चिंतन
मंथन व चिंतन या दोन शब्दांमध्ये बऱ्याचवेळा आपली गफलत होण्याची शक्यता असते. मंथन वस्तू, पदार्थ किंवा विचारांचे होते तर चिंतन परमेश्वरासाठी, प्रेमासाठी किंवा इच्छित विचारांची प्राप्ती करण्यासाठी केलं जातं. चिंतन मनःशांतीसाठीही केलं जाते. रामप्रहरी केलेले चिंतन परमेश्वर व भक्त यांच्यातील दरी कमी करून मनःशांतीसाठी अत्यंत उपयोगी ठरतं. देवावरील आपली श्रद्धा अधिक गाढ करण्यासाठी त्याचा साधकाला उपयोग होतो. मंथनाचे मात्र तसे नाही. अनेक व्यक्ती एका व्यासपीठावर बसून विचारांचे मंथन करतात. त्यात चांगलं व वाईट दोन्ही विचार असू शकतात. त्यात स्वार्थ व परमार्थ काहीही असू असत. अशा प्रकारची विचारमंथने कदाचित अनिर्णयीत होऊन नवीन वादाला तोंड फोडून त्याचा शेवट होतो. काही विचारमंथने चांगलीही असू शकतात, यात वाद नाही. भारतामध्ये प्रसारमाध्यमात अनुभवलेल्या बहुतेक विचारमंथनाचा शेवट शब्दयुद्धामध्ये परावर्तित होतो. कोणताही ठोस निर्णय न होता मंथनाचा शेवट होतो. एक मात्र नक्की, मंथनातून अनेकांचे विचार समोर येतात. समाजामध्ये ते रुजले जातात. व्यक्तीची विचारांची बांधणी ज्या प्रकारची असेल, त्या प्रकारच्या विचाराच्या प्रवाहाची माणसं एकत्र येतात. अशा समविचारी लोकांचा एक संच तयार होतो. अशा संचामध्ये अनेक राजकीय पक्ष, धार्मिक संस्था, धार्मिक पंथ यांचा समावेश होतो. एकत्र येण्यानं विचारांची ताकद वाढते. त्याला बळ मिळते. असे लोक आपले विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात.
मंथन इतर अनेक बाबींसाठी उपयोगात आणलं जात. रसायनशास्त्रात केलेले मंथन नवीन रसायनाला जन्म देते. त्यातून अनेक रासायनिक बाबींचा शोध लागला व आपले जीवन सुखकारक होण्यास त्याची मदत झाली. दह्याचं मंथन केल्यानं लोण्याचा शोध लागला. दही सुरुवातीला घुसळणाऱ्या महामानवानेच मंथन या शब्दाचा शोध लावला असावा. दह्याच्या घुसळण्यानं उत्तम प्रतीचं तुप मिळतं. भगवान श्रीकृष्ण लोण्याच्या गोळ्यासह अत्यंत विलोभनीय, लोभस व देखणें दिसतात. बालपणाचा त्यांचा बहुतेक कालावधी दही, दूध, व लोण्याच्या सहवासात गेला. भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा श्रीकृष्णांनी आपल्याला दिला. एक गोपालक मिळाला. एक सखा मिळाला. आणि मिळाला एक भक्तिमय विचार....! जो विचार प्रेमळ आहे, जो लोभस आहे, खोडकर आहे आणि आहे तेजस्वी....! भगवान श्रीकृष्णांचे संपूर्ण आयुष्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या प्रत्येक रूपाची पूजा विलक्षण विलोभनीय वाटते. पाहता क्षणी प्रेमात पडावं असं ते रुप....! डोळ्यात साठवून तृप्तीचा ढेकर द्यावा इतकं निर्व्याज रूप ते....!
देव व दानव यांच्यामध्ये समुद्रमंथन झाल. मला वाटते मंथन शब्दाची व्याप्ती समुद्रमंथनामुळेच वाढली असावी. इतक्या मोठ्या प्रमाणावर आजवर कुठेही मंथन झाल्याच ऐकलं किंवा पहिलं नाही. समुद्रमंथनातून अनेक बाबी समोर आल्या. काही चांगल्या तर काही वाईट. अमृतासारखा अमूल्य घटक आणि दारूसारखा विनाशकारी घटक समुद्रमंथनातून मिळाला असल्याची आख्यायिका आहे. अमृत आपल्यापैकी कोणाच्या वाट्याला आलं नाही. ते येणारही नाही. कारण अमृत स्वर्गात असल्याच धर्मग्रंथ सांगतात. दारू दानवांच्या अर्थात राक्षसांच्या वाट्याला आल्याचही आपल्याला कळतं. ती मात्र हवी तिथं विनासायास मिळते. अमृत स्वर्गात व दारू इथे....? आजही आपल्यातील मानव ती प्राशन करतात. ती प्यावी कि नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण अशा पद्धतीने आपण दानवासारखं मूर्ख तर बनलो जात नाही ना हा विचार मात्र गांभीर्याने होणे गरजेचे वाटते. आपल्या वाईट सवयी आपल्याला अधोगतीकडे घेऊन जातात. अनेक सुखी संसार रस्त्यावर येतात व निरागस कुटुंबांना हालापेष्टा, दुःख, दैन्य व दारिद्र्य सोसावं लागतं. आपल्या कुटुंबाच्या नरकयातनांच सोयरसुतक अशांना नसतं. दुःखाच्या खाईत लोटणारा निर्णय योग्य की अयोग्य हे ठरवण्यासाठी पुन्हा मंथन किंवा चिंतन करण्यासाठी ज्याच त्यांन बसण्याची गरज आहे.
