करुणा पाहिली आणि संवेदनशीलता धावून गेली. बाबा आमटेरुपी संवेदनशीलतेने करुणेला कवठाळे, अलगद घट्ट मिठी मारली आणि सुरू झाला मानवतेचा प्रवास...... अनंत काळासाठी सुरू झालेल्या या प्रवासाची जगातील कानाकोपऱ्यांनं दखल घेतली. ही सेवामय संवेदनशीलता चकित करून सोडते. कोण ही व्यक्ती? ती काय व कसे आपले कार्य करीत असेल? अशी भावना मनात सहज उमटून जाते. आयुष्यभरासाठी व्यक्त केलेली संवेदनशीलता  मानवतेची मशाल म्हणावी लागेल. कारण अनेक करुणामयी तुटलेल्या भावनांना तिनं जगण्याचं बळ व कारण दिलेले असते. अशी अनेक करुणामयी अंतःकरणे या सेवाभावी संवेदनशीलतेच्या सावलीखालीच आधार घेत असतात व ही संवेदनशीलता मोठ्या प्रेमाने, मायेने या करुणेला धीर देते.

 

 

 या जगामध्ये जी माणसं संवेदनशील नाहीत, ती प्रयत्नपूर्वक तशी कदाचित बनू शकतील. मात्र व्यापारी कधीच संवेदनशील बनू शकणार नाहीत. हे ठामपणे सांगण्याची आवश्यकता नसावी. व्यापार हा वस्तूंचा होऊ शकतो. त्याचा मोबदला ज्याला त्याला मिळेल. वस्तूचा भाव ठरेल. पण भावाची भावना व्यापारात कधीच परावर्तित होऊ शकणार नाही. भावनांची खरेदी-विक्री अजून तरी कोणत्या व्यापाऱ्याने सुरु केली नाही. भावनांचा व्यापार म्हणजे मानवतेची केलेली क्रूर चेष्टा होय. संवेदनशीलता नफा व तोट्याच्या ताळेबंदपत्रकावर आधारित व्यक्त केली जाणारी जिन्नस नाही. व्यापारी धनाचा चोख विनियोग करणारा संवेदनरहित व्यवसायिक होय. सर्वच व्यापारी हे संवेदनशून्य असतीलच असं नाही. त्यांनी संवेदनशील असावं असं कुठं नाही. किंबहुना संवेदनशीलतेने केलेला व्यापार दिवाळखोरीचा राजमार्ग आहे. तुकाराम महाराजांनंतर असा राजमार्ग आनंदाने धारण करणारा आनंदमयी आनंदयात्री व्यापारी ऐकवीत नाही. भावनांचा दर ठरवणारे दरपत्रक  आपणाला अजून तयार करता आले नाही. तर भावनांसाठी किती मोल ठरवाव, अस सांगणारा एकही व्यापारी नाही. व्यापारी तत्त्वावर भावना व्यक्त होऊ शकत नाहीत. त्या या तत्त्वावर व्यक्त झाल्या तर ती संवेदनशीलता नव्हे, तर शुद्ध व्यापार  होय. संवेदनशीलता दिली व घेतली जाते. पण तरीही इथे कुठे व्यापारी तत्व निदर्शनास येत नाही. संवेदनशीलतेचा व्यवहार होतोय. पण व्यापार नाही. संवेदनशीलता जणू पाण्यात वाढणाऱ्या कमळाप्रमाणे मानावी लागेल. कारण पाण्यात राहूनही पाण्यापासून अलिप्त राहणं किती अवघड आहे, हे कमळापेक्षा दुसरं कुणीच सांगू शकणार नाही. व्यापारात संवेदनशीलता जोपासता येईल. पण संवेदनशीलतेत व्यापार कधीही जोपासता येणार नाही. अशी संवेदनशीलता ही संवेदनशीलता कमी व व्यापार जास्त होईल. व्यापारात संवेदनशीलता जोपासणे म्हणजेच एका म्यानात दोन तलवारी ठेवण्याचा व्यर्थ खटाटोप होय.

