Monday, 21 September 2020

चिंतन.......सद्भावनांचे.......१२

 

समारोप

 

 

    निरोप वेगळा व समारोप वेगळा. समारोप म्हणजे सांगता, शेवट. निरोप म्हणजे तळमळ, व्याकुळता, हुरहूर, आठवण, वेदना, एक झुरणं, एक संवेदना जी फक्त संबंधीत व्यक्तीलाच जाणवते. काही निरोपात आनंदही असतो; पण असा निरोप साजरा करता येत नाही. निरोपाच गांभीर्य त्यात दिसत नाही. निरोप.…..मनाला मनापासून पिळवटून काढणारा प्रसंग......! तसं तर आपणाला अनेक ठिकाणी निरोप द्यावा व घ्यावा लागतो. आपण तो आनंदानं देतो व घेतोही. पण काही ठिकाणचे निरोप देणेघेणे मन कासावीस करून सोडते. निरोपाच्या वेदना हरघडीला उगळल्या जातात. निरोपाच्या आठवणी बेचैन करून सोडतात. काहींना चांगला निरोप देता येत नाही. काही निरोप देण्यात पटाईत असतात. त्याला शुद्ध मराठीत 'कटवणे' असं म्हणतात. अशा कटवण्यात पटाईत असणाऱ्यांसाठी आजचा लेख नाही. अर्थात काही ठिकाणी अशा कटवण्यात वेळ वाचवणं हा मुख्य भाग असतो. काहींना मात्र कटवावच लागतं. तथापि कटवणे म्हणजे निरोप असं स्पष्टपणे म्हणता येणार नाही. निरोप दिमाखात दिला जातो. कटवणे हा चुटकीचा खेळ आहे. अनेकजण असा खेळ गंमतीने खेळतात.

 

    निरोप काही अंशी त्याग म्हणावा लागेल. म्हणजे नववधू सासरी जाते तेव्हा तिला निरोप दिला घेतला जातो. नवविवाहित सासरी जाताना व्याकुळ होते. इकडील मंडळी आता फक्त आठवणीत राहतील, प्रत्यक्षात असणार नाहीत. याची तिला स्पष्ट कल्पना असते. मला वाटत यापेक्षा मोठा निरोप नसेल.....! यापेक्षा दुसरी वेदना नसेल. आपल्या प्रिय आईवडील, बहिणभाऊ, सगेसोयरे यांना सोडून ती सासरी जाते तेव्हा ती माहेरचा त्यागच करते. तेव्हा निरोप व त्याग यांचा जवळचा संबंध आहे. त्यागात प्रेम असतं. त्यागात आठवण आहे. तळमळ आहे. व्याकुळता आहे. हुरहूर आहे. निरोपात उमटणाऱ्या भावना कदाचित शब्दात सांगूनही कमी पडाव्यात इतक्या उत्कट असतात. असो

 

    गेले जवळजवळ तीन महिने दर सोमवारी आपण माझ्या सोबत आहात. आता समारोपाची वेळ अगदीच जवळ आली आहे. आजचा हा समारोपाचा शेवटचा भाग. हा भाग मात्र ताजा आहे. मागील सर्व भाग मी पूर्वी लिहले होते. जवळपास चौदा वर्षानंतरही ते मला ताजे वाटले. म्हणून ते डिजिटल केले व आपल्या सेवेत हजर केले. खरं तर अशाप्रकारच लिखाण लोकांना आवडेल की नाही हा प्रश्न माझ्या मनात होता. मग विचार केला, चला पाहुयात. मी अक्षरशः भारावून गेलो. माझे फेसबुक खाते, फेसबुक पेज व ब्लॉगवर हे लेख मी उपलब्ध केले. वास्तविक माझ्या जवळच्या लोकांचा त्यावर पहिला अधिकार. आता फेसबुकवर सर्वजण दिसतात. म्हणून 'फेसबुक माण-खटाव', डॉ. प्रा. संगीता भालसिंग संचालित 'चित्रशलाका', ‘आम्ही साहित्यिक’ व उत्तरार्धात ‘अक्षर शाळा’ या माझे मित्र बरडकर यांच्या फेसबुक  समुहावर मी शेअर केले. यासर्व ग्रुपवर चांगला प्रतिसाद मिळाला. या सर्व ग्रुपचे सदस्य व अडमीन यांचे मी मनापासून आभार मानतो. त्याशिवाय फेसबुक पेज, फेसबुक खाते व ब्लॉगवर देखील अनेकांनी त्याचा लाभ घेतला. सर्वांचे आभार. वाचलेल्यापैकी अनेकांनी लाईक किंवा कंमेंट करणं टाळलं. मी लाईक व कमेंटचा भुकेला नाही. हे माझे विचार आहेत. चांगले विचार कोणी लिहिले अथवा कोणी वाचले वा कोणाच्या प्रतिक्रियांवरून अथवा प्रतिसादांवरून त्यांची किंमत कमीअधिक होत नाही. शेवटी चांगलं ते चांगलच. तरीही अनेकांनी लाईक व कंमेंट केले. माझे लेख एवढ्या मोठया प्रमाणावर वाचण्याची ही पहिलीच वेळ. तेव्हा सर्वांना मनापासून धन्यवाद...! 

 

     अनेकांनी सर असंच लिहा, वाचायला छान वाटतंय, असं आवर्जुन सांगितलं. अनेकांनी अभिनंदन केलं. अभिनंदनाने हुरळून जाण्याइतपत मी नवखा लेखक नाही. वास्तविक माझ्या स्तुतीपेक्षा ते अनेकांच्या वाचनात आले, हे फार महत्त्वाच आहे. लिखाणातून मला आनंद मिळतो. तो सर्वांना वाटण्यात गैर काय?

 

   एकूणच लोकांच्या प्रतिक्रियांवरून मी लिहावं,लिहीत राहावं असा सूर आला. सारख सारख एकाच सुरात लिहण्यांन वाचकांची वाचनाविषयीची रुची कमी होण्याची शक्यता असते. बरं ते योग्यही नाही. शेवटी शब्दांचे डोस किती जणांना रूचतात? त्यात जड लिखाण डोक्यात घेण्याऐवजी डोक्यावरून जातं याच भान मला आहे. मी लिहावं हे जरी ठीक असलं; तरी योग्य ठिकाणी थांबणही गरजेचे आहे. तशीही ही लेखमाला तीनेक महिने चालली. एवढया प्रदीर्घ लेखनाची ही पहिलीच वेळ. यात बरेच दिवस व्यस्त गेले. आणि म्हणून या लेखमालेचा समारोप करण इष्ट होय. पुन्हा कधी व काय लिहीन हे मला माहित नाही. तसे अनेक विषय सतत डोक्यात घोळत असतात. पण शब्दबद्ध करण्यासाठी निवांतपणा मिळणं दुरापस्त होतंय. बघूयात काय होतंय ते. जास्त वेळ पेनापासून स्वतःला दूर ठेऊ शकत नाही हे मात्र खरं आहे.

 

    कोरोनान जवळजवळ जग कवेत घेतलं. आपणा सर्वांना खरंच थांबावं लागलं. या जगात दृष्ट प्रवृत्या बळावत आहेत हे निश्चित आहे. मग त्या आपल्या आसपास असो किंवा देशाच्या आसपास. कोरोना हा असाच दृष्ट पृवृत्तीच्या लोकांच्या विचारसरणीतून जगभर हाहाकार माजविण्यासाठी पासरवलेला रोग आहे. रोग कुठून व कसा आला यावर चर्चा करण्याच हे व्यासपीठ नाही. पण सर्वाना कामाला लावलं हे मात्र खरंय. चीनचा आधुनिक छुपा साम्राज्यवाद व विस्तारवाद आपल्या मुळावर उठला आहे. वास्तविक सध्य परस्थितीत विस्तारवादी धोरण शक्य नाही. प्रत्येक देशानं असलं धोरण अवलंबल तर जगाचा विनाश अगदीच जवळ येईल. वैश्विक विचारांची गरज जगाला आहे. येणाऱ्या काळात हे वैश्विक नेतृत्व भारताला करावं लागणार आहे. इथली माती अशा सुपीक विचारांनी पावन झाली आहे. त्यामुळे भविष्यातील जगाचे नेतृत्व भारताकडे येणार आहे. जग विनाशपासून वाचवण्याची अलौकिक ताकद भारतीय संस्कृतीत आहे.

 

    सध्य परिस्थितीत आपल्याला अनेक गोष्टी नव्याने शिकून घ्याव्या लागल्या. हात धुणे, अंतर ठेवणे, तोंडाला मास्क लावणे, इत्यादी गोष्टी आपल्या समाजाच्या जवळपास अंगवळणी पडल्या आहेत. आपल्यासाठी ते योग्यच आहे. याव्यतिरिक्त कोरोनाकाळात अनेकांनी जोरदार पैसे कमावले. जणू ही त्यांच्यासाठी सुवर्णसंधी होती. अनेकांना अतोनात हाल सोसावे लागले. अनेकांच्या कुटुंबातील सदस्य आजाराला बळी पडले. सामाजिक भीतीतर पुढील अनेक वर्षे राहील. माणस माणसापासून अंतर ठेवून जास्त दिवस जगू शकत नाहीत. माणसामाणसात संशयाचा पीक अधिक बाळावतय. त्यामुळे अनेक सामाजिक संदर्भ बद्दलताहेत.  हे न भरून येणार नुकसान आहे. प्रश्न असा पडतो की याला जबाबदार कोण? चीन की आपण? त्याशिवाय यावर उपाय काय? भविष्यात असे विषाणू हल्ले होणार नाहीत याची खात्री काय? त्यामुळे यावर खोल विचार होणं आवश्यक आहे. चिंतन होणं गरजेचं आहे. भविष्यातील आपली गरज व दिशा याच नियोजन करावे लागेल.

 

    देशादेशातील वाद करोनापर्यंत गेला. जग एका अनोळखी आजाराशी झुंज देतंय. आपली मनं साफ होणं यानिमित्ताने गरजेचे  होऊन बसले आहे. जरी विस्तारवादी धोरणामुळे आपण चीनला दूषणं दिली तरी आपल्या जवळच बरकाव्याने पाहिलं तर हे विस्तारवादी धोरणं  छोट्या-मोठ्या प्रमाणात सर्वत्र दिसेल. धनाचा किती संचय केल्यानं आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे जगता येईल याचं उत्तर कोणाला देता येत नाही. त्यामुळे संपत्ती संचयात आयुष्य पुढे जातंय व चांगले विचार मागे राहताहेत. चांगले विचार घेऊन हे जग आत्ता आहे त्यापेक्षा सुंदर करण्याचा प्रयत्न प्रत्येकानं करावा. लेखमाला सुरू करून हे जग सुंदर करण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न होय. शेवटी चांगले विचारच तारणार आहेत. मला याची स्पष्ट कल्पना आहे की माझे प्रयत्न छोटे आहेत. पण असेच छोटे छोटे प्रयत्न शेवटी जग सुंदर, मनाने निरोगीव आशावादी बनवणार आहेत. इतरांविषयी चांगली भावना जग सुंदर करण्याचा प्रयत्नच आहे. 

 

 

 

   सध्या सोशल मीडियाचा वापर लोकप्रियता मिळवण्यासाठी जास्त होतोय. जवळचा लांबचा पाहून क्रिया व प्रतिक्रिया दिल्या घेतल्या जातात. खरं काम बाजूला पडतं. लोकप्रियतेच्या नावाखाली आपण दुसऱ्याचा वेळ व अक्कल कामातून घालवतोय याची कल्पनाही यांना नसते. प्रत्येकाने खरंच आपल्या कुवतीप्रमाणे पोस्ट कराव्यात. स्पष्टपणे सांगायचे तर हे लिखाण मी सवंग लोकप्रियतेसाठी केले नाहीत. माझ्या लोकांना मला काहीतरी द्यावं असं वाटतं होत. देताना ते सर्वोत्कृष्ट असावं एवढीच अट होती. हे लिखाण चांगलं आहे किंवा नाही हे मात्र मला माहित नाही. ते आपण सुज्ञ वाचकांनी ठरवावं. मराठीतील माझा हा पहिलाच प्रयोग....! व्याकरणाच्या अनेक चुकाही असू शकतात. माझ्या चुका मला मान्य आहेत. आपण त्याबद्दल मला माफ करावे. व्याकरणाच्या चुका होतात म्हणून लिहायचं नाही ही चूक असू शकते. ती भीतीही आहे. ती उराशी बाळगून मी लिहिणार नाही. लेखन हे धाडस आहे. मी ते धाडस केलं आहे. भविष्यात यात सुधारणा होईल हे निश्चित.

 

   आता वळूयात मुख्य लिखाणाकडे. सर्व लेख दीर्घ होते यात शंका नाही. सोशल मीडियातून असं दीर्घ लिखाण नाकारलं जात याची स्पष्ट कल्पना मला आधीपासूनच होती. आपल्यापैकी अनेकांनी लेख संपूर्ण वाचणे टाळले, याचीही जाणीव मला आहे. त्यात आपणा कोणाची चूक नाही. वास्तविक आपल्याकडे आता प्रदीर्घ लिखाण वाचण्यासाठी वेळ नाही. व्यावहारिकदृष्ट्या असले लेख लिहिणं योग्य नाही. यात आपण लोकांचा वेळ घेतोय असंही अधूनमधून वाटून गेलं. मध्यंतरी प्रत्येक लेखाचे दोन भाग करून प्रसारीत करावेत असंही मनाला वाटलं. त्यामुळे जी कमिटमेंट मी आधी केली होती, त्याला बाधा येत होती. त्यामुळे तोही विचार मी मनातून काढून टाकला. आहे ते योग्य समजून दर सोमवारी वाचकांसमोर ठरल्याप्रमाणे आलो. सुदैवाने संपूर्ण लेखमाला पूर्णही झाली. ही सर्व 'त्याचीच' लीला मी मानतो.

 

  देश व जग कोरोनाशी झुंजताना आपणही मागे राहू नये असं सतत वाटलं. आमच्या अनेक शिक्षक बांधवांच्या सेवा कोरोनासाठी अधिग्रहित केल्या गेल्या. मी पाहिलं, सर्व शिक्षकांनी या सेवा समर्पकभावनेने केल्या. ही तर खरी देशसेवा आहे. तसा आमचा शिक्षक सांगेल ते काम निमूटपणे करतो. विशेषतः समाजाला जास्त गरज असेल तिथं तो हजर असतो. कोरिनाकाळात कोरोना सर्वेक्षण, वॉर्डबॉय, चेकपोस्ट, क्वारंटाईन ड्युटी, इत्यादी ठिकाणी बिनबोभाट सेवा दिल्या. भीतीच सावट होतच. तरीही लोक मागे हटले नाहीत. छान सेवा केली. आपणही मागे असू नये असं वाटत होतं. उन्हाळभर क्वारंटाईन ड्युटी केली; पण प्रत्यक्ष कोरोना ड्युटी नाही. शेवटी ती वेळ आली व माझी अधिकृतपणे विसापूर ता. खटाव येथे चेकपोस्टवर पंधरा दिवसांसाठी नेमणूक झाली. नेमके माझ्या आधीच गावात सात रुग्ण एकाच दिवशी सापडले होते. सुरुवातीची भीती कर्तव्यात कधी परावर्तित झाली, हे समजलेच नाही. अतिशय आनंदाने व समाधानाने सर्व काळजी घेऊन सेवा बजावली.  मी कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील सैनिक असल्याचा अभिमान आहे. 

 

   आता पुन्हा प्रश्न लेखमालेवर येतो. पंधरा दिवस चेकपोस्टवर काम करताना लेखमाला सुरू ठेवणं मोठं जिकिरीचं काम होऊन गेलं. मुळात लेख प्रदीर्घ. त्यात मराठी टायपिंग, एडिटिंग मोठं अवघड काम. इतके मोठे लेख पूर्ण होतात की नाही हा प्रश्नच होता. त्यावरही उत्तर मिळालं. मला मिळणारा अधिकचा वेळ मी लिखाणासाठी दिला. प्रसंगी रात्री जागलो. खरं तर मी रात्री नव्हे, तुम्हाला दिलेल्या शब्दाला जागलो. विनाअडथळा कार्य सिद्धीस गेलं. अनेक प्रश्न असेच सुटतात, यावर माझा ठाम विश्वास आहे. त्रास तर होणारच. पण त्यात आनंद मानला की त्रास कमी होतो. तसंच झालं.

 

  दुसरं असं की दरम्यानच्या काळात तीन दिवस मी आजारी पडलो. त्यामुळे तीन दिवस काहीही करता आलं नाही. अशा वेळी केलेले संकल्प तुटतात की काय ही भीती सतत मनात डोकावते. एरवी आपण सगळेच अधूनमधून आजारी पडतो. एका टाईमबाऊंडमध्ये काम करताना तुम्हाला वेळ कमी असतो.  विशेषतः अशा वेळी कारणं चालत नाहीत. सामाजिक कमिटमेंटला काही किंमत असते. वादे आणि इरादे फक्त घोषणा करण्यासाठी नसतात. ते पूर्ण करावे लागतात. आता माझी पुन्हा चिंता वाढली. ती वाढणे स्वाभाविक होते. सुदैवाने तीन चार दिवसात बरा झालो व राहिलेल्या दिवसात पुढील अंक पूर्ण केला. एकूणच या लिखाणामुळे मी मात्र तीन महिने पूर्ण व्यस्त राहिलो. त्यामुळे लॉकडाऊन निवांत व व्यस्त घालवता आला. 

