आवाज
आवाज...... आवाज कसा असावा? किती असावा? कोणाचा असावा? असे आवाजासंबंधी अनेक प्रश्न आपणाला रोजच्या जीवनात पडलेले असतात. असे असले तरी आवाज अनेक वेळा मुका असतो. खूप कष्टाने मिळविलेल्या यशाची महती सांगण्यासाठी आवाजाची गरज नसते. पण तो आवाज सर्वत्र घुमतो खरा. खोट्यालामात्र खुप ओरडून आपला प्रचार करावा लागतो. त्याशिवाय खोटं खपत व रुजत नाही. अनेकजण असं खोटं खपवताना दिसतात. हल्ली सोशल मीडियाचा आधार त्यासाठी मोठ्या प्रमाणावर घेतला जातोय. त्यामुळे सत्य पाहण्यापेक्षा माझ्या जवळचा कोण, पक्षातील कोण, पाहुणा कोण, मित्र कोण, हे पाहून त्याला सपोर्ट होतो. दूरदर्शन संचावर दिसणाऱ्या बहुतांश जाहिराती खोट्या असल्याचं निदर्शनास येते. ग्लोबेल्स नितीप्रमाणे वारंवार सांगितलेलं खोटं कालांतराने खरं भासतं. आपल्या तुंबड्या भरण्यासाठी सर्रास ग्लोबेल्सनीतिशास्त्र समाजात अतिप्रमाणात वापरल्याने सत्य घरीच बसून राहतेय…...विवेकाचा आवाज वाढवणं हाच यावर उपाय असू शकेल.
शब्दांचा नेमका अर्थबोध करणार आवाज हे माध्यम आहे. निवडणुका आल्या की 'आवाज कुणाचा?' हे प्रश्नार्थक वाक्य नको म्हणायची वेळ आणते. एकंदरच विश्वाचा प्रवास आवाजापासून आवाजापर्यंत चाललेला आहे. जर आवाज नसेल तर शांतता असेल. अशी निरव शांतता असेल तर मन शांत असेलच असं नाही. मन.........या जगामध्ये सर्वात जास्त आवाज करणार कोण असेल तर ते आपले मन. मनातील आवाजाला स्वरयंत्राची मदत लागत नाही. मनाची खूप बडबड आपल्याला ऐकून घ्यावी लागते. अनेक सल्ले आले तरी, 'ऐकावे जनाचे करावे मनाचे', अर्थात मनाचं ऐकावं असं म्हणतात. इंग्रजीतून सिक्सथ सेन्सचं काम मन करत. मन आणि अंतर्मन हया तशा एकच संकल्पना आहेत. विवेकाचा लगाम मनात असतो. खरं तर आपण सर्वजण त्याचेच गुलाम आहोत. 'मन वढाय वढाय, उभ्या पिकातल ढोर' असं बहिणाबाईंनी मनाच्या अस्थिरतेविषयी वर्णन केले आहे. त्याशिवाय मनावर अनेकांनी भाष्य केले आहे. त्यातून एक दिसते की मन चंचल आहे. मन आपल्याशी बोलत. त्याचा आवाज आपल्याला स्पष्टपणे ऐकू येतो. त्याच ऐकणें जणू आपले कामच आहे. त्याचा आवाज प्रत्येकजण स्पष्टपणे ऐकू शकतो.
आवाज बोलके यंत्र आहे. आवाजामुळे बोलण्याला स्पष्टता येते. प्रत्येकाचा आवाज इतरांहून वेगळा आहे. आवाज प्रत्येकाच्या अस्तित्वाचं माध्यम आहे. आवाज दाबण्याचा अर्थ अस्तित्व संपवणे असाच होतो. अशी आवाज दबलेली माणसं मुकी होतात खरी पण कायमची नाही. काहींचा मात्र कायमचा आवाज दाबला जातो. आपल्याकडे असे आवाज दाबणारे अनेक गुप्त हुकमी एक्के असतात. असे आवाज काही वेळा योग्य वेळी तर अनेकदा अयोग्य वेळी योग्य माणसांचे दाबले जातात. योग्य माणसासाठी आशा वेळी समाजातून हळहळ ऐकू येते. पण त्या हळहळळीचा आवाज मंद असतो.
घरात बसून आपण घराबाहेरील, परिचित व्यक्ती आवाजाच्या माध्यमातुन ओळखू शकतो. आवाजातील चढ-उतार हा आणखीन एक मजेशीर विषय आहे.चढ्या आवाजात बहुदा मुद्यांवर बोललं जातं. एरवी वादातीत मुद्देही चढ्या आवाजात असतात. आवाज चढवला म्हणजे आपण बोललेलं योग्य आहे अशी समजूत अनेकजण करून घेतात, नव्हे तशी त्यांची ठाम धारणा असते. त्यामुळे मुद्याची लढाई गुद्यावर येते. पुढे अनेक अनर्थ घडतात. बोलताना आवाज महत्त्वाचा मानला जातो. तो कोणत्या पटीत ठेवायला हवा हे ज्याचे त्याने ठरवावं.