चिंतन चित्ताची शुद्धी करण्यासाठी केल जात. चित्त शांत, स्थिर राहावा म्हणून चिंतन उपयोगी आहे. मंथन हे करण्यासाठी असतं तर चिंतन अनुभवण्यासाठी. मन स्थिर बनवण्यासाठी चिंतन करणे गरजेचे आहे. चिंता व चिंतन परस्परविरोधी बाबी आहेत. चिंतेमध्ये भीती लपलेली असते. भीती असल्याशिवाय चिंता करू शकत नाही. चिंतनामध्ये भीती, क्रोध, लोभ नसतात. मनाची निर्विकार अवस्था प्राप्त करण्यासाठी चिंतन केलं जातं. चिंतनामध्ये भविष्याचा वेध घेण्याची प्रचंड ताकत आहे. भूतकाळाची स्मृती व भविष्याचा वेध फक्त चिंतनातच घेतला जाऊ शकतो. केलेल्या चिंतनातून व्यक्त होणारे विचार आत्मरुप असतात. वाईट गोष्टी समोर ठेवून केलेले चिंतन विध्वंसक होऊ शकत. म्हणून अंतकरण शुद्ध करून चिंतन केल्यास समाज व चिंतन करणारी व्यक्ती दोन्ही उजळून निघतात. काळ बदलला. काळाबरोबर आपणही बदललो. आपल्या गरजा बदलत आहेत. चिंतनासारखी त्रिकालबाधित सत्य गोष्ट आपल्यापासून कितीतरी दूर गेली आहे. समाज अस्थिर होण्यामागे महत्त्वाच कारण चिंतनाची उणीव आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अनामिक भीती सहजपणे पाहू शकतो. अनेक काळज्या, जबाबदाऱ्यांची भीती घेऊन आपली जगण्याची धडपड अखंडपणे चालू आहे. यात कधी चिंतनासाठी थोडा वेळ आपल्याकडे शिल्लक राहत नाही. जगणं सुरू राहत व काळजी, भीती तशीच राहते. दुसऱ्या दिवशी आपण जागे होतो व नकळत कालच्याच दृष्टचक्रात स्वतःला अडकवून घेतो. आयुष्य असेच पुढे जातं व खोलवर चिंतन करण्याची वेळ आपल्यावर नकळत येते.
काळजी अर्थात चिंता कधीकधी जीवघेणी ठरू शकते. सकारात्मक दृष्टिकोनातून केलेली चिंता चांगले विचार पुढे आणते. तर नकारात्मक दृष्टिकोनातून होणारी चिंता व्यक्तीला झिजवल्याशिवाय राहत नाही. 'चिंतासे घटी चतुराई' अशा अर्थाने हिंदीत कबीरांनी भक्तिरचना केली आहे. थोर संत विचारांची मुक्तपणे उधळण करणारी सोनेरी पाखरं होत. संत कबीर त्यापैकी एक. माणूस कर्तुत्वान असतो. पण तो चिंता खूप करतो. त्याची अक्कलहुशारी, धीटपणा या चिंतेमुळं खुंटते. सारासार विचार करणारी बुद्धि साशंक होते. चिंतेचे ढग मनामध्ये दाटून येतात व हाती घेतलेले कार्य निष्फळ होतं. चिंता करण्यामुळे व्यक्तीला मिळालेल्या यशाचे अपयशात रूपांतर तर होतेच परंतु त्याच्या आरोग्यावरही त्याचा दुष्परिणाम चिंता सोडून जाते. माणसाला माणसातून उठवण्याचे काम चिंता करते. चिंता करण्याने अनेकांचे वजन झपाट्याने कमी होतं. चेहऱ्यावर तसे स्पष्ट दिसतात. अशा माणसाला इतरांनी समजावलं तरी चिंतेच्या दुष्टचक्रात तो गुरफटल्याने सत्य विचारापर्यंत पोहोचनं त्याच्यासाठी फार कठीण जातं. खरंतर चिंता कशाचीच नसावी. माणूस कर्म नावाच्या बंधनाने बांधला गेला आहे. कर्मामध्ये बरोबर व चूक हे दोन मूळ विचार आहेत. त्यानंतर सत्कर्म व दुष्कर्म आहे. स्वार्थ व परमार्थ आहे. पाप व पुण्य आहे. आपल्या कर्माचा चिंतेशी जवळचा संबंध आहे. आपण केलेले कर्मच ठरवते की आपण व आपल्या संबंधित व्यक्तीने चिंता करायची की नाही. कर्म करताना असा सारासार विचार समाजामधून लुप्त होताना आपणास पहावयास मिळतोय. आपण दुःखी होण्यामागे हे महत्त्वाचं कारण असू शकेल. कर्माचं रूपांतर सत्कर्मात करण्यासाठी चिंतनाची आवश्यकता आहे. व्यक्तीचे नियंत्रण विचार करू शकतात. विचार शुद्ध करण्याचं महत्त्वाचं काम चिंतन करते. म्हणजे कर्माचे रूपांतरण सत्कर्मात करण्यासाठी किंवा आपली शक्ती विधायक कामासाठी वापरण्यासाठी चिंतनाची नितांत आवश्यकता आहे.