 

  जीवनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मार्ग मिळतात. मिळालेलं जीवन फार थोडं आहे. त्यात मनात विष घेऊन जगण्यात काहीच अर्थ नाही. बरं असलं विष कुठं खपत नाही. विषारी पेरणीचं पीक कधी आपल्या दारात उगवेल हे सांगता येत नाही. त्यामुळे या लेखमालेत व्यक्त केलेल्या विचारांना एक वेगळी उंची आहे. त्याचा लाभ कोणी घ्यायचा की नाही हा प्रश्न ज्याचा त्याने सोडवावा. पण कोरोनानंतरच्या जीवनात ही लेखमाला जगण्यासाठी नवी उभारी देईल यात तिळमात्र शंका नाही. याच काळात अगदी माझ्या जवळच्या अनेकांनी आत्महत्या केल्या. वास्तविक निराशावादी धोरण माणसाला मृत्यूपर्यंत घेऊन जात, नव्हे जिवंत मारते. अविचार मृत्यूच्या दाढेपर्यंत नेतात. आणि म्हणून चांगल्या विचारांची समाजाला सतत गरज आहे. ते कुठूनही मिळोत, पण सतत मिळाले पाहिजेत. जीवन कधीही नव्याने सुरू करता येते. जगताना सुंदर जगणं हा विचारांचा खेळ आहे. तो कधीही खेळता येतो. सुंदर जगण्यासाठी ही लेखमाला निश्चित उपयुक्त ठरेल.

 

  काही नविन देताना त्यात भर टाकावी म्हणून या लेखमालेतील हा अंतिम लेख. विषयाची निवड करण माझ्यासाठी खूपच सोपं होतं. अनायासे आपलं लिखाण संपत आलंय. तेंव्हा हा समारोप का होऊ नये? असा विचार मनात आला आणि तो झाला. मला माझ्या आयुष्यात अनेक निरोप वेदनादायक जाणवले आहेत. आजही वाटतात. मला आवडणारी माणसं निरोपाच्या यादीत आवडत नाहीत. त्यांना मी तरी माझ्या बाजूने निरोप देऊ शकत नाही. का कोणास ठाऊक पण माझ्या सहवासातील अशी अनेक गुणी लोकं आज माझ्याबरोबर नाहीत खरी; पण मनातून जाता जात नाहीत. ती माझ्याशी सतत हितगुज करतात. ती सदैव बरोबर लागतात. ती असतातही. त्यामुळे त्यांना माझ्याकडून निरोप मिळणार नाही, हे खात्रीशीर आहे. पण त्यांच्या आठवणींचा समारोप मला करता येतो. शेवटी आपण एका संवेदनावर जगणारी माणस आहोत. त्यातून आठवणी जपण व त्या मनात जागवण म्हणजेच माणूसपण जागवण आहे. सध्याच्या जमाण्यात आठवण आली की फोन करता येतो. त्यामुळे जरी निरोप दिला तरी व्हर्चुअली ती व्यक्ती सोबत असल्याचा फील येतो. आपण सर्वजण असंच करतो.

 

 सर, एका दमात वाचून होत नाही, असा सूर अनेकांनी लावला. यापुढे जर मी आपणासोबत काही शेअर केलं, तर असं प्रदीर्घ न लिहता छोट्या भागात विभागणी करून वेळेची बचत केली जाईल. अनेकांनी कौतुक केलं. टीकाही कोणी केली असेल. कौतुक व टीका दोन्हीही मान्य....! आपण व्यक्त झालो हे मात्र खरे....! विचार चांगले असले तरी फार दिवस मनात ठेवले की ते अडगळ होतात. आता नवीन चांगली अडगळ साचली की पुन्हा भेटेन....! सर्वांनी स्वतःची व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी हि विनंती. लोभ असावा. 180920     ©Harish gore

 

Wednesday, 16 September 2020

चिंतन.......सद्भावनांचे.......११

 राजकारण


  मानवाच्या उत्क्रांतीच्या एका नव्या टप्प्यामध्ये टोळ्यांच्या रोजच्या भांडणांमध्ये त्यांचे म्होरके तयार झाले असावेत. कालांतराने या मोरक्यातून पुढे राजेरजवाडे यांची निर्मिती झाली असावी.  त्यानंतर त्या त्या प्रदेशासाठी तो राजा अशी पद्धत रूढ होत गेली असावी.  त्यात नंतर प्रगल्भता येत येत आली असेल.  राजे राज्य करता करता राजकारण, समाजकारण, अर्थकारण, धर्मकारण, इत्यादी गोष्टीं उदयास आल्या असाव्यात. ह्या प्राचीन बाबी आहेत. त्या अशाच घडल्या असतील असे नाही. त्या अशा घडव्यात असेही नाही. पण उत्क्रांतीचा बहुतांश इतिहास याच मार्गाने जातो. माणूस अगदीच सुरुवातीच्या कालखंडापासून समूहाने वावरत होता. समूहाला ताब्यात ठेवण्याचं काम ज्याला चांगलं येत होतं तो मोरक्या....! त्यातून पुढे राजाची निर्मिती व मग पुढे समाजकारण, राजकारण, इत्यादी बाबींचा उदय होतो. प्रजेचे पालन-पोषण करत असताना, या सर्व बाजूंवर तितक्याच प्रकर्षाने व परिणामकारकरित्या लक्ष ठेवणे गरजेचे आहे. समाजहितासाठी वरील सर्व गोष्टी योग्य व फक्त आणि फक्त समाजहित डोळ्यासमोर ठेऊन करणं म्हणजे समाजकारण होय. धर्मासाठी राजानं झटणें, धर्माचे रक्षण शत्रूपासून करणं, धर्मस्वातंत्र्य प्रजेला बहाल करणे, इत्यादी गोष्टी करणे म्हणजे धर्मकारण होय. अशा अनेक बाबींवर राजा यशस्वीपणे तोंड देतो. आपल्या प्रजेला शक्य त्या पद्धतीने सुखी ठेवण्यासाठी राबतो. जेवढी प्रजा खूश, सुखी तेवढा राजा यशस्वी. प्रजेची हरएक प्रकारे सेवा करणे, म्हणजे राजधर्माचे पालन करणे. जो राजा योग्य प्रकारे राजधर्माचे पालन करतो, तो लोककल्याणकारी राजा होय. प्रजा व राजा यांचा ताळमेळ योग्यप्रकारे झाला पाहिजे. त्यामुळे राज्याचे कल्याण होते.  राज्याची प्रगती होते.

 आपण सगळेजण एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावरून आत येऊ पाहतोय. नव्हे आलोय सुद्धा...! सध्यातरी आपण प्रगत समाजामध्ये आहोत. वरील संकल्पना जशाच्या तशा आपल्याला लागू होत नसल्या तरी वेगवेगळ्या माध्यमातून त्या सगळ्यातून आपण जात आहोत. अर्थकारण, समाजकारण, धर्मकारण व राजकारण या सर्व बाबींना आपण स्पर्श करतो. जोपर्यंत समाज व्यवस्था अस्तित्वात आहे, तोपर्यंत या बाबी जिवंत राहतील. किंबहुना त्या जिवंत ठेवल्या जातील. कारण उत्तम समाज व्यवस्थेसाठी पोषक अर्थव्यवस्था, निकोप समाज व सर्वव्यापक राजकारणाची आवश्यकता असते.

 समाज अनेक रूढी, परंपरा, श्रद्धा व अंधश्रद्धा या व अशा अनेक गुण व अवगुणांनी व्याप्त आहे. त्याच्यामध्ये चांगले व वाईट गुण आहेत. पूर्वी टोळीयुद्ध होत. वर्चस्व सिद्ध करण्यासाठीच ही टोळीयुद्ध होत होती. त्यानंतर राजा राजांमध्ये लढाया झाल्या. त्याही वर्चस्वाच्या लढाया होत्या. अशा लढाया करून त्या राजाचे राज्य किंवा प्रांत काबीज केला जात होता. त्यानंतरच्या काळामध्ये देशादेशात युद्ध झाली. आपापल्याला देशाचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ती युद्ध  होती. अशा अनेक युध्दांमुळे समाजावर खोल परिणाम झालेले दिसून येतील. त्यातील काही युद्धे तर अतिविनाशकारी होती,  हे आपण जाणतो. युद्धातील चांगल्या व वाईट परिणामांचा प्रभाव थेट समाजावर होतो. युद्धातील दाहकता समाजावर शेकली जाते. युद्धनीती समाजाला डोळ्यासमोर ठेवून आखली जाते. युद्धातील अनेक कावे व डाव समाजाचे रक्षण किंवा विनाश करण्यासाठी आखलेले असतात. देशांतर्गत झालेल्यां युद्धामध्ये अशी युद्धे अनेक देशांनी जिंकलीतही. पण युद्धाचे परिणाम अनेक वर्षांपर्यंत तिथल्या समाजव्यवस्थेवर झालेले आपणास पहावयास मिळतील. दुसऱ्या महायुद्धानंतर अशा प्रकारची दाहकता जगासमोर आली. दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक राष्ट्रे अक्षरशः भिकेला लागली. रशिया व अमेरिका सोडली तर बाकी जवळजवळ जग पुढील अनेक दशकं गरिबी व सामाजिक विषमतेचा सामना करीत होती. युद्ध सर्व गोष्टींवर सर्वार्थाने उत्तर असू शकत नाही. युद्धाला योग्य प्रकारे कलाटणी देता येऊ शकते. युद्ध करण्याने युद्धासाठीचे प्रश्न सुटतीलही. पण युद्ध न करता हे प्रश्न सोडवण्यासाठी हुशार, मुत्सद्दी राजकारण्यांची आवश्यकता असते. ठाम तत्वे घेऊन, तितक्याच ठामपणे समाजापुढे मांडणारा तत्त्ववेत्ताच युद्धातला दुसरा पर्याय आहे.

 भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामामध्ये अनेकांनी प्राण गमावले. सर्वस्व अर्पण केलं. सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रजांवर आक्रमण करून, युद्ध करून, देशाला स्वातंत्र्य मिळवूयात असा विचार केला. त्यांचा तो विचार काही अंशी पूर्णत्वास जाऊ शकला नाही. कदाचित इथल्या मातीला रणसंग्रामचा विचार रुचला नसावा.  कोणतही कारण असूदेत. सुभाषचंद्र यांचा बेत तडीस गेला नाही. अनेकांनी देश स्वतंत्र करण्यासाठी कंबर कसली.  भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सुभाषचंद्र बोस यांच्यानंतर लोकमान्य टिळक  उठून दिसतात. टिळकांनी जहाल विचारसंघर्ष स्वातंत्र्यप्राप्तीसाठी केला. अनेक जळजळीत अग्रलेख लिहून जणू इंग्रजांच्या बापालाही आपण घाबरत नसल्याचे त्यांनी अनेक वेळा दाखवून दिलं. टिळकांचा हा प्रयत्नही देश स्वतंत्र करण्यासाठी पुरेसा ठरला नाही. पूर्ण स्वातंत्र्याची व्याख्या टिळकही पूर्ण करू शकले नाहीत. दरम्यानच्या काळात अनेक योद्धे आपापल्या परीनं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कंबर कसत होते. कमीअधिक प्रमाणात ते त्यात यशस्वीदेखील होत होते. त्यानंतरच्या कालखंडामध्ये मोहनदास करमचंद गांधी यांचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला व स्वातंत्र्यप्राप्तीची संपूर्ण समीकरणच या माणसाने बदलून टाकली. 

 भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या प्रवासात गांधीजींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या कालखंडामध्ये महात्मा गांधीजी  नसते तर कदाचित अनेक रक्तरंजित संघर्ष आपल्याला पहावयास मिळाले असते.  देश फक्त भांडवलशाही किंवा अर्थकारणावर कधीच चालू शकत नाही. कोणताही देश त्या देशाला दिलेल्या विचारांवर चालतो. तो विचारांचा वारसा जोपासतो, विचारांचे सौंदर्य अभ्यासतो व शक्य असल्यास त्या सुंदर विचारांच्या पायघड्या स्वतःच्या आयुष्यात अंथरतो. भारतामध्ये असे विचार पेरण्याचे काम महात्मा गांधीजींनी केलं. देशवासियांनी त्यांचे विचार मान्य केले व कालांतराने स्वीकारले. त्या काळात देशवासीयांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतले. त्यांना साथ दिली. तीही मौलिकपणें.....! देशाने गांधीजींना बळ दिले.  पाहता पाहता सत्याग्रह, अहिंसा, मुकमोर्चे, इत्यादीमध्ये देश अखंड बुडला. स्वातंत्र्यप्राप्तीची नवीन पद्धती गांधीजींनी शोधली. सुरुवातीसुरुवातीला गांधीजींची ताकत इंग्रजांना ओळखता आली नाही. गांधीजी स्वतःच्या तत्त्वज्ञानावर प्रचंड ठाम होते. त्यांना विचलित करण्याची हिंमत कोणातच नव्हती.  गांधीजींनी अत्युच्च मुल्ये घेऊन स्वतःच्या आयुष्याची आखणी केली होती. सुंदर मूल्यांमध्ये बदल त्यांना कदापि मान्य नव्हता. एक अनोखी,आग्रही व ठाम भूमिका गांधीजींनी संपूर्ण देशासमोर ठेवली. लढ्याला व्यापक स्वरूप दिले. संपूर्ण समाज अक्षरश ढवळून निघाला. चैतन्याचा संचार जेव्हा समाजामध्ये होतो तेव्हा परिवर्तन अटळ असते. असे परिवर्तन स्वातंत्र्यरूपानं संपूर्ण भारताने पहिले. भारतीय समाजव्यवस्थेची बांधणी मुळात प्रेम, परोपकार, सहिष्णुता, त्याग, अहिंसा, भूतदया या व अशासारख्या उच्च विचारांवर आधारित आहे. गांधीजींनी ह्या तत्वांना आपली हत्यारे बनवली. कोणत्याही रणसंग्रामामध्ये तरुणवर्ग जास्त सहभागी व अग्रेसर असल्याचं आपल्या लक्षात येईल. किंबहुना तरुणांशिवाय आपण लढाया जिंकू शकत नाही. भारतीय रणसंग्राम याला अपवाद आहे.  भारतीय स्वातंत्र्यलढयात तरुण तर होतेच; पण तरुणांबरोबर वृद्ध, बालके व महिलाही मोठ्याप्रमाणात सहभागी असल्याची नोंद आहे. त्यामुळेच हा लढा व्यापक झाला. जनमानसात रुजला. अशा प्रकारे सर्व समाज सहभागी होणे म्हणजे क्रांती व परिवर्तन होणारच....! ते झालंही. हा गांधीजींच्या विचारांचा विजय होता. भरताआधी व भरतानंतर अनेक देश स्वतंत्र झाले. यात समाजाच्या सर्व थरातील लोक सहभागी नव्हते. ही जादू फक्त भारतातच झाली आणि ती फक्त गांधीजींमुळेच झाली. कोणताही देश विचारांवर चालतो. समाजाला ठाम विचार देणारा कोणी तत्ववेत्ता असेल तर लोक त्याचे विचार स्वीकारतात व  आचरणात आणतात.  संबंधित व्यक्तीला डोक्यावर घेतात. गांधीच्या बाबतीत नेमकं तेंच झालं. गांधी विचारांची त्सुनामी आली जणू....! लोक भारावून गेले. लोकं त्यांच्या विचारांनी प्रेरित झाली; पण मग शेवटी प्रश्न असा पडतो की संपूर्ण समाज सहभाग गांधीजींनी कसा शक्य करून दाखविला? समाज आदर्श तत्वांची नेहमीच वाट पाहतो. अशी आदर्श तत्वे घेऊन येणाऱ्यासाठी समाज डोळे लावून वाट पाहतो. त्याचे निरीक्षण करतो. त्याचा अभ्यास करतो. त्याला ते पटले तर अशा विचारांना पाठिंबा देतो. साथ देतो. गांधीजी जगत असलेले तत्त्वें तर महान होतीच पण त्यांच्या आयुष्याची आखणी त्यांनी जाणीवपूर्वक या चांगल्या तत्वांना पोषक स्वरूपात करून घेतली होती. अंतर्बाह्य सत्य तत्व गांधीजींच्या आयुष्यात असल्याचे लोकांनी बारकाईनं पाहिलं. आदर्श तत्वाज्ञान अंगीकारण्यासाठीच असतं. ते अनेकांनी अंगीकारलं. त्यामध्ये वयाची अट नव्हती. संपूर्ण समाज सहभाग त्यामुळे आपोआपच सहज शक्य झाला. त्यामध्ये तरुण आले, वृद्ध आले, महिला आल्या व या सर्वांमुळे लहानगेसुद्धा आले. गांधीजीच्या स्वातंत्र्यलढ्यात 'चले जाव'चा नारा देणारे अनेक चिमुकले जीव होते हे विसरून चालणार नाही. अशाप्रकारे सर्व समाजस्तर रणसंग्रामात सहभागी झाला. हिंसा प्रत्येक प्रश्नावर उत्तर कधीच असू शकत नाही. उलट भारतीय समाज पारंपरिकरीत्या शांतताप्रिय आहे. भारताने कधीच कोणत्या देशावर आक्रमण केलं नाही. जगाच्या पाठीवर स्वातंत्र्यप्राप्तीसाठीचा कोणत्याच देशाचा लढा शांततापूर्ण नाही. किंबहुना लढा म्हटले की हिंसा आलीच; पण जगात भारत हा एकमेव देश आहे, जिथे लढा झाला पण हिंसा झाली नाही. अहिंसेने, सत्याने व उच्च तत्त्वांनी भरून तो लढा झाला. क्रांती झाली पण रक्तपात झाला नाही.  क्रांती झाली पण ती  रक्तरंजित लढाई नव्हे तर प्रभावी विचारांची झाली. गांधीजींचे तत्वज्ञान सगळ्या देशासाठी अत्यंत उपयुक्त ठरलं. गांधीजी त्यात पूर्णपणे यशस्वी झाले. भारतीय समाजव्यवस्थेवर गांधींचा प्रभाव खोलवर रुजला गेला. जनतेला युद्ध कोणत्या स्थितीत मान्य नसते. संघर्षातून नवीन संघर्ष जन्माला येतो. युद्धातून नवीन युद्ध जन्म घेतं. युद्धाशिवाय संघर्षाची व्याख्या पूर्ण होत नाही. युद्ध व संघर्ष एकच आहेत. गांधीजींनी मात्र युद्ध व संघर्ष वेगळे केले. संघर्ष केला पण युद्ध नाही.गांधीजी जिंकले पण लढाई झाली नाही. स्वतंत्रप्राप्ती झाली पण अतिशय कमी रक्त सांडून झाली. त्यानंतरच्या भारताच्या जडणघडणीत गंधाजींचे विचार दिपस्तंभाप्रमाणे आधारभूत मानले जातात. यापुढेही आपण गांधीजींच्या विचारांना ज्या ज्या वेळी फाटा देऊ तेव्हा तेव्हा आपल्याला त्याची जबर किंमत मोजावी लागेलं. भारत व गांधीजी हे अतूट नाते आहे. गांधी विचाराने हा देश जगभर ओळखला जातो.

