Monday, 24 August 2020

चिंतन.....सद्भावनांचे......८

  समाधान 


 मनाच्या व्यक्त आणि अव्यक्त भावनातील सर्वात सुखकारक समाधान ही भावना आहे.  मनाच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. कधी आपण खिन्न असतो, कधी प्रफुल्लित, तर कधी गंभीर असतो. सभोवतालच्या घटनांचा मोठाच प्रभाव आपल्या मनावर सदैव होतो. त्यातूनच आपल्या मनाची जडणघडण होते आणि त्याला चांगल्या किंवा वाईट सवयी लागतात. कधी मनातील भावनांचा उद्रेक होतो तर बऱ्याच वेळीच भावना दडपून राहतात. मन कोंदटल्यासारखे होते. उदास उदास असल्याची हीच वेळ असते. काही वेळा मनात भावना सुंदर उमटतात. पण विचारांचा किंवा शब्दांच्या तुटवड्यामुळे ओठापर्यंत येत नाहीत. किंवा त्या शब्दबद्ध करता येत नाहीत. दुःखी भावनांना अश्रू वाट मोकळी करून देतात. अतिआनंदातही  हेच अश्रू कामी येतात. सुख व  दुःख या परस्परविरोधी भावना आहेत. या दोन्ही भावनांमध्ये मनाची परिपूर्णता अनुभवता येत नाही. पण समाधान अशी भावना अवस्था आहे की, ज्यामध्ये परिपूर्णता अनुभवता येते. समाधानात जे समाधान आहे ते अनेक वेळा शब्दांच्या पलीकडील असते. सुख वेगळ आहे व समाधान वेगळ आहे. सुखात समाधान असेलच असं खात्रीपूर्वक सांगता येत नाही. तसेच समाधानात सुख किंवा दुःख काहीही असू शकतात.

 सुख शोधण्यासाठी आपण अहोरात्र झटत आहोत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अधिकाधिक सुखी बनण्याचा आपला आटोकाट प्रयत्न आहे. केलेला प्रत्येक कष्टाचं ध्येय सुखी व संपन्न होणे हेच आहे. सुख व संपन्नता म्हणजे समाधान खचितच असू शकेल. सुखाचं नातं समाधानाशी जोडण चुकीचे आहे. सुख अनुभवण्यात आहे तर समाधान मानण्यात आहे.  दोहोतील हा मुख्य फरक आहे.  हा फरकच त्यातील दरी स्पष्ट करू शकेल.  सुख अनुभवण्यासाठी आधी सुख तयार करावं लागतं. ते करत असताना अनेक हालअपेष्टा सहन करून ते तयार होत. समाधानाच मात्र तसं नाही. त्यासाठी वेगळे कष्ट करावे लागत नाहीत. अथवा त्यासाठी कुठे स्पर्धेत उतरावे लागत नाही. ते सर्वस्वी आपल्या मनाच्या वळणावर व आपल्या विचारसरणीवर अवलंबून असते.

 समाधानाची एक परिभाषा आहे. ही परिभाषा प्रत्येकासाठी वेगळी व भिन्न आहे. एक बालक, तरुण व वृद्ध यांच्या समाधानाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक प्राणी, पक्षी, तरु ह्यांच्याही समाधानाच्या परिभाषा वेगळ्या आहेत. त्या वेगळ्या आहेत, तेही एका अर्थाने चांगलेच आहे. कारण समाधानाची एकच व्याख्या असती तर ते मिळवण्यासाठी एकच रस्सीखेच सर्वत्र पहावयास मिळाली असती. सध्या आहे त्यापेक्षा विचित्र व जीवघेणी स्पर्धा तयार झाली असती. समाधान मिळणे दुरापास्तच पण प्रचंड तणावाखाली आपण सगळे असतो. पर्यायाने समाधान प्रत्येकासाठी स्वतंत्र आहे ही चांगलीच बाब आहे. ती वेगळी असण्यातच आपलं कल्याण आहे. लहान बाळाचं समाधान छोट्या-मोठ्या बाबींनी होतं. वय वाढतं. वयाबरोबर आकलनशक्ती आणि गरजा वाढतात.  गरजा वाढल्या की समाधानाच्या कक्षा रुंदावतात. पूर्वीचे बालवयातील  रोज खेळले जाणारे खेळ फोल ठरतात. नवीन वयानुसार, नवीन खेळ, नवीन सवंगडी व नवीन दिशा आवडतात. कालचा खेळ पोरखेळ होतो. तारुण्यातील सळसळत्या उत्साहात आपण लोटले जातो. जग कवेत घेण्याची जिद्द ह्रदयात पाझरू लागते. नवीन क्षितिज रोज खुणावतात. ती काबीज करण्याच्या योजना आखल्या जातात व तशी तयारीही केली जाते. यश मिळालं तर समाधान पावतो. अपयशाचे कडवट घोट वाट्याला आले तर, संकल्पांच्या ठिकऱ्या मन कोमेजून टाकतात. यशात सुखाच्या गुदगुल्या तर अपयशात काटेरी टोचणी लपलेली असते. सिकंदर जग जिंकण्यासाठी निघाला. त्याने बराच भूभाग जिंकलाही.  पण तो स्वतःचे मन जिंकू शकला नाही. जग जिंकून जे समाधान मिळणार नाही, ते मन जिंकून मिळेल. पण ही साधी बाब नाही. एक वेळ जग जिंकता येईल, पण मन जिंकणं अवघड आहे. म्हणून समाधान प्रत्येकाच्या मनाच्या वाटण्यावर अवलंबून असते. 'ठेविले अनंते, तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे, समाधान' तुकाराम महाराजांनी समाधान शोधण्याचा राजमार्ग सर्वांसाठी खुला करुन ठेवला आहे. खरं तर आपल चित्त जाग्यावर नसल्याने, आपण समाधान पाहू शकत नाही. चित्तातील अस्थिरता समाधानापासून आपल्याला दूर नेते. आपण बरच मिळवतो. पण समाधानी नसतो. समाधान मिळवण्यासाठी अनेकांचे अथक परिश्रम अनेक वेळा वाया गेलेले आहेत. समाधान मिळत नाही. चित्ताची स्थिरता मुळी समाधानी अवस्था आहे. पण चित्त स्थिर होत नाही. ते स्थिर करण्याचा आपण फारसा प्रयत्न करत नाही. आपण सुखी आहोत, पण समाधानी मात्र नाही. सुखापासून  समाधान वेगळे करू शकत नाही. त्यामुळे सुख येऊनही अनेक उणिवा काट्यासारख्या सतत टोचतात.

 वृद्धापकाळातील समाधानाची परिभाषा वेगळी असते. एका वृद्धाच समाधान एव्हरेस्ट जिंकण्यात कधीच असू शकत नाही. किंवा बाळासारख छोट-मोठ खेळही वृद्धाच समाधान करू शकत नाहीत. तरीही काही वृद्ध समाधानी दिसतात. कारण त्यांच्यासाठी समाधान वेगळ आहे. खरं तर या वयात काहीच मिळवायच राहिलेलं नसत. कल्पनांना परिपूर्णता आलेली असते. फक्त वृद्ध लोकच वर्तमानात असतात. आयुष्याचा बराच प्रवास पूर्ण करून या अवस्थेत पोचणं म्हणजेच अनुभवांची मोठी शिदोरी होय. माणूस वयाने म्हातारा व्हावा. मन म्हातारं झालं की तारुण्यातही वार्धक्य जडत. तारुण्यातील संवेदनशीलता उतारवयात टिकत नाही. मनाचा हळुवारपणा वयावर अवलंबून नसावा. वयावरून म्हातारपण आणि त्या म्हातारपणावर मनाचा वायस्कपणा ठरवण चुकीचे आहे. मनाला वयाच्या चाकोरीत बसवता कामा नये. किंवा त्याला वयस्कपणाचा शिक्का मारणही योग्य नाही. मन सदैव चिरतरुण ठेवण म्हणजेच कल्पनांचा विस्तार होय. समाधान इथेच कुठेतरी शोधलं तर मिळू शकेल.

 समाधान ही स्थिती नसून अवस्था आहे. या अवस्थेत बदल होऊ शकतो. बदललेल्या अवस्थेत समाधान असेलच असं नाही. समाधान या मनाच्या अवस्थेच स्थितीत रूपांतर केले की त्यात पुन्हा परिवर्तन शक्य नसतं. परंतु मनाचं समाधान स्थितीत पोहोचणे अवघड आहे. मन एकदा समाधानानं पावल की, सदैव त्याच अवस्थेत राहीलच असे नाही. याला जबाबदार आपणच असतो. मन समाधानी करण, चंचल करण, विचारी करणे, स्थिर करणे किंवा अस्थिर, दुखी करणे या बाबी आपणच करतो. आपल्या सभोवतालची परिस्थिती त्याला काही अंशी जबाबदार असते. आपल समाधान आपल्या मनासारखं झालं तरच होतं. आपल्या मनाच्या जरा जरी विरुद्ध झालं तर आपली समाधानीवृत्ती लोप पावते. आपण खिन्न होतो. असं का व्हावं? अनेक गोष्टी आहेत. काही आपल्या तर काही सभोवतालच्या आहेत.  या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास व निरीक्षण न करताच आपण पुढे जातो. त्यामुळे त्यातील बारकावे, जटीलता तशीच राहते व आपलं जगणं सुरू राहत. काळाच्या चक्रात प्रवाहित झालेलो आपण प्रवासी आहोत. एक दिवस हा प्रवास संपतोही. पण मग प्रश्न असा उरतो की या सर्व गोष्टी आपण अनुभवणार कधी? शिकणार कधी? आपलं मन आहे. त्याला शिकविण्याच्या भानगडीत आपण कधीच पडत नाही. किमानपक्षी मनाचं निरीक्षण तरी आपण केव्हा करणार आहोत? त्याच्या जटील स्वभावाच निरीक्षण होण गरजेचे आहे. सर्व सुख, समाधान, शांतीचा आरंभ तर मनातच आहे. आपण ह्या बाबी बाहेर शोधतोय. त्या अंतकरणात आहेत. म्हणजे आपला प्रवास चुकतोय, असेच होय. समाधान शोधाव कुठे? वस्तुत? पैशात? अलंकारात? भोगात? की मनात? जरा चोहीकडे डोळसपणे पाहिले तर सगळ्यांची शोधाशोधीतील धडपडत चुकीची असल्याची जाणीव होऊन जाईल. या धडपडीत सुख मिळेल पण समाधान यत्किंचितही असणार नाही. कारण समाधान मुळात तिथं नाहीच. जे नाही ते सापडणार कसं?

 व्यक्तीव्यक्तीतील फरकानुसार मी खूप समाधान आहे, असं भासवणारी किंवा स्वतःच्या मुखातून अशा प्रकारे विचार व्यक्त करणारी माणसं आपणास अनेक वेळा पहावयास मिळतात. खरंतर अशा व्यक्तींना पाहिले तरी ती समाधानी नसून सुख शोधणारी व ते मिळाव म्हणून आयुष्यभर केविलवाणी धडपड करणारी माणसातील अतृप्त आत्मेच होत. सुख व समाधान अशा व्यक्तींना वेगळं करता येत नाही. या सृष्टीची रचना परमेश्वराने अशा प्रकारे केली आहे की प्रत्येक जीवा जन्मल्यापासून मरेपर्यंत सततची धडपड करत असतो. ही धडपड अनेक कारणांसाठी असते. स्वामी विवेकानंद, रामदास, तुकाराम, ज्ञानेश्वर यांनीही आयुष्यात अनेक धडपडी केल्या. स्वामी विवेकानंद तर जगभर फिरले. त्याकाळी त्यांचेइतका प्रवासाचा झपाटा खचितच कोणत्या भारतीयाने केला असेल! हिंदू संस्कृती व सभ्यता संपूर्ण जगासमोर उलगडून, अनेक पाश्चिमात्यांचे डोळे दिपवून त्यांना भारतीय विचारांप्रति आकर्षून घेतले. खरंतर भारतीयांबरोबर जग समाधानी व्हावे या उदात्त विचारांनी झपाटून स्वामीजी आयुष्यभर धडपडत राहिले. संत तुकारामांना, रामदासांना परमेश्वर कसा होता हे माहीत होतं.त्यात ते आयुष्यभर गुंग राहू शकले असते. पण तरीही त्यांच्यासारखी व्यक्तिमत्व समाज समाधानी व्हावा म्हणून आयुष्यभर धडपडत राहिली. आपली  धडपड प्रत्येकाने तपासून पाहिली तर आयुष्यातील प्रत्येक क्षण आपण आपल्यासाठी व आपल्या आप्तस्वकीयांसाठी जगल्याच आपल्याला पहावयास मिळेल. शक्य तितका स्वार्थ आपण केल्याचं मोठ्या खुबीने आपण दाखवत असतो. जगण्यासाठी थोडा स्वार्थही गरजेचा आहे. पण जर समाधानानं जगायचं असेल तर त्याग महत्त्वाचा ठरतो. समाधानात त्यागी वृत्ती असणे गरजेच आहे. किंबहुना त्यागाशिवाय समाधान मिळणे दुरापास्त आहे.

 साठवून ठेवणे किंवा संचयन करणे ही बाब समाधानाची वैरीण मानावी लागेल. अधिकच्या हव्यासापोटी माणस माणुसकी सोडून अपराध्याच जीवन जगत आहेत. ज्यांनी खूप संचय केला, मग ते संचयन वस्तूच अथवा धनाच असेल, ती त्यांच्या आयुष्यात समाधानी आहेत का? याचा अभ्यास आपण कधीच करत नाही. समस्त सृष्टी नियंत्रण तो करतो आहे. ज्यांनी संचय केला त्यांचे नियमन तो करतो व जे भिकारी आहेत त्यांचही पोट भरतोय. अनेक व्यक्तींचा अभ्यास केला तर या भूमंडळी समाधानी व्यक्ती भेटण दुरापास्त किंबहूना अशक्य असल्याचं दिसून येईल. तरीही आपण समाधान अव्याहतपणे शोधत आहोत. खरंतर ही शोधाशोध समाधानाची नसून सुखाची असते. सुख मृगजळासारखे असून आपली पळापळी ही त्या मृगासारखी आहे, जी कधी संपत नाही. धडपड ही न संपणारी बाब आहे तर समाधान न मिळणारी चीज आहे. पुन्हा प्रश्न पडतो. मग आपलं काय चाललंय? हे कष्ट कशासाठी आणि का? अनेकांना याचे उत्तर मिळत नाही. काही थोड्यांना उत्तर मिळतं पण मार्ग सापडत नाही. काही थोडेच या कोड्याचे उत्तीर्ण परीक्षार्थी असतात. समाधानाचे गमक शोधणाऱ्यापैकी अनेक जण त्याचा स्वतःसाठी वापर करून घेतात व काही मोजकेच समाज समाधानी करण्याचा न पेलवणारा शिवधनुष्य उचलतात. स्वामी विवेकानंदांना भारतीयांविषयी आत्मिक तळमळ होती. भारतातील गरिबी, अज्ञान व अडाणीपणाविषयी अनेकवेळा ते बोलले आहेत. हृदयापासून व्यक्त केलेले विचार आजही तसेच आहेत. परिस्थितीत फार मोठी सुधारणा झाल्याचे चित्र आपल्याला पाहावयास मिळत नाही. आपण शिक्षण घेत आहोत, शहाणे होण्यासाठी धडपड करत आहोत. पण खरे पाहिले तर आजही आपण चमत्कार होण्याची अतुरतेने वाट पाहत आहोत. माझं जीवन व्यर्थ चाललय. प्रगती थांबली आहे. मला पूर्णपणे सुखी करणाऱ्या महापुरुषाची मी वाट पाहतोय. तो येईल व माझ्या जीवनात बदल घडवेल. या आशेवर आपल्यातील अनेकजण जगताहेत. चमत्काराचा अनामिक पगडा आपल्या विचारसरणीवर खोलवर रुतलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आपण आसल्या मानसिकतेतून बाहेर पडत नाही. निरर्थक गोष्टींची अनामिक वाट पाहतो व शेवटी अशा चमत्कारी फसव्या महापुरुषांची आपण शिकार होतो. कल्पना व  वास्तव यांच्या मध्यावर जीवन आहे. भगवी वस्त्रं परिधान केलेली प्रत्येक व्यक्ती संत असल्याचे चित्र आपल्याला दिसते. पुजलेला प्रत्येक दगड आपण देव मानतो व प्रत्येक कळसाखाली दिसणाऱ्या मूर्तीत आपण देवाप्रती भाव जागा करतो. देऊळ संस्कृती आपल्याकडे झपाट्याने वाढत आहे. देवाविषयी प्रेम आदर असावा याविरुद्ध मी नाही. पण आजच्या ग्रामीण भारतात डोकावून पाहिले तर प्रत्येक गावांमध्ये, गावाच्या आवाक्याबाहेरील शिखरं दिसून येतात. शिक्षण व आरोग्य तसेच दळणवळणाच्या सुविधा या ग्रामीण भारताच्या विशेष गरजा आहेत. त्या पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा शिखरांची उंची मोजण्यात ही मंडळी गर्क आहेत. तरुणांसमोर भावनिक आवाहन केले जाते व त्याची ऊर्जा शुन्याकडे प्रवास करू लागते. तरुणांचा वैचारिक प्रवास शून्यातून शून्याकडे सुरू आहे. वैज्ञानिक जाणिवांची उणीव ग्रामीण भारतात प्रकर्षाने जाणवते आहे. हात कष्ट करण्यासाठी असून, बुद्धी  स्वतंत्र विचारसरणीसाठी आहे, ही गोष्ट हे तरुण विसरून जातात व हुकमांची अंमलबजावणी करणारे गुलाम होतात. गुलामीत स्वतंत्र विचारसरणी कधीच जन्म घेऊ शकत नाही. यातूनच अज्ञानाकडे प्रवास सुरू होतो व शेवटी अज्ञानातच तो संपतो. थोडेफार सुख व थोडेफार समाधान मिळत असेलही. पण सुंदर जन्मातील अनेक गोष्टींना त्यांचं आयुष्य मुकलेल असत. पुढे सरकलेले आयुष्य मागे सरकू शकत नाही. हे आयुष्याच वास्तव आहे. वास्तवात जगणं व वास्तवात राहणार हीसुद्धा समाधान मिळवून देणारी बाब आहे.  