सुंदर आवाजातील कथन हे पुन्हा पुन्हा कानात साठवून ठेवावेसे वाटते. कथानातील ओघवतेपणा अर्थात आवाज मूळ कथेला रंगत चढवतो. शब्द लिखित व आवाजाचे मूर्त रूप आहेत.
बाजारातील आवाज जाहीर खरेदी-विक्री दर्शवितात. जिन्नस घेऊन बसलेले व्यापारी आवाजाचा कुशलतेने वापर करून मालाचा फडशा पाडतात. तर कसलेले गिऱ्हाईक किरकोळ किमतीसाठी घासाघीस करतं. तसं पाहिलं तर पुष्कळांना घासाघिशीशिवाय केलेली खरेदी अपूर्ण वाटते. सांगितलेला दर शांतपणे मान्य करणारी गिऱ्हाईक व्यापाऱ्याच्या दृष्टीने श्रेष्ठ ठरतं. बाजारातील कोलाहल अनेकांनी तारस्वरात काढलेल्या आवाजामुळे असतो. शांत बाजाराची संकल्पना भारतात रुजण्यास बराच कालावधी जाण्याची शक्यता आहे. काही जण बाजारात खरेदी-विक्री व्यतिरिक्त वेगळा उद्देश घेऊनही येतात. तर काही जण एक नित्याची सवय म्हणून देखील येतात. बाजार ही बाब आवाजाच्या नजरेतून टिपून ठेवण्याची बाब आहे. बरेच बाजार हे आवाजाचे असतात. 'बोलणाऱ्याचे खडे विकतील........' ही म्हण स्पष्टपणे बाजारातून मराठी भाषेत सामील झाली असावी. एकूणच बाजार गिऱ्हाईक व व्यापारी या दोघांनाही समाधान देऊन जातो. पण मालाच्या बाजाराआधी बराच आवाज खर्ची घालवावा लागतो. जो व्यापारी आवाजाचा कुशलतेने वापर करतो, त्याला अधिक लाभ संभवतो. तर जो कुशलतेने खरेदी करतो, त्याला योग्यपणे बाजार करता येतो.
मंदिर व धार्मिक स्थळांजवळील आवाज पवित्र असतात. अनेकांना फक्त परमेश्वराची भीती राहिलेले आहे. त्यामुळे असे लोक आपली देवापृथ्यार्थ नम्रता दर्शविण्यासाठी मंदिराकडे धाव घेऊ लागले आहेत. त्यामुळे हल्ली या ठिकाणची पवित्रता अशा वृत्यांमुळे कलंकित होऊ लागली आहे. अनेकांना परमेश्वर हा एकच विसावा वाटतो. कित्येकांना चराचरात साठुन राहिलेला विधाता माझाच आहे असं वाटतं. तर वृद्धांना देवा तुझ्या शिवाय मला कोणीही नाही, ही भावना घेऊन मंदिराकडे जाणे होते. पण एकूणच या ठिकाणचे आवाज दबक्या, नम्र व भक्तिमय सुरात असतात. परमेश्वराचे गुणगान गाताना अनेक जण तल्लीन होतात. भक्तीतील अर्जव आवाजाच्या माध्यमातून व्यक्त होते. तर परमेश्वर प्राप्ती भक्तीमुळे होते. भक्तीत राखट व कणखरपणा खपत नाही. भक्ती प्रेमळ व नम्र असावी. प्रेम व नम्रता आवाजावरूनच समजतात. मनातील विचारांची खोली व तीव्रता आवाज ठरवतो. देवासाठी मारलेली आर्त हाक भक्तीची तीव्रता दर्शविते. ठराविक आवाजातील देवाची हाक ही केवळ माझे काम आहे व मी ते संपवितो आहे हेच दर्शविते. प्रेमाचा लवलेशही इथे पाहावयास मिळत नाही. देव आवाजाचा नसून भक्तीचा भुकेला आहे. आवाज भक्तीचे माध्यम आहे. आवाज म्हणजे भक्ती नव्हे. आवाजाशिवायही भक्ती करता येते. मंदिर परिसरातील आवाज भिन्न असले तरी ते सर्व परमेश्वरासाठी व्यक्त केले जाणारे किंवा त्याच्यासाठी दाखविलेल्या चांगल्या भावना होत. वैयक्तिक गाऱ्हाणी व घरगुती कलह मंदिरात जाऊन परमेश्वराला कथित करणं म्हणजे भक्ती नव्हे. तो पूर्णपणे स्वार्थ होय. असे आवाज म्हणजे भक्तीत केलेली शुद्ध भेसळ होय.