 स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा भारत देशाचा प्रवास फक्त राजकारण या एकाच गोष्टीभोवती सुरू आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गांधीजींनी देशाचं नेतृत्व करावं असं मत अनेकांनी व्यक्त केलं. ठामपणे नकार देत गांधीजी त्यापासून जाणीवपूर्वक दूर राहिले. कदाचित तो आपला राजकिय  तोटा झाला असंही म्हणावं लागेल. गांधीजींशिवाय स्वातंत्रोत्तर सुरू झालेला देशाचा राजकीय प्रवास आज मितिस अत्यंत भयंकर स्थितीत पोहोचल्याच आपल्या लक्षात येईल. सत्तेसाठी कोणत्याही  थराला पोहोचणारे  राजकारणी समाजासाठी घातक आहेत. माझ्या मते गांधीजी जर राजकारणात सक्रिय झाले असते तर तिथेसुद्धा त्यांनी आपल्या विचारांचा ठसा उमटवला असता. त्यामुळे अनेक आदर्श तत्त्वें राजकारणात समाविष्ट झाली असती. राजकारणाला; विशेषतः भारतीय राजकारणाला नैतिकतेची किनार गांधीजींमुळे लागली असती, यात दुमत असण्याचे कारण नाही. भारतीय राजकारणाचा दर्जा उच्च स्तरापर्यंत पोहोचला असता. निकोप समाजव्यवस्था त्यामुळे निर्माण झाली असती. राजकारणातील सत्तापिपासूवृत्ती बळावण्यास काही प्रमाणात आळा बसला असता. आजचा राजकारणी सत्तेसाठी वर्तणुकीचा कोणताही स्तर लिलया पार करतोय. गांधीजींच्या राजकीय सहभागामुळे दर्जात निश्चित सुधारणा झाली असती. त्यांच्या राजकारणाचा आदर्श नवीन येऊ पाहणाऱ्या राजकारण्यापुढे राहिला असता. सध्या झालीय इतकी राजकारणाची वाताहात कदाचित झाली नसती. गांधीजी राजकारणात असते तर कदाचित कल्पनेपलीकडे राजकारणाचा प्रवास आपल्याला पहावयास मिळाला असता.

    राजकारणामध्ये काही विचार घेऊन समाजापुढे जावे लागते. राजकीय गुरूंची आवश्यकता व उपयुक्तता फार मोठी आहे. राजकारणातील भीष्माचार्य म्हणजे राजकारण पूर्णपणे त्यांच्या अंगी असल्याचे मानले जाते. यशवंतराव चव्हाणांनंतर महाराष्ट्रामध्ये आदर्श घ्यावा असे फारच कमी राजकारणी उदयास आले. कोणत्याही राजकीय व्यक्तीचा राजकीय प्रवास अनुकरणाने सुरू होतो. राजकारण हे काही आखाडे बांधून केले जाते. असे धूर्त आराखडे मनामध्ये तयार करण्यासाठी धूर्त व हुशार गुरूंची आवश्यकता असते. राजकारण स्वतःपासून सुरू होऊन समाजाजवळ व समाजहितासाठी संपलं पाहिजे. राजकीय व्यक्तीचा प्रवास स्वतःपासून सुरु होऊन तो समाजाच्या कल्याणामध्ये संपला नाही तर मोठाच अनर्थ संभवतो. उत्तम गुरूंचा उत्तम शिष्य स्वतःच स्थान मजबूत करून समाजाच हित साधल्याशिवाय गप्प बसत नाही. राजकारण स्वतःपासून सुरू होऊन स्वतःभोवती संपलं तर त्यातून राजकीय स्वार्थ साधला जातो.  त्यामुळे अशा व्यक्तीजवळ प्रचंड माया साचते व समाज प्रगतीपासून वंचित राहतो.  पैशातून पैसा निर्माण होतो व समाजामध्ये अराजकता फोफावते.  अज्ञान व आश्वासनांच्या भुलथापांत समाजाला गुरफटून ठेवले जाते. स्वतःचा विकास एवढी एकच गोष्ट केंद्रबिंदू मानून राजकीय व्यक्ती राजकारण करते. एकूणच समाजहितासाठी ही बाब अत्यंत धोकादायक आहे. सध्यातरी आपल्याकडे या अशा गोष्टींना पर्याय नाही. हे आपण सहन करतोय. अशा बाबी सहन करताकरता त्यांची सवय होते. सर्वार्थाने समाज मुका होण्याची वेळ हीच असते. समाजाची ताकद वेदनारहित होते. अशा बधिर समाजाला राजकीय व्यक्तीचं राजकारण कारणीभूत असतं. मूक व बधिर समाज कोणतच भाषण देऊ शकत नाहीत. अज्ञानी लोक राजकारण्यांना जाब विचारू शकत नाहीत. एखाद्याने त्यातूनही जाब विचारण्याचा प्रयत्न केला; तर येनकेनप्रकारे त्यांचा आवाज थंड केला जातो. विकसनशील भारतावर मारलेला हा मोठा आघात आहे. अशाने विकसित भारताचे स्वप्न आपण कधीच पूर्ण करू शकणार नाही किंवा विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी खूप वेळ तरी जावा लागणार आहे.

   लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्याला लोकांनी निवडून दिलं तो लोकप्रतिनिधी....! भारताचा राजगाडा भारतीय घटनेनुसार चाललेला आहे. घटनेला सर्वोच्च स्थान त्यामुळेच आहे. देशहित डोळ्यासमोर ठेवून घटनेचे प्रत्येक कलम लिहिलं गेलं आहे. त्यामध्ये सामान्य माणसाचं हित अगदी बारकाईने जोपासले गेलं आहे. लोकप्रतिनिधींची निवड लोकशाही पद्धतीने होते. लोकप्रतिनिधींची  निवडप्रक्रिया व त्याला निवडून दिलेल्या कालावधी यामधील घटनांना राजकारण म्हणतात. भारतीय राज्यघटना जात व धर्मरहीत आहे. पण अनेक निवडणुकीत जातीचे उकारें उकरले जातात, धर्माच्या भिंती समाजासमाजात उभ्या केल्या जातात.  निव्वळ विषाची पेरणी केली जाते. जातीजातीमध्ये व धर्माधर्मांमध्ये हाडामासाचं वैर राजकारणी पेरतात व त्याचचं राजकारण होत. खऱ्या अर्थाने निपक्ष लोकप्रतिनिधींची निवड प्रक्रिया पार पडणे गरजेचे आहे.  राजकीय उमेदवारांचा प्रचाराचा स्तर उच्च दर्जाचा असावा. जिंकणं हा निकष डोळ्यासमोर ठेवून साम, दाम, दंड व भेद या नीतीने समाजामध्ये मतांची मागणी होते. बरं जातीरहित व धर्मरहित प्रचार करायचा म्हटलं तरी प्रतिस्पर्धी उमेदवार आपले मनसुबे धुळीस मिळवेल ही भीती उमेदवारांच्या मनात असते. जिंकण्याची जिद्द व प्रतिस्पर्ध्याच्या प्रत्येक कुटील डावावर प्रतिडाव रचण्यानं राजकारणातील रंग वाढतात. ही स्पर्धा निकोपापासून विकोपापर्यंत जाते. उमेदवारांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाही काही प्रमाणात कमी पडते. एकूणच  लोकशाहीलाच हरताळ फासला जातो  व एकाची लोकप्रतिनिधी म्हणून निवड होते. दरम्यानच्या काळात बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलेलं असतं.  निवड चुकल्याचे बऱ्याचदा आपल्या लक्षात येते; पण तोपर्यंत नवीन ताजे जिंकून आलेल्या प्रतिनिधीचे राजकारण सुरू झालेले असतं. त्या राजकारणाला समाज बळी पडतो. विकासकामेही होतात; पण तुलनेनं राजकारण जास्त होतं. काही इलाज चालत नाही. अशा लोकप्रतिनिधींचं बोट धरून चालावं लागतं. समाजहितासाठी तेच गरजेचे आहे. समाजाच्या तळमळीसाठी व त्यांच्या विकासासाठी झटणारे हजारो लोकप्रतिनिधी  भारताला हवे आहेत. सत्तेचं राजकारण स्वहितासाठी वापरणं समाजाच्या पथ्यावर पडतं; पण तळमळीने समाजाला विकसित करणारा लोकप्रतिनिधी डोक्यावर घेतल्याशिवाय समाज स्वस्थ बसत नाही.  स्वातंत्र्यप्राप्तीनंतर  इथं अनेक गोष्टी करायच्या राहून गेल्यात. आपल्या राजकारणाचा प्रामुख्याने त्यासाठी वापर करणारा राज्यकर्ता जनतेच्या नजरेतून हिरो ठरतो. असे अनेक लोकप्रतिनिधी ज्यांना राजकीय वारसा किंवा वरदहस्त नसताना निवडून आलेत व तें लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेत. शिक्षण, आरोग्य व दळणवळण या मूलभूत गरजांबरोबरच औद्योगिक वसाहत निर्माण करून रिकामटेकड्या हाताला काम देणाऱ्या लोकप्रतिनिधींची समाज सदैव वाट पाहतो. चोखंदळ नजरेतून पाहिल्यास, ग्रामीण भारतात बेकारांची संख्या प्रचंड आहे. अशांना काम व तें कामही सन्मानानं मिळणं गरजेच आहे. बऱ्याच वेळा काम मिळतही पण ज्या सन्मानाची तो त्या कामातून अपेक्षा करतो; तो सन्मान त्याला मिळत नाही. पर्यायाने कामाआधी त्याला लाचार केलं जातं. त्यामुळे कामात अनेक चुका करतो. बऱ्याचदा आर्थिक कुचंबणा होते. तुटपुंज्या पगारातील लचका असे राजकारणी तोडून नेतात. बरं कुठं वाच्छताही करता येतं नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मार खावा लागतो. असे प्रश्नही काही प्रमाणात सोडविले गेले पाहिजेत. ग्रामीण भारतामध्ये बेरोजगारीबरोबरच अज्ञान व अंधश्रद्धा यांचा सुळसुळाट झाला आहे. काही ठिकाणी शहरी भागही याला अपवाद नाही. शिक्षणाने समाजामध्ये परिवर्तन घडू शकते, यावर राज्यकर्त्यांचा विश्वास असला पाहिजे. समाजातील अंधश्रद्धा शिक्षणाने आपोआप संपण्यास मदत होते. अज्ञान व अंधश्रद्धा यातूनच अनेकांच्या हातून गुन्हे घडतात. अशांवर चाप बसवण्याची जबाबदारीही  राजकारण्यांची आहे. त्यानंतर आरोग्याचा प्रश्न आ वासून उभा आहे. भारतीय समाज गेली पन्नास-साठ वर्षे आजारी स्थितीत आहे; हे सांगायला कोणाची गरज नाही. आरोग्यव्यवस्था ठीक करण्यासाठी पुढील काही दशकं काम केलं तरी ते अपूर्ण राहील....! खाजगीपेक्षा शासकीय आरोग्यव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी लोकप्रतिनिधींना खूप वाव आहे. प्रत्येक गरीब व श्रीमंत व्यक्ती सरकारी दवाखान्यापर्यंत येईल अशी व्यवस्था तयार करणारा शासकवर्ग निर्माण झाला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठेही स्वार्थी राजकारण आणणं म्हणजे समाजाला आजारी ठेवणं होय. त्यानंतर दळणवळण आहे. रस्त्यांची दुरावस्था आपल्याकडे अनेकांची कंबरडी मोडून काढतात. रस्त्यांची गल्लीतगात्र अवस्थाच देशाच्या विकासासाठी धोक्याची घंटा आहे. देशातील रस्ते शरीरातील नाड्याप्रमाणे आहेत. त्यांची लांबी व मजबूती देशाची प्रगती सांगतात. आपल्याकडे कोण व कसे रस्ते बनवतात हा संशोधनाचा विषय आहे. सर्वप्रथम असे रस्तेच का बनवले जातात हा प्रश्न तयार होतो.  रस्ता म्हणजे संबंधित गाव व शहराचा प्राण आहेत, हे लक्षात न येण्याइत आपल्याकडील राजकारण अज्ञानी नाही. स्वतःच  घर भरून झाल्यानंतर तरी थोडं डांबर रस्त्यावर टाकावं. या भूमीचं आपण काही देणे लागतो; हेच अशी माणसे विसरून जातात. राजकारणाचा प्रवास असा दिशाहीन व विकास होऊनही विकासहिन होतो.  एकूणच अनेक ठिकाणी राजकारण होतं व समाज विकासापासून दूर राहतो. अशाप्रकारच्या राजकारणाचा समाजावर खोल परिणाम होतो. लोकशाहीत हुकूमशाहीची वृद्धी होते व समाजामध्ये विषमतेची बीजं रोवली जातात.

  राजकारण या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. गावपातळीपासून ते राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत इतरत्र सर्वत्र राजकारण आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशहिताला प्राधान्य दिले जाते. राष्ट्रीय स्तरावर राज्याचा विकास राजकारणातून साधला जातो. विभाग किंवा त्या त्या गटासंदर्भातील प्रश्न राज्यस्तरावरील राजकारणातून सुटतात. त्यानंतर अनुक्रमे जिल्हास्तर, तालुकास्तर व गावपातळीवरील राजकारण येतं. या सर्व स्तरात गावपातळीवरील राजकारण रंजक व चढाओढीचं ठरतं. अनेक मजेशीर किस्से ग्रामपंचायतीच्या निवडणूकीतीत घडतात. ज्यांना मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री बनण्याची स्वप्न पडतात, त्यांनी गावचा सरपंच होऊन पाहावं. ज्याने सरपंच म्हणून राजकारणाची सुरुवात केली व सरपंचकी शेवटपर्यंत टिकवली, तो राजकारणात कुठेही सहज निवडून येऊ शकतो. गाव, गावाच्या तऱ्हा, गावातील कार्यकर्ते व ठग संभाळणारा सरपंच हरहुन्नरी राजकारणी असतो. अनेक आश्वासन त्यांनी गावाला दिलेले असतात. काही पूर्णही करतो. काही शक्य नसतात. काही करायची नसतात; पण सरपंच नेहमीच मेळ घालणारं राजकारण करतो. गावाला घट्ट ठेवतो.

     औपचारिक राजकारण गावपातळीपर्यंत येऊन तिथच तें संपतं. त्यानंतर अनौपचारिक राजकारण सुरू होतं. हे अनौपचारिक राजकारण वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या वेळी घडतं. आपण उठल्यानंतर झोपेपर्यंत अशाच राजकारणाचा भाग होतो. कदाचित आपल्याला त्याची जाणीव नसते; पण ह्याच राजकारणाला आपल्यापैकी अनेकजण बळी पडतात. घराघरात असलं  राजकारण होतं. आप्तस्वकीयांत झालेलं राजकारण परस्परांत कटूता आणतं. अशी कटूता कमीअधिक काळ टिकते; पण इथं  राजकारण होतं हे मात्र नाकारता येत नाही. कुटुंबाचे सदस्य परस्परविरोधी अघोषित भेदभाव करतात.  विचारांची फारकत होते. त्यातून एकमेकांबद्दल इर्षा, द्वेष व मत्सर निर्माण होतो. कुटुंबाच्या एकजुटीला तडा जातो. सुखी घर कलहात कधी रुपांतरीत होतं, हे घरातील सदस्यांना समजत नाही. छोट्या-मोठ्या राजकारणाला आणखी एक उंबरठा बळी ठरतो. घराच्या भिंतींना तडा देणारं राजकारण घरासाठी घातक ठरतं. कुटुंबातील सदस्यांनी याचा बारकाव्याने अभ्यास करून कुटुंबहिताव्यतिरिक्त राजकारणाला थारा देऊ नये. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या हिताचे रक्षण होण्यास मदत होईल.