थोर व्यक्ती खरोखरीच थोर असतात. कारण त्यांचे पाय सदैव जमिनीवर असतात. आपलं मात्र यापेक्षा वेगळं असतं. आपले पाय जमिनीवर थरतच नाहीत. येथेच आपण अधोगतीच्या प्रवासास निघतो. मोठ होण्यासाठी निघालेले अनेक माणसं वैफल्यग्रस्त होतात व अशाच अवस्थेत आयुष्य कंठत असतात. विवेकबुद्धीचा ऱ्हास होऊन गर्वाचा, दंभाचा मोठा फुगा आपण सदैव फुगवतो. कल्पनांच्या वल्गना करण्यात आपण धन्यता मानतो. आपल्यापेक्षा शेजारी कसे वाईट आहेत. हे सर्वांना घसा तुटेपर्यंत सांगतो. निंदेतून समाधान शोधणे म्हणजे पाण्यातून लोणी काढण्यासमान आहे. समाधानाची परिभाषा यापेक्षा भिन्न आहे. समाधान ही बाब वृत्तीत जागी होणे गरजेचे आहे. आपलं मन कशानच भरत नाही. असे आपण सारे असमाधानी सतत समाधान शोधत असतो. 

 माणूस जात सोडून इतर ठिकाणी आपणास काही अंशी समाधानीवृत्ती पहावयास मिळते. पशू व पक्षी यांच समाधान अन्न, पाणी, निवारा व हवामान या घटकांवर अवलंबून असत. संचयन करण्याची त्यांची वृत्ती माणूस जातीपेक्षा सहसा कमी दिसून येते. संचयनाने स्वार्थ व स्वार्थामुळे अनर्थ जन्माला येतो. विवेकबुद्धी कुंठते व क्रूरपणा, मीपणा व दांभिकता वाढीस लागते. विवेकशून्य विचारातून उदात्त विचारसरणी कधीच जन्माला येऊ शकत नाही. वृक्ष काही अंशी संचयन करतात. पण साठवण्याच्या प्रयत्नात त्यांचं जगणं ते कधीच विसरत नाहीत. साठवणे व साठवलेल्यात पुन्हा उद्या आणखीन आणून ओतणे. यातून आपण एका विचित्र जीवघेण्या स्पर्धेला जन्म देतो. समाज अशा अनेक स्पर्धांनी भरून वाहताना आपण  पाहतोय.  स्पर्धेची अनावश्यक चढाओढीत समाजरचना नव्याने तयार होत आहे. बालकांचे बालपण स्पर्धेत अर्पण करून, अपेक्षांच्या ओझ्याने थकलेल्या हमालांचे आईबाप होण्यात आपण धन्यता मानतो. संपूर्ण समाजासाठी ही धोक्याची घंटा आपण न  ऐकता चढाओढीनं स्पर्धा जिंकण्याची व्यर्थ खटाटोप अव्याहतपणे करतोय. पक्षाने तयार केलेली गोदामे आपण कधी पाहिली नाहीत. किंवा पाणी आवश्यक आहे म्हणून झाडांनी नद्या थोपवून ठेवल्याचं आपल्या कधी ऐकण्यात नाही. सर्वांना सर्वच मिळत असतं, पण विनाकारण ते मिळवण्यासाठी आपण रस्सीखेच निर्माण करतो. या सगळ्यांमध्ये आपलं जगणं आपण शोधतो. खरं तर जगण याहूनही अनेक पटीने वेगळे आहे व नेमकी तेवढीच गोष्ट आपण हरवून बसलो आहोत. समाधानी नसण्याचं मुख्य कारणही कदाचित तेच आहे. आपण जीवन जगतो. मात्र जीवनात आपण कुठेच नसतो. जे नाही ते शोधणे व जे आहे ते विसरून बसण, अशी आपल्या जगण्याची व्यथा असते. अनेक वृद्धांच्या तोंडून जीवनाविषयी खरा दृष्टीकोन ऐकावयास मिळतो. वृध्दच जीवनाच समर्थपणे वर्णन करू शकतात. ज्ञानाइतकंच महत्त्व अनुभवाला आहे.  ज्ञानी मनुष्य व अनुभवी मनुष्य थोड्याफार अंतराने मला सारखेच वाटतात. वृद्ध हे ज्ञान नसले तरी ते अनुभवी मात्र निश्चितच असतात. त्या अर्थाने ते ज्ञानी होतात. जीवनाविषयी त्यांची सर्व गणिते मांडून झालेले असतात. काही चुकलेली तर काही अचूक असतात. वयाच्या अशा अवस्थेत असतात की काही मिळवण्यासाठी त्यांची धडपड कमी किंवा लुप्त झालेली आपणास पहावयास मिळते. सुदृढ समाजनिर्मितीसाठी त्यांचा आपण सहजतेने वापर करू शकतो.

 समाजामध्ये जगणाऱ्या अनेक वायस्कांच्या व्यथा आपण ऐकल्या तर मन विषण्ण होते. हात-पाय गळठुन जातात. पोटच्या पोरांवर जीवापाड प्रेम करणारे आईबाप वृद्धपणी प्रेमाला पोरकी होतात. मोठ्या आशेने सर्वांकडे प्रेमाची याचना करतात. पण प्रेम त्यांच्या वाट्याला सहसा लाभत नाही. आपण जगलेला हाच का तो समाज आहे यावर त्यांचा विश्वास बसत नाही. कालांतराने जगण्याची उमेद हरवली जाते आणि उरलेले आयुष्य शून्य होऊन बसत. प्रेमशून्य जगणं म्हणजेच दगड होऊन जगणं होय. ज्यांनी समाज घडवला, कुटुंब जपलं, वाढवलं त्यांच्या वाट्याला असल असह्य जगणं येत. मनात खोलवर हा विचार जातो व वाचा अबोल होते. अनेक वयस्कर माणसं कमी बोलतात. त्याचे कारण त्यांच्या वाट्याला आलेले  अपमानास्पद व कुचंबनायुक्त जीवन असत. याच जीवनात आपल्या वाट्याला आलेली अवहेलना काहींना सहन होत नाही. तर काहीजण काहीच मार्ग सापडत नाही म्हणूनच जगतात. समाज सशक्ताला बळ देणारा व  दुबळ्यावर प्रहार करणारा आहे का? भिन्नरुपी समाजाचे आपणही एक घटक असल्याचं दुःख प्रत्येकाच्या मनात आहे. कडुनिंबाच्या पोटी गोड आंबे येण्याची आपण निरर्थक वाट पाहतोय......! दुसऱ्याचं समाधान संपवण्यासाठी स्वतः दुःखी, अधीर होऊन इतरांच्या सुखात आपण पाय खूपसतोय. खरतर अशाने समाधान मिळणार नाहीच पण जगण बेसुरी होऊ पाहतेय. जगण्यातला आनंद आपण गमावतोय. प्रत्येक क्षण जगण्यासाठी असतो हे आपण विसरतोय. असंख्य दुःखी धागे आपल्या आयुष्यात घेऊन सुख सांधण्याचा प्रयत्न करतो आहोत. समाधान मिळण्यापेक्षा आपण अधिक स्वार्थी, कपटी, बावळट व एकूण समाजासाठी घातक ठरतोय. आई-वडिलांच्या मुळावर उठणारे अनेक पुत्र मी पाहिले व अनुभवले आहेत. ज्या माऊलीने मायेने वाढवल, तिचा केसाने गळा आवळणारे आपल्या समाजाचे घटक आहेत. सुखी व संपन्न होण्याच्या खटाटोपीत  संस्कृतीचा खून होतोय हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. मुलांना स्वातंत्र्य, तरुणांना काम व वृद्धांना सन्मान मिळाला तर समाज समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. आज आपण याच्या बरोबर विरुद्ध वागतोय. लहानांना पारतंत्र्यात अडकवतोय, तरुणांना आइतखाऊ करतोय आणि वृद्धांचा पावलोपावली व शक्य असेल नसेल तिथं अपमानित करतोय. अशाने समाज अशांत होतोय व आपणही अशा अशांत समाजाचे घटक होतोय.

 आपण लोकशाहीचा अंगीकार केला आहे. व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित असण्याचा घटनेने प्रत्येकाला दिलेला अधिकार आहे. अशा थोर अधिकाराचा घरात दार बंद केल्यानंतर आपणास विसर का पडावा? व्यक्तीच्या अर्थार्जनावरून त्याला मान द्यायचा की अपमान करायचा हे ठरवणारे न्यायाधीश प्रत्येक घरात जन्माला येऊ घातले आहेत. आई-वडिलांना तत्त्वज्ञांच्या गोष्टी सांगण्याइतपत संस्कृतीचा व सभ्यतेचा ऱ्हास अजून तरी झालेला नाही. पत्नी व मुलात समाज सुख पाहतोय. मुळावर घाव घालण्यानं पानं करपून जातात, हे विसरून चालणार नाही. समाज रचनेसाठी ते परवडणारही नाही.

 अनेक माणसं पाहताच समाधानी वाटतात. ती समाधानी असतात किंवा नाही हा वेगळा विषय आहे. परंतु त्यांच्या कृतीतून तरी ती समाधानी वाटतात. व्यक्तीची हालचाल व देहबोलीवरून आपण प्रेम, स्वार्थ, आनंद, क्रोध किंवा समाधान शोधू शकतो. अशा समाधानी व्यक्तीच्या सहवासात आपणही समाधान पावतो. किमानपक्षी समाधानाविषयी थोडाफार परिचय होऊ लागतो. हळूहळू केलेला प्रवास ध्येयाप्रती नेऊन ठेवतो. अर्ध्यावर सोडलेला ध्यास निव्वळ ढोंगीपणा होय. काही गोष्टी अनुकरणाने सहजपणे शिकता येतात. त्या अंगी टिकून ठेवण्यासाठी स्वतःसुद्धा थोडेफार प्रयत्न करणे गरजेचे ठरत.  वृत्ती समाधानी ठेवण्यासाठी समाधानी व्यक्तींचे अनुकरण करणे गैर वाटत नाही. चांगल्या बाबी प्रयत्नपूर्वक मिळवाव्या लागतात. तर वाईट गोष्टी आपोआप आपल्याकडून घडत असतात. दारू पिण्यासाठी अनेक दुकानं तुम्ही शोधू शकता. ती सहजपणे मिळतातही. परंतु दारू सोडवण्यासाठी दवाखाने समृद्ध असल्याचे चित्र आज तरी आपल्याला दिसत नाही.

 अनेक विचारांती समाधान कशाने मिळेल हा प्रश्न अनुत्तरित राहतो. जगणं सुरू असतं. वय वाढतं. आपण फसतो व शेवटी सर्व केले पण समाधान मिळाले नाही. याची खंत राहून जाते. ज्याच्यासाठी आयुष्य घालवलं ती न मिळणे म्हणजे फसगत होय. अशी फसलेली अनेक माणसं आपल्या समोर येतात. त्यांच्या बोलण्यातून निराशेचा सूर दिसून येतो. हा पाश्चाताप आयुष्याच्या उत्तरार्धात व उत्तरार्धाच्या शेवटच्या चरणात करणं योग्य नाही. म्हातारपणी अनेक गोष्टींचा संकल्प केला तरी तो  नेटाने पूर्ण होईलच याची खात्री नाही. त्यापेक्षा सोपा मार्ग म्हणजे तारुण्यात थोडावेळ थांबून विचार व चर्चा केली तर समाधान लवकर भेटू शकेल. वाईट गोष्टी करण्यासाठी फारसे कष्ट करावे लागत नाही. पण चांगल्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. त्याशिवाय चांगल्या बाबी पूर्णत्वाकडे जाऊ शकत नाहीत. समाजासाठी सोडा, स्वतःसाठीतरी उच्च  तत्व घेऊन, आपण आपले जीवन जगले पाहिजे. सृष्टीतील शुद्ध तत्वे आपल्याकडे खेचून आणणें गैर नाही. त्याच्यासाठी आपला काही वेळ दिला तरी आयुष्याचं खूप मोठे नुकसान होणार नाही. उलट व्यक्तीचा फायदा होऊन उच्च दर्जाच्या सवयी मनाला जडल्याशिवाय राहणार नाहीत. स्वकल्याणात समाजाचे व पर्यायाने देशाचे कल्याण आहे. सर्व गोष्टी मिळवत असताना आपण  थांबत नाही. थांबून विचार करत नाही. आपल्या प्रत्येक कृतीचा आढावा आपण घेतला पाहिजे. त्याचे मूल्यमापन तटस्थपणे केलं पाहिजे. सत्याच्या बोधात समाधानाचा उगम आहे. या उगमापर्यंत आपला प्रवास झाला पाहिजे. तो प्रवास जास्तीत जास्त सुखकर होण्यासाठी आपण योजना आखल्या पाहिजेत व त्या योजनावर प्रत्यक्ष काम करून सत्यात उतरवल्या पाहिजेत. समाधान ही वस्तू नाही. समाधान ही मनाची अवस्था आहे. म्हणून मन अभ्यासणे गरजेचे आहे. 'मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण' मनाची प्रसन्नता अनेक गोष्टी आपल्याला सहज मिळवून देईल. चित्तातील अशुद्धी गेल्यानंतर मन शुद्ध होत. जगताना आपण अनेक ओझी घेऊन जगत आहोत. एका अनामिक भीतीचे सावट घेऊन रोज घरातून आपण बाहेर पडतो. अनिश्चितता हा जगण्यातील मूलमंत्र होऊन गेलेला आहे. परिवर्तन सृष्टीचा नियम आहे. पण जगताना एक अनामिक काहूर  प्रत्येकाच्या मनात आहे. अशी मनातली वादळे प्रयत्नांती शांत केली पाहिजेत. मनाचा अभ्यास झाला पाहिजे. प्रयत्न व सातत्य यामुळे हे सहज शक्य आहे. चाकोरीबद्ध आयुष्यातून बाहेर पडून उज्वल प्रकाशाकडे वाटचाल करणाऱ्यांना एके दिवशी प्रकाश दिसल्याशिवाय राहणार नाही. त्यात मनाच्या अनेक स्थिती मिळतील. महत्त्वाचं म्हणजे समाधान मिळेल, जे आपणास पूर्णत्वाकडे घेऊन जाईल. अशा प्रकारचा अनुभव स्वतः घेतल्यानंतर इतरांना तो अनुभव आपण देऊ शकू. विचारांमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. याचा अनुभव प्रत्येकाने एकदातरी घेतला पाहिजे. त्यात मिळणारी धन्यता शोधूनही सापडणार नाही. या धन्यतेत समाधान असते. एकदा असं समाधान मिळाले म्हणजे इतर कोणतीच गोष्ट मिळवण्याची इच्छा मनात उरत नाही. काही आठवण्याची व साठवण्याची गरज राहत नाही. स्वार्थ आपल्यापासून खूप दूरवर गेलेला असतो. चंगळवाद संपतो व सुख भोगण्याविषयीचे विचार हळूहळू लुप्त होतात. मन परिपूर्ण व तृप्त होतं. निरिच्छ भावभावना मनामध्ये उमलू पाहतात. निर्मळ व निथळ झऱ्याप्रमाणे आयुष्य दुसऱ्यांच्या सेवेसाठी तयार होते. निष्काम कर्मयोगाचा आपला प्रवास सुरू होतो. हा प्रवास म्हणजेच परमेश्वरी कार्य होय.  प्रेमसागराच्या तळात आपण अखंड बुडून जाऊ. उरलेलं आयुष्य व पूर्वायुष्य यामधील पडदा गळून पडून नवसंजीवनी घेऊन आपण नवा प्रवास सुरू करू. प्रयत्नपूर्वक टाकलेल्या प्रत्येक पाऊल आपल्याला शेवटी यश देऊन जाईल. त्यात समाधान मिळेल. आपण ते समाधान शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. त्यातच आपल हित आहे. 090414 ©Harish Gore

Monday, 17 August 2020

चिंतन....... सद्भावनांचे.........७

                                                             संबंध




 शब्द मायेचे पांघरून आहेत. शब्द म्हणजे प्रचंड वादळ आहेत.  शब्द म्हणजे संहारही आहेत. शब्दांत जसा मायेचा प्रेमळ ओलावा आहे, तसाच त्यांच्यात विनाशाची प्रचंड आगसुद्धा भरलेले आहे. शब्द सर्वांवर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांचे सहाय्य घेतल्याशिवाय आपण जणू पांगळे होऊ, अशी वस्तुस्थिती आहे. शब्दांना विकार व अविकार दोन्ही आहेत. शब्दांची उपयुक्तता व भयानकता दोन्हीही मान्य करावी लागेल. भाषा कोणतीही असो, शब्दासंबंधीची सर्व तत्त्वे, सर्व भाषांत सारखीच आहेत. शब्दात प्रेम, माया, मत्सर, राग, हेवा, पैसा, दारिद्र्य, दुःख आणि असेच कितीतरी चांगले-वाईट गुण भरलेले आहेत. आई शब्दातून बाळावर प्रेमाचा वर्षाव करते. अनेकांच्या आयुष्याची ठेव-ठेवण फक्त शब्द आहेत. ज्ञानेश्वरांचे, तुकोबांचे आता फक्त शब्दच ओळख म्हणून शिल्लक आहेत. त्याव्यतिरिक्त कोणतीही संपत्ती त्यांच्याकडे नव्हती व नाही.

