संबंध
शब्द मायेचे पांघरून आहेत. शब्द म्हणजे प्रचंड वादळ आहेत. शब्द म्हणजे संहारही आहेत. शब्दांत जसा मायेचा प्रेमळ ओलावा आहे, तसाच त्यांच्यात विनाशाची प्रचंड आगसुद्धा भरलेले आहे. शब्द सर्वांवर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांचे सहाय्य घेतल्याशिवाय आपण जणू पांगळे होऊ, अशी वस्तुस्थिती आहे. शब्दांना विकार व अविकार दोन्ही आहेत. शब्दांची उपयुक्तता व भयानकता दोन्हीही मान्य करावी लागेल. भाषा कोणतीही असो, शब्दासंबंधीची सर्व तत्त्वे, सर्व भाषांत सारखीच आहेत. शब्दात प्रेम, माया, मत्सर, राग, हेवा, पैसा, दारिद्र्य, दुःख आणि असेच कितीतरी चांगले-वाईट गुण भरलेले आहेत. आई शब्दातून बाळावर प्रेमाचा वर्षाव करते. अनेकांच्या आयुष्याची ठेव-ठेवण फक्त शब्द आहेत. ज्ञानेश्वरांचे, तुकोबांचे आता फक्त शब्दच ओळख म्हणून शिल्लक आहेत. त्याव्यतिरिक्त कोणतीही संपत्ती त्यांच्याकडे नव्हती व नाही.
शब्द अनेकांसाठी पैसे मिळवून देण्याच काम करतात. अश्या लोकांसाठी शब्दाचं मोल मोठं असतं. त्यांच्यासाठी शब्द हिऱ्या-मोत्यासमान असतात. याच शब्दांनी त्यांच्यावर पैशाची उधळण केलीली असते. तर कित्येक वेळी शब्दच दुःख, दारिद्र्याला कारणीभूत ठरतात. शब्दात वास्तविकता व मार्मिकता असेल, तर ते शब्द प्रभावी मानले जातात. शब्दाशब्दांनी वाक्य तयार होते. तर वाक्यातील अर्थपूर्ण शब्दांच्या संबंधाने वाचन तयार होते. सर्वोत्तम शब्द आपल्या वाट्याला येणे, हीच साहित्यिक श्रीमंती होय. उत्तमातील उत्तम शब्द आपल्या संगतीत असल्यानंतर कधी एकटं राहण्याचा प्रश्न येत नाही. शब्द अनेक वेळी तारक ठरतात. शब्दात मोठी जादू आहे. शब्द एकदा आपल्या दारात आले तर कसे ठाण मांडून बसतात. उठता उठत नाहीत. त्यांची सेवा ज्या प्रमाणात आपण करू, त्या प्रमाणात शब्द आपल्यावर कृपा करतात. शब्दांची सेवा म्हणजे साहित्याची सेवा. एक निर्भेळ समाधान देणारी सेवा, असा साहित्यिक सेवेचा नाव लौकिक आहे. त्यातून मिळणारं समाधान फक्त संबंधित व्यक्तीलाच मिळू शकते. पुन्हा संपूर्ण साहित्य शब्दाशब्दातील सहसंबंधाने ओतप्रोत भरलेल असतं. शब्दातील अतूट संबंधाने साहित्यक कलाकृती उमलत जाते. शब्द साहित्यिक कलाकृतीची मौलिकता किंवा क्षणभंगुरता ठरवतात. शब्दाशब्दातील संबंधाने सौंदर्यपूर्ण वाक्य, वाक्यावाक्यातील संबंधाने एखादी अनमोल साहित्यकलाकृती निर्मिली जाते. शब्दातील सहजसुंदर संबंधाने नटलेल्या अनेक साहित्यिक कलाकृतींशी आपला जेव्हा संबंध येतो, तेव्हा धन्यतेची ढेकर येते.