भक्तीमध्ये चिंतनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चिंतनाशिवाय भक्ती कदाचित अपूर्ण राहू शकते. चिंतन भक्ताला देवरूपी करते. चिंतनच परमेश्वराबाबतचे भक्ताचे मनात बांधलेले आराखडे पूर्ण करते. चिंतन एकांतात किंवा कोलाहलातही करता येते. सहसा एकांतातील चिंतनाला बाधा येत नाही. अशा प्रकारचे चिंतन आपल्याकडे प्रचलित आहे. गर्दी किंवा गोंगाटात चिंतन करण्यासाठी मनाची उच्च अवस्था प्राप्त असणे गरजेचे आहे. स्थिर व निश्चल मन शांतता व गोंगाट यातील कशानेच बाधित होत नाही. आत्यंतिक कोलाहालात किंवा स्तब्ध शांतता या दोहोंमध्ये ज्याच्या मनाचा स्थिरपणा टिकतो, तो सर्वश्रेष्ठ भक्त मानला जातो. अशांना सुख किंवा दुःख प्रभावित करू शकत नाही. व्यक्तीव्यक्तीनुसार चिंतनाचे परिणाम वेगवेगळे असू शकतात. परंतु चिंतन सर्वच अवस्थेमध्ये आपल्याला मदत करणारे ठरू शकते. अपयश सदैव झिणझिण्या आणतं, आपण निराश होतो. समाजामध्ये अनेक माणसं त्यामुळे खचून जाऊन शांत बसतात. अशांनी चिंतनाची मदत घेतली तर त्यांना त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. अपयशामुळे प्रयत्न सोडणे हा निव्वळ भित्रटपणा होय. उलट अपयशातून चुका सुधारण्याची संधी माणसाला मिळते. पुन्हा अशा चुका टाळून यश खेचून आणता येऊ शकत. यश नेहमी प्रेरणा देतं. तर अपयश बोचरं वाटतं. अपयश टाळण्यासाठी चिंतनाची आवश्यकता आहे. अपयश सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यास त्याला सामोरे जाण्याचे मनोधर्य आपल्या अंगी आल्याशिवाय राहणार नाही. अपयशाचं निरीक्षण चिकित्सक वृत्तीने व्हावं. स्वतःवर होणारा आघात मोठेपणाने पचवावा व नवीन प्रयत्नात स्वतःला बेफान करून द्याव. सकारात्मकतेचे नवीन रुप, चैतन्याची सळाळी व यशाची किनार नव्यानं नशिबी आल्याशिवाय राहणार नाही.
माणसाच्या अनेकविध गरजा आहेत. त्यातील काही प्राथमिक तर काही दुय्यम आहेत. प्राथमिक गरजा मिळवण्यात आपण सर्वजण व्यस्त असतो. प्राथमिक गरजांबरोबर दुय्यम गरजा प्राप्त करण्यासाठी धडपडतो. प्राथमिक गरजापेक्षा अनाठायी इतर गरजांना अवाजवी महत्त्व देतो. गरज प्राथमिक आहे की दुय्यम आहे, इतपत वर्गीकरण करणारी सद्सद्विवेकबुद्धी आपण झाकून ठेवतो व इथंच फसतो. गरजा असाव्यात पण गरजांवर मर्यादाही असाव्यात. अवाजवी गरजा व्यक्तीचे चित्त अस्थिर करतात. काही कारण नसताना आपण पिळले जातो. नाहक त्रास सहन करावा लागतो. आयुष्य बोजड वाटू लागतं व जगण्यातील मजा हवा गेलेल्या टायर प्रमाणे थांबते. नको त्या गरजांना प्राथमिकता देण्यांनं जीवनातील मुख्य उद्देश बाजूला पडून नको असलेल्या व्यापांची माळ नकळत गळ्यात येऊन पडते. आपण परिस्थिती जशी येईल त्या पद्धतीने वागतो. पण एके दिवशी याच परिस्थितीच्या जाळ्यात खोलवर, दीर्घकाळ न सुटण्यासाठी अडकतो. गरजांच्या हव्यासापोटी धांद्रटपणा करणारी मंडळी सुखी होऊ शकत नाहीत. जगताना थोडावेळ थांबून चिंतन करण्याची नितांत आवश्यकता आहे. जगण्यातील मजा चिंतनाने वाढते. अतिगरजांपोटी अनेक दुर्गुण अंगात शिरतात व आपला स्वभावही त्याच दुर्गुणांसारखा होतो. चित्ताची शुद्धी कर्माने होऊ शकते. पुन्हा कर्मातील शुद्धी चित्तामुळे व चित्त शुद्धी फक्त आणि फक्त चितांनानेच होऊ शकते. गरजा पूर्ण करण्यासाठी केलेला हव्यास माणसाला पशुरुप देऊन जातो.