शब्द अनेकांसाठी पैसे मिळवून देण्याच काम करतात.  अश्या लोकांसाठी शब्दाचं मोल मोठं असतं. त्यांच्यासाठी शब्द हिऱ्या-मोत्यासमान असतात. याच शब्दांनी त्यांच्यावर पैशाची उधळण केलीली असते. तर कित्येक वेळी शब्दच दुःख, दारिद्र्याला कारणीभूत ठरतात. शब्दात वास्तविकता व मार्मिकता असेल, तर ते शब्द प्रभावी मानले जातात. शब्दाशब्दांनी वाक्य तयार होते. तर वाक्यातील अर्थपूर्ण शब्दांच्या संबंधाने वाचन तयार होते. सर्वोत्तम शब्द आपल्या वाट्याला येणे, हीच साहित्यिक श्रीमंती होय. उत्तमातील उत्तम शब्द आपल्या संगतीत असल्यानंतर कधी एकटं राहण्याचा प्रश्न येत नाही. शब्द अनेक वेळी तारक ठरतात. शब्दात मोठी जादू आहे. शब्द एकदा आपल्या दारात आले तर कसे ठाण मांडून बसतात. उठता उठत नाहीत. त्यांची सेवा ज्या प्रमाणात आपण करू, त्या प्रमाणात शब्द आपल्यावर कृपा करतात. शब्दांची सेवा म्हणजे साहित्याची सेवा. एक निर्भेळ समाधान देणारी सेवा, असा साहित्यिक सेवेचा नाव लौकिक आहे.  त्यातून मिळणारं समाधान फक्त संबंधित व्यक्तीलाच मिळू शकते. पुन्हा संपूर्ण साहित्य शब्दाशब्दातील सहसंबंधाने ओतप्रोत भरलेल असतं. शब्दातील अतूट संबंधाने साहित्यक कलाकृती उमलत जाते. शब्द साहित्यिक कलाकृतीची मौलिकता किंवा क्षणभंगुरता ठरवतात. शब्दाशब्दातील संबंधाने सौंदर्यपूर्ण वाक्य, वाक्यावाक्यातील संबंधाने एखादी अनमोल साहित्यकलाकृती निर्मिली जाते. शब्दातील सहजसुंदर संबंधाने नटलेल्या अनेक साहित्यिक कलाकृतींशी आपला जेव्हा संबंध येतो, तेव्हा धन्यतेची ढेकर येते.

 शब्दांचा संबंध साहित्याशी तर साहित्याचा संबंध व्यक्तीशी येतो. ज्यांनी साहित्यावर प्रेम केलं, त्यांची जीवन अक्षरशः फुलली....!  ज्यांना साहित्य काय आहे हे कळालं नाही किंवा ज्यांचा साहित्याशी काडीचाही संबंध आला नाही, ते आडाणी होत. साहित्यातून संस्कृती डोकावते. साहित्यातून संस्कार उत्तम प्रकारे दिले व घेतले जाऊ शकतात. त्यामुळे ज्यांची साहित्याशी जवळीक नाही, त्यांना संस्कार व संस्कृतीपासून लांब थांबण्याची पाळी येऊ शकते. मनाचा हळुवारपणा कसा जपला व  उलगडला जातो, हे साहित्यातून स्पष्टपणे कळू शकते. साहित्यातून विचार व सभ्यता यांच दर्शन होऊ शकत. अनेकांना साहित्याने घडवलं व वाढवल आहे. साहित्याविना जगणं त्यांना पाण्यातून बाहेर निघालेल्या माशाप्रमाणे तडफडीच वाटतं. अशा व्यक्तींचे जगणं  साहित्य होऊन गेलेल असत. जीवन एक सुंदर साहित्य, यापेक्षा सुंदर दुसरी कोणती कल्पना असू शकेल? साहित्यात जगणं,साहित्यात वाढण आणि शेवटी स्वतः एक साहित्य होऊन जाणं, ही वृत्ती साहित्याला वाहून घेणारी म्हणावी लागेल. एक उच्च प्रतीच जगण अशा जगण्यात दिसू शकतं. साहित्याची सेवा, साक्षात सरस्वतीची पूजा आहे. ज्या तन्मयतेने ती केली जाईल, त्याच तन्मयतेने ती साहित्यिकाला पावते. सरस्वती पावलेल्या साहित्यिक कलाकृत्या सुदैवाने आज आपल्याकडे विपुल प्रमाणात आहेत. साहित्य म्हणजे निव्वळ अक्षरे नव्हेत. साहित्य थेट मनाला भिडणारं अस्त्र आहे. मनात खोलवर शिरून मन व मत परिवर्तन करण्याची प्रचंड शक्ती साहित्यात आहे. तलवारीपेक्षा शब्दांची ताकद कितीतरी पटीने जास्त आहे. 'पेन इज माईटर द्यान सोर्ड' अशी शब्दांची महती सांगणारी इंग्रजीत म्हण आहे. साहित्य म्हणजे शब्दांचा खेळ आहे. तसाच तो शब्दांचा मेळही आहे. ज्यांना हा मेळ आणि खेळ चांगला खेळता येतो, ते उत्तम साहित्यिक होत. जे साहित्यातून मिळत, ते खचितच इतर कशातून मिळू शकेल.  अनेकांची आयुष्य या साहित्याने तारली आहेत. शेवटी विचार करायला भाग पाडणार आणि मनाला व जगण्याला बळ देणार साहित्यच सर्वश्रेष्ठ होय. त्यातून जे घेतले जाईल, तेच जगण होय. त्यातून जे मिळेल तेच विचार होत आणि शेवटी त्यातून जे पुन्हा दिले जाईल तेच साहित्य व साहित्याची सेवा होय.

 साहित्याचा अनेक बाबींशी लागेबांधे अर्थात संबंध आहेत. ओठातून बोटात येणारे साहित्य वाचकाची तहान भागवू शकतं. मानवी जडणघडणीत अनेकविध पैलूंचा अविष्कार साहित्यातून होतो. साहित्य वाचण व साहित्य घडवण, या दोन वेगळ्या बाबी आहेत. वाचनाने साहित्य घडवता येईलच असं नाही. एक वाचक साहित्यिक असू किंवा नसू शकतो. पाण्याचा पेला पाण्यान  भरल्यानंतर त्यात ओतलेले पाणी जसं खाली सांडत, तसं साहित्य असावं. स्वतःचं मन भरलं. जे साहित्य मनाची तृप्ति करून गेले, ते इतरांना तृप्त करण्यासाठी पेनात उतरत, तेच हृदयस्पर्शी साहित्य होय.. बहिणाबाईचं कोणतंही वाचन नव्हत. संत रामदास, तुकाराम, ज्ञानेश्वरांनी शब्द व भाषा किंवा भाषेची तत्व अभ्यासून लेखन केले नाही. साहित्य म्हणजे साहित्यिकाच्या मनाचा आरसा आहे. साहित्य जड कधीच असू शकत नाही. एकतर ते नावडीच किंवा आपल्याशी संबंध नसलेलं असतं. बहिणाबाईंच्या कविता व तुकारामांच्या अभंगांची खोली आजवर कोणत्याच कवीला गाठता आली नाही. ज्ञानेश्वरांची प्रत्येक ओवी विचारवंतांना विचार करण्यासाठी थांबवते. समर्थांचे मनाचे श्लोक आजही जनमानसात त्यांची लोकप्रियता टिकवून आहेत. या सर्वांच्या मागे एक तरल व भावनिक संवेदनशीलता आहे. त्यांच्या प्रत्येक रचनेत महान तत्व विराजित आहे. सर्वसामान्यांचं जगणं त्यांनी त्यांच्या साहित्यातून व्यक्त केले आहे. एक ठाम सिद्धांत या सर्व साहित्यातून डोकावतो. तरीही एक साधेपणा व साध्यातील सच्चेपणा अशा साहित्यातून दिसतो. त्यांच्या साहित्याचा संबंध समाजातील सर्व स्तरातील लोकांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष येतो. तुकारामांची गाथा वाचता न येणारेही ती मुखोद्गत करतात. अनेक अशिक्षित ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीची पारायण करताना दिसतात.  ही संतसाहित्याची प्रचंड ताकद नव्हे काय? आजचा स्थिर समाज म्हणजे संत साहित्याचा ज्ञात व अज्ञात परिणाम असू शकतो. समाज आदर्श व उच्च तत्वांनी बांधून ठेवण्याचं काम संत साहित्य आजवर चोखपणे पार पाडत आल आहे. त्यामुळेच या साहित्य  प्रकाराला उत्तरोत्तर अधिकाधिक लोकप्रियता बहाल केली जात आहे.  शब्दांचा संबंध जेंव्हा व्यक्तीशी येतो, तेव्हा विचारांची निर्मिती होते.  विचार जेव्हा सात्विक शब्दांनी युक्त असतात तेव्हा ते साहित्य  निश्चितच संत साहित्य असतं असं म्हणता येईल. शब्दांच्या शिडीवर साहित्याची निर्मिती होते. साहित्यातून शब्दवारसा जोपासला जातो. माणुस घडवणार साहित्य  उत्तमप्रतीचे साहित्य होय. मनुष्यातील विकार व अविचार नष्ट करण्याचं काम साहित्य निर्मितीतून व्हावं एवढी माफक अपेक्षा साहित्यातून असावी. साहित्यातून माणसं घडवणे, हेच महत्त्वपूर्ण काम चोखपणे पार पाडल पाहिजे. अन्यथा विकारी साहित्य हे साहित्य प्रकारात न मोडता समाजमनाचा खून करणार हत्यार या प्रकारात मोडेल. अलीकडे रंजक साहित्याकडे वाचक पटकन वळतात. तुलनेनं आपल्याकडे अशा प्रकारचं भडक व भंकस साहित्य फार कमी आहेत. खप हा मुख्य उद्देश ठेवून निर्मिती केल्या जाणारे साहित्य हे साहित्य नसून साहित्याचा व्यापार होय. तरीही अशा खपाचा यशस्वी साहित्याशी तुलना करताना महत्त्वाचे योगदान असतं. मानवीमूल्यांची जडणघडण साहित्यनिर्मितीतून नकळतपणे वाचकाच्या मनावर कोरणार साहित्य आवडीने आणलं व वाचलं जातं.

 आपण सगळेच कोणाशी ना कोणाशी संबंधित असतो. तशी या सृष्टीची निर्मितीच मुळात संबंधातून झालेले आहे. जगताना जसजसं पुढे जाऊ तसतस नवीन अनुभव गाठीशी येतात. कालच्यापेक्षा आज अनुभवाने आपण समृद्ध असतो. कालचा दिवस कदाचित अज्ञानात जातो. त्याहीपेक्षा आज अधिक ज्ञान आपल्याकडे असते. उद्याचा दिवस आजच अज्ञान सिद्ध करणारा असतो. जगता जगता एक प्रगल्भता व परिपूर्णता येऊ पाहते. आयुष्य पूर्णत्वाकडे जाताना  हळूहळू समाधानी वृत्तीच दर्शन व्हायला पाहिजे. वास्तविकता याउलट व विरोधाभासाची आहे. जगता जगता जगण्याची ओढ वाढताना दिसते आहे. आणखीन जगावं, खूप जगावं, खूप पहावं, करावं ही तळमळ पूर्णत्वाकडे जाताना बळावणं चुकीच आहे. परिपूर्णतेकडे सरकणारा प्रवास चित्ताची स्थिरता वाढविणारा असावा. जगण्याची ओढ असणे स्वाभाविक व नैसर्गिक आहे. पण मरणातील आनंदाची अवहेलना जिवंतपणी का करावी?  जगताना जगण्याशी संबंध आला.  जीवनाशी संबंध आला. तसा तो मरणाशी यावा, या भावनेतूनच सगळीकडे पाहण स्वाभाविक का असू नये? जगताना जाणिवांची जागृती होणे गरजेचे आहे. जाणिवांच्या कक्षा रुंदावन आवश्यक आहे. इथलं सगळं ज्ञान होणे गरजेच आहे. ते झालं पाहिजे या तळमळीने झपाटले पाहिजे.  हे सर्व तर सोप आहे, आपण ते करण्यासाठी सिद्ध होऊया, या भावनेतून विचार झाला पाहिजे. जीवनातील अनेक सुंदर  सत्यांचा उलगडा आपल्याला फार उशिरा होतो. आपण जगतो, रोज पाहतो, अनुभवतो पण शेवटी, अरे हे सर्व तर इथंच होतं, मग आजपर्यंत माझ्या वाट्याला का आलं नाही, याची जाणीव आपल्याला त्यावेळी होते.

   भगवान बुद्धांच्या जीवनाचा प्रवास म्हणजे सत्यशोधनामागील तळमळ होय. सुखी, संपन्न, ऐश्वर्यपूर्ण जीवन जगताना  सत्याचा शोध घेण्याची कल्पना सुचणं, ती पूर्णत्वाकडे नेणं ही  साधी गोष्ट नाही. सत्य काय आहे हे बुद्धांना शेवटी कळालं. स्वतःच  जीवन त्यांनी त्या दिशेने वळवलं. म्हणून त्यांना अखेर सत्याचं, एका प्रकाशाच दर्शन झालं. सर्व ऐश्वर्य सोडलं. सरळ जंगलाची वाट धरली. अनेक महत्त्वपूर्ण गोष्टीचं ज्ञान सुखात  किंवा श्रीमंतीत होतं नाही. सुखाची व श्रीमंतीची ही मोठी मर्यादा आहे. आपणास ह्या मार्यदेची जाणीवच होत नाही. खडतर तपश्चर्या आरंभली. अन्न पाणी सोडलं. हाडाचा फक्त सापळा बाकी राहिला. शरीर दिवसेंदिवस दुर्बल, अशक्त होऊ लागल. सर्व सहकारी निघून गेले. सत्य काय आहे हे बुद्धांना शेवटी कळालं.  सत्य शोधण्यासाठीची तळमळ अंतिम ध्येयाप्रत त्यांना घेऊन गेली. अवघ जीवन प्रकाशमय झाल. ज्ञानाचा प्रकाश अंतःकरणात प्रवेशिला.  ज्ञानाशी आलेला संबंध जीवन उजळून टाकतो. अज्ञान मिटवतो. ही घटना सुखाच्या त्यागात व प्रयत्नांच्या पराकष्टेतून शक्य झाली. जीवनभर सुखात राहणं  गौतमाला सहजशक्य होतं. पण सत्याच्या दर्शनाच्या ओढीपुढं हे सुख क्षणभंगुर वाटलं. सत्य आहे  पण ते शोधलं पाहिजे. त्यासाठी एशोआरामावर तिलांजली दिली पाहिजे, अशी भावना गौतमाला सत्याच्या, ज्ञानाच्या  प्रवेशद्वाराजवळ घेऊन गेली. जो त्याग  त्यांनी केला, तो अवर्णनीय आहे.जे त्यांनी त्यागातून मिळवले, ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. हे प्रत्येकाला शक्य आहे. पण ज्ञानप्राप्तीची  तळमळ गौतमाजवळ होती ती खचितच कोणाजवळ पाहायला मिळेल.

  आपण सर्वसामान्य त्यांच्या एवढे कष्ट करूही शकत नाही. आणि म्हणून जीवनात सत्याचा बोध होण्याची शक्यताही तशी धुसर बनते. आपल्या जीवनातील सत्याची शक्यता धूसर असली तरी इथल्या  सत्याला किंवा ज्ञानाला आपण नाकारुही शकत नाही. सत्य किंवा ज्ञान त्रिकालबाधित आहे. ते तुमच्या किंवा आमच्या नाकारण्याने किंवा स्वीकारण्याने बदलणार नाही. मुळात आपल्या अस्तित्वाचा सत्यावर परिणाम होत नाही. मात्र सत्य स्वीकारण्यांन किंवा नाकारण्यांन आपल्या जीवनात मोठा बदल होऊ शकतो. पृथ्वी किंवा स्वर्ग कदाचित बदलतील पण सत्य अढळ आहे.  या जीवनात सत्याशी आपला संबंध यावा या भावलहरी मनात उमटण हा सत्याच्या दिशेने सुरू केलेला प्रवास होय. या जीवनात त्याचे दर्शन कदाचित होणार नाही. पण त्याच्या शोधाचा प्रवास थांबवणही उचित होणार नाही. सत्य शोधण्यासाठी आवश्यक आचार, विचार हळूहळू सत्याकडे घेऊन जातील. प्रामाणिक प्रयत्नातून सत्य हळूहळू जवळ येईल. त्यासाठी किमान काही दिवस, काही महिने, काही वर्षे किंवा कदाचित काही जीवनंही गमवावी लागतील. पण प्रयत्न सोडून चालणार नाही. शेवटी सत्याच दर्शन म्हणजे कृतकृत्यता होय. सत्याच दर्शन भलं नाही झालं, तरी सत्य शोधताना समाधान मिळेल, जी शांतता प्रस्थापित होईल तिचा अनुभव तरी घेतला पाहिजे. ज्ञान कदाचित यापेक्षा वेगळे असू शकत नाही. मनात शांतीसागर साठण, एकही भावतरंग न उमठण, कर्म करून त्यापासून अलिप्त राहण,  यासारख्या  मौल्यवान बाबी जीवनाला परिपूर्णता देणाऱ्या सोप्या गोष्टी आपण हळूहळू अनुभवू शकु. पण आधी त्या मार्गावरून थोडं का होईना चालावं लागेल. हे अनुभव घ्यावे लागतील. शेवटी आपला संबंध सत्याशी येईल व तो आला पाहिजे ही भावनासुद्धा सत्याचा अंश म्हणावी लागेल. शेवटी ध्येय व ध्येयाप्रत पोहोचण्याची तळमळ ही एक जरी नसली तरी अंशतः ती एकच आहेत. आपण एखाद्या विशिष्ट गावाला निघालोत. उचललेले प्रत्येक पाऊल म्हणजे आपण योजिलेलं गाव नव्हे.  पण त्या गावापर्यंत जाण्यासाठी केलेली धडपड आहे. आपली अनेक पावलं आपल्याला त्या गावापर्यंत नेतात. तद्वतच सत्य शोधण्यासाठी केलेली तळमळ किंवा आपली धडपड असू शकेल. शेवटी हीच तळमळ आपल्याला सत्य दाखवून  सोडल्याशिवाय राहणार नाही.