  कामाच्या ठिकाणी, कार्यालयात होणार राजकारण हे त्यानंतर अत्यंत मजेशीर असतं. अनेक डावपेच इथं रचले जातात. काही प्रत्यक्षात उतरतात; तर काहीच तसेच धुळीत मिळून जातात. कंपन्यांमध्ये कामगार व अधिकारी, अधिकारी व  वरिष्ठ अधिकारी,  वरिष्ठ अधिकारी व मालक यांच्यामध्ये पावलोपावली राजकारण दिसतं. अनेकांवर त्यातून अन्याय होतो. नको असलेल्यांच्या  गळ्यात माळा घातल्या जातात. या सर्व ठिकाणी राजकारणच होतं. अशा प्रकारच्या राजकारणापासून शासकीय कार्यालये तर कधी सुटत नाहीत. त्यामध्ये लोकहितार्थ राजकारण आणि स्वहितार्थ राजकारण होतं. राजकारणामध्ये कोणाला पायात घातलं जातं; तर कोणाला मांडीवर बसवलं जातं. कोणाला खांद्यावर; तर कोणाला डोक्यावर घेतलं जातं. त्यातून अनेक समीकरणांची गोळाबेरीज केली जाते व डावपेच आखले जातात. काही राजकारण्यांचे डाव यशस्वी होतात; तर काहींचे फसतात. यशस्वी झालेले हसतात; तर फसलेले मनाची समजूत घालतात. हसलेले व  फसलेले असे दोघेही  नव्या दमात पुन्हा राजकारणासाठी स्वतःला सज्ज करतात. राजकारणाचं वेड मात्र डोक्यातून निघत नाही. राजकारण व्यसनासमान आहे. त्याची सवय माणसाला स्थिर बसू देत नाही. किंबहुना जो स्थिर बसेल तो राजकारणातून अस्थिर झालाच म्हणून समजा....! राजकारण म्हणजे नशा आहे. पराभव झाला तरी त्याची झिंग डोक्यातून उतरत नाही. शेवटी राजकारण हे राजकारण असतं. ते तुमच्या आमच्या सर्वांसाठी, सर्वठिकाणी, सर्ववेळी होत असतं. असा माणूस शोधूनही मिळणार नाही, ज्याच्या बाबतीत राजकारण झालं नाही....! हे जीवन जगणे म्हणजेच एक राजकारणाचा डाव मांडणे आहे.त्यामुळे जरा जपून.....पुढे राजकारण सुरू आहे......सावध रहा....... हुशारीने जगा....... हुशारीनं जगणारा तो डाव जिंकतो. आयुष्याच्या प्रत्येक पावलावर राजकारण सोसावं लागतं. घरात राजकारण, समाजात राजकारण व कार्यालयात किंवा कामाच्या ठिकाणी राजकारण. अशा ठिकाणच्या राजकारणामध्ये लोकप्रतिनिधींच्या  निवडीच्या प्रक्रिया नसतात. असतात त्या अस्तित्व टिकवण्याच्या,वर्चस्वाच्या व जगण्याच्या अघोषित स्पर्धा.....! ह्या स्पर्धेतून अनेक खेळ्या होतात, डाव प्रतिडाव होतात. काही योग्य; तर काही अयोग्य.…..! काही  वरच्या तर काही खालच्या पातळीवरील राजकारण होतं. ह्या साऱ्या प्रक्रियेतून प्रत्येकाला जावं लागतं. अनेकजण यशस्वी होतात. अनेकांच्या वाट्याला निराशा येते; पण आपण प्रत्येकजण राजकारणी आहोत, हे मात्र तितकेच सत्य आहे.

  जनकल्याणासाठीच राजकारण समाजमान्य आहे. लोकशाहीला असं राजकारण मान्य आहे. राजकीय व्यक्तीच्या राजकारणाचा मुख्य भाग याच लोककल्याणासाठी वापर करणे म्हणजे यशस्वी राजकारण होय. समाजामध्ये अनेक असह्य लोक आहेत. गरजू, अपंग व दारिद्र्याच्या खोल दरीच्या चक्रव्यूहात फसलेले अनेक जीव यातनायुक्त अज्ञानी जीवनयात्रा जगतात. अशांसाठी राजकारण त्यांना जगण्यातील शक्ती व बळ प्राप्त करून देईल. अज्ञानांच्या घरी ज्ञानाचा दिवा जळेल. दलितांना योग्य न्याय मिळेल. स्त्रियांना सन्मान व समानता मिळेल. तरूणांच्या हाताला योग्य काम मिळेल. ही व अशी अनेक कल्याणकारी कामे मार्गी लागतील. समाजातील अडचणींचा सूक्ष्मपणे अभ्यास होणे गरजेचे आहे. समाज व राजकारणी यांचा योग्य मेळ म्हणजेच विकासाचे राजकारण होय. आपल्याकडे दुर्दैवाने आवश्यक तेवढे बारकाव्याने समाजाकडे राजकारणी पाहताना दिसत नाहीत. एखाद्या सत्तेच्या खुर्चीत बसला की त्या खुर्चीला डिंक लावल्याप्रमाणे चिकटून बसतात. सालोन् साल एकच  राज्यकर्ता पहावा लागतो. त्यातून विकास थांबतो. काळानुसार परिवर्तन आवश्यक आहे. वर्षामाघून वर्षे सत्तेत राहिल्याने  कदाचित जनहित डोळ्यासमोर न दिसता फक्त सत्ता दिसायला लागते. त्यातून हुकूमशाहीवृत्ती बळावते. अशी हुकूमशाही आपल्या लोकशाहीत न परवडणारी आहे. सत्तेमध्ये घराणेशाही येऊ पाहत आहे. ती आली तरी चालेल; पण त्याच्याबरोबर समाजहिताचं विस्मरण होता कामा नये. पिढ्यान पिढ्या एखाद्या मतदारसंघाची जहागिरी उपभोगणारे अनेक राज्यकर्ते क्षणात जनतेने घरी बसवले आहेत. हे आपण अनुभवले आहे. राजकारण ही अशा कुणा एकाची मक्तेदारी असता कामा नये. राजकारणामध्ये कर्तुत्वाला व समाजहिताला प्रथम प्राधान्य दिले गेलं पाहिजे. जो विकास करेल तो सत्ता भोगील. विकासापासून जनतेला वंचित ठेवणारा राजकारणी जनतेपासून दूर ठेवला पाहिजे. सत्ता स्वतःच्या हितासाठी नसून अविरतपणे जनतेच्या कल्याणासाठी आहे, याच भान जो राज्यकर्ता ठेवतो तो जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवतो. जनकल्याण, जनतेचा विकास व संबंधित क्षेत्राचा कायापालट या व्यतिरिक्त स्वहितासाठी स्वार्थी विचार करणारा राज्यकर्ता कदाचित जनतेची ताकद विसरतो. जनता अशा पुढाऱ्यांना परिवर्तनातून उत्तर देते. अगदी नको असं म्हणण्याची पाळी समाजावर येईपर्यंत, अनेक राजकारणी सत्तेचा उपभोग घेताना दिसतात. अशा अनेक ठिकाणी न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं परिवर्तन आपण पहिलं आहे. मनातील कामाची उर्मी संपल्यानंतर अशा राजकारण्यानी इतरांना काम करण्याची संधी दिली पाहिजे. दुर्दैवाने आपल्याकडे अशा गोष्टी घडत नाहीत. अटीतटीची लढत होते. लढ्यात एकजण जिंकणार आहे हे माहीत असते; पण तरीही हा लढा होतो. पैशाचा चुराडा होतो. अनेकांचे श्रम वाया जातात. नको असताना अनेक आश्वासने दिली जातात. समाजाची दिशाभूल होते. पराभवाच्या कारणांच विश्लेषण केलं जातं. शेवटी पुढील पंचवार्षिक निवडणुकीसाठी हरलेल्या  मनाची समजूत काढली जाते. संबंधीचा पराभव होऊनही मनाची समजूत काढून मन तयारकेलं जातं. भारतीय राजकारणातून असली मानसिकता हद्दपार करणे गरजेचे आहे.

 भक्ती आणि राजकारणासाठी समाजाची गरज असते. लोकांची आवश्यकता खूप आहे. देव मी जाणला आहे, त्याचे रूप सांगायचे आहे; पण लोक नसतील तर सांगणे शक्य नाही. संत नेहमी विरक्त जीवन जगताना आपण पाहतो, ऐकतो. विरक्तीमध्ये एकांत येतो. या एकांताला संतसुद्धा कधी कधी कंटाळतात. एकांतात मुखातून उच्चारलेले शब्द आसमंतात निःशब्द होतात. ज्ञान त्यातून कमी प्रतीचं होतं. त्याची अवहेलना ज्ञानी पुरुषांनी केली असं होतं. म्हणून संतांनी समाजप्रबोधन केलं. त्यामध्ये प्रवचन, कीर्तन, निरूपण, चर्चा, भजन, इत्यादी बाबी येतात. या सर्वांसाठी लोकांची आवश्यकता असते. लोक नसतील तर त्याची किंमत संपते. राजकारणामध्येही तसंच आहे. समाजाची उपयुक्तता खूप वर्णिली जाते. समाज किंवा जनता राजकारणापासून अलिप्त कधीच केली जाऊ शकत नाही; किंबहुना समाजापासून अलिप्त राहून केलेली कोणतीही गोष्ट राजकारण असूच शकत नाही. लोकशाहीमध्ये मतांच्या राजकारणापायी अनेक कटू बाबी समाजामध्ये विषासारख्या पेरल्या जातात. त्या विचारांची उपयुक्तता किंवा टाकाऊपणा, त्याचे परिणाम याचे घेणे-देणे समाज व राजकारणी या दोघांनाही नसते. गर्दी ही अल्प बुद्धीची असते असं म्हणतात. गर्दीला कोणता चेहरा नसतो. गर्दीत थोडेच दर्दी असतात. राहिलेले असेच असतात. राजकारणी नेमके याच गोष्टीचा फायदा उठवतात. विचार हे विकार आहेत. मोठ्याने बोलले तर आपल्याकडे असे विकारी विचार वेगाने समाजात पसरतात. त्वेषाने केलेले प्रत्येक भाषणाला आपला समाज मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतो. राजकारण करत असताना राजकारण्यांनी असले व्यर्थ खटाटोप व शब्दांचा भडिमार जनतेच्या पदरी देण्यापेक्षा विकास व परिवर्तनाच्या सत्यकथा समाजापुढे मांडणे, हे समाजासाठी कधीही चांगले. समाज व  राजकारणी यांच्यात परिपक्वता असेल तरच या बाबी घडतील. त्यातून राजकारण व समाजकारणही होईल. यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. आपल्याला यातून नवीन वैचारिक पातळी व प्रगल्भता पहावयास मिळेल. 

 प्रपंचात राहून राजकारण करणं यात नवे किंवा वावगे असे काही नाही. प्रपंच करून राजकारण करावें व या दोन्ही बाबी अत्यंत सावधपणे कराव्यात असें समर्थ रामदास स्वामी ठामपणे सांगून गेलेत.
          मुख्य हरिकथा निरूपण l दुसरे तें राजकारण
          तिसरे ते सावधपण l सर्व विषई ll
    धर्मकारण, राजकारण, सावधपण व क्षमा या गोष्टी प्रपंचाच्या पाया आहेत.  प्रपंचाला यामुळे यथार्थता मिळून जाते. तो सुरळीतपणे पैलतीरी जाण्यास मदत होते. राजकारणाला, म्हणून प्रपंचामध्ये अद्वितीय स्थान मिळते. राजकारण व प्रपंच सावधपणे करून किरकोळ अन्याय करणाऱ्यांना क्षमेचा धर्म दाखवा, असं समर्थांना अभिप्रेत आहे.  तसे केल्याने आपलं हित तर होतंच पण समाजापुढेही आदर्श निर्माण केला जातो. आपल्याकडे मात्र यापेक्षा विचित्र घटना पहावयास मिळतात. उसने पाचशे रुपये देत नाही, म्हणून खून करणारे महाभाग आपल्यात आहेत. क्षमा ही अशी जीवावर उठणारी क्रूर गोष्ट नाही. क्षमेचा व सावधपणाचा व्यापक अर्थ आहे. स्वार्थाच्या ठिकाणी दाखवलेला सावधपणा घातकी प्रवृत्तीच द्योतक आहे.असला सावधपणा अनेकांच्या मुळावर उठतो. आपण क्षमा करतो पण समोरचा आपल्या आवाक्याबाहेर किंवा परिस्थिती आपल्या विरोधात असेल तरच.....! ती क्षमा कधीच असू शकत नाही. जगण्याची ती एक चाल निश्चितच असेल. जगताना अशा चाली चालून फार अंतर कापू शकत नाही. त्यासाठी चांगले विचार असणे गरजेचे आहे. असल्या चाली क्षमेत कधीच रूपांतरित होऊ शकत नाहीत. म्हणून त्यांचा वेगळा व तटस्थ दृष्टिकोन ठेवून विचार केला गेला पाहिजे. सर्वार्थाने जगण्याला व जगण्यातील राजकीय रंगांना वेगळा अर्थ प्राप्त होईल. त्याने नवीन राजकीय व सामाजिक उंची प्राप्त होईल. 100514 ©Harish Gore

Monday, 7 September 2020

चिंतन......सद्भावनांचे......१०

                                                                    व्यथा

का कोणास ठाऊक पण प्रत्येकाला आपापल्या व्यथा मांडायच्या असतात. मी खूप खूप सोसलं. मी खूप सहन केलं. मी नसतो तर हे शक्यच नव्हतं. माझ्या इतका अपमान कोणीही सहन करणार नाही. मी होतो म्हणून आज हे सारं वैभव तुम्ही पाहत आहात. वगैरे, वगैरे. किती किती म्हणून गोष्टी आहेत, त्या सांगायच्या असतात. त्यातील व्यथा मांडायच्या असतात. मन मोकळ करायचं असतं. पण ते होत नाही. त्याचीही एक व्यथा होते. व्यथेत भर पडते पण व्यथा संपत नाही. संपत नाहीत करूण कहाण्या व त्यातील कारुण्यपूर्ण दर्दनाक काटेरी टोचण्या. या व्यथातून अनेक कथांचा जन्म होतो. व्यथा संपतात व इतिहास रचला जातो. त्याचं अध्ययन होतं, चर्चा होते व त्यातून व्याथांच्या कथा सुरसपणे सांगितल्या जातात.

 व्यथा वैयक्तिक, सामाजिक व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरही असू शकतात. काही शब्दच त्यातील भाव स्पष्ट करतात. जसे  प्रेम म्हटलं की अनेक गोष्टींचा बोध होतो. त्याचप्रमाणे व्यथा शब्द ऐकला तरी त्यातील व्यथा कानांना नकोशा वाटतात. अनेकांचे जीवन व्यथांशिवाय जातं.! तर अनेक जण व्यथातील मुख्य पात्राच्या भूमिकेत असतात. त्यांच्या वाट्याला आलेलं जीवन म्हणजे फक्त आणि फक्त व्यथा होय. व्यथांचा अंत व्हायला बहुदा बराच वेळ लागतो. अशा व्यथांचा अंत झाला तरी त्या आपल्या पाऊलखुणा त्या व्यक्तीच्या जीवनात खोलवर सोडून जातात. आपण लहानाचे मोठे होतो. समाजाच्या मुख्य प्रवाहात येईपर्यंत अनुभवाची शिदोरी बरोबर घेतो. एक व्यक्ती म्हणून स्वतःची ओळख निर्माण करतो. जीवन जगतो व जगता जगता या व्यथांचा भाग होतो. काहींच्या वाट्याला कमी तर काहींच्या वाट्याला करूण व्यथा येतात. व्यथांचा स्पर्श नसलेला माणूस शोधणे म्हणजे परिसाचा शोध  घेण्यासमान आहे. व्यथांशिवाय जीवाचं जीवन पूर्णत्वाकडे जाण जवळजवळ अशक्य आहे.

 व्यथा व  अडचण किंवा व्यथा आणि संकट यामध्ये खूप अंतर आहे. हिंदवी स्वराज्य निर्माण करताना शिवाजी महाराजांना अनेक संकटाना तोंड द्यावं लागलं. परकीय शत्रू व स्वकीयांनी महाराजांसमोर अनेक अडचणी निर्माण केल्या. त्या सर्वांचा महाराजांनी यशस्वीपणे सामना केला. अशा अडचणी किंवा संकट म्हणजे व्यथा नव्हे. त्या व्यथा नसून जनतेच्या व्यथा संपविण्यासाठी केलेले अतुलनीय शौर्य व पराक्रम आहे. रयत त्यातून सुखी झाली. व्यथांचा व्याप्ती कधीकधी कल्पनाशक्ती पलीकडील असते. व्यथा व्यक्तीला कधीकधी लाचार बनवते. स्वाभिमान विकायला भाग पाडते व व्यक्तिस्वातंत्र्यावर काही प्रमाणात मर्यादा येतात. व्यथांतून व्यक्त होणाऱ्या भावना असह्य असतात. त्यातील दुःख मन पिळून काढतं. त्याचे परिणाम व्यक्तीवर अनेक दिवस किंबहूना हयातभर राहतात. 
 सुख तोंडभरून सांगता येतं, तर दुःख डोळेभरुन दिसते. सुख व दुःख ही अशी कळतात. नदीचा प्रवाह व महापूर यामध्ये जो फरक असतो तो सर्वसामान्य दुःख व या अशा वेदनांमध्ये दिसतो. शब्द संपतील पण तरीही व्यथातील काही कहाण्या शिल्लक राहतील, अशी परिस्थिती निर्माण होते. ज्यांच्या वाट्याला अशा प्रकारचे जगण येतं, त्यांचा अनेक चांगल्या मानवीमूल्यांवरचा विश्वास कधीच उडालेला असतो. ज्याकडून कोणतीच अपेक्षा नाही, कोणतच ध्येय नाही, असं उजाड माळरान होऊन जातं जीवन. आपल्याला जगण्यासाठी प्रेम, स्वार्थ, ईर्षा, ध्येय, प्रेरणा,अहंकार, या अशा अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. दर्दनाक परिस्थितीतूनही अनेक जण बाहेर पडतात. मानाचं जीवन जगतात आणि इतरांना जगण्यातील आनंद शिकवितात. काहीजण जगण्यापुढे शरण जातात व स्वतःचं जगणं संपवितात. व्यथांच्या चक्रव्यूहात गुरफटलेल्या अनेकांना मार्गच सापडत नाही. जगण्यापेक्षा मारणं सोपं वाटतं. जगण्यापेक्षा मरण जवळच वाटतं तेव्हा ती विचारांची हारच मानवी लागेल. अर्थात हा मार्ग चुकीचा असला तरी त्याचं समर्थनसुद्धा करता येणार नाही. परिस्थितीला सामोरं जाणं काहींना अशक्यप्राय होते व इहलोक यात्रा संपवली जाते. राहिलेले काही वाममार्गाला जवळ करतात. काही नशेत स्वतःला खोलवर गाडून घेतात. अशा सर्वच ठिकाणी असह्य वेदनांचा डोंगर दिसून येईल. आयुष्यभर पुरेल इतक्या वेदना चहूबाजूंना दिसतील. अनेकजण व्यथांतून यशस्वीपणे बाहेर पडले तरी सर्वांना ते शक्य नसते. व्यथा प्रथम विचारावर घाला घालतात. त्यातून व्यथा अनेकांना लाचार बनवतात. भावनाशून्य जीवनचक्रात ती व्यक्ती गुंतते. किंबहुना तिला परिस्थिती अशा भावनाशून्य जीवन जगण्यास भाग पाडते. अनेकांना वेदना असतात. पण पर्वतांएवढ्या वेदनांचं ओझं डोक्यावर घेऊन पाऊल पुढं टाकण जवळजवळ अशक्यप्राय होतं. विवेकशून्य, भावनाशुन्य, प्रेमशुन्य आयुष्य निरर्थक आयुष्य ठरतं. जगण्याचा अधिकार सर्वांना आहे. मग अशा व्यक्तीच्या बाबतीत समाजाची कर्तव्य विस्मृतीत जाणं मानवतेला परवडणारे नाही. दुःख दिसूनसुद्धा बऱ्याच वेळा आपण दुःखी होत नाही. सर्वत्र आनंदीआनंद असल्याचा भास आपण तयार करतो. सत्याला नाकारतो. विवेकशून्य, भावनाशून्य होतो. समाजाच्या भावना जाणून हळवे होणारे सानेगुरुजी महाराष्ट्रातील होते, हे विसरून चालणार नाही. अशा दुःखांकडे निर्विकारपणे बघण्याने सामाजिक विषमतेची बीजे पेरल्याशिवाय राहणार नाहीत. सामाजिक विषमता कालांतराने समाजासाठी घातक ठरते. अनेक देशांमध्ये ही विषमता उद्रेकाच्या रूपाने बाहेर पडल्याचे चित्र दिसतं. अशा वेदनांची जाणीव समाजाला लवकर होण एकूणच समाजासाठी फायदेशीर आहे.