महात्मा गांधीजींना चाळीस डझन ड्रेस असल्याचे वाचनात आलं. सत्य आणि निष्ठा कशी असावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महात्मा गांधी. गरज ही शोधाची जननी मानली जाते. शोध लागतो, गरजा वाढतात. इतक्या मोठ्या प्रमाणावर स्वतःसाठी कपड्यांची हौस करणारा माणूस इतक्या कमी व साध्या कपड्यांमध्ये कसा भागवून घेत असेल, हे समजण्यासाठी त्यांच्या चरित्राचे वाचन होणे गरजेचे आहे. गरजा तर आहेतच. पण अनाठायी गरजांपासून स्वतःला अलिप्त ठेवण्यासाठी कसं तयार करायचं हे गांधीचे मोठ्या हुकुमाने आपल्याला दाखवतात. याविषयावर गांधीजी सतत बोलले. नुसते बोलले नाही तर ते सर्व प्रत्यक्षात उतरवलं. अनेक गरजा कमी केल्या. आयुष्य सुटसुटीत झालं. त्यामुळे गांधींजीचं आयुष्य प्रेरणादायी होऊन जातं. जगात त्यांच्यासारखे महापुरुष अवतरले, त्यामुळेच आपला समाज तग धरून आहे. आज गांधीजी आपल्यात नाहीत. परंतु जोपर्यंत त्यांचे विचार आहेत, तोपर्यंत समाज घट्ट बांधलेला असेल. गांधीजींनी त्यांच्या असंख्य गरजा प्रयत्नपूर्वक कमी केल्या. त्यातून त्यांना त्रासही झाला.
आपण सवयींचे गुलाम असतो. वस्तूंचा उपभोग घेण्यात स्वतःला धन्य समजतो. परंतु अशा वस्तूंचा किंवा व्यक्तीचा त्याग करणे ही बाब म्हणावी तेवढी सोपी नाही. मनाविरुद्ध घडणारी प्रत्येक घटना माणसाला क्रोध उत्पन्न करते. वस्तूमुळे आपली सोय होते तर ती वस्तू त्यागल्याने कायमची सोय होते, हे ध्यानात घेतले पाहिजे. चंगळवादी व भोगी समाजामध्ये प्रत्येक गोष्ट मला मिळालीच पाहिजे, यामागे आपण लागलोय. भोगी वृत्तीमुळे त्यागीपणा लुप्त होतोय. त्याग संपल्याने माणसं व पर्यायाने माणुसकी संपतेय. महात्मा गांधीजींनी अशा अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी प्रयत्नपूर्वक सोडल्या. गरजा कमी केल्यामुळे माणसाला कमी दुःख भोगावं लागतं. गरजा कमी करणे म्हणजे गरजांचा त्याग करणे. ही बाब जेवढी दिसते, तेवढी सोपी नाही. त्यात गरिबी व श्रीमंती हा मुद्दा नाही. सद्या असण्यापेक्षा दिसण्याकडे लोकांचा कल जास्त आहे. प्रत्येक गोष्टीचं प्रेझेंटेशन सुंदर होण्यासाठी अट्टाहास होतो. त्यापोटी गरजा वाढतात पण त्या कमी होण्याचं नावं घेत नाहीत.