माऊली, संत तुकाराम, समर्थांचा आवाज कसा असेल याविषयी मनात सदैव उत्कंठा दाटून असते. मध्यंतरी स्वामी विवेकानंद यांनी शिकागो इथं केलेल्या ऐतिहासिक भाषणाची ध्वनिफीत ऐकण्यात आली. खरं सांगतो, इतकी वर्षे त्यांच्या साहित्याचं वाचन करून साध्य झालं नाही ते त्यांच्या क्षणाच्या आवाजाने केलं. अंगावर सर्रकन काटा फुटला.जुन्या काळातील आवाज आपल्या वाट्याला न आल्याबद्दल मनाला अनेकदा खंत वाटली आहे. निश्चितच संतांच्या आवाजात माधुर्य, प्रेम आणि रसाळपणा असणार यात शंका नाही. उगीचच का चारपाचशे वर्षे लोटून गेलीत आणि तरीही ज्ञानोबा-तुकोबांच्या नावाचा गजर तेवढ्याच तीव्रतेने ऐकू येतो. आपण अनेक प्रेमळ माणसांचे आवाज ऐकतो. पण संतांचे प्रेमळ व मधुर आवाज चांगुलपणाचे आदर्श आहेत व ते ऐकवण्याची तहान संतांशिवाय दुसरं कोणीही भागवू शकत नाही. असा प्रयत्न कळत नकळत कोणी केला तर ते शुद्ध नाटक होऊ शकते. हल्ली फायद्याशिवाय गोड आवाज ऐकायला मिळतच नाहीत! जोपर्यंत स्वतःचा स्वार्थ साध्य होत नाही तोपर्यंत आवाजातील गोडी टिकते. तद्नंतर खरा आवाज बाहेर येतो. संतांचे आवाज प्रेमळ, तितकेच हुकमी असू शकतात. भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळाचे वेध घेणारे संत हे परोपकारी महात्मे होत. त्यामुळेच ते असे अधिकारपणे बोलू शकत असतील. संत जसे बोलतात, तसे वागतात. 'बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले' असे समर्थांनी ठामपणे सांगितले आहे. संतांचे आवाज फसवे कधीच होऊ शकत नाहीत. तर फसवणारे आवाज संतांचे असूच शकत नाहीत.
काही आवाज फक्त सोसण्यासाठीच असतात व ते सोसणारे कान सोशिक कान म्हणावे लागतील. वाहनचालकास किंवा मोठ्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना अशा प्रकारचे आवाज सोसावे लागतात. अशा आवाजात शून्यता, रुक्षता व उत्पादकता असते. पण एकूणच असे आवाज सहनशील कामगारच सहन करू शकतो व ते सोसण्यातच त्याचं व त्याच्या कुटुंबाचे भले म्हणावे लागेल. स्वतःचा चरितार्थ चालवत असे उत्पादक आवाज देशासाठी फार मोठा हातभार लावतात.
सुंदर स्वरातील गाणं आवाजाच्या दुनियेतील परमोच्च बिंदू मानावा लागेल. मानवी मूल्यातील गाणं हे एक स्वतंत्र प्रकरण आहे. किंबहुना दिवसभरातील बेसूर आवाजाचा अंत रात्रीच्या वेळी एखादं मधुर आवाजातील गाणं करत. काहींना गाणं ऐकल्याशिवाय काम होत नाही. तर अनेक विद्यार्थ्यांना गाण्याशिवाय अभ्यास शक्य होत नाही. गाणं लहानांपासून वृद्धांपर्यंत आवडीचा विषय आहे. गाण्याचा प्रकार वेगळा असेल पण गाणं आवडतच. सुर गाण्याचा आत्मा आहे. सुराशिवाय गाणं 'बेसुर' आहे. उत्तम गाता येणे यशस्वी गायकाचे लक्षण आहे. तसे आपण सर्वजण गायकच आहोत. पण आपल्या कानाशिवाय त्या गाण्याला दुसरा चांगला श्रोता मिळणे कठीण आहे.