 

 

 जगामध्ये इतकी दुःख आहेत, अनेक यातना सहन करूनही जगणारे धडपडी जीव आहेत. काही लोकांच्या पाहण्यात व अनुभवात हे सदैव येत असते. पण अशी माणसं त्यांच्यासाठी संवेदनशीलता दाखवण्याऐवजी अधिकाधिक निष्ठुर व दगडी काळजाची होतात. जणू आपण त्यांच्यापैकी नव्हे. आणि तो जो भोगतो आहे, त्याचं त्यांन पहावं. अशी संवेदनशीलता म्हणजे भावरहित अंतःकरणाचा चांगला नमुना होय. दुःख, कष्ट, यातना आहेत तर ते दूर करणारी संवेदनाही आहे. या दृष्टिकोनातून ते कधीच विचार करू शकत नाहीत. अशा व्यक्तीने काही क्षणासाठी जरी संवेदनशीलता दाखवली तरी, बऱ्याच अंशी सृष्टी नंदनवन होऊन जाईल. इतरांसाठी शुद्ध भावना व्यक्त करताना त्रास होतो. स्वतःचा विचार सोडून इतरांसाठी करावं लागतं, वेळ, पैसा वाया जातो. पण नाही. वारा सदैव वाहतो. प्रत्येक श्वासात आपल्याला नवीन जीव देऊन जातो. पण त्याचं मोल तो कधी मागत नाही. सूर्य अविरतपणे प्रकाश व अग्नी देऊन आपल्याला जगायला कारणीभूत ठरतो. त्याने कधी त्याचं मोल मागितलं नाही. पाणी प्रत्येक वेळी जीवन बहाल करते. त्याचं मोल कुठे मागते? नाही. सृष्टीतील अनेक तत्व अशी आपल्यासाठी अविरतपणे विनामूल्य अत्यावश्यक सेवा अखंडपणे पुरवीत असतात. हा निव्वळ परोपकार आहे. तो भावनां सहित किंवा भावनारहित व्यक्त होतो. मग आपल्याला थोडं कष्ट, थोडा पैसा, थोडा वेळ भावनासहित गेला तर बिघडलं कुठं ? आपण संवेदनशीलतेने केलेले आचरण यातनातीत जीवांसाठी किती आजीवन उपकार पर्वणी ठरू शकते. याची जाणीव या बोथट मनांना  कधीतरी झाली पाहिजे. तसा त्यांनी किमान प्रयत्न तरी केला पाहिजे. एक प्रयत्न, दोन प्रयत्न, अनेक प्रयत्न, अशा अनेक प्रयत्नातून उमटणाऱ्या आनंदलहरी मनाला बळ देऊन शेवटी आपल्या प्रयत्नातील हिशोब चुकत्या करून टाकतात. मदर तेरेसा या लोकविलक्षण बाईने मंदिरात देव शोधला नाही. गोरगरिबांची अंतःकरणपूर्वक संवेदनशील सेवा करून कीर्तीची झालर पांघरून अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या. दुनयेत दुःख व मानवता जोपर्यंत आहे, तोपर्यंत त्यांचा विसर शक्य नाही. गांधीरुपी महामानव दुःख, अन्याय व अत्याचार दिसला की धावून गेला. जगात परमेश्वरानंतर गांधी रुपी रसायनच जाहीरपणे संवेदनशील असू शकते. काही संवेदनशील व्यक्तिमत्व दुःखावर तुटून पडतातअन्यायावर औषध ठरतात तर हिंसेसाठी उत्तर ठरतात. त्यातील उच्चकोटीचे व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा गांधी. संवेदनशीलतेचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे महात्मा गांधी. कोणीही या. पात्रता नाही. उपसा हवी तितकी संवेदनशीलता, दया, प्रेम......मोल नाही.....जा घेऊन.....फुलवा आपली जीवनयात्रा.....मोफत.....अगदी मोफत......गांधीरुपी  संवेदनशील परीसाला ज्यांनी स्पर्श केला, त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत  सोनेरीपणा गेला नाही. भावना, प्रेम, दया, अहिंसा या सदाचारी बुद्धीची पदवी घ्यावी ती गांधी विद्यापीठातूनच.