शब्दांचा संबंध साहित्याशी तर साहित्याचा संबंध व्यक्तीशी येतो. ज्यांनी साहित्यावर प्रेम केलं, त्यांची जीवन अक्षरशः फुलली....! ज्यांना साहित्य काय आहे हे कळालं नाही किंवा ज्यांचा साहित्याशी काडीचाही संबंध आला नाही, ते आडाणी होत. साहित्यातून संस्कृती डोकावते. साहित्यातून संस्कार उत्तम प्रकारे दिले व घेतले जाऊ शकतात. त्यामुळे ज्यांची साहित्याशी जवळीक नाही, त्यांना संस्कार व संस्कृतीपासून लांब थांबण्याची पाळी येऊ शकते. मनाचा हळुवारपणा कसा जपला व उलगडला जातो, हे साहित्यातून स्पष्टपणे कळू शकते. साहित्यातून विचार व सभ्यता यांच दर्शन होऊ शकत. अनेकांना साहित्याने घडवलं व वाढवल आहे. साहित्याविना जगणं त्यांना पाण्यातून बाहेर निघालेल्या माशाप्रमाणे तडफडीच वाटतं. अशा व्यक्तींचे जगणं साहित्य होऊन गेलेल असत. जीवन एक सुंदर साहित्य, यापेक्षा सुंदर दुसरी कोणती कल्पना असू शकेल? साहित्यात जगणं,साहित्यात वाढण आणि शेवटी स्वतः एक साहित्य होऊन जाणं, ही वृत्ती साहित्याला वाहून घेणारी म्हणावी लागेल. एक उच्च प्रतीच जगण अशा जगण्यात दिसू शकतं. साहित्याची सेवा, साक्षात सरस्वतीची पूजा आहे. ज्या तन्मयतेने ती केली जाईल, त्याच तन्मयतेने ती साहित्यिकाला पावते. सरस्वती पावलेल्या साहित्यिक कलाकृत्या सुदैवाने आज आपल्याकडे विपुल प्रमाणात आहेत. साहित्य म्हणजे निव्वळ अक्षरे नव्हेत. साहित्य थेट मनाला भिडणारं अस्त्र आहे. मनात खोलवर शिरून मन व मत परिवर्तन करण्याची प्रचंड शक्ती साहित्यात आहे. तलवारीपेक्षा शब्दांची ताकद कितीतरी पटीने जास्त आहे. 'पेन इज माईटर द्यान सोर्ड' अशी शब्दांची महती सांगणारी इंग्रजीत म्हण आहे. साहित्य म्हणजे शब्दांचा खेळ आहे. तसाच तो शब्दांचा मेळही आहे. ज्यांना हा मेळ आणि खेळ चांगला खेळता येतो, ते उत्तम साहित्यिक होत. जे साहित्यातून मिळत, ते खचितच इतर कशातून मिळू शकेल. अनेकांची आयुष्य या साहित्याने तारली आहेत. शेवटी विचार करायला भाग पाडणार आणि मनाला व जगण्याला बळ देणार साहित्यच सर्वश्रेष्ठ होय. त्यातून जे घेतले जाईल, तेच जगण होय. त्यातून जे मिळेल तेच विचार होत आणि शेवटी त्यातून जे पुन्हा दिले जाईल तेच साहित्य व साहित्याची सेवा होय.
साहित्याचा अनेक बाबींशी लागेबांधे अर्थात संबंध आहेत. ओठातून बोटात येणारे साहित्य वाचकाची तहान भागवू शकतं. मानवी जडणघडणीत अनेकविध पैलूंचा अविष्कार साहित्यातून होतो. साहित्य वाचण व साहित्य घडवण, या दोन वेगळ्या बाबी आहेत. वाचनाने साहित्य घडवता येईलच असं नाही. एक वाचक साहित्यिक असू किंवा नसू शकतो. पाण्याचा पेला पाण्यान भरल्यानंतर त्यात ओतलेले पाणी जसं खाली सांडत, तसं साहित्य असावं. स्वतःचं मन भरलं. जे साहित्य मनाची तृप्ति करून गेले, ते इतरांना तृप्त करण्यासाठी पेनात उतरत, तेच हृदयस्पर्शी साहित्य होय.. बहिणाबाईचं कोणतंही वाचन नव्हत. संत रामदास, तुकाराम, ज्ञानेश्वरांनी शब्द व भाषा किंवा भाषेची तत्व अभ्यासून लेखन केले नाही. साहित्य म्हणजे साहित्यिकाच्या मनाचा आरसा आहे. साहित्य जड कधीच असू शकत नाही. एकतर ते नावडीच किंवा आपल्याशी संबंध नसलेलं असतं. बहिणाबाईंच्या कविता व तुकारामांच्या अभंगांची खोली आजवर कोणत्याच कवीला गाठता आली नाही. ज्ञानेश्वरांची प्रत्येक ओवी विचारवंतांना विचार करण्यासाठी थांबवते. समर्थांचे मनाचे श्लोक आजही जनमानसात त्यांची लोकप्रियता टिकवून आहेत. या सर्वांच्या मागे एक तरल व भावनिक संवेदनशीलता आहे. त्यांच्या प्रत्येक रचनेत महान तत्व विराजित आहे. सर्वसामान्यांचं जगणं त्यांनी