जीवनाला काही जण गाण्याची उपमा देतात. ज्यांना जीवन गाणं चांगलं गाता येतं, त्यांना सुरेख सुर सापडले असे म्हणता येईल. अनेक जण जीवनगाणे कुरकुरत गातात. किंबहुना कुरकुरल्याशिवाय अशा व्यक्तींचा दिवस पुढे सरकत नाही. जीवन सुरेख गाण्यात रूपांतरित करण्याची क्षमता अशा व्यक्तीजवळ कमी असते. गाण्याचा अविष्कार मानवाला कधी झाला हे सांगता येणार नाही. पण गाणे हा प्रकार जेव्हा सुरू झाला असेल, तो क्षण निवांत वेळेतील मानवाचा कलागुणांसाठी वाहिलेला क्षण असेल. त्या क्षणी त्याने नित्याची भाकरीसाठीची धडपड बाजूला ठेवली असेल व गाण्याकडे लक्ष पुरवले असेल. कदाचित त्या काळच्या मानवाच्या गरजा या फक्त शारीरिक असू असतात. पण जेव्हा केव्हां त्याने गाण गायला सुरुवात केली असेल, तेव्हा त्याच्या मानसिक गरजा असू शकतात या पातळीवरून त्याने विचार केला असावा. यातूनच गाणे हा प्रकार सुरू झाला असावा. गाण्याची गोडी आवाजावरून ठरते. तर आवाजाची गोडी गाण्यातील शब्दाने वाढते. जात्यावर गायल्या जाणाऱ्या ओव्यासाठी कित्येकांचे कान आजही असुसलेले आहेत. तर जात्यावर कोणते गीत गायले जात होते, हे ठाऊक नसणारा वर्गही आपल्या समाजात समाविष्ट आहे. काहींना पूर्वीची जुनी गाणी सुरेख वाटतात तर सध्याच्या गाण्याकडे नकारात्मक दृष्ट्या पाहणारेही आपल्याकडे आहेत. जुनी गाणी हृदयाचा ठाव घेत होती तर सध्याची गाणी ह्रदयाचा छेद घेत आहेत. अशा प्रकारच्या तिखट प्रतिक्रिया द्यायला ही मंडळी विसरत नाहीत. नव्या गाण्याकडे तुच्छतेने पाहणारे जुने डोळे नव्या गाण्याला नाकतोंड मुरडतात. अशांवर सध्यातरी आभाळच कोसळत असेल. तसं पाहिलं तर सध्याची अनेक गाणीही सुरेल आहेत. ऐ. आर. रेहमान किंवा आपल्यातीलच मराठमोळे अजय-अतुल जोडगोळी संगीतात अनेक नवे प्रयोग करताना दिसताहेत. फक्त जुन्याला कवटाळून बसलात तर असे प्रयोग आपण कधी अनुभवणार? काळाबरोबर रसिकताही बदलली पाहिजे व ती बदलताना दिसतेय. ते काहीही असो पण गाणे हा प्रकार काही बंद नाही व तो बंद पडण्याची सुतराम शक्यता नाही.
आपल्या आवाजाच्या सामर्थ्यावर कित्येकांनी गाण्यासाठी आयुष्य खर्ची घातले. पण गाणे जिवंत ठेवले. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर या प्रकारात येतात. आयुष्यभर गाणे आणि गाता गाता गाण्यासाठी आयुष्य वेचणे या दोन्ही गोष्टी लता मंगेशकर यांनी केल्या. सुरुवातीच्या काळातील गरजेसाठीचे गाणे हेच त्यांच्या आयुष्याचे जगण्याचे कारण ठरले. आवाजात काय ताकद असते हे लता मंगेशकर यांच्याकडे पहिल्यानंतर कळते. किंबहुना त्यांच्यामुळेच आवाजाची ताकद समाजाला कळली. गाण्यासंबंधित सर्व शब्द त्यांच्याजवळ स्तब्ध होतात. अशा या चिरतरुण आवाजाला जगाने कधीच श्रेष्ठत्व बहाल केले आहे.
कित्येकांचे आवाज रुक्ष व राकट वाटतात. असे आवाज ऐकण्यासाठी नकोसे वाटतात. अशी व्यक्तिमत्व बोलत असताना, थांबणार कधी हा प्रश्न मनात येतो. शब्द तलवारीप्रमाणे असतात. पण माझ्या मते जर शब्द तलवार असतील तर ते व्यक्त करणारा राकट आवाज तलवारीची तीक्ष्ण धार आहे. अशा व्यक्तींचे साधे बोलणेही नकोसे वाटते. आवाजाचे सामर्थ्य अशांना कळणे दुरापास्त आहे. कित्येकांचे आवाज प्रेमळ असतात. असे प्रेमळ आवाज सर्वांनाच हवेहवेसे वाटतात. आवाज ही परमेश्वराने दिलेली देणगी आहे. मानवजात दिलेल्या आवाजात बदल करू शकत नाही. प्रेमळ आवाजात बोलणे हे स्वतःसाठी, तसेच इतरांसाठी अर्थातच हितकारक ठरते.