 

 

 दहा गाभाभूत घटकांपैकी एक संवेदनशीलता आहे. दहा गाभाभूत घटक राष्ट्रीय आहेत. राष्ट्राच्या उन्नती व भरभराटीसाठी आपण ते निर्माण केले आहेत. पण हळूहळू आपण सर्वजणच संवेदनशून्य होतोय. संवेदनशीलता फक्त मानवजातीसाठीच राखून ठेवली नाही. केवळ तिचा या भावनेतून विचार करणे म्हणजे स्वार्थ तत्परतेने व संकुचित भावनेने केलेला विकसित विचार होय. मुक्या असहाय्य जनावरापासून हवेत स्वच्छंदपणे भरारी मारणाऱ्या पाखरापर्यंत आणि वाऱ्याच्या  हेलकव्यावर मनमुराद डोलणार्या झाडाच्या प्रत्येक पानापासून अनंत सागराच्या तळापर्यंत संवेदनशीलता व्यापून राहिलेली आहे. 

 

पक्षांवर नितांत प्रेम करणारे पक्षीप्रेमी,जनावरांचे पोटच्या पोराप्रमाणे लालन-पालन, आरोग्य व काळजी घेणारे पशूप्रेमी व अव्यक्त भावनांना बांध फोडून जाणीवपूर्वक वाढ व जोपासना करणारे वनप्रेमी ही काही उच्च उदात्त अंतकरणाची संवेदनशीलता म्हणावी लागेल. संवेदनशीलतेचे हे मेरूमणी होत. मानवी संवेदनशीलता व्यक्त करता येते. ज्यांची संवेदनशीलता उच्च कोटी पर्यंत पोहोचली आहे अशीच व्यक्तिमत्व अव्यक्त भावना समजावून घेऊ शकतात. पशू, प्राणी, पक्षी, लता,वेली, जलचर यांना दुःख, यातना आहेत. हे समजणे व ते दूर करून त्यांच्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे म्हणजेच मानवतावादीपणाचे अत्युच्च शिखर होय.  अशी व्यक्तिमत्वाने व्यक्त केलेली संवेदनशीलता ही सामान्य माणसाने व्यक्त केलेल्या संवेदनशीलतेपेक्षा कितीतरी पटीने निराळी व अलौकिक आहे, सर्वश्रेष्ठ आहे. क्षणासाठी का होईना पशुपक्ष्यांवर प्रेम, दया दाखवणे ही मुळात मानव जातीसाठी परमोच्च संवेदनशीलता आहे. ती धारण करण्याची पात्रता आपल्या अंगी असेल तर आपणही तिच्याबरोबरच उच्च पदापर्यंत पोहोचू शकतो. क्षणासाठी दया दाखवली तरी चांगली. जीवनभर दया दाखवली तर ती सोन्याहून सोनेरी होय. मानवतेचा मुकुट परिधान करून वावरणारे महामानवच अशा प्रकारची उच्च प्रतीची संवेदनशीलता व्यक्त करू शकतात. प्राणी-पक्षी, मुके जीव त्यांच्यासाठी लक्ष आशीर्वाद राखून ठेवतात. ते आशीर्वाद त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि त्यातून मिळणारी धन्यता दुसरे कोणीही अनुभवू शकत नाही किंवा ती नेमक्या शब्दात व्यक्त होत नाही. जरी ती शब्दातून व्यक्त झाली तरी त्या धन्यतेला पूर्णत्व येऊ शकत नाही. पशुपक्षी व मानवेतर जीवांसाठी व्यक्त केलेली संवेदनशीलता मानवतावादी संवेदनशीलता होय.