त्यांच्या साहित्यातून व्यक्त केले आहे. एक ठाम सिद्धांत या सर्व साहित्यातून डोकावतो. तरीही एक साधेपणा व साध्यातील सच्चेपणा अशा साहित्यातून दिसतो. त्यांच्या साहित्याचा संबंध समाजातील सर्व स्तरातील लोकांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष येतो. तुकारामांची गाथा वाचता न येणारेही ती मुखोद्गत करतात. अनेक अशिक्षित ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीची पारायण करताना दिसतात. ही संतसाहित्याची प्रचंड ताकद नव्हे काय? आजचा स्थिर समाज म्हणजे संत साहित्याचा ज्ञात व अज्ञात परिणाम असू शकतो. समाज आदर्श व उच्च तत्वांनी बांधून ठेवण्याचं काम संत साहित्य आजवर चोखपणे पार पाडत आल आहे. त्यामुळेच या साहित्य प्रकाराला उत्तरोत्तर अधिकाधिक लोकप्रियता बहाल केली जात आहे. शब्दांचा संबंध जेंव्हा व्यक्तीशी येतो, तेव्हा विचारांची निर्मिती होते. विचार जेव्हा सात्विक शब्दांनी युक्त असतात तेव्हा ते साहित्य निश्चितच संत साहित्य असतं असं म्हणता येईल. शब्दांच्या शिडीवर साहित्याची निर्मिती होते. साहित्यातून शब्दवारसा जोपासला जातो. माणुस घडवणार साहित्य उत्तमप्रतीचे साहित्य होय. मनुष्यातील विकार व अविचार नष्ट करण्याचं काम साहित्य निर्मितीतून व्हावं एवढी माफक अपेक्षा साहित्यातून असावी. साहित्यातून माणसं घडवणे, हेच महत्त्वपूर्ण काम चोखपणे पार पाडल पाहिजे. अन्यथा विकारी साहित्य हे साहित्य प्रकारात न मोडता समाजमनाचा खून करणार हत्यार या प्रकारात मोडेल. अलीकडे रंजक साहित्याकडे वाचक पटकन वळतात. तुलनेनं आपल्याकडे अशा प्रकारचं भडक व भंकस साहित्य फार कमी आहेत. खप हा मुख्य उद्देश ठेवून निर्मिती केल्या जाणारे साहित्य हे साहित्य नसून साहित्याचा व्यापार होय. तरीही अशा खपाचा यशस्वी साहित्याशी तुलना करताना महत्त्वाचे योगदान असतं. मानवीमूल्यांची जडणघडण साहित्यनिर्मितीतून नकळतपणे वाचकाच्या मनावर कोरणार साहित्य आवडीने आणलं व वाचलं जातं.
आपण सगळेच कोणाशी ना कोणाशी संबंधित असतो. तशी या सृष्टीची निर्मितीच मुळात संबंधातून झालेले आहे. जगताना जसजसं पुढे जाऊ तसतस नवीन अनुभव गाठीशी येतात. कालच्यापेक्षा आज अनुभवाने आपण समृद्ध असतो. कालचा दिवस कदाचित अज्ञानात जातो. त्याहीपेक्षा आज अधिक ज्ञान आपल्याकडे असते. उद्याचा दिवस आजच अज्ञान सिद्ध करणारा असतो. जगता जगता एक प्रगल्भता व परिपूर्णता येऊ पाहते. आयुष्य पूर्णत्वाकडे जाताना हळूहळू समाधानी वृत्तीच दर्शन व्हायला पाहिजे. वास्तविकता याउलट व विरोधाभासाची आहे. जगता जगता जगण्याची ओढ वाढताना दिसते आहे. आणखीन जगावं, खूप जगावं, खूप पहावं, करावं ही तळमळ पूर्णत्वाकडे जाताना बळावणं चुकीच आहे. परिपूर्णतेकडे सरकणारा प्रवास चित्ताची स्थिरता वाढविणारा असावा. जगण्याची ओढ असणे स्वाभाविक व नैसर्गिक आहे. पण मरणातील आनंदाची अवहेलना जिवंतपणी का करावी? जगताना जगण्याशी संबंध आला. जीवनाशी संबंध आला. तसा तो मरणाशी यावा, या भावनेतूनच सगळीकडे पाहण स्वाभाविक का असू नये? जगताना जाणिवांची जागृती होणे गरजेचे आहे. जाणिवांच्या कक्षा रुंदावन आवश्यक आहे. इथलं सगळं ज्ञान होणे गरजेच आहे. ते झालं पाहिजे या तळमळीने झपाटले पाहिजे. हे सर्व तर सोप आहे, आपण ते करण्यासाठी सिद्ध होऊया, या भावनेतून विचार झाला पाहिजे. जीवनातील अनेक सुंदर सत्यांचा उलगडा आपल्याला फार उशिरा होतो. आपण जगतो, रोज पाहतो, अनुभवतो पण शेवटी, अरे हे सर्व तर इथंच होतं, मग आजपर्यंत माझ्या वाट्याला का आलं नाही, याची जाणीव आपल्याला त्यावेळी होते.