 ज्यांचा संबंध त्यागाशी आला त्यांच्या जीवनाच सोन होऊन गेले आहे. त्याग वस्तू, व्यक्ती किंवा आवडत्या गोष्टींचा असू शकतो. भावनांचा त्याग त्यामानाने सगळ्यात उच्च होय. त्यागाचा स्पर्श परिसस्पर्शपेक्षा यत्किंचित कमी प्रतीचा नसावा. त्यागाची भावनाच मुळात उच्च कोटीतील आहे. त्याग स्वार्थासाठीही असू शकतो.  स्वार्थाने केलेला त्याग बराच. पण त्यांची नैतिकता खालच्या पातळीवरील होईल. त्याग कशासाठी करायचा? तो कोणासाठी करायचा? किती करायचा? हे आधी निश्चित करून केलेला त्याग, चांगली फळे घेऊन येऊ शकेल. अनेकांनी देशाला स्वातंत्र्य मिळताना सर्वस्वाचा त्याग केला. हा त्याग भारतभूमीच्या कर्जातून उतराई होण्याचा प्रयत्न होता. तो कधीही चांगलाच होय. त्यागाच मूळ मनात आहे. स्वार्थ व त्याग एकाच ठिकाणी उगम पावणारे पण विरुद्ध दिशेने वाहणारे प्रवाह आहेत. स्वार्थ म्हणजे जस पायात पाहणे असत तसं त्याग म्हणजे दूरदृष्टी होय.त्यागात प्रेम आहे. स्वार्थात मत्सर, द्वेष आहे. त्याग म्हणजे सर्व सोडणे. त्याग म्हणजे अर्पण करणे. आणि त्याग म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्याकडील इतरांना देणं किंवा वर्ज्य करणं होय.  

   विनोबा भावे हे एक त्यागी व्यक्तिमत्व होतं. भूदान चळवळीची सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली. सर्व जमीन दान करून इतरांना दान करण्यास त्यांनी उद्युक्त केले. विनोबाजींच्याजवळ हा त्याग आला कुठून? त्यांच्या त्यागाच मूळ महात्मा गांधींजींच्या व्यक्तीमत्वात लपलेला आहे. महात्मा गांधीजींचे जीवन त्यागाचं ज्वलंत उदाहरण आहे. गांधीजींनी त्यागाची सुरुवात स्वतःपासून करून समाजापर्यंत  स्फुर्तीदायकपद्धतींन पोहोचवली. त्याग म्हणजे दिव्यत्वाची प्रचिती आहे. गांधीजींच्या जीवनात त्यागाला अनन्यसाधारण महत्त्व होत. त्यांचे चारित्र्य त्यागाने भरून वाहते आहे. सत्याचा किंवा अहिंसेचा अंश त्यागात असू शकतो हे गांधीजींच चरित्र चांगल्याप्रकारे  शिकवून काढत. त्यागातील ताकद तिथं दृष्टीपथात येते.  गांधीजींच्या पाठीमागे सारा देश उभा होता. पण स्वतः गांधीजींचे जीवन  त्याग, सत्य, अहिंसा यासारख्या महान तत्वावर आधारित होत. विनोबाजींच्यावर गांधीजींचा मोठा प्रभाव होता. या प्रभावामुळेच विनोबाजी भूदानासारखी आगळीवेगळी चळवळ उभी करू शकले व ती यशस्वीपणे राबवू शकले. त्यांनी अशा पद्धतीने त्यागाच मूर्तीमंत उदाहरण भारतीयांसमोर ठेवल. भारताच्या इतिहासामध्ये विनोबाजींना जे वेगळे स्थान आहे, त्यात गांधीजींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव असल्याचे दिसून येत. स्वतः गांधीजींनी जो त्यागाचा मार्ग धरला होता, तो तर विलक्षण व खडतर होताच. पण त्याचबरोबर विनोबाजीसारख्या अनेक अनुयायांना तो त्याग प्रेरणास्थान बनून गेला. 

त्यागाची प्रेरणा ज्याच्यापासून घेतली जाते, त्याचा त्याग निश्चितच उच्च कोटीतील असणार यात दुमत असण्याच कारण नाही. गांधीजींनी आहारात मिठाचा त्याग केला.  हा तसा साधाच पण एक प्रकारचा त्याग आहे. जेवताना अन्नात मिठ न टाकता जेवण करणं किती कठीण जातं हे अनुभवातून पाहिलं तर त्यांचा हा त्याग किती मोठा होता हे सिद्ध होईल. आजच्या चंगळवादात मिठाशिवाय जेवण रुचकर लागणे अशक्यप्राय आहे. आपण मिठाचा त्याग करायचा म्हणालो तरी तो का करायचा किंवा करायचा की नाही, यासारखे प्रश्न निर्माण होतात. शरीरासाठी जेवणं वेगळं व जिभेसाठी जेवणं वेगळं.  चंगळवादात सर्व इंद्रियांची सुखं आहेत. तर त्यागात इंद्रियांच्या सुखाला मज्जाव आहे. ते कितपत आपल्या पचनी पडणार आहे, हे आधी पाहिले पाहिजे. त्यागात परमेश्वर आहे. पण तो मनोभावे पूजला पाहिजे. नाहीतर त्याचे दर्शन होईलच असं नाही. एशोआरामाची भाषा त्यागाच्या विरुद्ध दिशेचा प्रवास होय. विरुद्ध दिशेचा प्रवास  इच्छुक ध्येयापर्यंत नेऊ शकणार नाही. ध्येयाविषयी संभ्रमच त्यामुळे तयार होईल. मनात एक अराजकता निर्माण होऊन त्यागाऐवजी सुखासीनता बोकाळेल. त्याग चित्ताची शुद्धी व शांतता करतो. त्याग निस्वार्थी असेल, तर तो मन स्थिर केल्याशिवाय राहणार नाही. त्याचा प्रभाव अनुभवण्यासाठी सिद्ध झाल पाहिजे. त्यागाशी आलेला संबंध एक वेगळ्याच प्रकारचा प्रभाव आपल्यावर पाडतो. असा प्रभाव व त्याचे परिणाम दीर्घकाळासाठी असतात. तसेच ते परिणाम चांगलेदेखील असतात. महानता अनुभवण्यासाठी त्याग केला पाहिजे. त्याग करण्यासाठी आपल्याकडे काहीतरी त्यागमय असले पाहिजे, हे तितकच खर आहे. ज्यांच्याजवळ त्याग करण्यासारखं काही नाही, त्याच्यासाठी त्यागाचा प्रश्नच येत नाही.  एक भिकारी काय त्याग करू शकतो? त्याने केलेला पैशाचा त्याग, त्याग असू शकेल काय? म्हणून त्याग करण्यासाठी, स्वतःजवळ त्यागयोग्य काही असणं अधिक महत्त्वाचं होऊन जातं. नाहीतर त्या त्यागाला काडीची किंमत येणार नाही. तो त्याग न होता त्यागाच ढोंग होईल. त्याग वेगळा व त्यागाचे ढोंग वेगळे. ते तर एक भयानक रूप आणि मनाचा कुरूप चेहरा होय. त्याग अंतकरणात खोल परिणाम करून चित्त ढवळून काढतो. त्यागात विचारशिलता आहे. विवेक व निष्कपट आहे. निस्वार्थ आणि बरीच उच्च मूल्ये अंतर्भूत आहेत.

 संबंध हा शब्द सर्व बाबींशी तसा संबंधित आहे. इथं कोणतीच बाब किंवा गोष्ट नाही जी दुसऱ्या कोणत्याच बाबींशी किंवा वस्तूशी संबंधीत नाही. एका व्यक्तीचा इतर हजार व्यक्तींशी संबंध येतो. चांगली सोबत लाभणे म्हणजे त्या व्यक्तीचा चांगल्याशी आलेला संबंध होय. 'सुसंगती सदा घडो, सृजनवाक्य कानी पडो' अशी रास्त अपेक्षा सर्वजण व्यक्त करतात. ती करणेही तसे रास्त आहे. कारण संगतीतच माणूस घडतो किंवा बिघडतो. संगतीच्या संबंधाचा प्रभाव व्यक्तीवर विचित्र पद्धतीने पडतो. अनेक व्यक्तिमत्व चांगल्या माणसाच्या सहवासाने बहरतात. समाजात तीन प्रकारच्या मुख्य विचारसरणीची माणसं असतात. चांगल्या, वाईट व स्थिर विचारसारणीची ही माणसं होत. स्थिर विचारसरणीची व्यक्तिमत्त्व साचेबद्ध जीवन जगतात. त्यांच्या जगण्यात चांगल किंवा वाईटांशी फारसा संबंध नसतो.  आला तरी त्याविषयीची एक तटस्थता इथे पाहायला मिळते. जगणं उद्दिष्ट घेऊन ही माणसं समाजात वावरताना आपल्याला पहावयास मिळतात. परिस्थिती कशीही असो, हे लोक त्यावर जास्त विचार करत बसत नाहीत. आल्या प्रसंगाला बिनबोभाट तोंड देतात. वाईट स्वभावाची माणसं इतरांवर त्याच प्रकारचा अनिष्ट परिणाम सोडतात. ती वाईट करण्याची कोणतीच संधी सोडत नाहीत. अशांना अराजकता पाहताना आसुरी आनंद होतो. जी माणस चांगल्या स्वभावाची आहेत, त्यांचं वर्गीकरण अनेक प्रकारे करता येऊ शकेल. स्वतःसाठी चांगलं, घरातील किंवा जवळच्यासाठी चांगलं, जो कोणी संबंधात येईल त्यांच्यासाठी चांगलं किंवा यापेक्षा वेगळ्या पद्धतीने चांगल्या माणसाचे वर्गीकरण आपल्याला करता येईल. जो जो सहवासात येईल, त्याला चांगल्याची ओळख आणि सवय देणारी माणसं सर्वश्रेष्ठ होत. गांधीजींचा स्वभाव सर्वांना परिचित आहे. त्यांच्या पश्चात या देशात गांधीवादी विचारसरणीचे हजारो गांधीजी तयार झाले होते. आजही त्या वाटेवरून खडतरपणे निश्चल मनाने प्रवास करणारे कित्येक गांधी भेटतात. हा केवळ गांधींच्या विचारांचा विजय आहे. चांगल्या विचारांशी संबंधित सर्वच चांगलं मानाव लागेल. एका चांगल्यापोटी हजार सत्कृत्यांचा जन्म होतो. त्यामुळे चांगल्या विचारांच्या माणसाशी संबंध येण तसं कधीही चांगलंच होय.

 काही संबंध सहज उलघडणारे असतात. तर काही संबंध कितीही विचार केला तरी समजून येत नाहीत. आई बाळावर जीवापाड प्रेम का करते?  फुलं का उमलतात?  किंवा माणसं दृष्ट का वागतात?  त्यांना त्यातून काय साध्य करायचे असते? किंवा निसर्ग कधीमध्ये इतका क्रूरपणे का वागतो?  फुलांसारखा भावनिक संबंध, विघातकी प्रवृत्यांसारखा मानव जातीला काळीमा फासणारा संबंध किंवा निसर्गाच्या नैसर्गिक क्रूरपणाचा सहसंबंध कितीही विचार केला तरी त्याचा उलगडा सहजासहजी होत नाही. संकटात मदतीला धावून येणाऱ्या हाताचा संबंध कोणाशीही नसून, तो फक्त माणुसकीशी असतो. पीडितांना न्याय मिळवून देणारी माणसं समाजात सुख पेरणारी असतात. दीन, दुबळ्यांच्या सेवेत परमेश्वर मानणारी माणसं म्हणजे दुःख संपविण्यासाठी विडा उचलून झपाटल्यासारखे काम करणारे युद्धे होत. त्यांच्या कामाचा आढावा घेणे तसं चुकीच आहे. समाजातील एक दुःख संपविणारा व हजार दुःख संपविणारा, दोहोंची तुलना कधीच करता येणार नाही किंवा त्यांच्या कार्यामुळे यातील कोणाला श्रेष्ठत्व द्यायचा हा प्रश्न कधीच तयार होता कामा नये. रामाला सेतू बांधण्यासाठी सर्वांनी मदत केली. छोटे छोटे प्राणीदेखील त्यात होते. त्यांच्या आवाक्यातील काम त्यांनी केल. म्हणून त्यांचा दर्जा कमी, असं म्हणता येणार नाही. चांगले हे अत्तराच्या वासासारख असत. अत्तराच्या वासात राहिल तरी चांगलं. अत्तराचा ओझरता वास आला तरी तो चांगलाच होय.

 वाऱ्याचा स्वैरपणाशी येणारा संबंध किंवा खळखळून वाहणाऱ्या पाण्याचा मुक्ततेशी येणारा संबंध हे काही निसर्गाचे मापदंड आहेत. त्यातील कोणावरच कोणाची सत्ता असू नये.  मुक्तपणाशी आलेला संबंध अवघं जीवन उजळून प्रकाशमय करतो. निसर्ग मुक्त आहे. निसर्गातून मिळणारा मुक्तपणाचा संदेश दुसरा कुठेच अनुभवता येणार नाही. त्याच्या मुक्तपणाची तुलनाही होणार नाही. वाऱ्याची झुळूक कुठंही जाते व आपल चैतन्य व सळाळी तिथं ओतून पुढच्या प्रवासाला निघते. पाऊस मुक्त व अनियंत्रितपणे  बरसतो आणि अनेकांची मनं भरून टाकतो. अनेकांच्या आशांना  त्यामुळे कोंब फुटतात. पाऊस फक्त पाणी देतो असं म्हणणं कदाचित चुकीचे होईल. पावसात कविता आहे, सौंदर्य आहे, कोमलता आहे,  रसिकता आहे, प्रेम आहे आणि आहेत पावसातल्या आठवणीसुद्धा. पाऊस येतो व त्याच्याबरोबर फुलांना फुलवण्यासाठी उमेद आणतो. सगळीकडे जीवन देऊन निघुन जातो. त्याच्या येण्याने, त्याच्या मुक्तपणे व उदारमनाने भरभरून कोसळण्यातील औदार्य खचितच दुसऱ्या कुठं पहावयास मिळेल. एरवी आपल्यावर बऱ्याच गोष्टींची कोसळाकोसळ चाललेली असतेच. पण जीवनात पावसाच्या निरपेक्ष कोसळण्याइतक गुदगुल्या करून कोणतीच गोष्ट जात नाही. पावसाच्या वर्षावाची जाणीव होण्यासाठी मनसुद्धा तितकच जाणिवेन भराव लागत. मनातील ही जाणीव पावसाच चिंब करून ठेवणं अविस्मरणीय करून ठेवते. पावसात भिजणं व भिजलेल्या पावसात तळलेले खमंग पदार्थ फस्त करण, इतक्याच पावसाळ्यातील आठवणी आज दुर्दैवानं होऊ पाहताहेत. पावसाच्या आठवणींच्या कक्षा त्याहीपलीकडे जाऊन रुंदावन गरजेच आहे. पाऊस निमित्त आहे. त्याच्या आड जाऊन बऱ्याच सुखसंध्याचा उपभोग घेणे हा पावसावरील अन्याय होईल. पावसात भिजून धुंद होणे व कृत्रिमरीत्या बेधूंद होण, या विचार करायला लावणाऱ्या बाबी आहेत. पावसातील आठवणीने मन बहरून जाण्याऐवजी गहिवरून येत. अशांचा पावसाशी काडीचाही संबंध असू नये. निसर्गात कुठेही खोटेपणा नाही. एक सत्य व नित्य तत्वाने भरभरून ओसांडणारा संदेश निसर्गात आहे. मग आपण हे असे कसे? आपणसुद्धा याच निसर्गाचा छोटासा अंश आहोत. आपली नाळ याच निसर्गात खोलवर कुठतरी आहे. याचा आपल्याला विसर पडू नये. निसर्गातील सर्व तत्व तर माझ्यात आहेत. मग मी असा कसा?

     माणसाला बुद्धी दिली पण त्याच्याबरोबर परमेश्वराने एक अप्रतिम बाबही दिली ती म्हणजे विवेक. विवेक प्रत्येकाच्या अंतकरणात आहे. चांगल आणि वाईट वेगळं करण्याचं सामर्थ्य विवेकात आहे. विवेक हे महान मानवी मूल्य आहे. क्षणभंगुर सुखासीनता विवेकाची ज्योत विझवण्यास कारणीभूत होते. सारासार विचारधिनता नष्ट होवून विचार प्रक्रिया मंद होते. प्रसंगी थांबते देखील. विचारांच थांबणं आणि अज्ञानाचा प्रारंभ या दोन एकच बाबी आहेत. वरकरणी वेगळ्या वाटल्या तरी त्या एकाच ठिकाणावरून उगम पावतात. ते ठिकाण म्हणजे विवेकशून्यता. विवेकी होण्याचा प्रारंभ व ज्ञानी बनण्याचा मार्ग सारासार विचारसरणीतुनचं जन्मतो. निसर्गातील काही मोजकी तत्व अंतर्मनात विराजित करण्याचा प्रयत्न म्हणजेच निसर्गाशी मिळविलेला मैत्रीचा हात होय. निसर्गाशी असा संबंध म्हणजे मुक्ततेशी पडलेली गाठ होय. निसर्ग मुक्त, आपण मात्र साखळदंडात राहणं कितपत योग्य आहे? निसर्गातून निसर्गाकडे म्हणजेच मुक्तपणा होय. मुक्ती यापेक्षा वेगळी काय असू शकेल?  कुणावर अन्याय करून, कोणाचा खून करून किंवा अवैध धनसंपदा साठवून मुक्तीची वाट पाहणं म्हणजे निव्वळ खुळचटपणा होय. विचारांचा कृत्रिम धांद्रटपणा असाही त्याचा उल्लेख करता येईल.