 

 

 संवेदनशीलता प्रत्येकाजवळ असावी. इतरांसाठी व्यक्त केलेली संवेदना परोपकाराच्या भावनेतून असते. पण किमान स्वतःसाठी तरी प्रत्येकाने काही अंशी संवेदना दाखवणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळा आपल्या मनाच्या व शरीराच्या भावनात्मक गरज असू शकतात. पण निर्दयी हृदयाला त्याचा ठावठिकाणा लागत नाही व आपण चुकतोय हे शेवटी जाणवते. स्वतःला स्वतःविषयी विचार करायला लावणारी वेळ, स्वतःसाठी संवेदनशीलता धारण न केल्याचे परिणाम असल्याचे बऱ्याच वेळेला असू शकते. उदात्त हेतू राहू द्या पण किमान स्वतःच्या हितासाठी तरी प्रत्येकाने ही निर्लेप संवेदनशीलता जोपासली पाहिजे. स्वतःसाठी जोपासता जोपासता ती कालांतराने इतरांसाठी व्यक्त होईल. कारण भावना स्वतःसाठी व भावना इतरांसाठी यात अनेक पटीने भावनिक अंतर आहे. इतरांसाठीची सद्भावना वैयक्तिक सद्भावनेपेक्षा श्रेष्ठ व सर्वव्यापी आहे. पण बऱ्याच वेळा इतरांसाठी सद्भावना व्यक्त करता येत नसेल तर ती व्यक्त करण्यास शिकताना स्वतःपासून सुरुवात करून हळूहळू इतरांसाठी व्यक्त करायला शिकलं पाहिजे. त्यातून मिळणारं समाधान अव्यक्त, अवर्णनीय व शब्दातीत असत. दुसऱ्यांसाठी जर आपण संवेदनशीलता दाखवत असेल तर ती परमेश्वराने सेवा करण्याची आपल्याला संधी दिल्यासमान आहे.

 

 

निस्वार्थी संवेदनशीलता ही कधीही चांगली व उच्च प्रतीची होय. शक्य झाल्यास अशाच प्रकारच्या भावलहरी मनात उमटवण्याचा हेतुपुरस्पर प्रयत्न झाला पाहिजे. जगात सुख, संपन्नता, सुंदरता, विशालता जेवढी आहे त्याहूनही दुःख, यातना, हाल, करूणा, विषमता, विदारकता, दारिद्र्य व लाचारी आहे. ती कमी व्हावी ही भावना जरी उमटली तरी चांगल. ती कमी करण्याच्या दृष्टीने उचललेले पहिले पाऊल त्याहूनही चांगलं व त्यासाठी आपलं आयुष्य वेचणे सर्वात चांगले. परमेश्वराने दिलेल्या मूल्यातील हे एक उत्कृष्ट मूल्य आपल्या अंगी बाळगून त्या प्रति आपला व्यवहार ठेवणे म्हणजेच स्वतः जगता-जगता इतरांना जगवन्यासमान आहे. चांगुलपणा हा भावनेतून घातला जाणारा सुंदर सडा आहे तर प्रेम हे त्यावर रेखाटलेली सुंदर रांगोळी आहे. आपली पावलं अशा प्रेमयुक्त रांगोळीरुपी भावनांवर पडणे म्हणजे मनात संवेदनशीलता विकसित करणे होय.140106 ©Harish Gore

https://www.facebook.com/harishgore26

https://www.facebook.com/harish.gore.54/ 


दौशाड

  दौशाड हे डॉ. नंदकुमार राऊत यांच्याकडून मिळालेले पुस्तक मला जसे वाटले तसे.....        पुस्तकाचे नाव एका चिवट जातीच्या वनस्पतीच्या नावावरून ...