भगवान बुद्धांच्या जीवनाचा प्रवास म्हणजे सत्यशोधनामागील तळमळ होय. सुखी, संपन्न, ऐश्वर्यपूर्ण जीवन जगताना सत्याचा शोध घेण्याची कल्पना सुचणं, ती पूर्णत्वाकडे नेणं ही साधी गोष्ट नाही. सत्य काय आहे हे बुद्धांना शेवटी कळालं. स्वतःच जीवन त्यांनी त्या दिशेने वळवलं. म्हणून त्यांना अखेर सत्याचं, एका प्रकाशाच दर्शन झालं. सर्व ऐश्वर्य सोडलं. सरळ जंगलाची वाट धरली. अनेक महत्त्वपूर्ण गोष्टीचं ज्ञान सुखात किंवा श्रीमंतीत होतं नाही. सुखाची व श्रीमंतीची ही मोठी मर्यादा आहे. आपणास ह्या मार्यदेची जाणीवच होत नाही. खडतर तपश्चर्या आरंभली. अन्न पाणी सोडलं. हाडाचा फक्त सापळा बाकी राहिला. शरीर दिवसेंदिवस दुर्बल, अशक्त होऊ लागल. सर्व सहकारी निघून गेले. सत्य काय आहे हे बुद्धांना शेवटी कळालं. सत्य शोधण्यासाठीची तळमळ अंतिम ध्येयाप्रत त्यांना घेऊन गेली. अवघ जीवन प्रकाशमय झाल. ज्ञानाचा प्रकाश अंतःकरणात प्रवेशिला. ज्ञानाशी आलेला संबंध जीवन उजळून टाकतो. अज्ञान मिटवतो. ही घटना सुखाच्या त्यागात व प्रयत्नांच्या पराकष्टेतून शक्य झाली. जीवनभर सुखात राहणं गौतमाला सहजशक्य होतं. पण सत्याच्या दर्शनाच्या ओढीपुढं हे सुख क्षणभंगुर वाटलं. सत्य आहे पण ते शोधलं पाहिजे. त्यासाठी एशोआरामावर तिलांजली दिली पाहिजे, अशी भावना गौतमाला सत्याच्या, ज्ञानाच्या प्रवेशद्वाराजवळ घेऊन गेली. जो त्याग त्यांनी केला, तो अवर्णनीय आहे.जे त्यांनी त्यागातून मिळवले, ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. हे प्रत्येकाला शक्य आहे. पण ज्ञानप्राप्तीची तळमळ गौतमाजवळ होती ती खचितच कोणाजवळ पाहायला मिळेल.
आपण सर्वसामान्य त्यांच्या एवढे कष्ट करूही शकत नाही. आणि म्हणून जीवनात सत्याचा बोध होण्याची शक्यताही तशी धुसर बनते. आपल्या जीवनातील सत्याची शक्यता धूसर असली तरी इथल्या सत्याला किंवा ज्ञानाला आपण नाकारुही शकत नाही. सत्य किंवा ज्ञान त्रिकालबाधित आहे. ते तुमच्या किंवा आमच्या नाकारण्याने किंवा स्वीकारण्याने बदलणार नाही. मुळात आपल्या अस्तित्वाचा सत्यावर परिणाम होत नाही. मात्र सत्य स्वीकारण्यांन किंवा नाकारण्यांन आपल्या जीवनात मोठा बदल होऊ शकतो. पृथ्वी किंवा स्वर्ग कदाचित बदलतील पण सत्य अढळ आहे. या जीवनात सत्याशी आपला संबंध यावा या भावलहरी मनात उमटण हा सत्याच्या दिशेने सुरू केलेला प्रवास होय. या जीवनात त्याचे दर्शन कदाचित होणार नाही. पण त्याच्या शोधाचा प्रवास थांबवणही उचित होणार नाही. सत्य शोधण्यासाठी आवश्यक आचार, विचार हळूहळू सत्याकडे घेऊन जातील. प्रामाणिक प्रयत्नातून सत्य हळूहळू जवळ येईल. त्यासाठी किमान काही दिवस, काही महिने, काही वर्षे किंवा कदाचित काही जीवनंही गमवावी लागतील. पण प्रयत्न सोडून चालणार नाही. शेवटी सत्याच दर्शन म्हणजे कृतकृत्यता होय. सत्याच दर्शन भलं नाही झालं, तरी सत्य शोधताना समाधान मिळेल, जी शांतता प्रस्थापित होईल तिचा अनुभव तरी घेतला पाहिजे. ज्ञान कदाचित यापेक्षा वेगळे असू शकत नाही. मनात शांतीसागर साठण, एकही भावतरंग न उमठण, कर्म करून त्यापासून अलिप्त राहण, यासारख्या मौल्यवान बाबी जीवनाला परिपूर्णता देणाऱ्या सोप्या गोष्टी आपण हळूहळू अनुभवू शकु. पण आधी त्या मार्गावरून थोडं का होईना चालावं लागेल. हे अनुभव घ्यावे लागतील. शेवटी आपला संबंध सत्याशी येईल व तो आला पाहिजे ही भावनासुद्धा सत्याचा अंश म्हणावी लागेल. शेवटी ध्येय व ध्येयाप्रत पोहोचण्याची तळमळ ही एक जरी नसली तरी अंशतः ती एकच आहेत. आपण एखाद्या विशिष्ट गावाला निघालोत. उचललेले प्रत्येक पाऊल म्हणजे आपण योजिलेलं गाव नव्हे. पण त्या गावापर्यंत जाण्यासाठी केलेली धडपड आहे. आपली अनेक पावलं आपल्याला त्या गावापर्यंत नेतात. तद्वतच सत्य शोधण्यासाठी केलेली तळमळ किंवा आपली धडपड असू शकेल. शेवटी हीच तळमळ आपल्याला सत्य दाखवून सोडल्याशिवाय राहणार नाही.