  सारासार विचार केला तर प्रेमाचे संबंध सर्व नाती अजरामर करून टाकतात. प्रेम मुक्या प्राण्यावर केले तरीदेखील त्या प्रेमाची भाषा त्यांना समजते. वस्तूवर केलेले प्रेमसुद्धा वस्तू परतफेड करते. प्रेम दगडाला पाझर फोडते. आजवर अनेकांनी जगावर राज्य करण्याची भाषा केली. काहींनी तसा प्रयत्नही केला. पण आजपर्यंत ते कोणालाही शक्य झाले नाही.  ज्यांनी प्रेमातून जगाशी संबंध प्रस्थापित केले, त्यांनी जगावर अनामिक राज्य केल. इतरांच्या हृदयात फक्त प्रेमाच्या रूपाने आपण जागा मिळऊ शकतो. प्रेमाने सर्व जग जिंकता येते. प्रेमाचे संबंध फक्त संबंध नसून एक जिव्हाळा असतो. प्रेम म्हणजे आत्मीयता आहे. त्याच्यात सर्व चांगल्या बाबी आहेत. निरपेक्ष प्रेम तर सर्वोच्च आहे. त्याची तुलना इतर कशाशीही होऊ शकणार नाही. सर्व संबंधात फक्त प्रेमाचे, जिव्हाळ्याचे संबंध चांगले होत. प्रेमाचे संबंध सर्वांशी येण्यासाठी प्रेम समजून घेतलं पाहिजे. एक निरिच्छ, निर्हेतुक प्रेम संबंधच माणसाची व माणुसकीची कुळी उंचावण्यास कारणीभूत ठरतील.        300706 ©Harish Gore

Monday, 10 August 2020

चिंतन....... सद्भावनांचे........६

                                                       भूमिका 


 या जगामध्ये विविधता, विविधतेबरोबर विशालता व विशालतेबरोबर व्यापकता पदोपदी पाहायला मिळते. सर्व व्यक्ती, वस्तू, व प्राणी विविधता, विशालता व व्यापकतेच्या अधिन आहेत. व्यक्ती म्हणून प्रत्येक पुरुष इतरांपेक्षा वेगळा आहे. प्रत्येक स्त्री इतर स्त्रियांपेक्षा वेगळी आहे. प्राणी, पक्षी किंवा वस्तू जात म्हणून एक आहेत पण प्रत्येकाचा स्वातंत्र्यरित्या विचार केल्यास भिन्नता आढळून येते. भिन्न गुणधर्म प्रत्येकाच्या मुळाशी आहेत. व्यक्तीत, प्राण्यात, वस्तूत भिन्न गुणधर्म असणे ही विविधता आहे. त्यांच्यात विशालताही आहे व या सर्वांनी तर जग व्यापले आहे. म्हणजे व्यापकता ही प्रत्येकाठायी आहे. अशा रितीने सृष्टीची रचना समतोल ठेवली गेली आहे. कोणत्याही एका गोष्टीचा अतिरेक इथं नाही किंवा विशिष्ट अशा गोष्टीचा तुटवडाही नाही. सर्व काही तोलून-मापून आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी पूर्णत्व आहे. प्रत्येकजण परिपूर्ण आहे. अपूर्ण इथं काहीच नाही. जे आहे ते पूर्ण व निःसंकोचपणे परिपूर्ण आहे. प्रत्येकाला महत्व आहे. व्यक्ती, वस्तू किंवा प्राणी यांचा कालचक्रात मोलाचा वाटा आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने झटकण्याचे काम करतोय. कोणाच्या कुवतीनुसार झटण्यात कमी-जास्तपणा आहे. पण झटतोय हे मात्र निश्चित आहे. गाय दिवसभर चरते. संध्याकाळी दूध देते. तिचं काम संपलं. दूध मिळाल्यानंतर अनेकांचे काम मार्गी लागत. गाईने दूध देण्याची भूमिका घेतली म्हणून अनेकांच्या सकाळच्या चहाची रंगत वाढली. कित्येक लहान बाळांचे रडण गाईने बंद केलेलं असतं. दुधाला दूध हेच उत्तर आहे. इतर कोणताही पांढरट पदार्थ  दुधाची भूमिका वठऊ शकणार नाही. किंवा आजपर्यंत कोणत्याही पदार्थाने दुधाची तहान पूर्ण केली नाही. ती पूर्णही करणार नाही. 


 भूमिका हा शब्द रंगमंच किंवा चित्रपटसृष्टीशी अधिक निगडित आहे. भारतीय मनावर चित्रपटांनी खोलवर परिणाम केलेला आहे. किंबहुना चित्रपटाशिवाय सध्याच्या भारतीय समाजाची कल्पना कदाचित अपूर्ण ठरेल. चित्रपट हा विषय जसा आपल्यासाठी अविभाज्य आहे, तसच त्यातून रंगवल्या गेलेल्या भूमिकाही आपल्यासाठी अविभाज्य आहेत. विशिष्ट एका चित्रपटातील नटनटीनं केलेली भूमिका मनाच्या कोपऱ्यात घर करून असते. कितीही विसरेन म्हटलं तरी विसरणं अशक्यप्राय होत. ती भूमिका अनेक मनांवर अनेक काळ अधिराज्य गाजवत असते. वास्तविक नट-नटीन केलेली भूमिका अजरामर कलाकृती असते. अनेकांशी निगडित विचारांशी समरस ती भूमिका असते. त्यातून साकार होणार भावविश्व मनात खोलवर आधी कधीतरी रुजलेलं असतं किंवा त्या आदर्शांची, भावभावनांची काल्पनिक उजळणी मनात पूर्वी होऊन गेलेली असते. त्या भूमिकेच्या रूपाने आपलं मन पडद्यावर उलगडत असतं आणि आपण कलाकाराने साकारलेल्या भूमिकेत गेलेलो असतो. कल्पना व सत्य यात फक्त पडदा असतो. आपण खुर्चीत, तर मन पाडद्यावर साकारलेल्या भूमिकेत असत. 


   चित्रपटाचा असा फार दिवसापूर्वीचा काळ होता, जेव्हा भूमिका रसास्वादासह प्रेक्षक गृहण करीत होता. त्या चित्रपटांविषयी, त्यातील भूमिकांविषयी गोडीने बोलत होता. काळ बदलला. काळाबरोबर चित्रपट, रंगमंच व याबरोबर भूमिकाही बदलल्या. श्रोता-प्रेक्षकही बदलला. त्याच्या मागण्या बदलल्या. समाज व समाजरचना आणि त्यांच्या गरजेनुसार चित्रपट रंगमंचावरील भूमिकाही बदलत राहिल्या. त्या अशाच काळाबरोबर बदलत राहणार. पण एकूणच तिथे वठवल्या जाणाऱ्या भूमिकांविषयी रसिक पूर्वीइतका तृप्त पाहावयास मिळत नाही. जुन्या जमान्यात विशिष्ट कलाकाराच्या भूमिकेने रसिकाची चित्रपटांविषयी, रंगमंचावरील एखाद्या नाटकातील भूमिकेविषयाची समाधानी वृत्ती होती, ती आता त्याहीपेक्षा सरस भूमिकेने होत नाही. त्याला अनेक कारणे आहेत. पूर्वीच्या समाजरचनेत व आत्ताच्या समाजरचनेत अनेक सामाजिक स्थित्यंतर झाली आहेत. यात वाद नाही. अनेक बदल होत, समाज हळूहळू बदलला. त्याच्या मागण्याबरोबर त्याच्या भावनिक गरजा वाढल्या. त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न चित्रपट किंवा रंगमंच करत गेला. आणि हा प्रयत्न त्यात वठवल्या जाणाऱ्या भूमिकेमुळे विशेषता रसिकापर्यंत मोठ्या कुशलतेने पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला गेला. 

 चित्रपट किंवा रंगमंचावरील काही भूमिका आव्हानात्मक असतात. बऱ्याच वेळेला आपण एखादी भूमिका साकारलेले पाहत असताना, आपल्याला उगीचच वाटत जातं की ही भूमिका अशी नाही, अशी पाहिजे होती. या ठिकाणी या नायक-नायिकेनें किंवा अन्य पात्रांने असं बोलायला हवं होतं. थोडक्यात त्या कलेमध्ये कुठेतरी मनात थोडी उणीव जाणवते. तेंव्हा ती भूमिका पूर्णपणे कोसळलेली असते. भूमिका किंवा चित्रपट, नाटक आपल्या मनात पूर्णपणे केव्हा घर करतं? जेव्हा तो चित्रपट, नाटक मनातल्या घरात येतो तेव्हा....! आपलं मन फार विचित्र आहे. मनात कोणालाही उगीच थारा नसतो. मनातील घरात फक्त आवडत्या गोष्टीच असतात. नावडत्या बाबी पटकन तिथून निघून जातात. तसच फक्त मनापासून आवडलेल्या भूमिका आपल्या मनात असतात. भला तो चित्रपट किंवा नाटक पाहिलेल्या घटनेला दहा वर्षे होऊ देत. पण मनात ती भूमिका आजही ताजी व टवटवीत असते.


 भुकेल्या पोटान बाहेरून याव. जरा आवरून जेवायला बसावं. बघतो तर काय.....? भाजीत मीठ नाही. आहारातील मिठाची भूमिका किती महत्त्वाची आहे, याची जाणीव जीभ आपल्याला लगेच करून देते. आपल्या वापरातील प्रत्येक गोष्टीची आपण नीट चाचपणी केली, तर आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल की त्या सर्व वस्तूंची आपणास प्रकर्षाने गरज आहे. ती गरज पूर्ण करण्याची भूमिका त्या वस्तू पार पाडत असतात. काही वस्तू आपण वापरून फेकून देतो. काही वापरून परत वापरण्यासाठी ठेवून देतो. आपल्या दैनंदिन जीवनाला, या सर्व बाबींमुळे पूर्णत्व येत. आपल दिवसभराचं काम सोपस्कर होत. एखाद्या वस्तूने आपलं काम अडवलं, तर आपण कमालीची चिडचिड व्यक्त करतो. भाजीत मीठ नाही ही बाब ऐकायला किंवा वाचायला साधी वाटत असली तरी अनेक घरात केवळ या साध्या घटनेने बायकांची डोकी फोडलीत किंवा मोठा कलह तरी माजतो. सकाळी उठून पाहतो तर काय....? काल आणून लावलेलं वाहन आज चालू होण्यास नकार देतय. वास्तविक आपल्याला वाहून नेण्याची महान भूमिका वाहनं नेहमी करत असतात. त्यांनी एखाद्या दिवशी नकार दिला, म्हणून कोणत आभाळ कोसळणार नाही. पण नाही. घरात त्रागा, वाहनावर त्रागा, वाहन दुरुस्त करणाऱ्या बिचाऱ्या मेकॅनिकला तर शिव्यांची लाखोली वाहिली जाते. हे का होते तर साधं वाहन चालू होत नाही. मला वाहून नेण्याची भूमिका ते पार पडत नाही म्हणून. पण आपण या घटनेचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करू शकत नाही. परिणामस्वरूप आपण विनाकारण स्वतःला व इतरांना त्रास देतो. शेवटी सगळं ठीक होतं. तोपर्यंत आपली भूमिका मूळ भूमीकेतून खलनायकाच्या भूमिकेत कधी गेलेली असते, हे आपल्यालाही माहीत होत नाही. मजेशीर बाब ही की हे सगळे आपल्या उशिरा लक्षात येते. प्रत्येक वेळी हे असंच होत. पुन्हा उशीरा आपल्या लक्षात येतं. इतका राग इथं नको होता. आपण पुन्हा पुन्हा तीच ती हळहळ व्यक्त करून वारंवार त्याच चुका करत असतो. आपल्या पाहण्यात, बघण्यात अशी बरीच माणसं असतात, ज्यांनी अत्यंत क्षुल्लक कारणासाठी एखाद्याचा जीव देखील घेतलेला असतो. रस्त्यावरून मी चाललो आहे. समोरून येणारी व्यक्ती मला नीटशी बाजू देत नाही. म्हणून त्याच्या श्रीमुखात मारणं ही शुद्ध हिंसा आहे. आपण रस्त्याने चाललो म्हणजे राजाच्या स्वारीप्रमाणे सर्वांनी बाजूला व्हावं असं कुठे लिहिले नाही. पण मन ऐकत नाही. राग अनावर होतो व त्याचा परिणाम हिंसेत होतो. समाजात अशा प्रवृत्या संख्येने जास्त होऊ पाहत आहेत. अनेकांना राग आवरता आवरत नाही. कित्येकांना राग आवरता येतो हे माहित देखील नाही. घटना छोटी व राग मोठा असे चित्र सर्वत्र आज आहे. 


 एखाद्या अनोळखी गावी गेल्यानंतर खरं तर धीर सुटलेला असतो.  अशा ठिकाणी कोणी मायेने विचारपूस केली तर आपल्याला जे समाधान मिळते, ते दुसऱ्या कशानेही मिळू शकणार नाही. त्या गावाविषयी, तिथल्या लोकांविषयी अचानक मनात प्रेम निर्माण होतं. जरा समाधान होतं. वास्तविक त्या व्यक्तीने पार पाडलेली भूमिका प्रेम, सदाचार, माया यावरील आपला विश्वास दृढ करते. 


  जीवन जगताना असे अनेक प्रसंग अनेक वेळा येतात की सतत दुःख,अत्याचार, निंदा  वाट्याला येते.  आपल्याच बाबतीत असं नेहमी का होतं, असं वाटतं. त्यावेळी खर तर आपला चांगल्यावरील विश्वास उडालेला असतो. नेहमीच दुःख, अन्याय, अत्याचार सोसणाऱ्यांची सहनशीलता बहुदा संपलेली असते. या जगात वात्सल्य, माया, प्रेम जणु काही नाही, यावर त्यांची ठाम धारणा झालेली असते. त्यातूनच नैराश्यपूर्ण जीवन कंठण्याची वेळ येऊन ठेपते. असे जीवन जगण्याऐवजी जीवन अक्षरशः ढकलण्याची परिस्थिती तयार होते. मन मोठ विषारी आहे. सभोवतालच्या परिस्थितीवरून मन मनाची भूमिका ठरवत.  त्याच्यातील उणिवा आपण शोधू शकत नाही.  आपण मूळ किचकट परिस्थितीत गुंतलेलो असतो. इकडे मन त्याच्या भूमिकेत अधिक बळकट होत.  अशा परिस्थितीत मन नकारात्मक भूमिकेत जास्त ओढ घेतं. त्या  वेळी कदाचित आपण चूकण्याचा धोका असतो. कधी कधी तर चुकतो देखील.


   सहनशीलता केवळ नाव नाही. सहनशीलतेला एक व्यापक अर्थ आहे. तिच्यात प्रचंड ऊर्जा असलेली शक्ती आहे.  तिचा अनुभव प्रत्येकाने घेतला पाहिजे. आपण किती सहनशील असावं? आपण नेहमी ऐकतो, मी खूप खूप सहन केल. आता सहन करणार नाही. ही बंडखोर प्रवृत्ती आहे. ती सहनशीलता नाही. सहनशीलता इतकी संकुचित नाही. स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेल्यानंतर, तिथे त्यांना अनेक गोष्टी  सहन कराव्या लागल्या. कित्येक लोकांनी तर त्यांची सार्वजनिक ठिकाणी टर उडवली, कुचेष्टा केली. त्यांचा पोशाख व राहणीमान पाश्चमात्यांचा चेष्टेचा मुख्य विषय होता. पण म्हणून स्वामीजींनी चिडून जाऊन कोणाला धमकावल्याची नोंद कुठेही नाही. गांधीजी दक्षिण आफ्रिकेत गेले. वर्णभेद तिथंही होता. डब्यातून सामानासह बाहेर फेकून दिले. वास्तवीक त्यावेळी त्यांनी बॅरिस्टर पदवी मिळवली होती. त्यांच्यावर अन्याय होण्याचा प्रश्नच येत नव्हता. पण झाला. कविवर्य नारायण सुर्वे......! जन्म झाला आणि रस्त्याच्या कडेला जन्मदात्यांनी फेकून दिलं. कवी नारायण सुर्वे यांच्या आयुष्यातील एक एक प्रसंग डोळ्यात पाणी आणतो. पण कुठंही सहनशीलता संपली नाही. अशी अनेक उदाहरणं देता येतील, जिथे फक्त सहन केलय. 


  अन्याय, अत्याचार सहन केला की मन शक्तिशाली बनतं. विचारी बनतं.  अन्याय-अत्याचार संपवण्यासाठी फक्त विचार गरजेचे असतात. विचार वाढविण्यासाठी सहनशीलता आवश्यक असते. सहनशीलता अंगी असण्यासाठी विचारी असणं गरजेचं असतं. अनेक वेळा, आपण खूप विचारी असल्याचे वाटत असतं. तो निव्वळ भास व इतरांना दाखविण्यासाठी केलेला उत्कृष्ट अभिनय असतो. विचार घडवणं आणि वाढवणं इतकी सोपी गोष्ट नाही.  क्षणाक्षणाला मनात अविचार डोकावणारी माणसं विचारी कधीच बनू शकत नाहीत. त्यांनी केलेल्या प्रत्येक प्रयत्न त्यांना शेवटी एका नव्या अविचारापाशी नेतो.  विचारी बनण्याच्या नादात नकळत अविचार हातून घडतो. मनाची जडणघडण ज्या बांध्याची असेल तसं आपण नकळत वागतो. जीवन जगणं व जगलेल्या जीवनात विचार असणं मोलाच आहे. आपण किती जगलो, ह्यापेक्षा कसं जगलो याला जास्त महत्त्व आहे. 