गांधीजींनी प्रयत्नपूर्वक अनेक गरजा कमी केल्या. भोगी व विलासी वृत्ती संपली. त्यागी व उदात्त व्यक्तिमत्व जगासमोर आलं. गांधी नावाचा विचारदिवा आजही तेवढ्याच ताकतीने सर्वांना प्रकाश व चेतना देतोय. आयुष्य अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींचे बनले आहे. जगण्यातील मजा व सजा अशा छोट्या-मोठ्या गोष्टीतच लपलेली असते. त्यागानंतरचे गांधींच आयुष्य अत्यंत साधं, सरळ व जगाला भुरळ घालणार ठरलं. त्यागाच ढोंग करणारी माणसंसुद्धा आपल्याकडे पाहावयास मिळतात. जे गांधीजींनी केले, ते प्रत्येकजण करू शकतो. पण म्हणून प्रत्येकजण गांधींजींसारखा होईल असं नाही. ढोंगी त्यागीवृत्ती कधी ना कधी पकडली जाते व सत्य जगासमोर येत. चांगल्या विचारांचा गळा घोटणारी अशी मंडळी समाजासाठी कीड आहेत. अशा घातकी मंडळींसाठी तर चिंतन फार आवश्यक आहे. समाज परिवर्तन करण्याची प्रचंड ताकत चिंतनामध्ये आहे. स्वतः गांधीजी काळ्याकुट्ट अंधारात परमेश्वर चिंतन करत होते. पहाटे केलेले चिंतन परमेश्वराला आवडते. यामध्ये कधीही खंड पडू दिला नाही. गांधीजी शिस्तीचे भोक्ते होते. ठरविलेला विचार दृढतेने उद्दिष्टपूर्तीकडे नेणें त्यांचा नित्यनेम असे. दिवसाची सुरुवात अशा प्रकारच्या मंगलमय चिंतनाने करणारे एकमेव स्वातंत्र्यसेनानी गांधीजी होते. चिंतानामुळे विचाराला चालना मिळते. जगण्यात ऊर्जा येते व अनेक विधायक कामे हातून होतात.
एका गावाला जाण्याचे अनेक मार्ग असू शकतात. जगण्यालाही अशाच प्रकारचे अनेक मार्ग आहेत. चिंतनशील विचारी जीवनाचा मार्ग हितावह असतो. लुप्त होणाऱ्या अनेक गोष्टींपैकी चिंतन एक आहे. काळाच्या प्रवाहलाटेवर आपण अरुढ होऊन चाललोय. वेगावर आपलं नियंत्रण नाही. त्यामुळे अनेक कटू प्रसंगाला आपल्याला सामोरे जावे लागतेय. खरंतर अशा प्रकारचा व्यर्थ खटाटोप करण्याची गरज नसल्याचं दिसून येईल. सभोवतालच्या परिस्थितीशी एकरूप होऊन आपण वेगवान होतो व जीवघेण्या धडपडीत पडतो. थांबण्याचं नावच घेत नाही. अशा प्रकारचं जीवन मानव जातीसाठी संयुक्तिक नाही. जीवनामध्ये गोडवा आहे. आपलं कर्म व कर्तुत्व त्यामध्ये कडूपणा आणते. आपले विचार योग्य प्रवाहदिशेने जात नाहीत व आपण भरकटतो. भरकटलेल्या नावेला किनारा मिळालेच असे नाही.
चिंतनामध्ये प्रचंड ताकत आहे. ती अनुभवण्यासाठी आपलं मन तयार असावं लागतं. स्वामी विवेकानंद, कोण मला देव दाखवेल का यासाठी अनेकांना थेट प्रश्न विचारत होते. आपल्याकडे संत नामदेवांची अवस्था काहीशी तशा प्रकारची झालेली दिसते. व्यक्तीची विद्वत्ता चिंतनाशिवाय परिपूर्ण होत नाही. शेवटी रामकृष्ण परमहंस भेटले. स्वामीजींची तहान भागली. शोध संपला व सुरू झाले चिंतन...…! या चिंतनातून त्यांच्या जीवनातील सर्व गोष्टी पुढे घडत गेल्या. त्या सर्व गोष्टींचं मुळ चिंतनात आहे.
चिंतन म्हणजे फक्त स्थिरपणे डोळे मिटून बसणें, इतका मर्यादित अर्थ चिंतनाचा लावणे म्हणजे चिंतनावर अन्याय केल्याप्रमाणे होईल. ईश्वराचे सूक्ष्म रूप माझ्या अंतःकरणामध्ये विराजित असल्याचा शोध लावणे म्हणजे चिंतन होय. हा शोध लागल्यानंतर त्याचा समस्त जगासाठी मी कसा उपयोग करू शकतो, हा विचार प्रवाह जागृत करणे म्हणजे चिंतन. स्वतःचा स्वार्थ चिंतनाच्या माध्यमातून साधणे म्हणजे चिंतनाचा दुरुपयोग केल्याप्रमाणे आहे. चिंतनाचा शेवट समाजहितासाठी झाला पाहिजे. स्वहितानंतर समाजाचे ऋण फेडण्यासाठी केलेला विचार परोपकारी आहे. अशा प्रकारच्या विचारांमध्येच सामाजिक शक्ती कालांतराने साठत जाते. जनकल्याणाच्या अनेक बाबी त्रासदायक वाटल्या तरी व्यक्तीचे व्यक्तिमत्व उजळून त्याला अजरामर केल्याशिवाय राहत नाहीत.