ज्यांचा संबंध त्यागाशी आला त्यांच्या जीवनाच सोन होऊन गेले आहे. त्याग वस्तू, व्यक्ती किंवा आवडत्या गोष्टींचा असू शकतो. भावनांचा त्याग त्यामानाने सगळ्यात उच्च होय. त्यागाचा स्पर्श परिसस्पर्शपेक्षा यत्किंचित कमी प्रतीचा नसावा. त्यागाची भावनाच मुळात उच्च कोटीतील आहे. त्याग स्वार्थासाठीही असू शकतो. स्वार्थाने केलेला त्याग बराच. पण त्यांची नैतिकता खालच्या पातळीवरील होईल. त्याग कशासाठी करायचा? तो कोणासाठी करायचा? किती करायचा? हे आधी निश्चित करून केलेला त्याग, चांगली फळे घेऊन येऊ शकेल. अनेकांनी देशाला स्वातंत्र्य मिळताना सर्वस्वाचा त्याग केला. हा त्याग भारतभूमीच्या कर्जातून उतराई होण्याचा प्रयत्न होता. तो कधीही चांगलाच होय. त्यागाच मूळ मनात आहे. स्वार्थ व त्याग एकाच ठिकाणी उगम पावणारे पण विरुद्ध दिशेने वाहणारे प्रवाह आहेत. स्वार्थ म्हणजे जस पायात पाहणे असत तसं त्याग म्हणजे दूरदृष्टी होय.त्यागात प्रेम आहे. स्वार्थात मत्सर, द्वेष आहे. त्याग म्हणजे सर्व सोडणे. त्याग म्हणजे अर्पण करणे. आणि त्याग म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्याकडील इतरांना देणं किंवा वर्ज्य करणं होय.
विनोबा भावे हे एक त्यागी व्यक्तिमत्व होतं. भूदान चळवळीची सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली. सर्व जमीन दान करून इतरांना दान करण्यास त्यांनी उद्युक्त केले. विनोबाजींच्याजवळ हा त्याग आला कुठून? त्यांच्या त्यागाच मूळ महात्मा गांधींजींच्या व्यक्तीमत्वात लपलेला आहे. महात्मा गांधीजींचे जीवन त्यागाचं ज्वलंत उदाहरण आहे. गांधीजींनी त्यागाची सुरुवात स्वतःपासून करून समाजापर्यंत स्फुर्तीदायकपद्धतींन पोहोचवली. त्याग म्हणजे दिव्यत्वाची प्रचिती आहे. गांधीजींच्या जीवनात त्यागाला अनन्यसाधारण महत्त्व होत. त्यांचे चारित्र्य त्यागाने भरून वाहते आहे. सत्याचा किंवा अहिंसेचा अंश त्यागात असू शकतो हे गांधीजींच चरित्र चांगल्याप्रकारे शिकवून काढत. त्यागातील ताकद तिथं दृष्टीपथात येते. गांधीजींच्या पाठीमागे सारा देश उभा होता. पण स्वतः गांधीजींचे जीवन त्याग, सत्य, अहिंसा यासारख्या महान तत्वावर आधारित होत. विनोबाजींच्यावर गांधीजींचा मोठा प्रभाव होता. या प्रभावामुळेच विनोबाजी भूदानासारखी आगळीवेगळी चळवळ उभी करू शकले व ती यशस्वीपणे राबवू शकले. त्यांनी अशा पद्धतीने त्यागाच मूर्तीमंत उदाहरण भारतीयांसमोर ठेवल. भारताच्या इतिहासामध्ये विनोबाजींना जे वेगळे स्थान आहे, त्यात गांधीजींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव असल्याचे दिसून येत. स्वतः गांधीजींनी जो त्यागाचा मार्ग धरला होता, तो तर विलक्षण व खडतर होताच. पण त्याचबरोबर विनोबाजीसारख्या अनेक अनुयायांना तो त्याग प्रेरणास्थान बनून गेला.