 व्यथा कपड्यावर पडलेल्या व न निघणाऱ्या डागांसारख्या असतात. कपडा फाटतो पण डाग निघत नाही. तसं काहीसं व्यथाचं होतं. जगताना त्याचा प्रवास कदाचित उत्तरार्धात सुखावह असेल पण मनावर कोरलेल्या त्या व्यथा डागांसारख्या आयुष्यभर साथसंगत करतात. मन शुद्ध होण्यापासून व्यक्तीला परावृत्त करतात. सततच्या टोचण्या आठवणरूपाने देतात. अशा टोचण्या आयुष्य पोखरुन टाकतात. मन उद्ध्वस्त करतात. आयुष्य त्यातून पुरतं झिजून निघत. दुःखाचा डोंगररांगातील प्रवास न संपण्यासाठी असतो. व्यथांतील कथा व कथेतून नव्या व्यथा जन्म घेतात. पण व्यथांचा प्रवास मात्र संपत नाही. 

 व्यथा ह्या कथन करण्यासाठी असतात. अनेक वेळा व्यथांच्या कथा सांगितल्या व ऐकल्या जातात. काही व्यथा मात्र मुक्यानेच  भोगल्या जातात व मुक्यानेच संपतात. अशा व्यथांना व्यक्त होण्यासाठी साधी संधीही मिळू नये, ही दुर्दैवी बाब आहे. अशा अनेक करूण कथा इथे जन्मतात व त्या अबोलपणे संपतात. आपला मागमूसही मागे न सोडणाऱ्या व्यथा दुर्दैवी होत. 

व्यथांतील काही कथा कदाचित शब्दात व्यक्त होतात तर काही शब्दांच्या पलिकडील असू शकतात. कुष्ठरोग झाला म्हणून  जगण्याचा अधिकार क्रूरपणे हिरावून घेणारे अनेक दैत्य आपल्यात लपून बसलेले आहेत. ज्यांच्यावर असा प्रसंग ओढवतो, त्यांच्या व्यथांचा अंत बहुदा त्यांच्या शेवटच्या श्वासाला होतो. रोगी शरीर, रोगी घर व रोगी समाज यांचा सामना करता करता अशी माणसं पुरती दमून जातात. दिवसाच्या प्रत्येक क्षणात संघर्ष व त्या संघर्षातून जगणं सुरू असतं. क्षणाक्षणात नवीन व्यथा व प्रत्येक व्यथेतून नवीन कथा उदयास येतात. कोणती कथा सांगायची व कोणती व्यथा लपवायची या द्विधा अवस्थेत अनेक व्यथा अबोल होतात. ह्या व्यथा फक्त आणि फक्त भोगण्यासाठी आणि त्याही एकट्यानेच भोगण्यासाठी असतात. क्षणाक्षणाला होणाऱ्या यातना सांगूनही संपणाऱ्या नसतात.  सांगूनही संपत नाही त्या व्यथा असतात.


 व्यथांचा जन्म का होतो हेही अभ्यासणे गरजेचे आहे. व्यथा अन्याय, अविचार, अज्ञान व परिस्थितीतून निर्माण होतात. हुकूमशाहीवृत्ती इतरांच्या व्यथांसाठी कारणीभूत ठरते. असे अघोषित हिटलर पावलोपावली आपल्याला दिसतील. ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्या अन्यायाची वाच्यताही अशांच्या तोंडून होत नाही. स्वतःच्या कृत्याचं समर्थन शेवटपर्यंत असे लोक करतात. स्वार्थ अविचाराला कारणीभूत ठरतो. त्यातूनही व्यथांचा जन्म होतो. इतरांच्या भावभावना जाणून जगणं हितावह होय. इतरांच्या भावना पायदळी तुडवण हा अन्याय होय. त्यातून व्यथा जन्माला येतात. त्यानंतर अज्ञान येते. अनेक  गुप्त धनासाठी  अनेक बालकांचा बळी जाणं हे कृत्य निव्वळ अज्ञान या सदराखाली मोडतं. अन्यायग्रस्त बाळ व त्याचे पालक यांना या व्यथा सोसाव्या लागतात. अत्यंत क्रूर व स्वार्थी लोक अशा प्रकारचे कृत्य करू शकतात. भावनांचा लवलेशही नसणारी क्रुरकर्मी व्यक्तिमत्व समाजाला लागलेली वाळवी आहेत. शेवटी परिस्थिती व परिस्थितीजन्य व्यथा येतात. अशा व्यथा परिस्थितीनुसार जन्म घेतात. त्या वेळची परिस्थिती त्यांची तीव्रता ठरवतात. भोपाळची वायुगळती, खिल्लारी किंवा गुजरातचा भूकंप, त्सुनामीने माजवलेला हाहाकार, अचानक पडलेला कोरडा किंवा ओला दुष्काळ, अपघात इत्यादीमुळे निर्माण झालेल्या व्यथा परिस्थितीजन्य मानाव्या लागतील. अशा व्यथा सामाजिक भीती व असुरक्षितता निर्माण करतात. अशा व्यथा वैयक्तीक व सामाजिक पातळीवर अनेक पाऊलखुणा सोडून जातात.

 व्यथा कशाही जन्म घेऊ देत, त्यांचा जन्म झाला की संबंधित व्यक्ती पुरती हैराण होते. अनेकांचा जगण्यावरील विश्वास उडून जातो. ज्योतिषशास्त्र व व्यथा यांचा जवळचा संबंध असावा. आपल्याकडे शनीची साडेसाती सुरू झाली की व्यथा सुरू होतात, असं पंचांग मानतं.  साडेसाती बरेच दिवस चालते असं मानतात.  खरंतर हा विषय तसा माझ्याशी निगडित नाही. पण व्यथांचा मात्र साडेसातीशी संबंध आहे. अशा साडेसातीरूपी व्यथांना भलेभले घाबरतात. पंचांग, ग्रह, राशी, तारे आणि नशिब यांचा जवळचा संबंध लावणारे अनेकजण भेटतील. आपल्याकडे पंचांग व नशिब याशिवाय केवळ कष्ट व जिद्द यावर भर देणारेही अनेक धाडसी लोक पहावयास मिळतात. ग्रह व तारे यापेक्षा स्वतःच्या हिमतीवर विश्वास असावा. महात्मा फुले यांचे विचार याबाबतीत क्रांतिकारी ठरले. रूढी, चालीरीती यांची भीती दाखवून स्वतःच पोट भररणारे यांनी वेळीच सावध व्हावे. शिक्षण व लोकजागृती करणारे फुले हे आधुनिक समज परिवर्तक आहेत. आजही त्यांचे विचार युगपरिवर्तनाचे काम करताहेत. त्यांना गुरू मानून आंबेडकरांनीही तोच वारसा जपला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत असत, असं कृत्य करू नका ज्यांच्यामुळे भीती वाटेल. आपण भीती वाटण्यासारखं काम केले नाही तर भिण्याचे कारण नाही. काहींच्या हातून कळत नकळत  गुन्हे घडतात. घडलेल्या प्रत्येक गुन्ह्याची नोंद होत नाही. अशा नोंद न झालेल्या गुन्ह्यांची नोंद कदाचित शनीच्या डायरीत होत असल्याने अनेक जण घाबरतात. फुले-आंबेडकरांचं तत्त्वज्ञान जगणाऱ्याला साडेसातीची भीती यत्किंचितही नसावी. देव-देवतांचा धाक समाजावर असणें हे चांगलंच. पण विनाकारण मनात भीती बाळगणही चुकीच आहे. 

 व्यथा कोणत्याही वयात किंवा कोणत्याही स्थितीत असू देत. व्यथा कधीच रम्य असू शकत नाहीत. व्यथातून आनंद कधीच मिळत नाही. बालवयापेक्षा, तारुण्यापेक्षा वृद्धापकाळातील व्यथा सर्वांना भोगाव्या लागतात. शरीर जीर्ण तर मन कोमेजून गेलेली अवस्था म्हणजे वार्धक्य.  वार्धक्यात संगसोबत चांगली मिळाली तर त्या व्यक्तीच्या व्यथा कमी होण्यास मदत होते. अनेकांच्या वाट्याला वर्धक्यात अपमानास्पद वागणूक मिळते. जगण्याचा अधिकार काढून घेणारे सुपुत्र अनेक आईबापांच्याच्या वाट्याला येतात. काळाबरोबर लेकाचे घाव झेलणारे आईबाप परिस्थितीपुढे शरण जाऊन बंदिवासात  आयुष्य व्यतीत करताना मी पाहिले आहेत. त्यांच्या व्यथा चार भिंतीच्या आत बंदिवासात असतात. क्वचितप्रसंगी अशा व्यथा बाहेर आल्या तर त्या समाजाला कळतात. पण अनेकवेळा अशा व्यथा कमनशिबी आई-बाबांबरोबर गाढल्या जातात.  आयुष्यभर मुलांच्या कल्याणासाठी कष्ट करणारा बाप स्वतःच्या मुलांचा गुन्हेगार बनतो. ही आपल्या समाजाची वस्तुस्थिती आहे व ती स्वीकारावी लागेल.

 भोग ही गोष्ट व्यथेला जन्म देण्यास कारणीभूत ठरते. समाजाच्या मानसिकतेचं बारकाईने निरीक्षण केले तर असे लक्षात येईल की समाजामध्ये भोगी वृत्ती फोफावते आहे. समाजामध्ये अनेक ययातींचा सुळसुळाट झाल्याचे पहावयास मिळेल. भोगापायी अनेकजण व्यथांचे वाटेकरी होत आहेत. भोगांचा अंत नाही तसा त्यातून जन्म होणाऱ्या व्यथांचाही अंत नाही. रोज नवे भोग व  रोज नव्या व्यथा.  भोगातील व्यथा लाजिरवाण्या असतात. त्यातील कथा कानांपलीकडील असतात. खरोखरीच आपण माणूस आहोत की पशु याची जाणीव आपल्याला होत नाही. चंगळवादी, भोगी व विलासीवृत्ती समाजासाठी कोणत्याही अवस्थेत घातकच असते. स्वामी विवेकानंद यांच्या विचाराने व तेजपुंज देहाने प्रभावित झालेल्या अमेरिकन स्त्रीने स्वामीजींशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. स्वामीजींनी तत्परतेने त्या स्त्रीला माझ्याशी लग्न का करावेसे वाटते विचारल्यानंतर तिने तुमच्यासारखा तेजस्वी पुत्र माझ्या पोटी जन्माला येईल असे उत्तर दिलं. स्वामीजींनी मग मलाच तुमचा पुत्र का मानत नाही  असा सवाल करून त्या स्त्रीला निरुत्तर केलं. भोगात व्यथा आहेत तर त्यागात वीरश्री आहे. आपल्या समाजाला खऱ्या अर्थाने स्वामी विवेकानंदांच्या विचारांची प्रकर्षाने गरज आहे. समाजात मर्यादित भोग असणं समाजासाठी हितावह आहे. ययातीरुपी भोगातून समाजाचा ऱ्हास आपोआप होईल यात कोणतीच शंका नाही. आंबेडकरांनी शिक्षणाबरोबर शीलाला महत्त्व दिले आहे. भोग व त्याग ह्या परस्पर विरोधी बाबी आहेत. आपण त्यागापेक्षा भोगी असल्याचं आपल्याला दिसेल. एकुणच समाजासाठी ही बाब अत्यंत घातक आहे. भोग भोगण्यासाठी माणूस अत्यंत खालच्या स्तरावर पोहोचतो. अनेकांवर आपण अन्याय, अत्याचार करत आहोत इतकाही विवेक तो विसरतो. भोग भोगतो व मागे व्यथा सोडतो. अशा अनेक घटनांमध्ये पश्चातापाशिवाय नंतर काहीच उरत नाही. अनेक मानवी मुल्यांचं आचरण विवेकातून होतं. पण विवेक संपतो व अघोरी कृत्य हातून घडतात.

 स्वार्थ व्यथांच्या माळेतील मेरुमणी आहे. व्यथांच्या मालिकेतील सुरुवात व शेवट स्वार्थाजवळ होते. अनेकांच्या व्यथांना स्वार्थच कारणीभूत होतो. स्वार्थामुळे सद्सद्विवेकबुद्धी झाकली जाते व माणूस अविचारी व विवेकहीन वागतो. अनेक चांगल्या विचारांच्या व्यक्तीबाबतीतही साधारणपणे असेच होतं. आपण असं वागलो, यावर त्यांचा विश्वास बसत नाही. पण वस्तुस्थितीपासून दुरही  जाता येत नाही. व्यक्तीव्यक्तीनुसार त्याची तीव्रता कमी-जास्त असेल, स्वार्थाचा प्रकार वेगळा असेल किंवा स्वार्थाच्या तऱ्हा वेगळ्या असतील, पण स्वार्थ असतोच असतो. स्वार्थ कधीच उच्च दर्जाचा असू शकत नाही. उच्च मानवी मूल्यांचा यादीत स्वार्थाला बिलकुल जागा नाही. अनेक उदाहरणे देऊन स्वार्थामुळे व्यथांचा जन्म कसा झाला हे सांगता येईल. अनादिअनंत काळापासूनचे दाखले देऊन आपण हे सिद्ध करू शकतो. प्रभू रामचंद्र वनवासाला जाण्याची घटना निव्वळ स्वार्थापोटी घडली. अनेकजण ही घटना वाल्मीकीलिखित रामयणानुसार झाल्याचा युक्तिवाद करतील. पण श्रीरामांच्या वनवासाला मूळरूपाने स्वार्थच कारणीभूत आहे, हेही नाकारू शकतं नाहीत. कंसमामाचा मृत्यू श्रीकृष्णांच्या हातून होणार म्हटल्यावर मात्यपित्यांना बंदिवासात टाकलं. व्यथांचा जन्म झाला. सात बालकं कंसाने मारली. आठवा कृष्ण....! कंसमामा संपले. स्वतःच्या स्वार्थासाठी कांसमामाने अनेकांना त्रास दिला, यातना दिल्या. स्वार्थामुळे जी गोष्ट होणार होती, ती घडलीच. उलट ती सुनियोजितरीत्या योग्य वेळी घडली. त्यामुळे नियतीचे वेळापत्रक बदलण्याचं सामर्थ्य स्वार्थात कधीच असू शकत नाही. ती गोष्ट वेळ आल्यावर घडतेच. नियतीपेक्षा कुणीही मोठं होण्याचा प्रयत्न करू नये. 

 वैयक्तिक, सामाजिक व देशपातळीवर स्वार्थाचा विचार केला तर देशपातळीवर स्वार्थ अत्यंत घातक स्वरूपाचा आहे. देशपातळीवरील स्वार्थ सर्व देशवासीयांच्या यातनांना कारणीभूत होतो. अविचारी राज्यकर्ते देशवासीयांच्या दुःखाला कारणीभूत ठरतात. राजा कसा असावा याचा अभ्यास करायचा म्हटलं तर त्यात शिवाजी महाराज सर्वोच्च स्थानी असतील. ज्या राज्यातील तळागाळातील लोक राजाची स्तुती घरात बसून करतील तो राजा यशस्वी प्रशासकीय होय. शिवरायांचे नियोजन सामान्य माणसाला सुखी करणारं होतं. शिवराय सर्वसामान्यांच्या  हिताला प्रथम प्राधान्य देत होते. हिंदवी स्वराज्यामध्ये राजे सुप्रसिद्ध होण्याचे प्रमुख कारण हेच आहे. परकीयांबरोबर युद्ध करून त्यांना धूळ चारणे व स्वकीयांना उत्तम प्रकारे सांभाळणे हे राजाच्या यशस्वितेचे गमक आहे. महाराजांनी ते यशस्वीपणे केले. एक योगी पुरुषांसारखं आयुष्य जगले. कुठंही स्वार्थ नाही. प्रजेलाही उत्तम सेवा दिली. आजचे राज्यकर्ते इतिहासापासून काय घेतात हे त्यांनाच माहीत....! राज्यकर्त्यांच्या हातून स्वार्थ झाला तर संपूर्ण समाजाला, देशाला व्यथा सोसाव्या लागतात. तुम्ही, आम्ही आज त्याच प्रकारच्या व्यथातून जातोय.  भारत देशाला निस्वार्थी नेतृत्वाची अत्यंत गरज आहे. स्वामी विवेकानंदांची तळमळ व  इच्छा पूर्ण करणारे अनेक नेते या देशाच्या सेवेत लागले तर इथल्या व्यथा काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. शिवरायांसारखी रणनिती व राजनीती केली तर देश बदलण्यास वेळ लागणार नाही. भारतदेशाजवळ विचारांचे माहेरघर आहे. पण हे विचार प्रत्यक्ष व यशस्वीपणे राबवणारे प्रभावी राज्यकर्ते नाहीत. जगाला विचार व दिशा देणारे ज्ञान आपल्या जवळ असताना इथलं दारिद्र व दुःख संपता संपत नाही. गरिबांच्या नावाने राजकारण होत. पण त्या राजकारणाचा गरिबाला प्रत्यक्ष फायदा होताना दिसत नाही. याला स्वार्थी राज्यकर्तेच कारणीभूत आहेत.