रेडिओ हे आवाजाच्या दुनियेतील बोलके यंत्र आहे. रेडिओचे सामर्थ्य आवाजात आहे. सुरुवातीच्या कालखंडात अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या रेडिओने आजही त्याची ख्याती टिकवून ठेवली आहे. विविध केंद्रावरून ऐकू येणारे आवाज, श्रोतेवर्गात कमालीचे लोकप्रिय आहेत. कित्येक मैलाच्या अंतरावरून जवळीक साधण्याची कला अनेक निवेदकांकडे आहे. प्रेमळ पण शिस्तबद्ध आवाजाचे दुसरे नाव म्हणजे रेडिओ होय. अमिन सायानींसारख्या व्यक्तिमत्त्वाने अनेक पराक्रम केवळ निवेदकाच्या माध्यमातून स्वतःच्या नावावर नोंदवले आहेत. खऱ्या अर्थाने तोच कालखंड रेडिओसाठी पोषक ठरला. अनेकजण केवळ अमिन सायानींचा गोड आवाज ऐकण्यासाठी कानात जीव एकवठून रेडिओजवळ बसत असत. ही केवळ आवाजाची प्रेमळ जादू होती. त्या आवाजाचा आनंद अनेक वर्षे श्रोत्यांनी घेतला. आजही त्यांच्यासारखे अनेक निवेदक श्रोतेवर्गात लोकप्रिय आहेत. खुबीने निवेदन करून श्रोत्यांना खिळवून ठेवणे ही एक कला आहे. केवळ गोड आवाज नव्हे तर गरजेनुसार विविध माहित्या, मनोरंजन करून ज्ञानात भर टाकणे हे रेडिओचे मुख्य सूत्र आहे. या सर्व गोष्टी श्रोत्यांपर्यंत जितक्या यशस्वीपणे जो निवेदक पोहोचवेल तो निश्चितच लोकप्रिय होतो. एकूणच रेडिओ आणि आवाज यांचे एक अतूट नातं आहे. ते नाते कधीही संपणे शक्य नाही. आवाज रेडिओच भांडवल आहे. त्यावर त्याच्या यशस्वितेची वाटचाल अनेक वर्षांपासून अखंडीतपणे सुरू आहे व पुढेही सुरू राहील. यात शंका नाही.
आवाज वेगवेगळ्या वस्तूंचे तसेच व्यक्तींचे असतात. समाजातील विविध थरातील व्यक्तिंचे आवाज आपण ऐकत असतो. बऱ्याच वेळेला असे आवाज ऐकणे आपल्याला भाग पडते. या सर्व आवाजांमध्ये लहान बाळाचा आवाज अत्यंत आल्हाददायक वाटतो. बाळाच्या आवाजात कोमलता व निरागसता असते. त्याच्या आवाजाच्या मागे कोणताही छळवाद किंवा कपट, स्वार्थ मुळीच नसतो. बाळ हवेहवेसे तर त्याचा आवाज लोभस भासतो. घरात बाळ असणे म्हणजे जवळ पैसे असण्यापेक्षा कितीतरी पटीने समाधानी वृत्तीने असण्यासारखे आहे. आई बाळासाठी नेहमीच वेडी असते. प्रत्येक आईला आपल्या बाळाचं कौतुक असतं. त्याचे बोबडे बोल ऐकण्यासाठी तिचे कान असुसलेले असतात. दिवसभराच्या कामाचा थकवा अनेकांच्या घरात लहान बाळ घालवतात. परमेश्वराचे दुसरे रूप म्हणजे लहान बाळ होय. त्याला घडवण व वाढवण्यासाठी आई-वडील आपलं आयुष्य खर्ची घालतात. बहुतेक आई-वडील याच पद्धतीने आपल्या आयुष्याची आखणी करतात. पण तरीही समाजात हिंसाचार व क्रूरता का वाढत असावी? हा प्रश्न विचार करण्यासाठी उरतो. बाळाच्या आयुष्याला वळण देताना आई-वडिल कुठेतरी निश्चित चुकत असावीत किंवा संस्कार पुर्णपणे अंगिकारले जात नसावेत. कारण ज्याच्या वाट्याला प्रेम येते, तो निश्चित प्रेम देतो. मग कुठे आहे ते प्रेम, जे आई-वडीलांनी त्याला दिले? लहान बाळं सर्वार्थाने वेगळी असतात. त्यांच्या हालचाली, त्यांचे वागणे, त्यांचा हट्ट, लडिवाळ आवाज जणू आपल्या कल्पनेचा विस्तार असावा असा असतो. बाळामध्ये स्वतःचं बालपण शोधण्याची रम्य कल्पनाही काहीजण करतात. तर आपण लहान नाही याचा अनेकांना पश्चाताप होतो. तसं पाहिलं तर आपण कोणत्याही क्षणी लहान होऊ शकतो. पण क्रोध, अभिमान, अहंकार, द्वेष व मान आपल्याला इतके चिकटुन बसलेले असतात की आपण त्या पातळीवर विचार करणे शक्य होत नाही. हा आपल्या विचारांचा तोकडेपणा व बुद्धीच दारिद्र्य आहे. मुक्तपणे विचार करायला लहान बाळाकडूनच आपल्याला शिकाव लागेल. बाळाची समाधी लहान-सहान खेळात लागते. भान हरपून ती खेळत असतात. त्यांच्या मनाइतकी श्रीमंती व समृद्धी दुसरी कुठच पहावयास मिळत नाही. म्हणूनच ती निरागस असतात व ती आपणा सर्वांनाच हवीहवीशी वाटतात.