अनेक कलावंत, खेळाडू व उच्चपदस्थ अधिकारी चिंतनाचा आधार घेताना आपल्याला दिसतील. शरीरासाठी रोज व्यायामाची गरज असते. नेमकी तशाच प्रकारची गरज मनासाठी आवश्यक असते. ती मनाची मशागतच आहे. जितकी ही मशागत चांगली, तितके फायदे जास्त. चिंतन केल्याने मन निरोगी व निर्विकार राहण्यास मदत होते. कर्म करूनही कर्मापासून आपण दूर राहतो. मनाला अतिउच्च सवयी लागतात. स्वतःबरोबर कुटुंब व समाज आदर्श करण्यात आपलाही काही वाटा येतो.
मनाचे विकार न संपणारे आहेत. मनामध्ये उठणाऱ्या भावभावना न संपणाऱ्या आहेत. अनेक संत व सज्जन याविषयी आपल्याला सांगून गेलेत. कधी-कधी आपणही त्या भावनेतून मनाला समजवण्याचा प्रयत्न करतो. पण 'दिल है की मानता नही' अशीच आपली अवस्था होते. शेवटी मनामागून आपण निमूटपणे मान खाली घालून चालत असतो. मनाच्या तालावर जीवन जगतो. शेवटी कळतं की आपण चुकीचं जीवन जागलो. पण तोपर्यंत खूप उशीर होतो. काळाचा प्रवास व आयुष्याचा प्रवास विरुद्ध दिशेने कधीच होतं नाही. एक संधी दोन वेळा येत नाही. जगलेलं जीवन फक्त आठवणरुपात शिल्लक राहतं. येणारा काळ आपल्यासाठी काय वाढून ठेवतोय हे माहीत नसतं. म्हणून चांगल्या विचारांची सुरुवात जरा लवकर केली तर उर्वरित आयुष्यात समाधान प्राप्त होतं.
माणसाला जसं स्वैर मन आहे तशी विचारी बुद्धी आहे. मन व बुद्धी यांच न संपणार द्वंध्व आहे. या युद्धात बहुदा बुद्धी हरते. मन कधीच माघार घेत नाही. मानापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. पण मन बुद्धीवर अधिराज्य गाजवते. विवेकबुद्धीने मनावर ताबा मिळवला तर मन बुद्धीच्या मागे निमूटपणे येईल. पण तसं होतं नाही. शेवटी शरीरावर अधिराज्य गाजवण्यात मन बाजी मारतं. आपण फसतो. बुद्धी शरीराची साथ शेवटपर्यंत देते. पण मन बुद्धीला वेगळ्या मार्गावर नेते. त्यांच्या संघर्षात प्रत्येक व्यक्ती अडकते. अडकलेल्या संघर्ष जाळ्यातून कोणाचीच सुटका नसते. काही मोजकेच या संघर्षापासून अलिप्त राहतात. ते राहण्यासाठी चिंतन अत्यंत उपयोगी ठरते. मन व बुद्धी यांची स्वतंत्र बैठक आहे. त्यांच्यातील होणारा संघर्ष अनादीअनंत काळापासूनचा आहे. हा संघर्ष चिंतनाने शांत होतो. मनाला मनाचं काम मिळतं व बुद्धी बुद्धीच्या मार्गाला लागते. एकदा अशा प्रकारची वाटणी झाली म्हणजे ती व्यक्ती समाधान पावते. अशाप्रकारे चिंतन अनेक मूळ गोष्टींच्या जटिलतेच्या अभ्यासाचे साधन आहे. चिंतनाची सुरुवात विचारांच्या कालवाकालवीतून होते. तर त्याचा शेवट अगाध शांतता व कधीही न अनुभवलेल्या समाधानानं होते. अपयश येते पण चिंतनाचा मार्ग धरला म्हणजे कालांतराने त्या अवस्थेपर्यंत आपण पोहोचतो.
समाजामध्ये अज्ञानी व्यक्तींचा भरणा तुलनेने अधिक आहे. काही परिस्थितीने, काही स्वभावाने, काही शिक्षणाने तर काही स्वतः च्या समाजूतीमुळे अज्ञानी होतात. अज्ञानी हा शब्द वेगळ्या अर्थाने घेतला आहे. अज्ञानी म्हणजे अडाणी नव्हेत. ज्याला ज्ञान नाही तो अज्ञानी. अनेक अडाणी माणसे ज्ञानी असतात. अज्ञानींचा भरणा तुलनेने सुशिक्षित लोकांच्यात जास्त आहे. आपण ज्ञानी होण्याचा कधी प्रयत्न करत नाही. मला ज्ञान मिळवायचय अशी म्हणणारी थोडीच माणसं आपण पाहतो. ज्ञानामध्ये जडत्व आहे. हे जडत्व घेऊन आपण जगु शकत नाही. ज्ञानाचा ध्यास असतो. हा ध्यास कदाचित घरापासून, समाजापासून आपल्याला अलिप्त करण्याची भीती असते. त्यामुळे त्याच्या नादी लागत नाहीत. काहींना ज्ञानी झाल्याचा अभिमान होतो. ज्ञानी होणे म्हणजे पाठांतर करून शब्दांची पोपटपंची ओठात आणणें नव्हे. ज्ञान त्याअर्थाने खोलवर आहे. ते मिळवण्यासाठी अतोनात प्रयत्न करावे लागतात. काही लोक सुरुवात करतात व मध्येच खंड पडतो. अशा प्रकारे खंडाने मिळवलेले ज्ञान अखंडपणे कधीच राहत नाही. ते दुसऱ्या अर्थाने अज्ञानच होय. 'उथळ पाण्याला खळखळाट फार' ही म्हण अज्ञानासाठी आहे. ज्ञानी माणूस शांत असतो. ज्ञान मिळवणे एक तपस्या आहे. ती सर्वांनाच साधत नाही.