 व्यथांच्या या कथांबरोबर, त्यांच्या तीव्रतेच्या यातनांबरोबर समाजामध्ये व्यथा कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न होतो, हेही विसरून चालणार नाही. शारीरिक व्यथा वैद्यकशास्त्राने कमी केल्या जातात. शरीराची पिडा कमीअधिक प्रमाणात वैद्यांच्या मदतीने सोडवली जाते. डॉक्टर यमाचे वैरी आहेत. ते असवेतही. त्यामुळे प्रगत वैद्यकज्ञान असणाऱ्या देशात मृत्युदर कमी असतो. शरीराची पिडा व्यक्तिगत पातळीवर असह्य असते. व्यक्ती पूर्णपणे निरोगी असेल तर तीचं दैनंदिन जीवन सोयीस्कर होतं. पण ती जर शारीरिक पिडेत अडकली असेल तर डॉक्टरच तिची सोडवणूक करू शकतात. भारत देशाच्या प्रगतीमध्ये ज्या प्रमाणात वैद्यकीय सेवा ग्रामीण भागात मिळणे गरजेचे आहे, तेवढी सेवा अजून मिळू शकत नाहीत. याला अनेक कारणे आहेत. ग्रामीण भागात संपर्काची व दळणवळणाची व्यवस्था आजारी स्थितीत आहे. एकविसाव्या शतकातील सोनेरी स्वप्न पाहणाऱ्या विशाल भारताला लाजवेल अशी परिस्थिती ग्रामीण भारतामध्ये आजही आहे. ग्रामीण भागातून लोंढेच्या लोंढे रोजगारासाठी शहराकडे धवताहेत. हे सहूहिक अपयश आहे. देशाच्या प्रगतीत शहर व ग्रामीण हा भेदभाव केल्याने ही विषमता निर्माण झाली आहे. फक्त वैद्यकीय सेवेबद्दल बोलायचं झालं तरी हे चित्र विदारक आहे. बरं कोणी होतकरु डॉक्टर ग्रामीण भागात  वैद्यकीय सेवा देऊ लागला तरी त्याला तिथल्या परिस्थितीत अडकून ठेवणारे ठग ग्रामीण भागात आहेत.  त्याच्या सेवेविषयीचं भूत उतरलं जातं. याला जबाबदार ग्रामीण भागातील अव्यावहारी राजकारण आहे. एकूण यांमध्ये समाजाची गैरसोय होते. वैद्यकीय सेवेपासून संबंधितांना मुकावे लागते. इतर पर्यायाचा विचार करावा लागतो. अर्थात हा पर्याय शहरी भागाकडे त्याला घेऊन जातो. दोष फक्त संबंधित डॉक्टरांचा नसतो. समाज नाना तऱ्हा, नाना स्वभाव व नाना गुणांचा व अवगुणांचा बनलेला आहे. सेवा देणाऱ्यांनी त्या गुण-अवगुणांचा बारकाईने अभ्यास प्रथम करावा व नंतर सेवा सुरू करावी. नाहीतर सेवेचं भूत डोक्यातून उतरायला वेळ लागत नाही. बाबा आमटेंनी अशा प्रकारची सेवा केली. निष्कलंक व निस्वार्थी सेवा....! सेवा व फक्त सेवा....! अनेकांच्या व्यथांना हलकेपणा बाबांनी आणला. आज त्यांची तिसरी पिढी सेवेमध्ये येऊ पाहतेय. सेवेचे व्रत घेतलेल्या तीन पिढ्या कुटुंबात व त्याही एकाच कुटुंबात जन्मास येणे, हे अचंबित करणार आहे. कदाचित त्यापेक्षा मी तर असं म्हणेन की त्यांच्या येणाऱ्या पिढ्या न पिढ्या अशा प्रकारच्या सेवेत येवोत. त्यांच्यासारख्या सहृदयींची समाजाला अत्यंत गरज आहे व ती पुढेही राहील. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन उदयोन्मुख डॉक्टरांनी सेवाभावी वृत्तीने आपापल्या सोयीने समाजाची व्यथा कमी करावी. आपल्याकडे अनेक प्रश्न माणसाला पडतात. मी सेवा का करावी? सेवेतून मला काय मिळेल? मी सेवा केली तर मग माझ्या कुटुंबीयांच काय? वगैरे, वगैरे... बाबा आमटे यांनी हाच विचार केला असता तर कुष्ठरोग्यांचा वाली कोण झाला असता? अनेकांची व्यथांची ओझी कोणी उतरवली असती? आपल्या दैनंदिन जगण्यातून समाजाच्या उपकारांतून उतराई होण्यासाठी व्यक्तीने सदैव तत्पर राहणे, समाज हितासाठी योग्य आहे. संपूर्ण नाही पण त्यातून काही व्यथा कमी होण्यास हातभार लागेल.

 शारीरिक व्यथांबरोबर मानसिक व्यथा अतिभयंकर स्वरूपाच्या असतात. अशा व्यथा अमरवेलासारख्या असतात. त्यांचा शेवट नसतो. व्यक्ती संपेल तेव्हाच त्या संपतात. अशा व्यथा मनावर खोल ओरखडे काढतात. त्या जखमातून आयुष्यभर अश्रू ओघळतात. त्या संपता संपत नाहीत. डोळे आटतील पण व्यथा कमी होत नाहीत. अशा व्यथा कमी करणारे जादूगारही आपल्या समाजामध्ये आहेत, हे आपण विसरून चालणार नाही. परंतु आपल्याकडे त्यांची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात नाही. ज्यांच्यावर अन्याय, अत्याचार होतो, त्यांना मानसिक स्तरावरून आधार देण्याचे काम आपल्याकडे यशस्वीपणे केले जात नाही. एखाद्या महिलेवर अत्याचार झाल्यानंतर, तिला ज्या प्रमाणात समाजाकडून मदत मिळणें गरजेचे असते, त्या प्रमाणात ती मिळत नाही. अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतरचे उत्तरदायित्व समाजाच असतं. उलट घटनेनंतरची समाजाची अवहेलना संबंधित महिलेस परवडत नाही. अन्याय करण्याऱ्यांची पाठराखण अशा प्रकारे समाज करतो व व्यथा घेऊन संबंधित व्यक्ती जागते, त्यात भर पडते. पाश्चिमात्य देशात अशा प्रकारच्या सेवा देणाऱ्या सेवाभावी संस्था काम करतात. संबंधितांच्या हितांचे रक्षण मोठ्या मनाने करून मुख्य समाजप्रवाहात त्यांना पोहोचेपर्यंतचं दायित्व मोठया मनानं घेतात व ते मोठ्या निष्टेने पूर्ण करतात. आपल्याकडे असे काम प्रभावीपणे व मोठ्या प्रमाणात सुरू करणे व यशस्वी होणे अत्यंत गरजेचे आहे. समाजामध्ये विषमता आहे. जाती व्यवस्थेतही अशीच विषमता दिसते. जिथं विषमता आहे, तिथं व्यथा आहेत. स्त्री व पुरुष हा भेद आहेच. विकसित देशात हा भेद बऱ्याच अंशी कमी दिसतो. स्त्रियांना समानता व सन्मान मिळाल्याशिवाय समाज सुखी होणार नाही. 

 आत्यंतिक व्यथा कथनाने कमी होतात. आपल्या जवळच्यांना व्यथा सांगितल्याने त्या काही अंशी कमी होतात. मन हलकं होतं. व्यथा बाहेर येणे गरजेचे आहे. व्यथा ऐकण्यासाठी उत्तम श्रोता मिळणे गरजेचे आहे. व्यथा सांगणाऱ्यापेक्षा, व्यथा ऐकणारा श्रेष्ठ आहे. कारण त्या व्यथांवर एखादं रामबाण औषध ऐकणारा सुचवू शकतो. त्यांची पिडा तो कमी करू शकतो.  समाज झपाट्याने बदलतो आहे. बदलत्या समाजाबरोबर चांगली मूल्ये आपण मागे टाकून प्रगती करतोय. अशी प्रगती कालांतराने आपल्यासाठी घातक आहे. शेजाऱ्याच्या व्यथा ऐकून मनात उकळ्या फुटणारे अनेक कुटुंबे आपल्याकडे आहेत. व्यथांना जर अशा प्रकारचा श्रोता मिळाला तर त्या कमी होण्यापेक्षा त्यात आणखीन भर पडेल व पर्यायाने संबंधितांच्यावर आणखीन अन्याय झाल्याच आपल्या लक्षात येईल. 'भीक नको पण कुत्र आवर' असे म्हणण्याची पाळी व्यथाग्रस्तावर येऊन जाईल. व्यथात भर पडणं संबंधिताला परवडणारं नसतं. दुसऱ्याच्या वेदना पाहून आनंदाच्या उकळ्या फुटणारे राक्षसीवृत्तीचे होत.  माणूस म्हणून घेण्याचा किंवा माणुसकीचा लवलेशही अशांना स्पर्श करू शकत नाही. त्यांनी स्वतःच्या वर्तनाचा अभ्यास करून स्वतःमध्ये योग्य ते बदल करणे गरजेचे आहे. समाजासाठी व त्या व्यक्तीसाठी ते गरजेचं आहे. व्यथा सांगून काही का होईना, थोड्याफार प्रमाणात हलक्या होतात. व्यथांच्या कथा सांगाव्यात. त्यांची तीव्रता कमी व्हावी. त्या समाजाने ऐकून त्यावर उपाय करावा. हे संतूलीत समाजाचे लक्षण आहे. विचारी समाजाचे हेंच प्रतिक आहे.

 सरतेशेवटी जीवनामध्ये व्यथाही असाव्यात हे सांगताना मला भीती वाटत नाही. व्यथा जर नसतील तर आनंदाची किंमत कळणार नाही. व्यथा जर नसतील तर सुख भोगणं व तेही समाजहित जोपासून भोगण जमणार नाही. शबरीजवळ रामाला देण्यासाठी काहीच नव्हतं. शाबरींनं रामासाठी रोज बोरं वेचली, रोज त्या बोरांची चव पाहिली. गोड बोरं रामासाठी ठेवली व आंबट फेकून दिली. आयुष्यभर तिनं हेच केलं. आयुष्याच्या शेवटी राम आला. त्यांनी ती बोरं खाल्ली. शबरींच्या व्यथांना किनारा मिळाला. आज या घटनेला शेकडो वर्ष लोटलीत. रामानं शबरीची गोड बोरं खाल्ली की प्रेम? आपल्यासाठी हा संशोधनाचा विषय आहे. शबरीनं आयुष्यभर व्यथा भोगल्या नसत्या तर तिला राम भेटला असता का? व्यक्तीचा प्रवास व्यथांपासून परमार्थापर्यंत असला तर वाटेत देव भेटतोच भेटतो. शाबरीलाही वाटेत देव भेटला व तिच्या व्यथांचा अंत झाला.  रामानं बोरं उष्टी आहेत म्हणून टाकून दिली नाहीत की आपण प्रत्यक्ष परमेश्वराला उष्टी बोरं देत आहोत असा प्रश्न शबरीला निर्माण झाला नाही. ती भेट आजच्या काळात झाली असती तर कदाचित आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी देशभर झडल्या असत्या. कदाचित न्यायालयात दाद मागण्यासाठी अनेक जनहितार्थ याचिका दाखल झाल्या असत्या. आपण पुढारलेल्या समाजात आहोत, हे याचे तोटे आहेत. व्यथा आवश्यक आहेत, हे मी जाणीवपूर्वक म्हणतो आहे. याचं कारणही शबरीप्रमाणे आहे. व्यथांचा शेवट जर गोड होणार असेल तर माणूस अशा अनेक व्यथा भोगेल. जाणीवपूर्वक अन्याय व व्यथांयुक्त प्रवास, यात खूप अंतर आहे. अशा अनेक व्यथांचा अंत प्रेमपूर्वक होतो. शेवटी व्यथांचा अंत गोड होणं संबंधित व्यक्तीचा व्यथातील शिणवटा क्षणात उतरवतं. व्यथांतील वेदनांचा विसर त्यामुळे होतो. वेदनांची तीव्रता काही अंशी कमी होते. एका नव्या आयुष्याची सुरुवात होते. शबरीप्रमाणे आयुष्याचं कल्याण झालं नाही तरी थोड्याफार प्रमाणात ती व्यक्ती सुखी बनवण्यास मदत होते. शेवटी व्यथा भोगणारा श्रेष्ठ असतोच पण त्या ऐकनही गरजेच आहे. समाजाचा सहभाग त्यासाठी मोलाचा ठरतो. समाजाने मनावर घेतलं की अशा यातनायुक्त जीवांच्या व्यथा लिलया संपतात. त्या संपवण्यासाठी समाजानं धावून जावं. अशा प्रकारच्या समाजनिर्मितीचे काम हाती घेणारे योद्धे निर्माण करण हेही समाजाचं काम आहे. निरोगी समाजाचं तेच लक्षण आहे. ज्याठिकाणी व्यथा, दुःख, दारिद्र्य असतं त्याठिकाणी परमेश्वराचे वास्तव्य असतं. साने गुरुजींचा 'खरा तो एकची धर्म' शिकण्याची व पुन्हा नव्याने शिकवण्यासाठी हजारो सानेगुरुजी जन्माला येण्याची गरज आहे. समाजातील व्यथा त्याशिवाय कमी होणार नाहीत. नियतीने दिलेल्या व्यथा नियतीन तयार केलेले असे योद्धेच कमी करू शकतात. असे महामानवच समाजाला व्यथांपासून दूर करू शकतात. भारत भूमी  अशा योध्यांची आतुरतेने वाट पाहतेय. 060514 Harish Gore

Monday, 31 August 2020

चिंतन...... सद्भावनांचे.......९

                                                            चिंतन


 मंथन व चिंतन या दोन शब्दांमध्ये बऱ्याचवेळा आपली गफलत होण्याची शक्यता असते. मंथन वस्तू, पदार्थ किंवा विचारांचे होते तर चिंतन परमेश्वरासाठी, प्रेमासाठी किंवा इच्छित विचारांची प्राप्ती करण्यासाठी केलं जातं. चिंतन मनःशांतीसाठीही केलं जाते. रामप्रहरी केलेले चिंतन परमेश्वर व भक्त यांच्यातील दरी कमी करून मनःशांतीसाठी अत्यंत उपयोगी ठरतं. देवावरील आपली श्रद्धा अधिक गाढ करण्यासाठी त्याचा साधकाला उपयोग होतो. मंथनाचे मात्र तसे नाही. अनेक व्यक्ती एका व्यासपीठावर बसून विचारांचे मंथन करतात. त्यात चांगलं व वाईट दोन्ही विचार असू शकतात. त्यात स्वार्थ व परमार्थ काहीही असू असत. अशा प्रकारची विचारमंथने कदाचित अनिर्णयीत होऊन नवीन वादाला तोंड फोडून त्याचा शेवट होतो. काही विचारमंथने चांगलीही असू शकतात, यात वाद नाही. भारतामध्ये प्रसारमाध्यमात अनुभवलेल्या बहुतेक विचारमंथनाचा शेवट  शब्दयुद्धामध्ये परावर्तित होतो. कोणताही ठोस निर्णय न होता मंथनाचा शेवट होतो. एक मात्र नक्की, मंथनातून अनेकांचे विचार समोर येतात. समाजामध्ये ते रुजले जातात. व्यक्तीची विचारांची बांधणी ज्या प्रकारची असेल, त्या प्रकारच्या विचाराच्या प्रवाहाची माणसं एकत्र येतात. अशा समविचारी लोकांचा एक संच तयार होतो. अशा संचामध्ये अनेक राजकीय पक्ष, धार्मिक संस्था, धार्मिक पंथ यांचा समावेश होतो. एकत्र येण्यानं विचारांची ताकद वाढते. त्याला बळ मिळते. असे लोक आपले विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात.