आवाजाआवाजामध्ये भिन्नता असते. येणारा प्रत्येक आवाज भिन्न असतो. दिवसा होणारे बहुतेक आवाज कामासाठी किंवा मानवाने पोटासाठी केलेल्या धडपडीतून निर्माण होतात. रात्रीचे आवाज काळजाचा ठाव घेतात. उजेडात पुण्य तर अंधारात पाप होते असे म्हणतात. रात्री वाटणारी भीती पिढ्यानपिढ्या आपल्यापर्यंत चालत आलेली असते. रात्री होणारे बहुतांश आवाज भीतीदायक भासतात. रातकिड्यांचे ओरडणे असो किंवा कुत्र्याचे भुंकणे, कानाला असह्य वाटते. अनेक रात्रीच्या गर्भात कुटील डाव रचले जातात. बहुतांश क्रूरकर्म रात्रीच घडतात. पण तरीही रात्र होणे सर्वांसाठी हितावह असते. रात्री आवाजाची वारंवारिता कमी असते. रात्री आवाज नसणे हे सुद्धा कधीकधी डरावणे वाटते. सभोवतालच्या आवाजाची आपल्याला सवय झालेली असते. त्यामुळे रात्रीची नीरव शांतता कधीकधी जीवघेणी भासते. वृद्ध दिवस वर येण्याची आतुरतेने वाट बघत असतात. तर प्रेमीयुगल रात्र संपूच नये असे म्हणतात. रात्र त्यांच्यासाठी काही क्षणांसमान जाणवते. कष्टकरी वर्ग रात्री गाढ झोपतो. खरंतर प्रत्येक रात्र तिच्यासोबत येताना एक नवा साज घेऊन येते. शृंगाराने नटलेली रात्र कोण कशी साजरी करतो यावर रात्रीच्या सफलतेची गोष्ट अवलंबून असते. रात्र प्रत्येकासाठी जरी वेगळी असली, तरी रात्र ही रात्रच आहे व तिची भ्रमंती रोजचीच आहे. ती आपल्या वाटण्यावर किंवा असण्यावर बऱ्याच वेळा अवलंबून नसते. अनेकांच्या अनेक रात्री मित्र परिवारासोबत किंवा प्रियजनांसोबत गप्पांच्या मैफिलीत खोल डुंबून जातात. त्यावेळी खरतर सकाळ होऊच नये असं वाटतं. इतक्या वेळ गप्पा मारल्यानंतरही त्या बोलण्याला पूर्णत्व येत नाही. बरंच काही बोलायचं किंवा ऐकायचं राहून गेल्याची हुरहूर मनात राहते. प्रेमळ शब्द असतात ते हेच जे देऊनही शिल्लक राहतात व ऐकूनही ऐकण्याचे बाकी राहीलेले असतात. उद्याच्या भविष्याचा वेध आजच्या रात्रीत असतो. रात्र तिच्यासोबत शांतता घेऊन येते. तर शांतता नसलेल्या रात्रीत दिवसापेक्षा फारसा फरक नसतो. पण तरीही दिवस वेगळा व रात्र वेगळी असते. दिवसभराच्या वणवणीतून माणूस रात्री निवांत होतो. दिवसा तोंड बोलते तर रात्री मन बोलते. चिंतन ही मुकी बडबड आहे. जे तोंडाने बोलणे होत नाही ते मन सहज बोलते. मनाचं बोलणं आपल्याला स्पष्टपणे ऐकू येते. चिंतनाची सवय मनासाठी हितावह ठरते.