विवेकानंद ज्ञानी महापुरुष होते. लहानपणी उत्तम संस्कार त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावर दिले होते. त्यागाची व भक्तीची परंपरा त्यांच्या घरात होती. पिढीजात भक्ती वारसा लाभलेले कुटुंब व त्या कुटुंबामध्ये जन्माला येण्याच सौभाग्य मिळणें ही साधी बाब नाही. अशा भक्तीमय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. स्वामींजींचे आजोबा परमेश्वराच्या शोधार्थ उतारवयात घर सोडून निघून गेले. छोटा नरेन कदाचित यामुळे प्रभावित होऊन तारुण्यात आल्यानंतर मला देव कोण दाखवेल का, या विचाराने झपाटून गेला असावा. अतिउच्च ध्येयाने झपाटल्याने त्याला त्याचे ध्येय प्राप्त झालं. एक ज्ञानी महापुरुष म्हणून आपण आजही त्यांची पूजा करतोय. हे ज्ञान मिळवण्यासाठी अनेक कष्ट त्यांना करावे लागले. ते त्यांनी केले. परंतु त्यामध्ये चिंतनाचा मोठा वाटा असल्याचे आपल्याला दिसेल. चिंतनाने चित्ताची शुद्धी होते. मन लख्ख प्रकाशाने भरून जाते. अज्ञान दिसेनासे होतो व व्यक्तिमत्व उजळत. याच चिंतनाने ज्ञानाची प्राप्ती होते. अनेक गोष्टी कितीही झटले तरी माणसाला मिळत नाहीत. पण त्या चिंतनाने सहज मिळतात. बुद्धी व मन यांच्यातील संघर्षाचा अंत होतो. महत्त्वाचं म्हणजे पाय जमिनीवर स्थिर होतात.
बऱ्याच वेळा ज्ञान ग्रहण केल्यानंतर ती व्यक्ती अभिमानी बनते. पण पुर्ण ज्ञानी व्यक्ती सर्व दोषांपासून मुक्त असते. थोर शास्त्रज्ञ न्यूटन यांनी अनेक उपयुक्त शोध मानवजातीसाठी लावले. त्यांच्या गतीच्या शोधामुळे आपली प्रगती झाली. उर्जेविषयी, पदार्थाच्या स्वरूप, अवस्था व गुणधर्माविषयी अनेक शोध व समीकरण त्यांनी अव्याहतपणे समाजासमोर ठेवली. अनेकांनी त्यांच्या गृहितकांवर टीकाही केली. समाजातील अपूर्ण अज्ञाणींना ती शेवटी मानावी लागली. अशा या थोर ज्ञानी माणसाने स्वतः विषयी बोललेले वाचले म्हणजेच मन थक्क करते. 'समुद्रकिनाऱ्यावरील रेतीतील छोट्याशा वाळूच्या कणाएवढं माझं अस्तित्व आहे.' हे वाक्य असल्या ज्ञानी पुरुषाच्या तोंडून बाहेर पडल्यानंतर आपण कसे व किती शुन्य आहोत, हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. ज्ञानामध्ये जडत्व जरूर आहे. पण ज्ञानामध्ये नम्रता आहे, समाजाचं भलं करण्याची ताकद आहे. नम्रतायुक्त ज्ञानी महापुरुष अनेक होऊन गेले. त्यातीलच एक न्यूटन होय. अनेक शोध अखंडपणे केलेल्या चींतनामुळे शक्य झाले. आपण कसे व कोणत्या स्थितीत चिंतन करतो हे महत्त्वाचं असतं.