 मंथन इतर अनेक बाबींसाठी उपयोगात आणलं जात. रसायनशास्त्रात केलेले मंथन नवीन रसायनाला जन्म देते. त्यातून अनेक रासायनिक बाबींचा शोध लागला व आपले जीवन सुखकारक होण्यास त्याची मदत झाली. दह्याचं मंथन केल्यानं लोण्याचा शोध लागला. दही सुरुवातीला घुसळणाऱ्या महामानवानेच मंथन या शब्दाचा  शोध लावला असावा.  दह्याच्या घुसळण्यानं उत्तम प्रतीचं तुप मिळतं. भगवान श्रीकृष्ण लोण्याच्या गोळ्यासह अत्यंत विलोभनीय, लोभस व देखणें दिसतात. बालपणाचा  त्यांचा बहुतेक कालावधी दही, दूध, व लोण्याच्या सहवासात गेला. भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा श्रीकृष्णांनी आपल्याला दिला. एक गोपालक मिळाला. एक सखा मिळाला. आणि मिळाला एक भक्तिमय विचार....!   जो विचार प्रेमळ आहे, जो लोभस आहे, खोडकर आहे आणि आहे तेजस्वी....!  भगवान श्रीकृष्णांचे संपूर्ण आयुष्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या प्रत्येक रूपाची पूजा विलक्षण विलोभनीय वाटते. पाहता क्षणी प्रेमात पडावं असं ते रुप....! डोळ्यात साठवून तृप्तीचा ढेकर द्यावा इतकं निर्व्याज रूप ते....!


 देव व दानव यांच्यामध्ये समुद्रमंथन झाल. मला वाटते मंथन शब्दाची व्याप्ती समुद्रमंथनामुळेच वाढली असावी. इतक्या मोठ्या प्रमाणावर आजवर कुठेही मंथन झाल्याच ऐकलं किंवा पहिलं नाही. समुद्रमंथनातून अनेक बाबी समोर आल्या. काही चांगल्या तर काही वाईट. अमृतासारखा अमूल्य घटक आणि दारूसारखा विनाशकारी घटक समुद्रमंथनातून मिळाला असल्याची आख्यायिका आहे. अमृत आपल्यापैकी कोणाच्या वाट्याला आलं नाही. ते येणारही नाही. कारण अमृत स्वर्गात असल्याच धर्मग्रंथ सांगतात. दारू दानवांच्या अर्थात राक्षसांच्या वाट्याला  आल्याचही आपल्याला कळतं. ती मात्र हवी तिथं विनासायास मिळते. अमृत स्वर्गात व दारू इथे....? आजही आपल्यातील मानव ती प्राशन करतात.  ती प्यावी कि नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण अशा पद्धतीने आपण दानवासारखं मूर्ख तर बनलो जात नाही ना हा विचार मात्र गांभीर्याने होणे गरजेचे वाटते. आपल्या वाईट सवयी आपल्याला अधोगतीकडे घेऊन जातात. अनेक सुखी संसार रस्त्यावर येतात व निरागस कुटुंबांना हालापेष्टा, दुःख, दैन्य व दारिद्र्य सोसावं लागतं. आपल्या कुटुंबाच्या नरकयातनांच सोयरसुतक अशांना नसतं. दुःखाच्या खाईत लोटणारा निर्णय योग्य की अयोग्य हे ठरवण्यासाठी पुन्हा मंथन किंवा चिंतन करण्यासाठी ज्याच त्यांन बसण्याची गरज आहे. 


 चिंतन चित्ताची शुद्धी करण्यासाठी केल जात. चित्त शांत, स्थिर राहावा म्हणून चिंतन उपयोगी आहे. मंथन हे करण्यासाठी असतं तर चिंतन अनुभवण्यासाठी. मन स्थिर बनवण्यासाठी चिंतन करणे गरजेचे आहे. चिंता व चिंतन परस्परविरोधी बाबी आहेत. चिंतेमध्ये भीती लपलेली असते. भीती असल्याशिवाय चिंता करू शकत नाही. चिंतनामध्ये भीती, क्रोध, लोभ नसतात. मनाची निर्विकार अवस्था प्राप्त करण्यासाठी चिंतन केलं जातं. चिंतनामध्ये भविष्याचा वेध घेण्याची प्रचंड ताकत आहे. भूतकाळाची स्मृती व भविष्याचा वेध फक्त चिंतनातच घेतला जाऊ शकतो. केलेल्या चिंतनातून व्यक्त होणारे विचार आत्मरुप असतात. वाईट गोष्टी समोर ठेवून केलेले चिंतन विध्वंसक होऊ शकत. म्हणून अंतकरण शुद्ध करून चिंतन केल्यास समाज व चिंतन करणारी व्यक्ती दोन्ही उजळून निघतात. काळ बदलला. काळाबरोबर आपणही बदललो.  आपल्या गरजा बदलत आहेत. चिंतनासारखी त्रिकालबाधित सत्य गोष्ट आपल्यापासून कितीतरी दूर गेली आहे. समाज अस्थिर होण्यामागे महत्त्वाच कारण चिंतनाची उणीव आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अनामिक भीती सहजपणे पाहू शकतो. अनेक काळज्या, जबाबदाऱ्यांची भीती घेऊन आपली जगण्याची धडपड अखंडपणे चालू आहे. यात कधी चिंतनासाठी थोडा वेळ आपल्याकडे शिल्लक राहत नाही. जगणं सुरू राहत व काळजी, भीती तशीच राहते. दुसऱ्या दिवशी आपण जागे होतो व नकळत कालच्याच दृष्टचक्रात स्वतःला अडकवून घेतो. आयुष्य असेच पुढे जातं व खोलवर चिंतन करण्याची वेळ आपल्यावर नकळत येते.


 काळजी अर्थात चिंता कधीकधी जीवघेणी ठरू शकते. सकारात्मक दृष्टिकोनातून केलेली चिंता चांगले विचार पुढे आणते. तर नकारात्मक दृष्टिकोनातून होणारी चिंता व्यक्तीला झिजवल्याशिवाय राहत नाही. 'चिंतासे घटी चतुराई' अशा अर्थाने हिंदीत कबीरांनी भक्तिरचना केली आहे. थोर संत विचारांची मुक्तपणे उधळण करणारी सोनेरी पाखरं होत. संत कबीर त्यापैकी एक. माणूस कर्तुत्वान असतो. पण तो चिंता खूप करतो. त्याची अक्कलहुशारी, धीटपणा या चिंतेमुळं खुंटते. सारासार विचार करणारी बुद्धि साशंक होते. चिंतेचे ढग मनामध्ये दाटून येतात व हाती घेतलेले कार्य निष्फळ होतं. चिंता करण्यामुळे व्यक्तीला मिळालेल्या यशाचे अपयशात रूपांतर तर होतेच परंतु त्याच्या आरोग्यावरही त्याचा दुष्परिणाम चिंता सोडून जाते. माणसाला माणसातून उठवण्याचे काम चिंता करते.  चिंता करण्याने अनेकांचे वजन झपाट्याने कमी होतं. चेहऱ्यावर तसे स्पष्ट दिसतात. अशा माणसाला इतरांनी समजावलं तरी चिंतेच्या दुष्टचक्रात तो गुरफटल्याने सत्य विचारापर्यंत पोहोचनं त्याच्यासाठी फार कठीण जातं. खरंतर चिंता कशाचीच नसावी. माणूस कर्म नावाच्या बंधनाने बांधला गेला आहे. कर्मामध्ये बरोबर व चूक हे दोन मूळ विचार आहेत. त्यानंतर सत्कर्म व दुष्कर्म आहे. स्वार्थ व परमार्थ आहे. पाप व पुण्य आहे. आपल्या कर्माचा चिंतेशी जवळचा संबंध आहे. आपण केलेले कर्मच ठरवते की आपण व आपल्या संबंधित व्यक्तीने चिंता करायची की नाही. कर्म करताना असा सारासार विचार समाजामधून लुप्त होताना आपणास पहावयास मिळतोय. आपण दुःखी होण्यामागे हे महत्त्वाचं कारण असू शकेल. कर्माचं रूपांतर सत्कर्मात करण्यासाठी चिंतनाची आवश्यकता आहे. व्यक्तीचे नियंत्रण विचार करू शकतात. विचार शुद्ध करण्याचं महत्त्वाचं काम चिंतन करते. म्हणजे कर्माचे रूपांतरण सत्कर्मात करण्यासाठी किंवा आपली शक्ती विधायक कामासाठी वापरण्यासाठी चिंतनाची नितांत आवश्यकता आहे.


 भक्तीमध्ये चिंतनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चिंतनाशिवाय भक्ती कदाचित अपूर्ण राहू शकते. चिंतन भक्ताला देवरूपी करते. चिंतनच परमेश्वराबाबतचे भक्ताचे मनात बांधलेले आराखडे पूर्ण करते. चिंतन एकांतात किंवा कोलाहलातही करता येते. सहसा एकांतातील चिंतनाला बाधा येत नाही. अशा प्रकारचे चिंतन आपल्याकडे प्रचलित आहे. गर्दी किंवा गोंगाटात चिंतन करण्यासाठी मनाची उच्च अवस्था प्राप्त असणे गरजेचे आहे. स्थिर व निश्चल मन शांतता व गोंगाट यातील कशानेच बाधित होत नाही. आत्यंतिक कोलाहालात किंवा स्तब्ध शांतता या दोहोंमध्ये ज्याच्या मनाचा स्थिरपणा टिकतो, तो सर्वश्रेष्ठ भक्त मानला जातो. अशांना सुख किंवा दुःख प्रभावित करू शकत नाही. व्यक्तीव्यक्तीनुसार चिंतनाचे परिणाम वेगवेगळे असू शकतात. परंतु चिंतन सर्वच अवस्थेमध्ये आपल्याला मदत करणारे ठरू शकते. अपयश सदैव झिणझिण्या आणतं, आपण निराश होतो. समाजामध्ये अनेक माणसं त्यामुळे खचून जाऊन शांत बसतात. अशांनी चिंतनाची मदत घेतली तर त्यांना त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. अपयशामुळे प्रयत्न सोडणे हा निव्वळ भित्रटपणा होय. उलट अपयशातून चुका सुधारण्याची संधी माणसाला मिळते. पुन्हा अशा चुका टाळून यश खेचून आणता येऊ शकत. यश नेहमी प्रेरणा देतं. तर अपयश बोचरं वाटतं. अपयश टाळण्यासाठी चिंतनाची आवश्यकता आहे. अपयश सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यास त्याला सामोरे जाण्याचे मनोधर्य आपल्या अंगी आल्याशिवाय राहणार नाही. अपयशाचं निरीक्षण चिकित्सक वृत्तीने व्हावं. स्वतःवर होणारा आघात मोठेपणाने पचवावा व नवीन प्रयत्नात स्वतःला बेफान करून द्याव. सकारात्मकतेचे नवीन रुप, चैतन्याची सळाळी व  यशाची किनार नव्यानं नशिबी आल्याशिवाय राहणार नाही.


 माणसाच्या अनेकविध गरजा आहेत. त्यातील काही प्राथमिक तर काही दुय्यम आहेत. प्राथमिक गरजा मिळवण्यात आपण सर्वजण व्यस्त असतो. प्राथमिक गरजांबरोबर दुय्यम गरजा  प्राप्त करण्यासाठी धडपडतो. प्राथमिक गरजापेक्षा अनाठायी इतर गरजांना अवाजवी महत्त्व देतो. गरज प्राथमिक आहे की दुय्यम आहे, इतपत वर्गीकरण करणारी सद्सद्विवेकबुद्धी आपण झाकून ठेवतो व इथंच फसतो. गरजा असाव्यात पण गरजांवर मर्यादाही असाव्यात. अवाजवी गरजा व्यक्तीचे चित्त अस्थिर करतात. काही कारण नसताना आपण पिळले जातो. नाहक त्रास सहन करावा लागतो. आयुष्य बोजड वाटू लागतं व जगण्यातील मजा हवा गेलेल्या टायर प्रमाणे थांबते. नको त्या गरजांना प्राथमिकता देण्यांनं जीवनातील मुख्य उद्देश बाजूला पडून नको असलेल्या व्यापांची माळ नकळत गळ्यात येऊन पडते. आपण परिस्थिती जशी येईल त्या पद्धतीने वागतो. पण एके दिवशी याच परिस्थितीच्या जाळ्यात खोलवर, दीर्घकाळ न सुटण्यासाठी अडकतो. गरजांच्या हव्यासापोटी धांद्रटपणा करणारी मंडळी सुखी होऊ शकत नाहीत. जगताना थोडावेळ थांबून चिंतन करण्याची नितांत आवश्यकता आहे. जगण्यातील मजा चिंतनाने वाढते. अतिगरजांपोटी अनेक दुर्गुण अंगात शिरतात व आपला स्वभावही त्याच दुर्गुणांसारखा होतो. चित्ताची शुद्धी कर्माने होऊ शकते. पुन्हा कर्मातील शुद्धी चित्तामुळे व चित्त शुद्धी फक्त आणि फक्त चितांनानेच होऊ शकते. गरजा पूर्ण करण्यासाठी केलेला हव्यास माणसाला पशुरुप  देऊन जातो. 


   महात्मा गांधीजींना चाळीस डझन ड्रेस असल्याचे वाचनात आलं. सत्य आणि निष्ठा कशी असावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महात्मा गांधी. गरज ही शोधाची जननी मानली जाते. शोध लागतो, गरजा वाढतात. इतक्या मोठ्या प्रमाणावर स्वतःसाठी कपड्यांची हौस करणारा माणूस इतक्या कमी व साध्या कपड्यांमध्ये कसा भागवून घेत असेल, हे समजण्यासाठी त्यांच्या चरित्राचे वाचन होणे गरजेचे आहे. गरजा तर आहेतच. पण अनाठायी गरजांपासून स्वतःला अलिप्त ठेवण्यासाठी कसं तयार करायचं हे गांधीचे मोठ्या हुकुमाने आपल्याला दाखवतात. याविषयावर गांधीजी सतत बोलले. नुसते बोलले नाही तर ते सर्व प्रत्यक्षात उतरवलं. अनेक गरजा कमी केल्या. आयुष्य सुटसुटीत झालं. त्यामुळे गांधींजीचं आयुष्य प्रेरणादायी होऊन जातं. जगात त्यांच्यासारखे महापुरुष अवतरले, त्यामुळेच आपला समाज तग धरून आहे. आज गांधीजी आपल्यात नाहीत. परंतु जोपर्यंत त्यांचे विचार आहेत, तोपर्यंत समाज घट्ट बांधलेला असेल. गांधीजींनी त्यांच्या असंख्य  गरजा प्रयत्नपूर्वक कमी केल्या. त्यातून त्यांना त्रासही झाला. 


आपण सवयींचे गुलाम असतो. वस्तूंचा उपभोग घेण्यात स्वतःला धन्य समजतो. परंतु अशा वस्तूंचा किंवा व्यक्तीचा त्याग करणे ही बाब म्हणावी तेवढी सोपी नाही. मनाविरुद्ध घडणारी प्रत्येक घटना माणसाला क्रोध उत्पन्न करते. वस्तूमुळे आपली सोय होते तर ती वस्तू त्यागल्याने कायमची सोय होते, हे ध्यानात घेतले पाहिजे. चंगळवादी व भोगी समाजामध्ये प्रत्येक गोष्ट मला मिळालीच पाहिजे, यामागे आपण लागलोय. भोगी वृत्तीमुळे त्यागीपणा लुप्त होतोय. त्याग संपल्याने माणसं व पर्यायाने माणुसकी संपतेय. महात्मा गांधीजींनी अशा अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी प्रयत्नपूर्वक सोडल्या. गरजा कमी केल्यामुळे माणसाला कमी दुःख भोगावं लागतं. गरजा कमी करणे म्हणजे गरजांचा त्याग करणे. ही बाब जेवढी दिसते, तेवढी सोपी नाही. त्यात गरिबी व श्रीमंती हा मुद्दा नाही. सद्या असण्यापेक्षा दिसण्याकडे लोकांचा कल जास्त आहे. प्रत्येक गोष्टीचं प्रेझेंटेशन सुंदर होण्यासाठी अट्टाहास होतो. त्यापोटी गरजा वाढतात पण त्या कमी होण्याचं नावं घेत नाहीत.


गांधीजींनी प्रयत्नपूर्वक अनेक गरजा कमी केल्या. भोगी व विलासी वृत्ती संपली. त्यागी व उदात्त व्यक्तिमत्व जगासमोर आलं. गांधी नावाचा विचारदिवा आजही तेवढ्याच ताकतीने सर्वांना प्रकाश व चेतना देतोय. आयुष्य अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींचे बनले आहे. जगण्यातील मजा व सजा  अशा छोट्या-मोठ्या गोष्टीतच लपलेली असते. त्यागानंतरचे गांधींच आयुष्य अत्यंत साधं, सरळ व जगाला भुरळ घालणार ठरलं. त्यागाच ढोंग करणारी माणसंसुद्धा आपल्याकडे पाहावयास मिळतात. जे गांधीजींनी केले, ते प्रत्येकजण करू शकतो. पण म्हणून प्रत्येकजण गांधींजींसारखा होईल असं नाही. ढोंगी त्यागीवृत्ती कधी ना कधी पकडली जाते व सत्य जगासमोर येत. चांगल्या विचारांचा गळा घोटणारी अशी मंडळी समाजासाठी कीड आहेत. अशा घातकी मंडळींसाठी तर चिंतन फार आवश्यक आहे. समाज परिवर्तन करण्याची प्रचंड ताकत चिंतनामध्ये आहे. स्वतः गांधीजी काळ्याकुट्ट अंधारात परमेश्वर चिंतन करत होते. पहाटे केलेले चिंतन परमेश्वराला आवडते. यामध्ये कधीही खंड पडू दिला नाही.  गांधीजी शिस्तीचे भोक्ते होते. ठरविलेला विचार दृढतेने उद्दिष्टपूर्तीकडे नेणें त्यांचा नित्यनेम असे. दिवसाची सुरुवात अशा प्रकारच्या मंगलमय चिंतनाने करणारे एकमेव स्वातंत्र्यसेनानी गांधीजी होते. चिंतानामुळे विचाराला चालना मिळते. जगण्यात ऊर्जा येते व अनेक विधायक कामे हातून होतात.