अनेक आवाज आपणाला परिचयाचे असतात. मानव उत्क्रांतीच्या प्रवासात माणूस शक्य तितका वेळ चार भिंतीच्या आत स्वतःला डांबून ठेवत आहे. त्यामुळे सहाजिकच निसर्गाची सोबत त्याच्यासाठी दुर्मीळ होतेय. आपण निसर्गापासून फार दूर होतो आहोत असा भास त्याला होतो. निसर्गाच्या अनेक नियमांचे उल्लंघन दिवसागणिक आपण करतो. निसर्गचक्राचे दुष्परिणाम त्यामुळे आपणाला सहन करावे लागतात. निसर्ग जितक्या सहजतेने देतो, तितक्याच क्रूरपणे अनेक गोष्टी आपल्यापासून हिरावून नेऊ शकतो. त्याने असे रुद्र रूप अनेकवेळा धारण केल्याचे आपण पाहतो. त्यामुळे निसर्ग मानवाचे काही अंशी आक्रमण सहन करेलही परंतु तो जेव्हा माघारी उलटेल तेव्हा ते आपल्याला सहन होणार नाही. आपण स्वतःही निसर्ग आहोत. तेव्हा आपलं वागणं, बोलणं आणि एकूणच आचार, विचार व उच्चार नैसर्गिक हवेत. ते निसर्गावर अतिक्रमण करणारे, कृत्रिम नसावेत,अर्थात नैसर्गिक असावेत.
निसर्गात कधी काळी भ्रमंती झाली तर तिथले भावविश्व चाकोरीबद्ध जीवनापेक्षा सर्वस्वी वेगळे वाटते. निसर्गाचे निरीक्षण व तिथल्या आवाजाचा कानोसा आपल्यासाठी अविस्मरणीय पर्वणी ठरते. पक्षांची किलबिल आणि पानांची सळसळ वनात गेल्याशिवाय गवसणें शक्य नाही. खरं तर असे आवाज आपल्याला काहीच देत नाहीत. ते उगीचच ऐकायचे असतात व कानात साठवायचे असतात. पहाटेच्या अंधुक प्रकाशात पक्षी जागे होऊन गप्पांच्या मैफली भरवतात. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कोणत्या विषयावर ही बडबडी लेकरं बोलताहेत असं वाटतं. निरागसता अंगावर घेऊन ती रोजच हा कार्यक्रम मांडतात. कोणी पहा किंवा पाहू नका, कोणी लाईक करा, करू नका, कोणी कमेंट करा, करू नका, ती रोजच बडबडतात. पानें वाऱ्याच्या प्रत्येक हिंदोळ्यावर मागे सळसळाट सांडतात. तर खट्याळ वारा त्यांना रात्रंदिवस झोके देतो. त्यातून निर्माण होणारा नाद कानात साठवून ठेवण्यासाठीच असतो.
अनेकविध छोटे-मोठे जीव रानावनात आपले आयुष्य निसर्गाच्या वाटेवर व्यतित करतात. त्यांचे आवाज आपल्यासाठी वेगळे असतात. निसर्ग बोलतो हे कावळ्याच्या कावकाव व चिमणीच्या चिवचिवेपलीकडे गेल्यानंतरच कळते. झाडं बडबडतात, वेली खळखळून हसतात, वारा कर्णमधुर शीळ घालतो, झऱ्याचा मंजुळ आवाज अंतर्मनात नादब्रह्म निर्माण करतो, डोंगर गंभीर होऊन आपल्याकडे पाहतो आणि पर्वताचा प्रत्येक सुळका माझ्याएवढा हो अशी आर्जव आपल्याला करत नाहीत का? निश्चल दगडांना शब्दांचे घस असतात. हे दगडाशी व निसर्गाशी केलेल्या प्रितीतूनच समजते. असा विचार वेडेपणाचा वाटला तरी आपल्या फायद्याचा आहे. अखिल भूतलासाठीच हे पसायदानाच आहे.
आपण निसर्गाच्या कुशीत जाऊन त्याच्या ऊबीचा अनुभव घेतला पाहिजे. त्याच थोडं का होईना, आपण ऐकून घेतले पाहिजे. खरं तर कोणाचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत आपण नसतो. आपलच ऐकवण्याचा हट्ट आपण धरतो. जीवन जगण्याचा हा चुकीचा मार्ग आहे. काही ठिकाणी फक्त ऐकून घेण्यासाठी जायचं असतं. त्यात निसर्ग वरच्या स्थानावर आहे. तो आपल्याला खुणावतो पण आपण जागचे हललो तर शप्पथ.....! तो बोलावतो पण आपण गेलो तर नवल...! आणि त्यातून चुकून गेलो तर आपल्या विकृत्या आपण निसर्गाच्या गालावर कायमस्वरूपी कोरून येतो. निसर्गात शिकण्यासाठी जायचं असतं. तिथ गेल्यानंतर तो शिकवतोच पण त्याची भाषा मुकी असते जी आपल्या आकलनशक्तीबाहेरील असते. त्याच्याशी जवळीक साधली तर तिथली प्रत्येक बडबड आपल्या कानावर आल्याशिवाय राहणार नाही.