  थोर व उदात्त तत्व घेऊन जगणारी माणसं अनेकांना वाट दाखवू शकतात. अनेकांना आधार ठरतात. तत्त्व व विचार घेऊन जगणं आणि अज्ञान व अविचार घेऊन जगण, या दोन जगण्यात कितीतरी पटीने नैतिक अंतर आहे. एक सन्माननीय तर दुसरे क्षुद्र जगणं आहे. भले तो क्षुद्र श्रीमंत असो अथवा कंगाल. विचार व जगण्याची संस्कृती नसेल तर तो कितीही श्रीमंत झाला तरी त्याच क्षुद्रपण फार काळ लपून राहत नाही. वादळवाऱ्यात दिवा तेवत ठेवणं जेवढं कठीण आहे, तेवढच कठीण जीवनात विचार टिकवण आहे. एक विचार टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी शंभर अविचारांचा गळा घोटावा लागतो. आपल्याकडे परिस्थिती याच्या उलट आहे. एका अविचारासाठी आपण अनेक चांगल्या विचारांना, चांगल्या मूल्यांना कोणताही विचार न करता क्षणात तिलांजली देतो. विचार घडवताना हा अविचार आपल्याकडून नकळत होतो. शेवटी लक्षात येतं तेव्हा 'आपलेच दात व आपलेच ओठ'  यासारखी परिस्थिती येते. आपण मूग गिळून गप्प बसतो. विचार घडवताना असा अविचार होणे सर्वस्वी चुकीचे आहे. चांगले विचार, आदर्श तत्वे, काही मुल्ये,  सर्वांसाठी सारखीच आहेत. व्यक्तिपरत्वे ती बदलत नाहीत. ती काळ सापेक्षही आहेत. काळही ती बदलू शकत नाही.  त्या मूल्यांचा, विचारांचा किंवा तत्वांचा  संबंध आपल्यापाशी आला, आपण चुकलो; जाऊ द्यात. असं म्हणणं सर्वस्व चुकीचे व निंदनीय आहे. तत्वांचा आदर्श सर्वांसाठी सारखा आहे. जे आहे ते आहे. व्यक्तीव्यक्तीनुसार मूल्ये भिन्नभिन्न करता येणार नाहीत किंवा व्यक्तीच्या पदानुसार किंवा परिस्थितीनुसार त्यात बदल करण्याचा अधिकार कोणालाच नाही. तसा बदल करणेसुद्धा योग्य होणार नाही.


 भारत देशामध्ये अनेक जातीचे, विविध धर्माचे, पंथाचे लोक एकत्र आहेत. भारतात विविधतेत एकता आहे. भारताच्या इतिहासातील जडणघडणीत वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांची भूमिका स्पृहणीय आहे. अनेकविध जाती, अनेक धर्म असून सुद्धा एका घट्ट धाग्याने सर्वजण बांधले आहेत. जगामध्ये अनेक देश आहेत. पण इतकी विविधता कुठेच नाही. सर्व जग आपल्याकडे मोठ्या कौतुकाने  पाहत आहे. भारत एक अव्यक्त चेतना आहे. भारत एक अनामिक आकर्षण आहे. हे आकर्षण काही आज तयार झालं नाही. ते अनेक वर्षापासून जगाला आहे. भारत एक चमत्कार आहे. अनेक संकटे या देशाने मोठ्या हिमतीने छातीवर झेलली आहेत. अनेक झंजावातात त्यानं त्याचं व्यक्तिमत्व  सोडलं नाही. पूर्वी जी ओळख होती, ती आजही आहे व ती पुढेही अबाधित राहणार आहे.


 महापुरुष सामान्यापेक्षा सर्वस्वी वेगळे व वेगळेपणात स्वतःबरोबर देशाची ओळख टिकविणारे असतात. भारत ही जशी कर्मपुण्य कर्मवीरांची भूमी आहे, तशी ती या मातीसाठी जीव ओवाळणाऱ्या रत्नांची मायभूमी आहे. भारत म्हणजे केवळ जमीन, पर्वत, डोंगर, नद्या, समुद्र यांचा मिलाफ नाही. तर भारत एक विशाल तत्व आहे. तिच्या मातीला येणारा गंध इतरत्र अनुभवता येणार नाही. तिच्या कुशीत मिळणारी ऊब दुसऱ्या कुठेच अनुभवता येणार नाही. भारतभूमी जशी कर्मवीरांची, देशभक्तांची भूमी आहे, तशी ती  संतांची आवडती आहे. भारतात संतांची मोठी परंपरा आहे. संतांच्या पावनस्पर्शाने पुनित झालेली पवित्र माती म्हणजे भारत होय. पावित्र्यात संस्कृती, संस्कृतीत तत्व व तत्वात देश फक्त भारतच आहे. भारत महान व जगावेगळा असण्याची कितीतरी कारण आहेत.  इथल्या मातीत जे आहे ते क्वचितच इतरत्र पहावयास व अनुभवयास मिळते. इथल्या काही बाबी फक्त इथेच आहेत. भारताने घेतलेली भूमिका जगासाठी एक आदर्श असते. जगाला भारताची भूमिका नाकारण्याच धाडस आज तरी नाही. भारताने घेतलेली भूमिका सर्वमान्य असते. त्या भूमिकेमागे वैयक्तिक स्वार्थ नसतो. असते ते जगाचे, मानवजातीचे कल्याण.....!  कुणी घेतलेली भूमिका, किती निस्वार्थी आहे, त्यावर त्या भूमिकेचं वजन व किंमत ठरते. निस्वार्थी भूमिका घेणाऱ्या देशाच्या पाठीमागे काय संस्कृती आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. संस्कृती नसेल तर कित्येक वेळी विचार तोकडे पडण्याची शक्यता असते. जगापुढे आपली भूमिका नेहमी आदर्श राहिलेली आहे. 


  शिकागो धर्मपरिषदेत भारतीय धर्मग्रंथ तळाला होता. तो तळाला असला म्हणून त्याची मौलिकता मुळीच संपणार नाहीत किंवा ती तसूभर कमीही होणार नाही. जगाला शाश्वत वाट दाखवण्याची धमक फक्त भारतीय धर्मग्रंथातच आहे. भारतीय धर्मग्रंथ ही निव्वळ पुस्तके या सदराखाली मोडणाऱ्या वस्तूं नाहीत. त्यांची किंमत थोडयाफार मूल्याने वसुल होईलही. पण त्या किमतीच्या हजार पटीने त्याच मोल आहे. जगात अनेक पुस्तकं आजवर छापली. ती मोठ्या चवीनं कदाचित वाचलीतसुद्धा. पण पुस्तक कशी वाचावीत हे आपले धर्मग्रंथ सांगतात. त्यांच्या प्रत्येक पानावर, पानातील ओळीत व ओळींतील शब्दात आदर्श तत्वज्ञान  ठासून भरल आहे. दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करण्याची कुवत त्यांच्यात आहेत. 


  जगात इतरत्र संपन्नता, श्रीमंती आपल्याला पाहावयाला मिळेल. तिथली प्रगती आपले डोळे दिपविल. हे सर्व आहे. तरीही भारताविषयीचे प्रेम भल्याभल्यांना नाकारता आल नाही.  इथल्या मातीत आकर्षणाची लोकविलक्षण जादू आहे. तिला कोणतं नाव नाही. पण त्या आकर्षणाचा इन्कारही  करता येत नाही. खूप दिवस घरापासून दूर आहोत. आज घरी जाण्यासाठी निघालोत. मनात घराविषयीची ओढ, घरातील माणसांचे प्रेम, या सर्व गोष्टींच आकर्षण शब्दात किंवा व्याख्येत सांगता येणार नाही. नेमकं तेच आकर्षण भारत व भारतभूमीविषयी जगाच्या मनात आहे. आपण जागलो, वाढलो पण भारतात गेलो नाही, याची खंत अनेक विदेशी लोकांना आहे. नैतिकदृष्ट्या आपला व आपल्या संस्कृतीचा हा फार मोठा विजय आहे. अशा नीतिमान देशात आपण आहोत. आपल्या कणभर अस्तित्वाची भूमिका मिळून देश व देशाची संस्कृती ठरवताहेत. याचा सार्थ अभिमान सर्वाजवळ असला पाहिजे.


 जीवन जगताना अनेक चमत्कारिक घटना बऱ्याच वेळी घडतात. काही चांगल्या तर काही वाईट असतात. काही हलक्याफुलक्या तर काही हृदयद्रावक असतात. अशा घटना घडणें कोणालाच अपेक्षित नसतात. पण त्या घडतात खऱ्या. कधी अचानक कुठूनतरी भूकंपाची वार्ता धडकते आणि अनेकांच्या आशा-अपेक्षासह घरदार जमीनदोस्त होतात. कधी दुष्काळ पडतो आणि संकटांची माळ गळ्यात घालून लोक त्याचा सामना करताना दिसतात. कधी अतिवृष्टीने गावागावात पाणी थैमान घालत येतं. या सगळ्या घटनात जगण विस्कटून टाकल जात. जगणं आणि विस्कटलेल जगण या परस्परविरोधी बाबी आहेत. या व अशा प्रकारच्या महासंकटाने अनेकांच्या आयुष्याला पूर्ण कलाटणी मिळालेले आहे. जगणं विस्कटत तेंव्हा आभाळाला टाके टाकून आभाळ शिवण्यासारखं असतं. असं जगणं जिवंतापणीचा मृत्यू होय. काय काय म्हणून हातात धरून ठेवणार?  कोणाला कोणाला वाचवणार? सगळं तर ठीक चाललं होतं. क्षणात सर्व परिस्थिती भयानक असल्याचे चित्र समोर असताना होत्याचं नव्हतं पाहण्याची धमक मनात शिल्लक राहत नाही. एखादा महापूर बोळातून यावा, तसे अश्रू बाहेर येण्यासाठी डोळे अपुरे पडतात. भावनांचा बांध चौफेर विखुरला जातो. काय अडवाव आणि काय आठवावं? 


 जशी संकटरुपी भयानकता अचानकपणे समोर येते, तशाच अचानक काही चांगल्या घटना देखील घडतात. पावसाळ्यात चातकाच ओरडणं मनाला हुरहूर लावून जात. त्याच्या ओरडण्याने पावसाची अनामिक वाट पाहिली जाते आणि अशीच एक दिवस चातकासह सृष्टी तृप्त करणारी बरसात येऊन जाते. एका अनामिक हुरहुरीला असं समाधानाच पूर्णत्व येत. आवडती व्यक्ती दूरवर आहे. अचानक एके दिवशी ती आपल्या समोर यावी. जे अकल्पित समाधान आपल्याला मिळतं, ते ओठांत कधीच मावत नाही.  त्याच्या येण्यान मन भरल्याची पावती आपल्या चेहऱ्यावर मिळते. ती व्यक्तीच नाही तर अनेक आठवणी त्याच्याबरोबर आपली  संगसोबत करण्यासाठी आलेल्या असतात. त्याच्या येण्यानं मनाची मरगळ दूर होतें व नवसंजीवनी अंगात संचारते. असं का होतं?  तसं पाहिलं तर जगात कोणीतरी कोणाची वाट पाहतोय हे सर्वत्र चाललेलं असतं. बायको नवऱ्याची,  बाळ आई-बाबांची, आजोबा नातवांची, मित्र मित्राची, झाड पाण्याची, दुकानदार गिऱ्हाईकांची, वाट पाहत असतात. यश प्रयत्नांची वाट पाहत. गुरु उत्तम शिष्याची तर परमेश्वर निस्सीम भक्ताची वाट पाहतो. एका उदात्त हेतूनं वाट पाहणं वेगळं आणि स्वार्थाच्या किंवा स्वहितार्थ वाट पाहणं वेगळं. त्यात बरेच नैतिक अंतर आहे.


 एखाद्याच्या असण्याने कुणाच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होत असतील तर त्या विशिष्ट व्यक्तीच्या अस्तित्वाची, उपस्थितीची भूमिका खरोखरीच अतुलनीय मानावी लागेल. अनेकांची जगण्यातील उमेद खचलेली असते. त्याला बळ देणं  कधीच गैर असू शकत नाही. उलट या भूमिकेत आपण असणं कोणासाठी वरदान ठरत असेल, तर ती भूमिका वठवण, त्या भूमिकेत राहण नेहमी चांगलं होय. दीपस्तंभाप्रमाणे स्वतः अचल राहून इतरांना मार्ग दाखवण तसं कठीण काम आहे. पण  आपल्यामुळे अनेकांना मार्ग दिसत असेल तर दीपस्तंभ का होऊ नये? इतरांना वाट दाखवताना आधी स्वतःला वाट सापडण महत्त्वाच आहे. आपण वाटेवर असणंसुद्धा त्याइतकच महत्त्वाच आहे. अशा प्रकारच्या जगण्यातील आस्वाद  वेगळाच असतो. आपली ती भूमिका  श्रेष्ठ मानावी लागेल. 


 चित्रपट किंवा नाटकातील भूमिकेशी ते पात्र एकरूप झालेले असत. त्या पात्रातील सुख-दुःख अभिनयातून व्यक्त होतं. कलाकार आपली भूमिका मोठ्या तन्मयतेने साकारतात. कलाकाराच्या वास्तविक जीवनात त्या भूमिकेला काडीचाही थारा नसतो. भूमिका वठवताना हसणं, रडणं, गंभीर होण म्हणजे फक्त अभिनय होय. रडण्याचा अभिनय करणे म्हणजे रडणं नव्हे. प्रेमाचा अभिनय म्हणजे खरंखुरं प्रेम नव्हे. मारामारीचा अभिनय म्हणजे लुटूपुटूचा खेळ होय. सगळं म्हणजे खोटं खोटं. पण आपल्यासाठी तो कलाकार सर्व प्रसंग जिवंत करण्याचा अभिनय करतो. आपलं रोजचं जगणं म्हणजे एक उत्कृष्ट अभिनय का असू नये? आपलीसुद्धा जगण्यातील भूमिका लुटूपुटू, खोटी खोटी का असू नये? जीवन म्हणजे एक विशाल रंगमंच आहे. इथली आपली भूमिका संपली म्हणजे इथंच आपला मेकअप उतरवून आपल्या मूळ घरी जायचय. कोणतीही वस्तू जाताना बरोबर न्यायाची नाही, की रंगमंचावरील पात्रच जीणं बरोबर घ्यायचं नाही. इथली भूमिका विसरून, आपल्या मूळ भूमिकेत आपणा सर्वांना परतायचं आहे. आपल्याला मात्र या गोष्टीचा पुरता विसर पडतो. आपण जगतोय. पण प्रत्येक वस्तू किंवा व्यक्तीत डिंक  लावल्याप्रमाणे चिकटून बसतोय. खरोखरच हे जगणं आहे काय?  मी एक टुमदार घर बांधलं. इतरांपेक्षा जरा वेगळ आहे. त्याचं वर्णन ऐकवून ऐकवून सर्वांना बेजार करून सोडतो. एक छानदार गाडी घेतली. हजारवेळा तिला मिरवून आपली आर्थिक ताकद आपण सर्वांसमोर सिद्ध करत असतो. एखाद पद मिळाल तर त्या पदाला पुरत चिकटून बसतो. सोडता सोडत नाही. त्यातुन जे जे गाळून काढता येईल ते ते शेवटपर्यंत काढतो.  हे का ?  आपण एक घर बांधतो. त्याचं इतकं रसभरीत वर्णन करतो.परमेश्वराने सकल सृष्टीच बांधकाम सुरेखपणे केलय. ती निर्मिती करताना त्यांन त्याचं वर्णन किंवा बडेजावी कधीच मारली नाही. 


  आपला अनेकांशी संबंध येतो. कोणाशी प्रेमाने, कोणाशी खट्याळपणे, तर कोणाशी तटस्थपणे. आपण कोणावर प्रेम केलं, मग ती व्यक्ती असो वा वस्तू, आपण त्यात पुरते अडकतो. प्रसंगी फसतोदेखील. कोणाशी वाद झाला तर आपण तो विकोपाला नेतो. एखाद्या ठिकाणी तटस्थपणाची भूमिका घेतली तर कमालीचे तटस्थ होतो. त्या घटनेच किंवा प्रसंगच आपल्याला सोयरसुतक नसतं. घरातील माणसावर बरावाईट प्रसंग आला तर आपल्याला धक्का बसतो. असं का होतं?  त्या नात्यात आपण पुरते अडकलेले असतो. त्या नातेसंबंधाशी आपण खरोखरीच संबंध जोडलेला असतो. जगताना स्वतःची भूमिका विषद करणं गरजेचं आहे. 