त्यागाची प्रेरणा ज्याच्यापासून घेतली जाते, त्याचा त्याग निश्चितच उच्च कोटीतील असणार यात दुमत असण्याच कारण नाही. गांधीजींनी आहारात मिठाचा त्याग केला. हा तसा साधाच पण एक प्रकारचा त्याग आहे. जेवताना अन्नात मिठ न टाकता जेवण करणं किती कठीण जातं हे अनुभवातून पाहिलं तर त्यांचा हा त्याग किती मोठा होता हे सिद्ध होईल. आजच्या चंगळवादात मिठाशिवाय जेवण रुचकर लागणे अशक्यप्राय आहे. आपण मिठाचा त्याग करायचा म्हणालो तरी तो का करायचा किंवा करायचा की नाही, यासारखे प्रश्न निर्माण होतात. शरीरासाठी जेवणं वेगळं व जिभेसाठी जेवणं वेगळं. चंगळवादात सर्व इंद्रियांची सुखं आहेत. तर त्यागात इंद्रियांच्या सुखाला मज्जाव आहे. ते कितपत आपल्या पचनी पडणार आहे, हे आधी पाहिले पाहिजे. त्यागात परमेश्वर आहे. पण तो मनोभावे पूजला पाहिजे. नाहीतर त्याचे दर्शन होईलच असं नाही. एशोआरामाची भाषा त्यागाच्या विरुद्ध दिशेचा प्रवास होय. विरुद्ध दिशेचा प्रवास इच्छुक ध्येयापर्यंत नेऊ शकणार नाही. ध्येयाविषयी संभ्रमच त्यामुळे तयार होईल. मनात एक अराजकता निर्माण होऊन त्यागाऐवजी सुखासीनता बोकाळेल. त्याग चित्ताची शुद्धी व शांतता करतो. त्याग निस्वार्थी असेल, तर तो मन स्थिर केल्याशिवाय राहणार नाही. त्याचा प्रभाव अनुभवण्यासाठी सिद्ध झाल पाहिजे. त्यागाशी आलेला संबंध एक वेगळ्याच प्रकारचा प्रभाव आपल्यावर पाडतो. असा प्रभाव व त्याचे परिणाम दीर्घकाळासाठी असतात. तसेच ते परिणाम चांगलेदेखील असतात. महानता अनुभवण्यासाठी त्याग केला पाहिजे. त्याग करण्यासाठी आपल्याकडे काहीतरी त्यागमय असले पाहिजे, हे तितकच खर आहे. ज्यांच्याजवळ त्याग करण्यासारखं काही नाही, त्याच्यासाठी त्यागाचा प्रश्नच येत नाही. एक भिकारी काय त्याग करू शकतो? त्याने केलेला पैशाचा त्याग, त्याग असू शकेल काय? म्हणून त्याग करण्यासाठी, स्वतःजवळ त्यागयोग्य काही असणं अधिक महत्त्वाचं होऊन जातं. नाहीतर त्या त्यागाला काडीची किंमत येणार नाही. तो त्याग न होता त्यागाच ढोंग होईल. त्याग वेगळा व त्यागाचे ढोंग वेगळे. ते तर एक भयानक रूप आणि मनाचा कुरूप चेहरा होय. त्याग अंतकरणात खोल परिणाम करून चित्त ढवळून काढतो. त्यागात विचारशिलता आहे. विवेक व निष्कपट आहे. निस्वार्थ आणि बरीच उच्च मूल्ये अंतर्भूत आहेत.
संबंध हा शब्द सर्व बाबींशी तसा संबंधित आहे. इथं कोणतीच बाब किंवा गोष्ट नाही जी दुसऱ्या कोणत्याच बाबींशी किंवा वस्तूशी संबंधीत नाही. एका व्यक्तीचा इतर हजार व्यक्तींशी संबंध येतो. चांगली सोबत लाभणे म्हणजे त्या व्यक्तीचा चांगल्याशी आलेला संबंध होय. 'सुसंगती सदा घडो, सृजनवाक्य कानी पडो' अशी रास्त अपेक्षा सर्वजण व्यक्त करतात. ती करणेही तसे रास्त आहे. कारण संगतीतच माणूस घडतो किंवा बिघडतो. संगतीच्या संबंधाचा प्रभाव व्यक्तीवर विचित्र पद्धतीने पडतो. अनेक व्यक्तिमत्व चांगल्या माणसाच्या सहवासाने बहरतात. समाजात तीन प्रकारच्या मुख्य विचारसरणीची माणसं असतात. चांगल्या, वाईट व स्थिर विचारसारणीची ही माणसं होत. स्थिर विचारसरणीची व्यक्तिमत्त्व साचेबद्ध जीवन जगतात. त्यांच्या जगण्यात चांगल किंवा वाईटांशी फारसा संबंध नसतो. आला तरी त्याविषयीची एक तटस्थता इथे पाहायला मिळते. जगणं उद्दिष्ट घेऊन ही माणसं समाजात वावरताना आपल्याला पहावयास मिळतात. परिस्थिती कशीही असो, हे लोक त्यावर जास्त विचार करत बसत नाहीत. आल्या प्रसंगाला बिनबोभाट तोंड देतात. वाईट स्वभावाची माणसं इतरांवर त्याच प्रकारचा अनिष्ट परिणाम सोडतात. ती वाईट करण्याची कोणतीच संधी सोडत नाहीत. अशांना अराजकता पाहताना आसुरी आनंद होतो. जी माणस चांगल्या स्वभावाची आहेत, त्यांचं वर्गीकरण अनेक प्रकारे करता येऊ शकेल. स्वतःसाठी चांगलं, घरातील किंवा जवळच्यासाठी चांगलं, जो कोणी संबंधात येईल त्यांच्यासाठी चांगलं किंवा यापेक्षा वेगळ्या पद्धतीने चांगल्या माणसाचे वर्गीकरण आपल्याला करता येईल. जो जो सहवासात येईल, त्याला चांगल्याची ओळख आणि सवय देणारी माणसं सर्वश्रेष्ठ होत. गांधीजींचा स्वभाव सर्वांना परिचित आहे. त्यांच्या पश्चात या देशात गांधीवादी विचारसरणीचे हजारो गांधीजी तयार झाले होते. आजही त्या वाटेवरून खडतरपणे निश्चल मनाने प्रवास करणारे कित्येक गांधी भेटतात. हा केवळ गांधींच्या विचारांचा विजय आहे. चांगल्या विचारांशी संबंधित सर्वच चांगलं मानाव लागेल. एका चांगल्यापोटी हजार सत्कृत्यांचा जन्म होतो. त्यामुळे चांगल्या विचारांच्या माणसाशी संबंध येण तसं कधीही चांगलंच होय.