आवाजातील कडवटपणा, माधुर्य किंवा प्रेमळपणा अचूकपणे टिपतात ते कान. कान आवाज ऐकण्याचे माध्यम आहेत. काही शब्द ऐकून साठवण्यासाठी असतात तर काही ऐकून विसर्जन करण्यासाठी असतात. प्रियजनांचे बोल कान साठवतो तर नको असलेले किंवा दृष्टांचे आवाज कान सहज विसरून जातो. कान आवाजाचा सदैव भुकेलेला असतो. काहीच आवाज त्याची भूक भागवतात. अशा आवाजासाठी कान सदैव आतुर असतात. प्रत्येकाच्या कानाची भूक व भूकेची चव वेगळी असली तरी प्रत्येक कानाला ही भूक असते खरी. तोंड फक्त बोलते. कान फक्त ऐकतो. डोळे मात्र बोलतात व ऐकतातही. डोळ्यांनी पाहण्याव्यतीरिक्त करायची ही दोन अतिरिक्त कामे आहेत. डोळे बोलतात तेव्हा बहुधा तो प्रणयक्षण असतो. डोळ्याकडून बोलण्याची व ऐकण्याची क्रिया याच क्षणी जास्त होते. डोळे याव्यतिरिक्तही बऱ्याच वेळा बोलतात. अनेक डोळ्यातून दुःख, दारिद्र्य ओसंडून वाहते. अनेकांच्या डोळ्यातून लाचारी प्रत्येक उघडझापेतुन डोकावते. अन्यायग्रस्त डोळे दया व प्रेम मागतात. तर असाह्य रोग्यांची डोळे करूणा ओततात. डोळे असंच काही बोलतात...... ते बोलतात खरं.... पण अशा बोलक्या डोळ्यांचे, डोळ्यातील शब्दांचे आवाज टिपण्यासाठी कानसेन डोळेच हवेत. समदृष्टी असणारे डोळेच असे डोळ्यांचे आवाज अचूक टिपू शकतात. काहींचे डोळे आग ओकतात. डोळ्याचा व आगीचा काडीचाही संबंध नाही. पण अशी आग डोळ्यात दिसते खरी. असे आग ओकणारे डोळे पाहणे आपल्याला शक्य होत नाही. अशा डोळ्यातील भावना सर्वस्वी मानवतेची पायमल्ली करणाऱ्या, हेकाड व एककल्ली ठरतात.
डोळ्याव्यतिरिक्त आपल्या शरीराच्या इतर अनेक अवयवातून आवाज दिला जातो. शरीराची भाषा मानवी भाषेबरोबर विकसित झाली असावी. तिला अजून तरी पूर्णत्व नाही. पण शारीरिक भाषेला अस्तित्व मात्र नक्कीच आहे. जर आपले अवयव बोलते होत असतील तर सृष्टीतल्या प्रत्येक कणाजवळ भरपूर शब्दसंपत्ती असलीच पाहिजे. अचल वस्तु स्थिरतेचा संदेश देतात. तर मुके प्राणी-पक्षी, वनस्पती प्रेम, दया व करूणा शिकवितात. त्यांच्याकडून शिकण्यासाठी सद्भावना पाहिजे. चांगल्या भावनाच अव्यक्त आवाज ऐकू शकतात. त्यासाठी मन शुद्ध व भावना तरल असाव्यात एवढीच अट आहे.
असा हा आवाज हवाहवासा तसेच नको नकोनकोसा वाटतो. आवाज हवाहवासा व आवाज नकोनकोसा वाटणे या केवळ मनाच्या स्थितीवर अवलंबून असते. आत्यंतिक कोलाहालात आणि नीरव शांततेतही जो कार्यमग्न असतो त्याला मनाची स्थिरता लाभलेली असते. स्वामी विवेकानंदांच्या मते तोच एक स्थिर मनाचा होय. मनाच्या स्थिरतेचा भंग आवाज करतो. आवाजामुळे एकाग्रतेचा भंग होतो. पण जर मन स्थिर असेल तर कितीही कर्कश आवाज मनाची स्थिरता मोडू शकत नाही. शेवटी आवाज कितीही करता येत असेल किंवा काढता येत असेल तरी हळू व नम्र आवाजात बोलणे सभ्येतेचे अंग आहे. सर्वांनी याचं पालन केले तर एक प्रेमळ समाजाची निर्मिती होऊन जाईल. 200306 ©Harish Gore
No comments:
Post a Comment