  स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला 'कर्मयोग' जीवन जगायला शिकवितो. त्या कर्मयोगानुसार जीवन जगणे म्हणजे चिखलात कमळ उमलणं होय.  एक निस्वार्थी, निगर्वी, अहंकाररहीत जगणं कर्मयोग शिकवितो. सर्वजण तर रंगमंचावर आहेत.  बोलताहेत, भांडताहेत, जगताहेत. पण ते खरे की खोट? जगताना आपण फक्त जगतोय. अभिनयक्षमता आपल्यात नाही. याच जगण्यात जेव्हा आपण अभिनय शिकू तेव्हा तिथून जगणं सुरू होईल. आपली भूमिका सुरेखपणे आपण वठवू तेव्हा तिला दाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. याच जीवनातील, दोन जगण्यातील अंतर या तत्वामुळे आपण अनुभवू शकू. जगुनसुद्धा आपलं जगणं अलिप्तपणे अनुभवू शकू. प्रेम करूनही त्यात अडकणार नाही. पण प्रेम तसूभर कमीही होणार नाही. आपण रागावू पण तरी आपण रागीट असणार नाही. आपण  बोलू, तरीही मौनवृत्त धारण केलेल असू. आपण अनेक नातेसंबंध प्रस्थापित करू. पण नात्यातील बंधनात कधीच अडकणार नाही. आणि आपली ही भूमिका आपल्यासाठी खूप काही मौलिकता देऊन जाईल.   110706   ©Harish Gore

Monday, 3 August 2020

चिंतन....... सद्भावनांचे........५



                                                                         दुःख



 भाषेमध्ये काही शब्दांच्या वाट्याला लावण्य, काहींच्या वाट्याला प्रेम, काहींच्या मान, काहींच्या वाट्याला अपमान आहे. काही शब्दांना वजन आहे.  काही हलकेफुलके तर काही जड आहेत. काही शब्द सुंदर, काही लोचट, काही खुळे, तर काही बावळट असतात. भाषा आशा अनेक शब्दसमूहांचा संच आहे. त्यातील दुःख हा शब्द आहे. दुःख हा शब्द क्लेशदायक आहे. या शब्दाला खूप यातना जोडलेल्या आहेत. त्याला स्वतःचं असं सौंदर्य नाही. दुःख या शब्दाने काळीज पिळवटून निघावं इतक्यात यातना या शब्दात आहेत. या शब्दाचा उच्चार करणे म्हणजे दुःख आहे. घडलेल्या दुःखी घटनेचे वर्णन म्हणजे दुःखाचा पाढा होय. ते कथन करणे, ऐकणे अथवा तो प्रसंग मनात आणन या सर्वात दुःखच दुःख विखुरलेल असत. दुःख अशी जिन्नस आहे, ती कोणालाच हवीहवीशी वाटत नाही. तिच्यापासून आपण कसं लांब राहू याच नियोजन प्रत्येकजण करतो.

प्रेमाच तसं नाही. प्रेम सर्वांना हवेहवेसे वाटते. आपल्यावर सर्वांनी प्रेम करावे, अशी रास्त अपेक्षा प्रत्येकजण करतो. प्रत्येकाची अपेक्षा पूर्ण होते न होते हा भाग वेगळा. पण प्रेमाची अपेक्षा लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण करतात. दुःख नकोनकोसे असते. दुःखाची सावलीसुद्धा आपल्या जवळ येऊ नये अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. वास्तविक प्रेमाकडून व दुःखाकडून आपली अपेक्षा रास्त आहे. पण या अपेक्षा मोठ्या सफलतेने पूर्ण होताना दिसत नाहीत. याला अनेक कारणं असू शकतात. मुख्य कारण अपेक्षा अर्थात आशा. प्रेमाकडून प्रेमाची आशा आणि दुःखाकडून सुटकेची अर्थात दुःख दूर करण्याची आशा. या दोन्ही बाबतीत सदैव दुःख आहे. प्रेमाची अपेक्षा करावी  आणि ते मिळत नाही, म्हणजे दुःख. दुःखाकडून दुःख दूर राहण्याची आशा आणि दुःख आपल्या पुढ्यात येऊन हजर, म्हणजे दुःख होय. या दोन घटनांचा सारासार विचार केला तर अपेक्षा किंवा आशा दुःखाला कारणीभूत होते. कोणाकडून किती आशा धरावी याचं ताळतंत्र आपण सोडून दिलेले असत. त्यामुळे पुढील दुःखमय प्रवास आपल्या वाट्याला येतो. तसा तो येऊ नये ही प्रत्येकाची अपेक्षा असते पण 'आशेच' गाठोडं वाढत जाते व मग पुढील अनर्थ घडतात.

 दुःख शब्द एक आहे पण त्याची व्याप्ती प्रत्येक ठिकाणी वेगळी आहे. प्रत्येक ठिकाणची त्याची तीव्रता वेगळी असते व प्रत्येक ठिकाणी उमटणाऱ्या त्याच्या पाऊलखुणा वेगवेगळ्या असतात. इथल्या प्रत्येक जीवाला आणि निर्जीवाला दुःख भोगाव लागत. दुःखातून व्यक्ती अथवा वस्तूच संक्रमण वारंवार होत असत. फुल मोठी उमेद घेऊन उमलतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी प्रवासाला निघतात. काहींच्या वाट्याला अंतयात्रा येते. काही फुले एखाद्या बड्या नामांकित आसामीच्या सत्काराला हजर होतात. काही लग्नसमारंभासाठी वापरली जातात. काही सजावटीसाठी वापरली जातात. तर काही दिवंगताच्या प्रतिमेसमोर माळ करून बसतात. काही ईश्वराच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतात. काहींच्या वाट्याला पायदळी पडण होतं तर काही फुलं उगीचच न वापर होता कोमेजून जातात. फुलांचा प्रवास सुखकारक कमी व दुःखदायक जास्त आहे. इथं दुःख आहे. ते आपल्या वाट्याला येणार आहे. दुःख सहन करण्याची क्षमता  फक्त फुले देऊ शकतात.  फुल सहन करतात आणि दुःख भोगूनही ती सदैव आनंदी दिसतात. दुःखाची तीव्रता फुलांच्या ताजेपणापेक्षा कमी असते. म्हणूनच अनेक सुखी व दुःखी ठिकाणी फुलांचा सर्रास वापर केला जातो. दुसऱ्याला प्रसन्न करण्याचा गुण फुलं कोणत्याही ठिकाणी सोडत नाहीत. म्हणूनच ती सर्वांना हवीहवीशी वाटतात.

 जगताना कोणाच्या वाट्याला किती व कोणत्या प्रकारच दुःख येईल हे निश्चित सांगता येत नाही. पण प्रत्येकाला दुःख  सहन कराव लागत हे मात्र खरे आहे. त्याची तीव्रता वेगवेगळी असते. एखादी सुंदर भावना शब्दबद्ध करताना लेखकाचा न बसेलला ताळेबंद किंवा एखादी नवीन रचना रचत असताना कवींची होणारी घालमेल व त्यातून निर्माण होणार दुःख, खरच कोणाला सांगायचं नसतं. असं दुःख भोगण्याचं भाग्य फारच कमी लोकांना मिळत. हजारो निरीक्षण नोंदवल्यानंतर पुढील निरीक्षणात शोध असतो. मग मागील हजार निरीक्षणात मिळालेलं अपयश नवीन मिळालेल्या यशाचा पाया असतो. ती निरीक्षण शोधकर्त्याशिवाय कोणालाच माहीत नसतात. चित्रपट तयार करताना चित्रपटाच्या मागे एक चित्रपट असतो. प्रत्येक कवितेमागे एक कविता असते. प्रत्येक पुस्तकामागे एक पुस्तक होईल एवढं पुस्तक असत. खरं तर ते दुःखच असत. ते बहुदा कोणाला न संगण्यासाठी असत. प्रत्येकाला पडद्यामागची कथा जाणून घेण्याची उत्सुकता असते. चित्रपट हिट होण्यासाठी घेतलेले टेक आणि रिटेक ही दुःख नसून प्रयत्न आहेत. अनेक न जुळलेली कडवी फाडून पुन्हा रचलेली शब्दांची माळ, कविता वा गाणं अप्रतिम बनविण्यासाठीचा प्रयत्न असतो. त्याच्या यशातून सुख तर अपयशातून सतत टोचण्या बसतात. 

दुःख सर्वव्यापी आहे. काही ठिकाणच्या दुःखाची तीव्रता हलकी असते तर काही ठिकाणच दुःख काळजाचा काप घेऊन जात. परमेश्वराने दुःख का निर्माण केला असाव? भयानक, ह्रदयद्रावक, प्राणांतिक, अतीव दुःख, अशा दुःखाच्या अनेकविध फांद्या आहेत. ईश्वराने दुःख निर्माण केले असे स्पष्टपणे म्हणता येणार नाही. पण दुःख सहन करण्याची क्षमता माणसाच्या अंगी निर्माण केली ही एक वरदायी बाब म्हणावी लागेल. नाहीतर सर्वत्र दुःख, दैन्य दिसलं असत. अनेक दुःखावर मात करीत माणूस जगतो. सुखाच्या एकेरी शोधात अविरतपणे धडपडतो. पण सुख काही त्याच्या हाती येत नाही. 'सुख पाहता जवापडे, दुःख पर्वताएवढे.....' ह्या अध्यात्मिक ओळीत दुःखाचा डोंगर व सुखाची क्षणभंगुरता छोट्या शब्दात तीव्रतेने सामावलेले आहे. आपण अहोरात्र सुख शोधतोय. एक सुख मिळालं की दुसर सुख दृष्टीच्या टप्प्यात दिसतं. ते मिळवण्यासाठी आपण पुन्हा कंबर कसतो. सुखापर्यंत जाणाऱ्या मार्गात अनेक काटे पायात रुततात. दुःखाच्या हेलकाव्याने आपण पुरते घायाळ होऊन जातो. अंती ते सुख आपल्याला मिळत देखील. तोपर्यंत सहन कराव लागलेल दुःख, त्या सुखाच्या मानाने कितीतरी पटीने अधिक असत. सुखाची सावली दुःख विसरायला लावते. सुख  बहुदा मृगजळाप्रमाणे असावे. या मृगजळाच्या शोधात आपण इतके पळतो की घशात अखंड कोरड तशीच राहून जाते. मृगजळाप्रमाणेच सुखसुद्धा भेटणं दुरापस्त आहे. बऱ्याच वेळी आपल्याला सुख येऊनही आपण सुखी नसतो. अनेक उणिवा काट्याप्रमाणे टोचतात व आपण खिन्न होतो. सुख येऊनही सुखी नसणें असते ते हेच. खऱ्या अर्थाने सुखाची किंवा दुःखाची व्याख्या करता येत नाही. सुख आणि दुःख मोजता येत नाही हेही आपलं एक दुःख आहे. त्यामुळे सुख आलं तरी त्या सुखाला आपल्या मर्यादित विचारसरणीमुळे पूर्णत्व येत नाही व दुःख कोसळलं तरी त्याचा अंत पाहता येत नाही. ह्या आपल्या मर्यादा आहेत. नेमक्या त्याच मर्यादा आपल्या दुःखाच्या व सुखातील सुखासीन दुःखाच्या मुळाशी आहेत. त्यामुळे आपण दुःखी आहोत व  दुःखाचे पुन्हा पुन्हाचे साथीदार आहोत.

 काही अतिव दुःख वगळता, इतर दुःख मनाच्या वाटण्यावर अवलंबून असतात. मग कोण किती खोलवर त्याची उजळणी करेल तितकी ती अधिक काटेरी बनून आपल्याला टोचतात. दुःखाच्या उकिरड्यातून सुख शोधताना दुःख मिळणार हे निश्चित आहे. तरीही आपण अविरतपणे असल्या न मिळणाऱ्या सुखाचा शोध घेतो. मुळात दुःख हा विषय चिंतन किंवा मनन करण्याचा नाही. दुःख हा असा वृक्ष आहे, त्याची मूळ, खोड, पान, फुलं, फळं आणि फांद्या दुःखी आहेत. त्यातून सुखद कल्पनांची संकल्पना चुकीची व अंती दुःखद ठरू शकते. म्हणून त्याची उजळणी करत न बसता येणाऱ्या प्रसंगाला धीराने सामोरे जाण महत्त्वाचे ठरत. धीर धरणं हे दुःखातील जालीम औषध आहे. ज्यांना दुखी प्रसंगात धीर धरता येत नाही, त्यांना खूप दुःख विनाकारण सहन कराव लागत. असलं दुःख शरीर आणि मनावर खोल परिणाम सोडून जातं. धीराने तोंड देत दुःखावर सहज मात करता येऊ शकते. आत्मसंकुचित वृत्तीतून बाहेर पडल्यानंतर दुःखाची बंधन सैल होतात. एक साधा विचार आहे, प्रभू श्रीरामचंद्र जगाचे मालक होते. अवतार धारण केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात खूप दुःख सहन कराव लागल. सामान्य माणसाच्या जीवनाइतका किंबहुना त्याहीपेक्षा जास्त संघर्ष व दुःखी प्रसंग त्यांच्यावर कोसळले. वास्तविक त्यांच्यावर असे प्रसंग येण्याचं नियतीचे कोणतंच प्रायोजन नव्हत. तरीही श्रीरामचंद्रांना अनेक दुःख का झेलावी लागली?  या जीवनात अशी अनेक माणसं आपल्या पाहण्यात, वाचण्यात येतात की जी खूप यातना सहन करुन, खूप हाल अपेष्टा सोसून जीवनात प्रचंड यशस्वी झालेली आहेत. त्यांनी दुःखाचा पाढाच वाचला असता तर ती आज तिथपर्यंत पोहोचू शकली असती का? पुण्यात माधुकरी मागून अनेकांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. चांगल्या पदव्या घेऊन आपला जीवनस्तर उंचावला, ना की ते रडगाणे गात बसले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विध्यार्थीदशेत असताना चारदोन तास सोडले तर इतर वेळ ज्ञान मिळवण्यात घालवला. अनेक ठिकाणी अपमान सहन केला. पण दुःखाचा पाढा वाचला नाही. इन्फोसेसचे नारायण मूर्ती  ध्येय व चिकाटीने वेडावून गेलेले साधे  गृहस्थ होते. रोजच्या जीवनातील व्यावहारिक अडचणी कदाचित आपल्यापेक्षा त्यांना जास्त होत्या. पण काही करून दाखवण्याची जिद्द त्यांना एका अढळ पदापर्यंत नेऊन पोहोचवते. ते तिथपर्यंत पोचतात खरे. पण वाटेत अनेक दुःखी घटना घडल्या. त्यांना वेडगळ थारा न देता त्यांचा प्रवास सुरू राहिला. एक दिव्य स्वप्न ते साकार करू शकले.

 वेळ अनेकांच्या दुःखाला कारणीभूत ठरते. सर्वसामान्यांपासून ते अतिमहत्त्वाच्या सर्व व्यक्तीपर्यंत वेळेचे भान ठेवावे लागते. वेळेचे महत्त्व ज्यांनी ओळखले ते सुखी राहू शकतात. वेळेचे भान सुटले, त्याला दुःख अर्थात मनस्तापाला सामोरे जावे लागते. वेळेत सुटणारी गाडी पकडण्यासाठी थोडा उशीर झाला. गाडी निघून गेल्यानंतरचा प्रत्येक क्षण वेळेचे महत्त्व मनात उजळणी करायला लावतो. त्यातून निर्माण होणारे दुःख  फक्त स्वतःलाच भोगण्यासाठी उद्भवलेल असत.  बसस्थानकातून बस निघून गेल्याचं सोयरसुतक इतर कोणालाही नसत. त्यावेळेचा प्रत्येक क्षण बोचरा असतो. दुःखाला धार मन  लावत.  मन दुःख तयार करत व मनच ते दुःख स्वतः न भोगता यातना आपल्यासाठी देऊन इतरत्र भटकत. शेतकऱ्याने वेळेत पेरणी न केल्यास,  वर्षभर दारित्र्याला तोंड द्यावे लागत. विद्यार्थी परीक्षेचे महत्त्व न ओळखता नेमक्या परीक्षांच्या वेळेत गाफील राहिला तर त्याचा त्याच्या गुणांवर परिणाम होतो. रोगी माणसाला वेळेवर उपचार मिळाले नाही तर रोग आणखीन बळावतो. क्वचित प्रसंगी अनिष्टसुद्धा  घडू शकतं. वेळ तारक आहे. परंतु तिचं महत्त्व ज्यांना नाही त्यांच्यासाठी ती मारक ठरू शकते. वेळेत मारलेल्या चेंडूवर षटकार बसतो व अवेळी टोळविलेला चेंडू त्रिफळा उडवतो. पैलवानाने योग्यवेळी साधलेला डाव गड्याला धुळ चारतो तर नेमक्या त्याच वेळी गाफील राहिल्यामुळे धूळ खावी लागणाऱ्या गड्याला अपयशाचे शल्य पुढील डावापर्यंत टोचत राहत. वेळ म्हणजे पैसा, अशा आशयाची 'टाईम इज मनी'  ही म्हण इंग्रजीत आहे. त्यात वेळेची अचूकता व मार्मिकता असल्याचे दिसत. वेळेचे महत्त्व जे नाकारतात त्यांना पैसे मिळणं अवघड असतं. वेळ ही अशी बाब आहे की, ती कोणासाठी थांबत नाही. योग्य वेळी योग्य काम न केल्यास, योग्य तो परिणाम होणार नाही व अंती दुःखाला सामोरे जावे लागते. काही माणसांच्या आयुष्याच समीकरण बिघडलेलं असतं. बालपण खेळण्यासाठी, तारुण्य कष्ट व अर्थाजनासाठी तर वार्धक्य  ईश्वरीय चिंतनासाठी असत. यामध्ये जर बदल झाला तर दुःख पुढ्यात वाढून ठेवलेल आहेच म्हणून समजा. तारुण्यातील मस्ती भविष्यासाठी दुःखाचा प्याला घेऊन उभी असते. तारुण्य कर्तृत्व सिद्ध करण्याचे रणांगण आहे. जो ज्या पद्धतीने इथं हे रणांगण कौशल्याने लढेल, तो त्या त्या प्रमाणात कर्तुत्ववान म्हटला जातो. तारुण्यातील आळस, म्हातारपणी कष्ट व दुःख आणतो. अर्थातच आयुष्यात ज्या त्या वेळी जे ते काम केले, तर दुःखाचा प्रश्नच निर्माण होत नाही.