काही संबंध सहज उलघडणारे असतात. तर काही संबंध कितीही विचार केला तरी समजून येत नाहीत. आई बाळावर जीवापाड प्रेम का करते? फुलं का उमलतात? किंवा माणसं दृष्ट का वागतात? त्यांना त्यातून काय साध्य करायचे असते? किंवा निसर्ग कधीमध्ये इतका क्रूरपणे का वागतो? फुलांसारखा भावनिक संबंध, विघातकी प्रवृत्यांसारखा मानव जातीला काळीमा फासणारा संबंध किंवा निसर्गाच्या नैसर्गिक क्रूरपणाचा सहसंबंध कितीही विचार केला तरी त्याचा उलगडा सहजासहजी होत नाही. संकटात मदतीला धावून येणाऱ्या हाताचा संबंध कोणाशीही नसून, तो फक्त माणुसकीशी असतो. पीडितांना न्याय मिळवून देणारी माणसं समाजात सुख पेरणारी असतात. दीन, दुबळ्यांच्या सेवेत परमेश्वर मानणारी माणसं म्हणजे दुःख संपविण्यासाठी विडा उचलून झपाटल्यासारखे काम करणारे युद्धे होत. त्यांच्या कामाचा आढावा घेणे तसं चुकीच आहे. समाजातील एक दुःख संपविणारा व हजार दुःख संपविणारा, दोहोंची तुलना कधीच करता येणार नाही किंवा त्यांच्या कार्यामुळे यातील कोणाला श्रेष्ठत्व द्यायचा हा प्रश्न कधीच तयार होता कामा नये. रामाला सेतू बांधण्यासाठी सर्वांनी मदत केली. छोटे छोटे प्राणीदेखील त्यात होते. त्यांच्या आवाक्यातील काम त्यांनी केल. म्हणून त्यांचा दर्जा कमी, असं म्हणता येणार नाही. चांगले हे अत्तराच्या वासासारख असत. अत्तराच्या वासात राहिल तरी चांगलं. अत्तराचा ओझरता वास आला तरी तो चांगलाच होय.
वाऱ्याचा स्वैरपणाशी येणारा संबंध किंवा खळखळून वाहणाऱ्या पाण्याचा मुक्ततेशी येणारा संबंध हे काही निसर्गाचे मापदंड आहेत. त्यातील कोणावरच कोणाची सत्ता असू नये. मुक्तपणाशी आलेला संबंध अवघं जीवन उजळून प्रकाशमय करतो. निसर्ग मुक्त आहे. निसर्गातून मिळणारा मुक्तपणाचा संदेश दुसरा कुठेच अनुभवता येणार नाही. त्याच्या मुक्तपणाची तुलनाही होणार नाही. वाऱ्याची झुळूक कुठंही जाते व आपल चैतन्य व सळाळी तिथं ओतून पुढच्या प्रवासाला निघते. पाऊस मुक्त व अनियंत्रितपणे बरसतो आणि अनेकांची मनं भरून टाकतो. अनेकांच्या आशांना त्यामुळे कोंब फुटतात. पाऊस फक्त पाणी देतो असं म्हणणं कदाचित चुकीचे होईल. पावसात कविता आहे, सौंदर्य आहे, कोमलता आहे, रसिकता आहे, प्रेम आहे आणि आहेत पावसातल्या आठवणीसुद्धा. पाऊस येतो व त्याच्याबरोबर फुलांना फुलवण्यासाठी उमेद आणतो. सगळीकडे जीवन देऊन निघुन जातो. त्याच्या येण्याने, त्याच्या मुक्तपणे व उदारमनाने भरभरून कोसळण्यातील औदार्य खचितच दुसऱ्या कुठं पहावयास मिळेल. एरवी आपल्यावर बऱ्याच गोष्टींची कोसळाकोसळ चाललेली असतेच. पण जीवनात पावसाच्या निरपेक्ष कोसळण्याइतक गुदगुल्या करून कोणतीच गोष्ट जात नाही. पावसाच्या वर्षावाची जाणीव होण्यासाठी मनसुद्धा तितकच जाणिवेन भराव लागत. मनातील ही जाणीव पावसाच चिंब करून ठेवणं अविस्मरणीय करून ठेवते. पावसात भिजणं व भिजलेल्या पावसात तळलेले खमंग पदार्थ फस्त करण, इतक्याच पावसाळ्यातील आठवणी आज दुर्दैवानं होऊ पाहताहेत. पावसाच्या आठवणींच्या कक्षा त्याहीपलीकडे जाऊन रुंदावन गरजेच आहे. पाऊस निमित्त आहे. त्याच्या आड जाऊन बऱ्याच सुखसंध्याचा उपभोग घेणे हा पावसावरील अन्याय होईल. पावसात भिजून धुंद होणे व कृत्रिमरीत्या बेधूंद होण, या विचार करायला लावणाऱ्या बाबी आहेत. पावसातील आठवणीने मन बहरून जाण्याऐवजी गहिवरून येत. अशांचा पावसाशी काडीचाही संबंध असू नये. निसर्गात कुठेही खोटेपणा नाही. एक सत्य व नित्य तत्वाने भरभरून ओसांडणारा संदेश निसर्गात आहे. मग आपण हे असे कसे? आपणसुद्धा याच निसर्गाचा छोटासा अंश आहोत. आपली नाळ याच निसर्गात खोलवर कुठतरी आहे. याचा आपल्याला विसर पडू नये. निसर्गातील सर्व तत्व तर माझ्यात आहेत. मग मी असा कसा?