अखंडपणे केलेले चिंतन अनेक गोष्टींचा उलगडा सहजपणे करतं. ध्यासयुक्त चिंतन परमेश्वर प्राप्ती मिळवून देते. एकदा 'तो' मिळाला म्हणजे ज्ञानसुद्धा त्याच्या पुढे फिकं पडतं. कारण सर्वच गोष्टीचं मूळ त्याच्या ठायी असतं. त्यामुळे ज्ञान व अज्ञान 'त्याचीच' लिला आहे. फक्त ज्ञानाचा मार्ग परमेश्वराच्या पायाजवळ जातो व अज्ञानाचा मार्ग त्याच्या विरुद्ध दिशेने दूरवर जातो. आपण शक्यतो अज्ञानी मार्गाचा अवलंब करतो. अज्ञानातच आपला शेवट होतो पण परमेश्वर प्राप्ती मात्र होतं नाही. सुजाण माणसाने ज्ञानाचा प्रवास करावा. शेवटी साखर मूठभर गोड व कणभरसुद्धा गोडच असते. ज्ञानाच्या मार्गाचाही तसंच आहे. ज्ञानाच्या मार्गात आपला शेवट झाला तरी चालेल पण एक कणतरी साखरेची गोडी मी अनुभवली हे अभिमानाने सांगता येईल. पूर्ण ज्ञानी होता आलं नाही तरी किमानपक्षी अज्ञानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न तरी केला हे ठामपणे सांगता येईल.
आपल्याकडे मन व त्याचे संयमन करण्यापेक्षा व्यक्ती तिचा पेहराव व राहणीमान यावर सध्या विशेष भर देण्यात मग्न आहेत. विचारांपेक्षा कपडे शुभ्र असण्यात आपण धन्यता मानतो. कपडे घाणेरडे घालावेत असं मुळीच नाही. पण चमकदार राहणीमानात सुरेख विचार जोपासण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करताना आपण का दिसत नाही? व्यक्ती म्हणून प्रत्येकाला स्वतंत्र अस्तित्व आहे. यात गरीब व श्रीमंत किंवा काळा व गोरा हा भेदभाव मान्य नाही. चांगल्या विचारांना यातील कशाचीच बाधा येत नाही. परंतु एक गोष्ट आपल्याकडे सर्रास पहावयास मिळते, श्रीमंत श्रीमंतीच्या ध्यास घेतात. सुंदर विचार सोडा पण साधं किरकोळ सत्कृत्यही अनेक दूषणं दिल्याशिवाय त्यांच्या हातून होत नाही. त्यांचे विचार फक्त पैशाशी निगडित असतात. पैसा मनाची शांती कधीच आणू शकत नाही. ते त्याचं कामही नाही. पैसा गरजेचा तर आहेच. पण व्यक्तीच्या गरजेअधिकचा पैसा चित्त विचलित करून मानाचा बीभत्सपणा पेरतो. सुंदर विचार जोपासण्यासाठी असतात. त्यांची चेष्टा करण्यासाठी नाहीत. चिंतन व चित्ताचे समाधान ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधून देणारे रामबाण औषध आहे. मन स्थिर करू शकणारा प्रत्येक माणूस जवळजवळ परमेश्वरच मानावा लागेल. मनाची ही अवस्था माणसाला परमेश्वरयुक्त करून सोडते. एकदा असे रूप अनुभवले की जीवनाचे वेगळं, कधीही न पाहिलेलं सुंदर रूप आपण पाहू शकतो. स्वार्थ गळून पडतो. अभिमान, अहंकार, क्रोध नाहीसे होतात.
मनापासून केलेलं चिंतन, मनाबरोबर शरीर, घर व समाजाची शुद्धी करतं. मनातील मरगळ बाजूला होऊन व्यक्तीचं मन व जीवन प्रफुल्लित करतं. त्यातील शक्तीचा अनुभव घेतल्यानं जीवनाला नवसंजीवनी मिळाल्याचा अनुभव प्रत्येकक्षणी आपण अनुभवू शकू. अनेक ठिकाणी मागून व प्रयत्न करूनही न मिळणारे समाधान चिंतनातून प्रकट होईल. आत्मसाक्षात्कार किंवा ज्ञानप्राप्ती हा त्याचा शेवटचा टप्पा आहे. सद्गुरुखेरीज हा टप्पा कोणीही पार करू शकत नाही. स्वतःच्या कल्याणासाठी गुरूंचे पाय धरण्यात कमीपणा कधीच मानता कामा नये. योग्य वेळी योग्य ते उपचार केल्याने निरोगी राहण्यास मदत होते. चित्तशुद्धीच्या प्रत्येक टप्प्यात अलौकिक आनंद आपण सोधला तर मनं त्यात पुढं पुढं सरकेल व शेवटी यश मिळेल. त्यानंतर स्वार्थ सुटेल व परमार्थ सुरू होईल. निंदा थांबेल व जीवन योग्य मार्गाला सुरळीतपणे धाव घेईल. व्यक्तीचा विकास त्याच्या प्रयत्नावर अवलंबून असतो. प्रबल प्रयत्न, उत्कट इच्छा, उत्तम यशात परावर्तित होते. चिंतन करता करता परमेश्वरप्राप्ती होते. मन सुदृढ होईल. शेवटी निरोगी मनच निरोगी शरीर व पर्यायाने निरोगी समाज व राष्ट्र ठरवतात. 190414 ©Harish Gore
No comments:
Post a Comment