 एका गावाला जाण्याचे अनेक मार्ग असू शकतात. जगण्यालाही अशाच प्रकारचे अनेक मार्ग आहेत. चिंतनशील विचारी जीवनाचा मार्ग हितावह असतो. लुप्त होणाऱ्या अनेक गोष्टींपैकी चिंतन एक आहे. काळाच्या प्रवाहलाटेवर आपण अरुढ होऊन चाललोय. वेगावर आपलं नियंत्रण नाही. त्यामुळे अनेक कटू प्रसंगाला आपल्याला सामोरे जावे लागतेय. खरंतर अशा प्रकारचा व्यर्थ खटाटोप करण्याची गरज नसल्याचं दिसून येईल. सभोवतालच्या परिस्थितीशी एकरूप होऊन आपण वेगवान होतो व जीवघेण्या धडपडीत पडतो. थांबण्याचं नावच घेत नाही. अशा प्रकारचं जीवन मानव जातीसाठी संयुक्तिक नाही. जीवनामध्ये गोडवा आहे. आपलं कर्म व कर्तुत्व त्यामध्ये कडूपणा आणते. आपले विचार योग्य प्रवाहदिशेने जात नाहीत व आपण भरकटतो. भरकटलेल्या  नावेला किनारा मिळालेच असे नाही. 


 चिंतनामध्ये प्रचंड ताकत आहे. ती अनुभवण्यासाठी आपलं मन तयार असावं लागतं. स्वामी विवेकानंद, कोण मला देव दाखवेल का यासाठी अनेकांना थेट प्रश्न विचारत होते. आपल्याकडे संत नामदेवांची अवस्था काहीशी तशा प्रकारची झालेली दिसते. व्यक्तीची विद्वत्ता चिंतनाशिवाय परिपूर्ण होत नाही. शेवटी रामकृष्ण परमहंस भेटले. स्वामीजींची तहान भागली. शोध संपला व सुरू झाले चिंतन...…! या चिंतनातून त्यांच्या जीवनातील सर्व गोष्टी पुढे घडत गेल्या. त्या सर्व गोष्टींचं मुळ चिंतनात आहे.


 चिंतन म्हणजे फक्त स्थिरपणे डोळे मिटून बसणें, इतका मर्यादित अर्थ चिंतनाचा लावणे म्हणजे चिंतनावर अन्याय केल्याप्रमाणे होईल. ईश्वराचे सूक्ष्म रूप माझ्या अंतःकरणामध्ये विराजित असल्याचा शोध लावणे म्हणजे चिंतन होय. हा शोध लागल्यानंतर त्याचा समस्त जगासाठी मी कसा उपयोग करू शकतो, हा विचार प्रवाह जागृत करणे म्हणजे चिंतन. स्वतःचा स्वार्थ चिंतनाच्या माध्यमातून साधणे म्हणजे चिंतनाचा दुरुपयोग केल्याप्रमाणे आहे. चिंतनाचा शेवट समाजहितासाठी झाला पाहिजे. स्वहितानंतर समाजाचे ऋण फेडण्यासाठी केलेला विचार परोपकारी आहे. अशा प्रकारच्या विचारांमध्येच सामाजिक शक्ती कालांतराने साठत जाते. जनकल्याणाच्या अनेक बाबी त्रासदायक वाटल्या तरी व्यक्तीचे व्यक्तिमत्व उजळून त्याला अजरामर केल्याशिवाय राहत नाहीत. 


 अनेक कलावंत, खेळाडू व उच्चपदस्थ अधिकारी चिंतनाचा आधार घेताना आपल्याला दिसतील. शरीरासाठी रोज व्यायामाची गरज असते. नेमकी तशाच प्रकारची गरज मनासाठी आवश्यक असते. ती मनाची मशागतच आहे. जितकी ही मशागत चांगली, तितके फायदे जास्त. चिंतन केल्याने मन निरोगी व निर्विकार राहण्यास मदत होते. कर्म करूनही कर्मापासून आपण दूर राहतो. मनाला अतिउच्च सवयी लागतात. स्वतःबरोबर कुटुंब व समाज आदर्श करण्यात आपलाही काही वाटा येतो. 


मनाचे विकार न संपणारे आहेत. मनामध्ये उठणाऱ्या भावभावना  न संपणाऱ्या आहेत. अनेक संत व सज्जन याविषयी आपल्याला सांगून गेलेत. कधी-कधी आपणही त्या भावनेतून मनाला समजवण्याचा प्रयत्न करतो. पण 'दिल है की मानता नही' अशीच आपली अवस्था होते. शेवटी मनामागून आपण निमूटपणे मान खाली घालून चालत असतो. मनाच्या तालावर जीवन जगतो. शेवटी कळतं की आपण चुकीचं जीवन जागलो. पण तोपर्यंत खूप उशीर होतो. काळाचा प्रवास व आयुष्याचा प्रवास विरुद्ध दिशेने कधीच होतं नाही. एक संधी दोन वेळा येत नाही. जगलेलं जीवन फक्त आठवणरुपात शिल्लक राहतं. येणारा काळ आपल्यासाठी काय वाढून ठेवतोय हे माहीत नसतं. म्हणून चांगल्या विचारांची सुरुवात जरा लवकर केली तर उर्वरित आयुष्यात समाधान प्राप्त होतं. 


माणसाला जसं स्वैर मन आहे तशी विचारी बुद्धी आहे. मन व बुद्धी यांच न संपणार द्वंध्व आहे. या युद्धात बहुदा बुद्धी हरते. मन कधीच माघार घेत नाही. मानापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. पण मन बुद्धीवर अधिराज्य गाजवते. विवेकबुद्धीने मनावर ताबा मिळवला तर मन बुद्धीच्या मागे निमूटपणे येईल. पण तसं होतं नाही. शेवटी शरीरावर अधिराज्य गाजवण्यात मन बाजी मारतं. आपण फसतो. बुद्धी शरीराची साथ शेवटपर्यंत देते. पण मन बुद्धीला वेगळ्या मार्गावर नेते. त्यांच्या संघर्षात प्रत्येक व्यक्ती अडकते. अडकलेल्या संघर्ष जाळ्यातून कोणाचीच सुटका नसते. काही मोजकेच या संघर्षापासून अलिप्त राहतात. ते राहण्यासाठी चिंतन अत्यंत उपयोगी ठरते. मन व बुद्धी यांची स्वतंत्र बैठक आहे. त्यांच्यातील होणारा संघर्ष अनादीअनंत काळापासूनचा आहे. हा संघर्ष चिंतनाने शांत होतो. मनाला मनाचं काम मिळतं व बुद्धी बुद्धीच्या मार्गाला लागते. एकदा अशा प्रकारची वाटणी झाली म्हणजे ती व्यक्ती समाधान पावते. अशाप्रकारे चिंतन अनेक मूळ गोष्टींच्या जटिलतेच्या अभ्यासाचे साधन आहे. चिंतनाची सुरुवात विचारांच्या कालवाकालवीतून होते. तर त्याचा शेवट अगाध शांतता व कधीही न अनुभवलेल्या समाधानानं होते. अपयश येते पण चिंतनाचा मार्ग धरला म्हणजे कालांतराने त्या अवस्थेपर्यंत आपण पोहोचतो.


 समाजामध्ये अज्ञानी व्यक्तींचा भरणा तुलनेने अधिक आहे. काही परिस्थितीने, काही स्वभावाने, काही शिक्षणाने तर काही स्वतः च्या समाजूतीमुळे अज्ञानी होतात. अज्ञानी हा शब्द वेगळ्या अर्थाने घेतला आहे. अज्ञानी म्हणजे अडाणी नव्हेत. ज्याला ज्ञान नाही तो अज्ञानी. अनेक अडाणी माणसे ज्ञानी असतात. अज्ञानींचा भरणा तुलनेने सुशिक्षित लोकांच्यात जास्त आहे. आपण ज्ञानी होण्याचा कधी प्रयत्न करत नाही. मला ज्ञान मिळवायचय अशी म्हणणारी थोडीच माणसं आपण पाहतो. ज्ञानामध्ये जडत्व आहे. हे जडत्व घेऊन आपण जगु शकत नाही. ज्ञानाचा ध्यास असतो. हा ध्यास कदाचित घरापासून, समाजापासून आपल्याला अलिप्त करण्याची भीती असते. त्यामुळे त्याच्या नादी लागत नाहीत. काहींना ज्ञानी झाल्याचा अभिमान होतो. ज्ञानी होणे म्हणजे पाठांतर करून शब्दांची पोपटपंची ओठात आणणें नव्हे. ज्ञान त्याअर्थाने खोलवर आहे. ते मिळवण्यासाठी अतोनात प्रयत्न करावे लागतात. काही लोक सुरुवात करतात व मध्येच खंड पडतो. अशा प्रकारे खंडाने मिळवलेले ज्ञान अखंडपणे कधीच राहत नाही. ते दुसऱ्या अर्थाने अज्ञानच होय. 'उथळ पाण्याला खळखळाट फार' ही म्हण अज्ञानासाठी आहे. ज्ञानी माणूस शांत असतो. ज्ञान मिळवणे एक तपस्या आहे. ती सर्वांनाच साधत नाही. 


विवेकानंद ज्ञानी महापुरुष होते. लहानपणी उत्तम संस्कार त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावर दिले होते. त्यागाची व भक्तीची परंपरा त्यांच्या घरात होती. पिढीजात भक्ती वारसा लाभलेले कुटुंब व त्या कुटुंबामध्ये जन्माला येण्याच सौभाग्य मिळणें ही साधी बाब नाही. अशा भक्तीमय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. स्वामींजींचे आजोबा परमेश्वराच्या शोधार्थ उतारवयात घर सोडून निघून गेले. छोटा नरेन कदाचित यामुळे प्रभावित होऊन तारुण्यात आल्यानंतर मला देव कोण दाखवेल का, या विचाराने झपाटून गेला असावा. अतिउच्च ध्येयाने झपाटल्याने त्याला त्याचे ध्येय प्राप्त झालं. एक ज्ञानी महापुरुष म्हणून आपण आजही त्यांची पूजा करतोय. हे ज्ञान मिळवण्यासाठी अनेक कष्ट त्यांना करावे लागले. ते त्यांनी केले. परंतु त्यामध्ये चिंतनाचा मोठा वाटा असल्याचे आपल्याला दिसेल. चिंतनाने चित्ताची शुद्धी होते. मन लख्ख प्रकाशाने भरून जाते. अज्ञान दिसेनासे होतो व व्यक्तिमत्व उजळत. याच चिंतनाने ज्ञानाची प्राप्ती होते. अनेक गोष्टी कितीही झटले तरी माणसाला मिळत नाहीत. पण त्या चिंतनाने सहज मिळतात. बुद्धी व मन यांच्यातील संघर्षाचा अंत होतो. महत्त्वाचं म्हणजे पाय जमिनीवर स्थिर होतात. 


बऱ्याच वेळा ज्ञान ग्रहण केल्यानंतर ती व्यक्ती अभिमानी बनते. पण पुर्ण ज्ञानी व्यक्ती सर्व दोषांपासून मुक्त असते.  थोर शास्त्रज्ञ न्यूटन यांनी अनेक उपयुक्त शोध मानवजातीसाठी लावले. त्यांच्या गतीच्या शोधामुळे आपली प्रगती झाली. उर्जेविषयी, पदार्थाच्या स्वरूप, अवस्था व  गुणधर्माविषयी अनेक शोध व समीकरण त्यांनी अव्याहतपणे समाजासमोर ठेवली. अनेकांनी त्यांच्या गृहितकांवर टीकाही केली. समाजातील अपूर्ण अज्ञाणींना ती शेवटी मानावी लागली. अशा या थोर ज्ञानी माणसाने स्वतः विषयी बोललेले वाचले म्हणजेच मन थक्क करते. 'समुद्रकिनाऱ्यावरील रेतीतील छोट्याशा वाळूच्या कणाएवढं माझं अस्तित्व आहे.' हे वाक्य असल्या ज्ञानी पुरुषाच्या तोंडून बाहेर पडल्यानंतर आपण कसे व किती शुन्य आहोत, हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. ज्ञानामध्ये जडत्व जरूर आहे. पण ज्ञानामध्ये नम्रता आहे, समाजाचं भलं करण्याची ताकद आहे. नम्रतायुक्त ज्ञानी महापुरुष अनेक होऊन गेले. त्यातीलच एक न्यूटन होय. अनेक शोध अखंडपणे केलेल्या चींतनामुळे शक्य झाले. आपण कसे व कोणत्या स्थितीत चिंतन करतो हे महत्त्वाचं असतं. 


अखंडपणे केलेले चिंतन अनेक गोष्टींचा उलगडा सहजपणे करतं. ध्यासयुक्त चिंतन परमेश्वर प्राप्ती मिळवून देते. एकदा 'तो' मिळाला म्हणजे ज्ञानसुद्धा त्याच्या पुढे फिकं पडतं. कारण सर्वच गोष्टीचं मूळ त्याच्या ठायी असतं. त्यामुळे ज्ञान व अज्ञान 'त्याचीच' लिला आहे. फक्त ज्ञानाचा मार्ग परमेश्वराच्या पायाजवळ जातो व अज्ञानाचा मार्ग त्याच्या विरुद्ध दिशेने दूरवर जातो. आपण शक्यतो अज्ञानी मार्गाचा अवलंब करतो. अज्ञानातच आपला शेवट होतो पण परमेश्वर प्राप्ती मात्र होतं नाही.  सुजाण माणसाने ज्ञानाचा प्रवास करावा. शेवटी साखर मूठभर गोड व कणभरसुद्धा गोडच असते. ज्ञानाच्या मार्गाचाही तसंच आहे. ज्ञानाच्या मार्गात आपला शेवट झाला तरी चालेल पण एक कणतरी साखरेची गोडी मी अनुभवली हे अभिमानाने सांगता येईल. पूर्ण ज्ञानी होता आलं नाही तरी किमानपक्षी अज्ञानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न तरी केला हे ठामपणे सांगता येईल.


 आपल्याकडे मन व त्याचे संयमन करण्यापेक्षा व्यक्ती तिचा पेहराव व राहणीमान यावर सध्या विशेष भर देण्यात मग्न आहेत. विचारांपेक्षा कपडे शुभ्र असण्यात आपण धन्यता मानतो. कपडे घाणेरडे घालावेत असं मुळीच नाही. पण चमकदार राहणीमानात सुरेख विचार जोपासण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करताना आपण का दिसत नाही? व्यक्ती म्हणून प्रत्येकाला स्वतंत्र अस्तित्व आहे. यात गरीब व श्रीमंत किंवा काळा व गोरा हा भेदभाव मान्य नाही. चांगल्या विचारांना यातील कशाचीच बाधा येत नाही. परंतु एक गोष्ट आपल्याकडे सर्रास पहावयास मिळते, श्रीमंत श्रीमंतीच्या ध्यास घेतात. सुंदर विचार सोडा पण साधं किरकोळ सत्कृत्यही अनेक दूषणं दिल्याशिवाय त्यांच्या हातून होत नाही. त्यांचे विचार फक्त पैशाशी निगडित असतात. पैसा मनाची शांती कधीच आणू शकत नाही. ते त्याचं कामही नाही. पैसा गरजेचा तर आहेच. पण व्यक्तीच्या गरजेअधिकचा पैसा चित्त विचलित करून मानाचा बीभत्सपणा पेरतो. सुंदर विचार जोपासण्यासाठी असतात. त्यांची चेष्टा करण्यासाठी नाहीत. चिंतन व चित्ताचे समाधान ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधून देणारे रामबाण औषध आहे. मन स्थिर करू शकणारा प्रत्येक माणूस जवळजवळ परमेश्वरच मानावा लागेल. मनाची ही अवस्था माणसाला परमेश्वरयुक्त करून सोडते. एकदा असे रूप अनुभवले की जीवनाचे वेगळं, कधीही न पाहिलेलं सुंदर रूप आपण पाहू शकतो. स्वार्थ गळून पडतो. अभिमान, अहंकार, क्रोध नाहीसे होतात. 

 मनापासून केलेलं चिंतन, मनाबरोबर शरीर, घर व समाजाची शुद्धी करतं. मनातील मरगळ बाजूला होऊन व्यक्तीचं मन व जीवन प्रफुल्लित करतं. त्यातील शक्तीचा अनुभव घेतल्यानं जीवनाला नवसंजीवनी मिळाल्याचा अनुभव प्रत्येकक्षणी आपण अनुभवू शकू. अनेक ठिकाणी मागून व प्रयत्न करूनही न मिळणारे समाधान चिंतनातून प्रकट होईल. आत्मसाक्षात्कार किंवा ज्ञानप्राप्ती हा त्याचा शेवटचा टप्पा आहे. सद्गुरुखेरीज हा टप्पा कोणीही पार करू शकत नाही. स्वतःच्या कल्याणासाठी गुरूंचे पाय धरण्यात कमीपणा कधीच  मानता कामा नये. योग्य वेळी योग्य ते उपचार केल्याने निरोगी राहण्यास मदत होते. चित्तशुद्धीच्या प्रत्येक टप्प्यात अलौकिक आनंद आपण सोधला तर मनं त्यात पुढं पुढं सरकेल व शेवटी यश मिळेल. त्यानंतर स्वार्थ सुटेल व परमार्थ सुरू होईल. निंदा थांबेल व जीवन योग्य मार्गाला सुरळीतपणे धाव घेईल. व्यक्तीचा विकास त्याच्या प्रयत्नावर अवलंबून असतो. प्रबल प्रयत्न, उत्कट इच्छा, उत्तम यशात परावर्तित होते. चिंतन करता करता परमेश्वरप्राप्ती होते. मन सुदृढ होईल. शेवटी निरोगी मनच निरोगी शरीर व पर्यायाने निरोगी समाज व राष्ट्र ठरवतात. 190414  ©Harish Gore

दौशाड

  दौशाड हे डॉ. नंदकुमार राऊत यांच्याकडून मिळालेले पुस्तक मला जसे वाटले तसे.....        पुस्तकाचे नाव एका चिवट जातीच्या वनस्पतीच्या नावावरून ...