माणसाला बुद्धी दिली पण त्याच्याबरोबर परमेश्वराने एक अप्रतिम बाबही दिली ती म्हणजे विवेक. विवेक प्रत्येकाच्या अंतकरणात आहे. चांगल आणि वाईट वेगळं करण्याचं सामर्थ्य विवेकात आहे. विवेक हे महान मानवी मूल्य आहे. क्षणभंगुर सुखासीनता विवेकाची ज्योत विझवण्यास कारणीभूत होते. सारासार विचारधिनता नष्ट होवून विचार प्रक्रिया मंद होते. प्रसंगी थांबते देखील. विचारांच थांबणं आणि अज्ञानाचा प्रारंभ या दोन एकच बाबी आहेत. वरकरणी वेगळ्या वाटल्या तरी त्या एकाच ठिकाणावरून उगम पावतात. ते ठिकाण म्हणजे विवेकशून्यता. विवेकी होण्याचा प्रारंभ व ज्ञानी बनण्याचा मार्ग सारासार विचारसरणीतुनचं जन्मतो. निसर्गातील काही मोजकी तत्व अंतर्मनात विराजित करण्याचा प्रयत्न म्हणजेच निसर्गाशी मिळविलेला मैत्रीचा हात होय. निसर्गाशी असा संबंध म्हणजे मुक्ततेशी पडलेली गाठ होय. निसर्ग मुक्त, आपण मात्र साखळदंडात राहणं कितपत योग्य आहे? निसर्गातून निसर्गाकडे म्हणजेच मुक्तपणा होय. मुक्ती यापेक्षा वेगळी काय असू शकेल? कुणावर अन्याय करून, कोणाचा खून करून किंवा अवैध धनसंपदा साठवून मुक्तीची वाट पाहणं म्हणजे निव्वळ खुळचटपणा होय. विचारांचा कृत्रिम धांद्रटपणा असाही त्याचा उल्लेख करता येईल.
सारासार विचार केला तर प्रेमाचे संबंध सर्व नाती अजरामर करून टाकतात. प्रेम मुक्या प्राण्यावर केले तरीदेखील त्या प्रेमाची भाषा त्यांना समजते. वस्तूवर केलेले प्रेमसुद्धा वस्तू परतफेड करते. प्रेम दगडाला पाझर फोडते. आजवर अनेकांनी जगावर राज्य करण्याची भाषा केली. काहींनी तसा प्रयत्नही केला. पण आजपर्यंत ते कोणालाही शक्य झाले नाही. ज्यांनी प्रेमातून जगाशी संबंध प्रस्थापित केले, त्यांनी जगावर अनामिक राज्य केल. इतरांच्या हृदयात फक्त प्रेमाच्या रूपाने आपण जागा मिळऊ शकतो. प्रेमाने सर्व जग जिंकता येते. प्रेमाचे संबंध फक्त संबंध नसून एक जिव्हाळा असतो. प्रेम म्हणजे आत्मीयता आहे. त्याच्यात सर्व चांगल्या बाबी आहेत. निरपेक्ष प्रेम तर सर्वोच्च आहे. त्याची तुलना इतर कशाशीही होऊ शकणार नाही. सर्व संबंधात फक्त प्रेमाचे, जिव्हाळ्याचे संबंध चांगले होत. प्रेमाचे संबंध सर्वांशी येण्यासाठी प्रेम समजून घेतलं पाहिजे. एक निरिच्छ, निर्हेतुक प्रेम संबंधच माणसाची व माणुसकीची कुळी उंचावण्यास कारणीभूत ठरतील. 300706 ©Harish Gore
No comments:
Post a Comment