 'वेळ आली होती पण.......'  ही म्हण वेळेसंबंधी आहे. पण ती काळाशी अर्थात मृत्यूशी निगडित आहे. मृत्यू या भूतलावरील सर्वात भयानक गोष्ट आहे. मृत्यूची भीती  प्रत्येक सजीवाला आहे. त्यात  ती मनुष्यजातीला जास्त तर मनुष्यातील पिडाकरक मनुष्याला इतरांपेक्षा जास्त असते. अनेक माणसं दुसऱ्याला मारून स्वतः चिरंजीव राहण्याच्या प्रयत्नात असतात. अर्थात ते शक्य नसते. जर जन्म आहे तर मृत्यू  निश्चितच आहे. यात वाद नाही. दिवस उगवतो म्हणजे तो मावळण्यासाठी.  सुख आहे तर दुःख न सांगता येणार. तसं मृत्यूच्या बाबतीतही म्हणता येईल. मृत्यू अटळ आहे. मृत्यू आहे पण मृत्यूबरोबर दुःख आहे. मृत्यू त्याच्याबरोबर आभाळभर दुःख आणून आपल्या अंगणात ओततो.  ते पाहता पाहता आपण पुरते थकून जातो.  दुःख जिथं आहे, त्यात मृत्यू सर्वात दुःखद मानावा लागेल. मृत्यूच दुःख  मरणाऱ्यापेक्षा नातेवाईकांसाठी जास्त असतं. मृत्यू जीवनातील शेवटच्या अंकातील शेवटची घटना होय.  मृत्यू  सर्वांसाठी जसा अनिवार्य आहे, तसा तो सुखद किंवा दुःखद असणं ज्याच्या त्याच्या नशिबावर अवलंबून आहे. मृत्यू काहींसाठी भयानक असतो तर काहींसाठी हसरा असतो. काहींसाठी तो यातनादायक व दुःख भोगायला लावणारा असतो. मृत्यू जरी काहींसाठी सुखद असला, तरी मृत्यू ही बाब मुळीच सुखद असू शकत नाही. मरणाऱ्याला जरी तो सुखद असला, तरी तो इतरांसाठी दुःखद असतो. जगताना जीवनाचे ज्ञान व मृत्यूच भान असल म्हणजे मरणाची यत्किंचितही भीती असू नये. 

 मानवी जीवन विज्ञानामुळे सुसह्य  झाले आहे. परंतु विज्ञानाच्या काही मर्यादा आहेत. तसं पाहिलं तर विज्ञानाच्या मर्यादा फार कमी आहेत. इथल्या अनेक रहस्यांचा उलगडा विज्ञानाने सहजतेने केला आहे. पण काही बाबतीत आजही विज्ञान अपूर्ण आहे. विज्ञानाच्या ज्या काही उणिवा आहेत, त्यात मृत्यूनंतरचे जीवन अग्रस्थानी आहे.  मृत्यूपश्चातचे जीवन उलगडणे विज्ञानाला अजूनह तरी शक्य झालं नाही. किमान अजून कितीतरी वर्ष ते विज्ञानाच्या आवाक्याबाहेर दिसतेय. याबाबतीत काही ग्रंथ प्रसिद्ध झालेत. पण त्यात कोणताही ठोस पुरावा किंवा विश्वास ठेवण्यासारखं काही दिसत नाही. ती निव्वळ करमणूक म्हणावी लागेल. परमेश्वराने काही बाबतीत आपल्याला अज्ञानी ठेवलेय. तसे ते योग्यच आहे. त्यात वरील बाब येईल. जन्मापूर्वीच व मृत्यूनंतरचे जीवन ही बाब आपल्यासाठी अनभिज्ञ आहे. ही गोष्ट तशी योग्य म्हणावी लागेल. जर आपल्याला ह्या बाबी माहीत असत्या तर कदाचित मरण्यासाठी चढाओढ व रस्सीखेच झाली असती व जगण्यापेक्षा मृत्यूत आनंद व घाई वाटली असती. काही बाबतीत अज्ञान फायद्याचं ठरतं. मृत्यूची वेळ आधी कळली असती तर तीसुद्धा आपल्यासाठी यातनादायक ठरली असती. 

 जीवनात जस दुःख आहे तस क्षणाक्षणाला सुख आहे. मनापासून जीवन जगणाऱ्याच्या जीवनात सुखच सुख विखुरलेले असत.  त्यामुळे या जन्मावर आणि जगण्यावर शतदा प्रेम करावे असं म्हणतात, हे सार्थच आहे. मृत्यूची वेळ अथवा मृत्यूनंतरच जीवन जर आपल्याला ठाऊक असत तर कदाचित आपण जीवनातील आनंद गमावून बसलो असतो. जीवनातील आनंद निघून गेला असता, तर फक्त उदासीनता राहिली असती. सर्वत्र नकारात्मकता दिसली असती. क्षणाक्षणाला वाढण्याचं व वाढताना जगण्याचं गम्य  आपल्याला मिळालं नसतं व जीवन आता आहे त्यापेक्षा दुःखी बनल असत. मृत्यू माहित असणाऱ्यांन हसायचं सोडून दिलं असतं. जीवनाकडे कदाचित तो पाठ फिरवून बसला असता. परमेश्वर  सृष्टीचा निर्माता व चालक आहे. त्याने त्याच्या निर्मितीत काही अप्रतिम बाबी निर्माण करून ठेवल्या आहेत. त्यात त्याने आपलं हितच साधल आहे. त्यामुळे जीवन सुखकारक झाले आहे. 

 मृत्यू केवळ दुःख या परीभाषेतून वर्णन करणं, म्हणजे त्याचं अपूर्ण वर्णन होऊ शकतं. एखाद्याच्या मरणाने दुःख जरूर निर्माण होत असेल. पण सृष्टीच कालचक्र मृत्यूमुळे पूर्ण होतय. जर जन्म ही घटना कालचक्रातील सुरुवात आहे तर मृत्यू त्याचा शेवट होय. आपण मरून विधात्यावर मोठे उपकारच करतोय असं म्हणावं लागेल. झाडाला पालवी फुटलेल पान झाडासाठी खूप काही करत. शेवटी पिकतं व गळून खाली पडत. त्याच्या परिपक्व होण्यात व गळण्यात एक अप्रतिम समाधान आहे. जगताना मृत्यूचे भान ठेवून जगलं तर अनेक अजरामर काम आपल्या हातून होऊन जातील व शेवटी आपण कृतकृत्य होऊन देह ठेवू शकू. अशा मरणात दुःखाची किंचितही छाया असणार नाही. 

 मानवेतर समाज केवळ जगण्यासाठी जगतोय. झाडे, पशु, पक्षी, प्राणी ही मंडळी कोणतेही स्वप्न उराशी बाळगून जगत नाहीत. त्यांच्या जगण्यात स्वच्छंदीपणा आहे. एक नैसर्गिक ऊर्मी अंतरात साठवून ती एक एक दिवसांनी जीवन सर करताहेत. त्यांच्याजवळ आशा, आकांक्षा, पुढील अनेक पिढीना पुरेल इतक साठवून ठेवणे वगैरे गोष्टींना अजिबात थारा नसतो. अर्थात त्यांना या गोष्टी  ठाऊकदेखील नाहीत. म्हणून एक साध, सरळसोट पण नैसर्गिक जीवन त्यांच्या वाट्याला येत. मानवाचं जीवन इतरांपेक्षा खूप वेगळ, वेड्यावाकड्या वळणाच व पुष्कळस अनैसर्गिक मानाव लागेल. खरंतर आपण सर्वच सजीव प्राणी एकाच परमेश्वराची लेकर आहोत. पण तरीही मानवजात म्हणून नैसर्गिकपणापासून आपण खूप दूर चाललोय.  दुःख तयार होण्याचे हे महत्त्वाचं कारण मानाव लागेल. 

 मुळात नैसर्गिक दिनक्रम, आचार, विचार असतील तर दुःखाचा प्रश्नच तयार होत नाही. पण निसर्गाला फाटा देऊन दिनचर्या ठेवली की, थोडं का होईना दुःख सोसावं लागेल. रात्र विश्रांतीसाठी किंबहुना झोपण्यासाठी आहे. रात्री आपण जागून काम करत बसलो तर पित्त वाढेल, डोकं दुखण्याचा त्रास कदाचित होईल. आरोग्य बिघडले की दुःख आहे हे साधे उदाहरण मानता येईल. तसं दिवसभराची आपली दिनचर्या पाहिली तर ती पूर्णपणे निसर्गाच्या विरुद्ध आहे. शारीरिक रोगांमुळे निर्माण होणार दुःख स्वतःला भोगण्यासाठी असत. रोग होण्याची अनेक कारणे आहेत. पण मुख्य कारण दिनचर्येतील आधुनिक कृत्रिमता होय. हल्ली सर्वचजण ताणतणावाखाली दिसतात. बालकांपासून वृद्धांपर्यंत तणावाला सामोरं जावं लागतं.  हृदयविकार व मधुमेहासारख्या गोड व महागड्या आजारांनी सर्व इस्पितळे भरून व्यापलेली आहेत. हे रोग आधुनिक जीवनशैलीतून बाळसेदार झालेले आहेत. त्यांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतेय. एक दिवस येईल, त्यादिवशी अशा आजारांविषयी आपल्या सर्वांना चिंतन करण्याची पाळी निश्चित येईल. अर्थात ती आजही आहे पण इतकी नाही. त्या वेळी उत्तर फक्त एकच असेल, ते म्हणजे 'निसर्गाकडे चला...... नैसर्गिक जगा.....'  रोज जगताना, दहा पिढ्यांना पुरेल इतकं साठवण्याच्या हेतूनं आपण झोपेतून जागे होतो. आपल्या अव्यवहारी अपेक्षा आपल्या दुःखाच्या मुळाशी आहेत.  सार्थ आशा सुख देते तर स्वार्थी आशा दुःख देऊन जाते. 
 दुःख ही एक कडवट भावना आहे. अपेक्षेला तडा देणारी भावना म्हणजे दुःख होय.  दुःख या भावनेचा कण नि कण कडवट आहे. आपण आपल्या भावना सुख व  दुःखात व्यक्त करतो. पण इतर जीवांच्या दुःखी भावना कशा व्यक्त होत असतील? पाखरं रडत असतील का?  ती आपल्या व्यथा कोणाला सांगत असतील?  मन हलकं करण्यासाठी ती काय करत असतील?  स्वैरपणे हवेत भरारी मारण्याचा दिनक्रम ती सुखात आणि दुःखात ठेवत असतील, की दुःख आणि सुख ह्या भावनाच त्यांना नसतील?  पाण्यातल्या माशाचे अश्रू कोणी बरे पाहिले असतील?  मासा खूप दुर्दैवी जीव होय. त्याचे अश्रू देखील दिसण्यासारखे नाहीत. दुःख होऊनही दुःख दाखवू शकत नाहीत, असे जीव दुर्दैवी होत. त्यांच्या दुःखाला पारावार नाही. झाडाची एक फांदी तोडल्यानंतर शेजारची फांदी वाऱ्यावर मुक्तपणे का डोलत असावी?  झाडं सुख व दुःख  एकाच कुशीत घेऊन बसतात का?  त्यांच्यातील निरागसता दुःखाच्या घावाने का ढळत नसावी?   दुःख सर्वत्र आहे. ते इथं आहे.  इकडे, तिकडे, सर्वत्र आहे. असा माणूस शोधूनही सापडणार नाहीत जो दुःखी नाही. माणसांचा प्रवास सुख शोधण्यासाठी आहे.  पण तो दुःखाची गाठोडी घेऊन परतताना दिसत आहेत. सुख शोधता शोधता खूप दुखी होत आहेत. आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस दुःखी आहे. आजच्यापेक्षा उद्याच्या दिवसाकडून सुखाची अपेक्षा जास्त होती. ती पूर्ण झाली नाही म्हणून तो दुःखी आहे. दुःख माणसाची पाठ सोडणे महाकठीण आहे. त्यातुन त्याची सुटका नाही. माणूस संपेल पण तरीही दुःख मागे शिल्लक राहील. चालता-चालता जसा माणूस संपेल पण वाट संपत नाही. तसच दुःख सर्वांसाठी आहे. दुःखाच्या काटेरी वाटेवरुन प्रत्येकाला प्रवास करावा लागतो. मग कोणासाठी ही वाट जास्त काटेरी तर कोणासाठी कमी काटेरी असेल. पण ती काटेरी आहे हे मात्र खरे.

 सुखाची पराधीनता व दुःखाची सोबत सर्वांसाठी अटळ आहे. सुख जसं सुखावह असतं. तसं दुःखसुद्धा बऱ्याच वेळी सुखावह असतं. अर्थात सुखावह दुःखाचा अंत आपल्याला पहायला यायला हवा. कदाचित आजच दुःख उद्यासाठी सुख घेऊन येईल. आजची जखम उद्या खपली धरल्यानंतर गुदगुल्या करणारी असू शकते. दुःखाकडे दुःखी नजरेने पाहिल्याने दुःखात वाढ होते. तर निरागसपणे त्याला सामोरे गेले तर दुःख आपल्यावर त्याचा परिणाम दाखवू शकत नाही. दुःखातील सुखी भावना टिपण्यासाठी निरागसता हवी. सुख आठवण्यासाठी व  दुःख विसरण्यासाठी आहे. ते विसरण्यातच सुख आहे. दुःखातील सुखासीन प्रवास  ज्याला करता येतो, तो खरा सुखी मानावा लागेल. सुख व दुःख त्याने एकाच नजरेतून पाहिलेली असतात. सुख आणि दुःख यापैकी कोणीतीच भावना त्याच्या मनावर परिणाम करू शकत नाहीत. सुखातही सुखी व दुःखातही सुखी ही मनाची परमोच्च अवस्था आहे. ती गाठल्यानंतर सर्वत्र आनंदीआनंद पाहता येईल, अनुभवता येईल. शेवटी दुःख ही एक भावना आहे व ती आपण किती भावनिक होऊन मनावर घेतो, यावर त्याची तीव्रता अवलंबून आहे. सुखाची अपेक्षा नैसर्गिक मनाची मागणी आहे. ती प्रत्येकाजवळ असते. पण पूर्ण होत नाही. अशा अपूर्ण आशेच्या मागे आपण धावाधाव धावतो. निराश होतो. पण धावण काही थांबवत नाही. नकळत वेग वाढतो. पुन्हा निराशा येते. दुःख येतं. आशाअपेक्षांची आपली उलथापालथ बहुधा चुकीचे आहे. खूप हवं, आणखीन हवं, सर्वच हवं, अशा हव्यासापोटी अनेक दुःखांचा जन्म होतो. समाधानी वृत्ती  दिवसेंदिवस लुप्त होते की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ पाहतेय. आपण सर्वजण त्याचे बळी पडतोय. एक विचित्र प्रकारची अस्वस्थता सगळीकडे दिसतेय. सर्वजण मागताहेत. ते मिळवतेयदेखील पण मागायचं काही संपत नाही. सर्वच तर आपल्याजवळ आहे. पण जणू अजून खूप मिळवायचं राहून गेल्याची अनामिक आस मनाची हुरहूरता वाढवतेय. चित्ताच्या ठिकाऱ्या ठिकाऱ्या करतेय. आपण खिन्न होतोय. पुन्हा नकळत मार्गी लागतोय. पण एका सर्जनशील विचार भावनेतून जीवनाचा विचार होताना दिसत नाही. संयमाचा बांध दिवसेंदिवस अधिक खचतोय.  मी आणि माझं, यापलीकडे आपली दृष्टी अंधूक होतेय. अधिक हव्यास व संचयातून दुःखाचा पाझर न थांबणारा आहे.


जगामध्ये थोर महात्मे होऊन गेले. त्यांनी त्यांच्या परीने जगातील दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला. स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत जाऊन सांगितलं की, जोपर्यंत माझ्या देशातील दुःख संपत नाही तोपर्यंत माझा देश सुखी होऊ शकत नाही. शिक्षणाने सुशिक्षित समाज निर्माण होईल. सुशिक्षित समाज सुखी असेलच असं नाही. अज्ञान व अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यामुळे भारतात दुःख असल्याचं स्वामीजींनी ओळखलं होत. त्यावर त्यांनी आयुष्यभर काम केलं. इथल दुःख, दैन्य  संपविण्याचा ध्यास घेतला. पण दुःख काही आज अखेर संपल नाही, संपणारही नाही. दुःखाची पालवी दर दिवशी नव्या जोमाने फुटते. त्याच स्वरूप वेगळं असेल पण दुःख मात्र असतेच. त्यामुळे आजवर सुखी करण्याचे जेवढे प्रयत्न झालेत, त्या तीव्रतेने दुःख फोफावतय व हे असच राहणार. मग दुःख कमी करण्याचा उपाय कोणता? समाधानी वृत्ती ठेवणे हा यावर रामबाण उपाय आहे.  'ठेविले अनंते, तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान....'  ही सर्वच लिला 'त्याची' आहे. सुखाला  'तो' तर दुःखाला 'मी' जबाबदार धरून प्रवास झाला पाहिजे. दुःख आलं तरी धीराने सामोरे जाण्याची मानसिकता ठेवावी लागेल. निव्वळ अतातायी भूमिका दुःख वाढवेल. तर संयम व धीर दुःख कमी करेल. संपूर्ण दुःख कमी व्हाव अस वाटत असेल, तर कोणत्याही गोष्टीचा स्वतःवर प्रभाव पडू दिला नाही तर तो एक दुःखावरील रामबाण उपाय होईल.  280506 ©Harish Gore

दौशाड

  दौशाड हे डॉ. नंदकुमार राऊत यांच्याकडून मिळालेले पुस्तक मला जसे वाटले तसे.....        पुस्तकाचे नाव एका चिवट जातीच्या वनस्पतीच्या नावावरून ...